१९८०-२०१२
श्रद्धेय विलासरावजी देशमुखसाहेब यांनी लातूर शहराचा ४२ वर्षांत भौगोलिक विकासातून मानवी आर्थिक विकास कशा पद्धतीने केला, १९८० पासून साहेबांनी जी आर्थिक विकासाची वृक्ष लागवड केली त्या वटवृक्षाची गोड, रसाळ फळे आज लातूरकरांना चाखायला मिळत आहेत. त्यांच्या सावलीखाली लातूरकर आपले जीवन जगत आहेत. हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तिमत्त्व, संयमी स्वभाव, धूर्त व मुरब्बीपणा, हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य अशा वैशिष्ट्यांमुळे श्रद्धेय विलासरावजी देशमुखसाहेब यांच्याभोवती लोकप्रियतेचे वलय आणि चाहत्यांचे वर्तुळ महाराष्ट्र राज्यात निर्माण झाले होते. १९८० साली महाराष्ट्र विधानसभेवर लातूर तालुका मतदारसंघातून ते निवडून गेले. १९८२ मध्ये मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षांत मंत्रिपद मिळालेल्या विलासरावजी देशमुख साहेबांनी नंतर मागे वळून पाहिलेच नाही.
पुढे १९९५ पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले पण विलासरावजी देशमुख साहेब सदैव मंत्रिमंडळात राहिले.
शिक्षण, कृषी, उद्योग, परिवहन, महसूल, सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमतेने केला. १९९९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची सत्ता गेली. विलासरावजी देशमुखसाहेब हे लातूर मतदारसंघामध्ये ९५००० मतांच्या फरकाने निवडून आले. या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. म्हणून सत्ता स्थापनेचा काँग्रेस पक्षाचा अधिकार होता. काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने सत्ता हस्तगत करण्याचा निर्णय घेतला. अशा वेळी तडजोडीचा उमेदवार मुख्यमंत्रिपदासाठी शोधणे गरजेचे होते म्हणून लातूर जिल्ह्याचे विलासरावजी देशमुख साहेब हे १९९९ ते २००३ आणि नंतर २००४ ते २००९ असे दोन टर्म ८ वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनंतर ते सर्वांत जास्त काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर राहिले.
या काळात छगन भुजबळ, आर.आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्रिपदावर बदलले पण विलासरावजी देशमुख साहेबांनी सर्वांशी जमवून घेताना आपले वर्चस्व कायम राखले व दिल्लीमध्ये अवजड उद्योगाचे केंद्रीय मंत्री झाले. त्यामुळे त्यांची इमेज अद्याप संपलेली नाही, असे त्यांनी दाखवून दिले होते.
राज्यातील पहिला जनता दरबार
१९८० ला लातूर हा तालुका होता. उस्मानाबाद हा जिल्हा होता. औसा हनुमान-गांधी चौकपर्यंतच लातूर शहर होते. आझाद चौक परिसरात मुख्य बाजारपेठ होती. अशा अविकसित लातूर शहरामध्ये साहेब पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने लातूर नगर परिषद बरखास्त करून प्रशासक नियुक्त केलेला होता. साहेबांनी लातूर शहरात जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी व त्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जनता दरबार घेण्याचे जाहीर केले, नगर परिषदेचे प्रशासक, त्याचे सर्व अधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, एम. एस. ई. बी.चे सर्व अधिकारी या सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक वॉर्डमध्ये जनतेच्या सोबत बैठक घेऊन जनतेचे सार्वजनिक, वैयक्तिक प्रश्न समजून घेऊन जनता दरबारमध्ये प्रश्न सोडवित होते. नगर परिषदेच्या मूलभूत सुविधा, एम. एस. ई.बी. च्या लाईटच्या समस्या, अडचणी, तहसील कार्यालयातील रेशनकार्ड, स्वस्त धान्य दुकानातील धान्यासंबंधीच्या सर्व अडचणी संबंधित कार्यालयात लातूरकरांना चकरा न मारता घरबसल्या सर्व अडचणी दूर होत होत्या. यामुळे लातुरातील जनतेचा वेळ व पैसा खर्च न होता सार्वजनिक आणि वैयक्तिक कामे होत होती. म्हणून साहेब घेत असलेल्या जनता दरबाराची चर्चा राज्यात झाली होती.
मांजरा नदीची दिशा बदलली
लातूर जिल्ह्यामध्ये एकच मांजरा नदी मोठी असून ती नदी पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेला वाहते. पावसाचे पडलेले पाणी नदीच्या पात्रात जमा झाल्यावर ते पाणी कर्नाटक राज्यात वाहून जात होते. भर पावसाळ्यामध्ये नदीकाठच्या गावातील माणसांना व जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. शेतक-यांच्या शेतीला पाणी मिळेल ही अपेक्षा शेतकरी ठेवत नव्हते, म्हणून शेतकरी कोरडवाहू हायब्रीड ज्वारी आणि तूर पिकवत असे. ही समस्या साहेबांच्या निदर्शनास आल्यानंतर मांजरा नदीच्या पात्रातच पावसाचे पडलेले पाणी अडविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. सोबतच धनेगाव डॅममध्ये असलेले पाणी कॅनॉलच्या माध्यमातून मांजरा पट्ट्यातील शेतक-यांच्या शेतापर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही कामांचे अंदाजपत्रक संबंधित कार्यालयाकडून तयार करून घेतले.
महाराष्ट्र सरकारकडे सतत पाठपुरावा करून या दोन्ही विकासकामांसाठी बजेट मंजूर करून घेतले. साहेबांनी या कामाचे बजेट खेचून आणल्यानंतर मांजरा नदीवर ठिकठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यास सुरुवात झाली. तसेच धनेगाव डॅमपासून मांजरा पट्ट्यामध्ये कॅनॉल बांधण्यास सुरुवात केली. या दोन्ही विकास कामांची निर्मिती झाल्यानंतर मांजरा नदीच्या पात्रात पावसाचे पडलेले पाणी नदीच्या पात्रातच उभे राहू लागले. मांजरा नदी जी पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे वाहत होती. तिची कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधल्यामुळे दिशा बदलली आणि ती पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे वाहू लागली.
शेतक-यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांतीचे स्वप्न उराशी बाळगून साहेब निष्ठेने काम करीत असलेले पाहून शेतक-यांनी साहेबांवर विश्वास ठेवला. साहेबांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला. मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स खरेदी करून आपल्या शेतामध्ये ऊस लागवड केली. साहेबांनी साखर कारखाना उभा करून दाखवला आणि देशाचे पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या शुभहस्ते सर्व शेतक-यांना सोबत घेऊन साखर कारखान्याचे शानदार उद्घाटन केले. शेतक-याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांतीला सुरुवात केली.
पायाभूत व मूलभूत सुविधांतून आर्थिक विकास
साहेब आमदार झाल्यावर महाराष्ट्र सरकारचे बजेट खेचून आणण्यास सुरुवात केली. लातूरकरांना मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ लागले. अनेक जुन्या शासकीय इमारती तोडून नवी आधुनिक भव्य शासकीय कार्यालये उभी केली. विभागीय शासकीय कार्यालये उभी केली. नवीन रस्ते, गटारी बांधल्या. दलित वस्त्यांमध्ये समाजमंदिर बांधले, शासकीय मेडिकल कॉलेज उभे केले. सर्वांना मोफत आरोग्य सुविधा मिळू लागल्या. शहराचे सुशोभीकरण केले, वाहतूक सुरळीत होण्यासाठी उड्डाणपूल बांधले गेले.
धर्मनिरपेक्षतेमुळे आर्थिक विकास
लातूर शहरामध्ये धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता या दोन विचारधारेवर निवडणुका झाल्या आहेत. साहेबांची धर्मनिरपेक्षता आणि सर्वांचा आर्थिक विकास याच विचारसरणीवर आयुष्यभर कार्य केले. साहेबांनी मानवी आर्थिक विकास करताना शेतकरी कोणत्या समाजाचा आहे हे पाहिले नाही., त्या जमिनी कुठे आहेत हे पाहिले नाही. सर्व समाजाच्या शेतक-यांचा आर्थिक विकास, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव याच विचारांनी साहेबांनी काम केले. महाराष्ट्र राज्यात हजारो शेतक-यांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्या पण १९८० पासून आजपर्यंत लातूर शहरामध्ये आर्थिक अडचणीमुळे एकाही शेतक-याने आत्महत्या केल्याची नोंद शासकीय कार्यालयात दिसून येत नाही.
‘लातूर पॅटर्न’च्या माध्यमातून आर्थिक विकास
लातूर शहराचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे मानवी आर्थिक विकास होत गेला. साहेबांनी लातूर जिल्हा केल्यामुळे अनेक विभागीय कार्यालये, नवीन शासकीय कार्यालये सुरू झाली. साहेबांनी मागेल त्या संस्थाचालकांना प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय, उर्दू शाळा, इंग्रजी शाळा, आश्रमशाळांना शासनाकडून परवानगी मिळवून दिली. संस्थाचालकांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळवून दिले. लातूर शहरात शिक्षणाचा पॅटर्न निर्माण केला. शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवल्यामुळेच अनेक राज्यांतील मुले शिक्षण घेण्यासाठी लातूर शहरात येऊ लागली. सर्व विषयांचे क्लासेस सुरू झाले. मुले मेरिटमध्ये येऊ लागली.
हॉकर्स कुटुंबांचा आर्थिक विकास
लातूर शहरामध्ये १० ते १२ हजार हॉकर्स (हातगाडीवाले) छोटे व्यापारी आहेत. त्यांना स्वत:च्या मालकीची जागा नसल्यामुळे रस्त्यावर उभे राहून, फिरून आपला छोटासा व्यवसाय करतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात.
त्या छोट्या हॉकर्सना साहेबांचे संरक्षण होते. त्यांना पोलिस, नगर परिषदेचा त्रास होऊ दिला नाही. सदैव हॉकर्सच्या बाजूनेच निर्णय घेत असत. म्हणून हे सर्व हॉकर्स व त्यांचे कुटुंब साहेबांच्या सोबत राहून शहराच्या विकासामध्ये योगदान देत साहेबांच्या पाठीमागे खंबिरपणे उभे राहत होते.
धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव, ‘ना जात पर ना पात पर, सिर्फ आर्थिक विकासपर,’ ही विचारधारा स्वीकारून साहेबांनी कार्य केले. याच विचारसरणीमुळे व त्यांच्या पुण्याईमुळेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासरावजी देशमुख , धिरज विलासरावजी देशमुख हे दोन सुपुत्र साहेबांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे घेऊन जात आहेत. भविष्यात यांच्या कार्याचे फायदे लातूर शहराला मिळत राहतील. साहेबांनी लातूर शहराला महाराष्ट्र राज्याला ‘टॉप टेन’ मध्ये आणण्याचे स्वप्न पाहिले होते. ते अपूर्ण स्वप्न अमितजी विलासरावजी देशमुख साहेब पूर्ण करणार आहेत, यात लातूरकरांना तिळमात्र शंका नाही. साहेबांनी केलेली आर्थिक विकासाची बांधणी ही ऐतिहासिक, अभूतपूर्व अशी आहे. भविष्यात या निर्णयाचे फायदे लातूर शहराला, लातूरकरांना सतत मिळोत, साहेबांच्या पुण्याईमुळे, साहेबांच्या कर्तृत्वामुळे लातूरकरांचे सहकार्य आणि आशीर्वाद या दोन्ही कर्तव्यदक्ष सुपुत्रांना सतत मिळोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
-दगडूआप्पा मिटकरी
उपाध्यक्ष, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी