25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeविशेषमहाघसरणीचे सावट

महाघसरणीचे सावट

एकमत ऑनलाईन

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने दरवाढीबाबत कठोर पावले उचलावी लागणार असल्याचे सूतोवाच केल्यामुळे अमेरिकन बाजारात खूप मोठी पडझड झाली आहे. याचे पडसाद चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारातही पहायला मिळणार आहेत. फेडचे अध्यक्ष पॉवेल यांचे एकंदर भाषण हे आगामी अर्थकाळ कठीण असल्याचे संकेत देणारे असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सलग पाच आठवडे चाललेल्या तेजीला गतसप्ताहात ब्रेक लागला आहे; आता घसरणीच्या लाटेत बाजार किती खाली जातो की पुन्हा आश्चर्याचा धक्का देतो हे पाहावे लागेल. देशांतर्गत पातळीवरील स्थिती कितीही भक्कम असली आणि सकारात्मक असली तरी भारतीय शेअर बाजार हा जागतिक संकेतांनुसार हेलकावे खात असतो. हे हेलकावे बरेचदा अपेक्षेप्रमाणे असतात; तर काही वेळा सर्व अटकळींना चकवा देणारेही असतात. याचे उत्तम उदाहरण गेल्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून झालेल्या व्याजदरवाढीनंतर पहायला मिळाले. अनेकांना फेडने केलेल्या अर्ध्या टक्क्याच्या व्याजदरवाढीमुळे बाजारात घसरण येईल अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने मंदीवाल्यांनी जोरदार तयारीही केली होती; मात्र अपेक्षेपेक्षा कमी दरवाढ केल्यामुळे आणि एकंदर अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या काहीशा सकारात्मक भाषणामुळे गुंतवणूकदारांमधील उत्साह वाढलेला दिसून आला आणि सर्व अंदाज खोटे ठरवत अमेरिकन बाजारातील सर्व निर्देशांकांनी जोरदार आगेकूच केली. भारतीय शेअर बाजारातही याचेच तंतोतंत प्रतिबिंब उमटल्याचे पहायला मिळाले. २७ जुलै रोजीच्या १६,४४७ या पातळीपासून अवघ्या २०-२२ दिवसांत निफ्टीने १८ हजारांच्या पातळीपर्यंत भरारी घेतली; तर बँक निफ्टीने ३६,२५० पासून ३९,७५० पर्यंतची जबरदस्त घोडदौड केली.

या भरारीप्रवासामध्ये प्रत्येक टप्प्यावर मंदीवाले आणि बहुतांश गुंतवणूकदार सजग होऊन ‘आता यापुढे बाजार जाणार नाही’ असा विचार करत होते; परंतु मजल-दरमजल करत निफ्टी, बँक निफ्टीसह सेन्सेक्स आणि अन्य क्षेत्रांचे निर्देशांक झेपावताना दिसले. या तेजीमुळे मागील काळात नुकसान सहन कराव्या लागलेल्या अनेक गुंतवणूकदारांच्या चेह-यावर हास्याची लकेर उमटलेली दिसली. तथापि, ऑगस्ट सिरीजच्या शेवटच्या आठवड्यात बाजाराची वाटचाल काहीशी मंदावलेली दिसून आली. याचे मुख्य कारण म्हणजे २६ ऑगस्ट रोजी फेड रिझर्व्हकडून आगामी दरवाढीविषयीच्या धोरणाविषयीचा सारांश मांडण्यात येणार होता. त्यानुसार शुक्रवारी रात्री फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी जॅक्सन होल सिंपोयिझम येथे हे धोरण मांडले. त्यामध्ये महागाईविरोधातील लढाई सुरू राहील, दरवाढीवर नियंत्रण आणण्यास काही काळ जावा लागणार आहे, यामुळे आर्थिक स्थितीवर काहीसा ताण येऊ शकतो, कर्जे महाग झाल्यामुळे आर्थिक विकास मंदावू शकतो, बेरोजगारी वाढण्याचाही धोका आहे; हे कटू असले तरी महागाई कमी करण्यात अपयश आल्यास ते अधिक वेदनादायी असेल असे सांगतानाच कठोर पावले उचलण्याचे सूतोवाच त्यांनी केले. तसेच व्याजदरात वाढीची गरज आगामी काळात कायम राहण्याचेही संकेत त्यांनी दिले. पॉवेल यांनी फेडची भूमिका जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अमेरिकन शेअर बाजारात अभूतपूर्व घसरण पहायला मिळाली.

शुक्रवारच्या सत्राची सांगता होताना डाऊ फ्युचर्स १०९७ अंकांनी म्हणजेच ३.०३ टक्क्यांनी, एस अँड पी फ्युचर्स १५५.५० अंकांनी म्हणजेच ३.७० टक्क्यांनी आणि नॅसडॅक ५९१ अंकांनी म्हणजेच ४.५० टक्क्यांनी घसरले. एसजीएक्स निफ्टीमध्येही २१५ अंकांची घसरण होऊन तो १७,४४४ वर आला आहे. पॉवेल यांच्या भाषणाचे पडसाद चालू आठवड्यात किंवा चालू आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारातही दिसून येणार आहेत. वास्तविक पाहता गतसप्ताहात झालेल्या अनेक चढउतारांनी सलग पाच आठवड्यांपासून चालत आलेल्या भारतीय शेअर बाजारातील तेजीला ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असणा-या सेन्सेक्समध्ये गतसप्ताहात ३१२.२८ अंकांची म्हणजेच १.३२ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली; तर निफ्टीमध्ये १९९.५५ अंकांची म्हणजेच १.१२ अंकांची घसरण झाली आणि हा निर्देशांक १७५५८.९ वर बंद झाला आहे. गतसप्ताहात सर्वाधिक घसरण झाली ती आयटी कंपन्यांच्या निर्देशांकामध्ये. जवळपास ४.५ टक्क्यांनी हा निर्देशांक घसरला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आतापर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात २-२ टक्के तेजी पहायला मिळाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांकडून मिळालेली खरेदीची साथ. गतसप्ताहात एफआयआयनी ४५०.३६ कोटींच्या समभागांची खरेदी केली; तर डीआयआयनी ५०३.३२ कोटींच्या समभागांची विक्री केली आहे.

चालू आठवड्याचा विचार करता निफ्टी १७,३५० च्या वर आहे तोपर्यंत काळजीचे फारसे कारण नाही. ही आधारपातळी तोडल्यास निफ्टी १७,१०० ते १७,००० पर्यंत खाली घसरू शकतो. विक्रीचा मारा खूपच जोरदार राहिल्यास चालू आठवड्यात १६,८५० पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे सोमवारचा दिवस खरे पाहता ट्रेडर्सनी वेट अँड वॉच हे तत्त्व अवलंबून अचूक वेळी योग्य रणनीती आखून ट्रेडिंग करण्याची गरज आहे. याचे कारण बाजारातील दोलायमानता प्रचंड वाढणार आहे. सेल ऑन राईज हे तत्त्व या आठवड्यात उपयुक्त ठरेल. १७,७३० ते १७,७८० या पातळीपासून निफ्टी सातत्याने मागे फिरत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच बँक निफ्टीमध्येही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्टॉप लॉस या सुरक्षाकवचाचा वापर केल्याशिवाय ट्रेडिंग करणे टाळावे. चालू आठवड्यात कोणते समभाग तेजीत राहतील याचा आढावा घेण्यापूर्वी फेड रिझर्व्हच्या दरवाढीचे परिणाम जाणून घ्यायला हवेत. अमेरिकेतील व्याजदरात वाढ झाल्यास डॉलर अधिक भक्कम होणार आहे आणि रुपया पुन्हा घसरणार आहे. याचा फटका आयातीवरील खर्च वाढण्यात होणार आहे. मुख्य म्हणजे कच्च्या तेलावरील आयातीसाठीचे अर्थगणित कोलमडणार आहे. तसेच आयात वस्तूंवर आधारित उद्योगांना अधिक पैसे मोजावे लागल्यामुळे उत्पादनखर्च वाढून त्याचा परिणाम नफ्यावर होणार आहे.

दुसरीकडे अमेरिकन अर्थव्यवस्थेत या दरवाढीमुळे कर्जे महाग होऊन मंदीचे सावट आल्यास त्याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. विशेषत: भारताच्या निर्यातीला याचा फटका बसू शकतो. तिसरीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेलाही येत्या काळात व्याजदरात वाढ करावी लागणार आहे. याचा परिणाम कर्जे महाग होण्यावर दिसून येईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेत व्याजदर वाढल्यास भारतासारख्या उभरत्या अर्थव्यवस्थांमधील विदेशी गुंतवणुकीचा ओघ माघारी फिरू शकतो. गेल्या महिन्याभरातील शेअर बाजाराच्या उसळीमध्ये एफआयआयकडून झालेली खरेदी मोलाची ठरली आहे; आता येत्या काळात जर पुन्हा एफआयआयचा विक्रीचा मारा सुरू झाल्यास बाजारात घसरण वाढण्याची भीती आहे. तथापि, भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्यामुळे आणि रिटेल गुंतवूकदारांची शक्ती वाढल्यामुळे फार मोठी पडझड होण्याची शक्यता नाही. परंतु हेलकावे वाढत राहतील हे नक्की. चालू आठवड्यात समभागांचा विचार करताना आधी म्हटल्यानुसार बाजारातील घसरणीचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्या. लवकरच शेअर बाजारातील सर्वांत दिग्गज कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सभा होणार आहे.

-संदीप पाटील
शेअर बाजारं अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या