34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeविशेषस्मार्टफोनने बदलला भोवताल

स्मार्टफोनने बदलला भोवताल

एकमत ऑनलाईन

तंत्रज्ञानाने आपल्या भोवतालाचे संपूर्ण चित्र बदलून टाकले आहे. तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्याला कधी गुपचूपपणे बदलून टाकले हे आपल्याला समजलेसुद्धा नाही. सध्या आपण सर्वजण संधी मिळेल तेव्हा मोबाईलची नवीन मॉडेल्स आणि पॅकेजच्या गप्पा सुरू करतो. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर तर आपल्या मूलभूत गरजांमध्येच जणू समाविष्ट झाले आहेत. मोबाईल फोनविना आपले जीवन अधुरे वाटू लागते. एखाद्या दिवशी जर आपला मोबाईल कुठे विसरला असेल किंवा नादुरुस्त झाल्यामुळे दुरुस्तीला दिला असेल तर त्या दिवसभरात आपण किती बेचैन होतो, याचा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने घेतला असेल. जीवनाचा एक कोपराच अधुरा असल्यासारखे अशा वेळी भासते. माहिती असो, व्यवसाय असो वा मनोरंजन असो, मोबाईल फोनचे या सर्व गोष्टींसाठी लोकांना जणू व्यसन लागले आहे. भारतातील मोबाईल वापरावर ‘नोकिया’ने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला.

या अहवालानुसार भारतातील लोक इतर देशांतील लोकांच्या तुलनेत स्मार्टफोनमध्ये सरासरी अधिक वेळ गढलेले असतात. या अहवालानुसार भारतीय रोज सुमारे पाच तास मोबाईलवर खर्च करतात. हा वेळ जगात सर्वाधिक आहे. भारतात स्मार्टफोनवर व्हीडीओ पाहण्याचा ट्रेण्ड खूपच वाढला आहे आणि २०२५ पर्यंत तो आजच्यापेक्षा चौपट होईल, असा अंदाज आहे. देशात गेल्या पाच वर्षांत डेटा ट्रॅफिकमध्ये जवळजवळ ६० पटींनी वाढ झाली आहे आणि हा एक विक्रम आहे. गेल्या वर्षी देशात एका सामान्य वापरकर्त्याचा मोबाईल डेटा उपयोग चार पटींनी वाढला. अहवालानुसार, २०२० मध्ये घरातून काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) गरजेमुळे डेटाचा वापर वेगाने वाढला. डेटा वापराच्या बाबतीत भारत मोठ्या बाजारपेठांमध्ये सामील झाला आहे. येथे प्रति वापरकर्ता प्रतिमहिना मोबाईल डेटा वापर १३.५ जीबीपेक्षा अधिक होत आहे.

अहवालानुसार, भारतात दरमहा प्रति वापरकर्ता डेटाचा वापर दरवर्षी तब्बल ७६ टक्क्यांनी वाढतो आहे. यापैकी ५५ टक्के डेटा छोटे व्हीडीओ पाहण्यासाठी खर्ची पडत आहे. अहवालानुसार, मोबाईलवर ब्रॉडबँडच्या सर्वाधिक वापराच्या बाबतीत फिनलँडच्या पाठोपाठ भारत जगात दुस-या स्थानावर आहे. डेटावापर वाढला आहे, ही चांगलीच गोष्ट आहे; परंतु हा वापर कशासाठी होत आहे हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यातून ज्ञानवर्धन होते असे व्हीडीओ लोकांनी पाहिले तर चांगलेच आहे. परंतु हा डेटावापर जर येताना विकृती घेऊन येत असेल तर मामला चिंताजनक आहे.

देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्टेटिस्का या सांख्यिकी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये भारतात सुमारे ७० कोटी इंटरनेट वापरकर्ते होते. २०२५ पर्यंत ही संख्या ९० कोटींच्या घरात जाईल, अशी शक्यता आहे. यात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमधील इंटरनेट युजर्सची संख्या वाढत चालली असल्याचे समोर आले आहे. चीनच्या पाठोपाठ भारत हा इंटरनेटचा दुस-या क्रमांकाचा मोठा बाजार आहे. सर्वांत थक्क करणारे वास्तव असे की, इंटरनेटचा वापर लोक स्मार्टफोनच्या माध्यमातून सर्वाधिक करतात. इंटरनेट वापरकर्त्यांचे एवढे प्रचंड प्रमाण असूनसुद्धा एक उणीव जाणवते, ती म्हणजे शहरी आणि ग्रामीण वापरकर्त्यांच्या संख्येत मोठे अंतर आहे. त्याचप्रमाणे महिला आणि पुरुष तसेच वयोवृद्ध आणि तरुण यांच्यादरम्यान वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड तफावत आढळते. कनेक्टिव्हिटी आणि कॉल ड्रॉपची समस्या सर्वांत मोठी आहे.

नांदेड जिल्ह्यात पुन्हा ६९ व्यक्ती पॉझिटिव्ह

बिहार, झारखंड राज्यांमधील कोणत्याही शहरात एखाद्याला फोन केल्यास कनेक्टिव्हिटीची समस्या किती गंभीर आहे हे समजते. त्याचप्रमाणे इंटरनेटचा वेग हीसुद्धा मोठी समस्या आहे. बँकेपासून शिक्षणापर्यंत सर्व कामकाज इंटरनेटच्या माध्यमातून होणे अपेक्षित असेल तर सर्वांना हायस्पीड आणि अखंडित इंटरनेट सेवा मिळाली पाहिजे, ही मागणी अवास्तव नाही. इंटरनेटसोबतच सोशल मीडियाचा वापर करणा-यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. २०१८ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३२.६१ कोटी लोक त्या वर्षापर्यंत सोशल मीडियाचा वापर करीत होते. २०२३ पर्यंत ४४.८ कोटी लोक सोशल मीडियाचा वापर करू लागतील असा अंदाज आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक हा सर्वांत लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. खेळांमध्ये सोशल मीडियावर आयपीएल सर्वांत लोकप्रिय आहे. जगभरात जेवढ्या क्रीडा स्पर्धा लीग स्वरूपात खेळविल्या जातात त्यात आयपीएल क्रिकेट स्पर्धा सर्वाधिक लाईक केली जाते.

आयपीएलच्या काही फेसबुक पोस्टवर ५.९ कोटींपर्यंत लाईक आले आहेत. ट्विटरवर सुमारे ५.८ कोटी लोक आयपीएलला फॉलो करतात. वास्तविक सोशल मीडिया कंपन्यांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळालेल्या माहितीनुसार जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे सुमारे एक अब्ज वापरकर्ते असून, त्यापैकी सुमारे २० कोटी भारतातील आहेत. फेसबुकचा वापर करणा-या भारतीयांची संख्या जवळजवळ ३४ कोटी आहे. ट्विटर अकाऊंट्सची संख्या सुमारे १.७५ कोटी इतकी आहे. सोशल मीडियाची सर्वांत मोठी समस्या म्हणजे हा मीडिया अनियंत्रित होत चालला आहे. या माध्यमातून चुकीच्या, खोट्या बातम्या झटकन पसरत आहेत. माहितीचा हा पर्यायी स्रोत आहे हे मान्य; परंतु तो खोट्या माहितीचा स्रोत अधिक होऊ लागला आहे.

‘नोकिया’च्या अहवालात म्हटले आहे की, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी वापरण्यात येणा-या अ‍ॅपचा वापर ३० टक्क्यांनी वाढला आहे. वास्तविक कोरोनाने शिक्षणाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले आहे. व्हर्च्युअल वर्गांमुळे इंटरनेटचे महत्त्व अचानक बरेच वाढले आहे. परंतु आपल्या देशातील एका मोठ्या वर्गाकडे ना स्मार्टफोन आहे, ना संगणक आहे आणि ना इंटरनेट कनेक्शन. आपण हे वास्तवही विसरता कामा नये. नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या सर्वेक्षणानुसार, केवळ २३.८ टक्के भारतीय घरांमध्येच इंटरनेटची सुविधा आहे. या बाबतीत ग्रामीण भाग खूपच पिछाडीवर आहे. शहरी घरांमध्ये ही उपलब्धता ४२ टक्के इतकी आहे. मात्र ग्रामीण घरांमध्ये ही उपलब्धता अवघी १४.९ टक्के इतकीच आहे. संगणक आणि इंटरनेट अशा दोन्ही सुविधा असणारी घरे केवळ ८ टक्के आहेत. देशात मोबाईलची उपलब्धता ७८ टक्के असल्याचे दिसून आले आहे. परंतु यातही शहरी आणि ग्रामीण भागामधील फरक मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ग्रामीण क्षेत्रात ५७ टक्के लोकांकडेच मोबाईल फोन आहे.

काही वर्षांपूर्वी बीबीसीच्या लंडन येथील मीडिया लीडरशिप इव्हेन्टमध्ये तंत्रज्ञानाच्या बदलत्या वास्तवासंबंधी विस्तृत चर्चा झाली होती. तंत्रज्ञानाच्या बाबतीत माध्यमांच्या क्षेत्रातही बरेच प्रयोग झाले आहेत. व्हॉईस टू टेक्स्ट अशी काही सॉफ्टवेअर विकसित करण्यात आली आहेत. लोक वर्तमानपत्रे तर वाचत आहेतच; शिवाय ते वेबसाईट आणि अन्य माध्यमांद्वारेही बातम्या प्राप्त करून वाचत आहेत. या दरम्यान आणखी एक रंजक माहिती समोर आली आहे. ती अशी की, युरोपात मोबाईलचा वापर करणारे लोक सरासरी दिवसातून २६१७ वेळा मोबाईलच्या स्क्रीनला स्पर्श करतात. कोरोना काळात या सरासरीत निश्चितपणे अधिक वाढ झाली आहे. भारतसुद्धा या बाबतीत फार मागे असेल असे वाटत नाही. आज जवळजवळ ७० कोटी भारतीय इंटरनेट युजर्स आहेत. तंत्रज्ञानाने आपल्याला जगाशी असे काही जोडले आहे की, आता या बदलांपासून आपण दूर राहूच शकत नाही.

महेश कोळी,
संगणक अभियंता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या