34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषलसीकरणाला हवी गती

लसीकरणाला हवी गती

कोरोनावरील लसीकरणास भारतात लवकर सुरुवात झाली असली, तरी त्याचा वेग अद्याप खूपच कमी आहे. अन्य कारणांबरोबरच लोकांच्या मनात अनेक शंका असल्यामुळेही लसीकरणाचा वेग कमी होत आहे. त्या शंका दूर करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. विषाणू कुणालाही सोडत नाही, हे आपल्याला वारंवार लोकांना सांगावे लागेल आणि विषाणूप्रसार रोखण्यासाठी नियम पाळण्याबरोबरच संधी मिळताच लस घ्यावी लागेल.

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने लसीकरणाच्या मोहिमेची सुरुवात अन्य देशांच्या तुलनेत भारतात लवकर झाली. आपल्याकडील शास्त्रज्ञ आणि लसनिर्मिती उद्योगाला याचे श्रेय द्यायला हवे. एका वर्षाच्या आत शास्त्रज्ञांनी कोविड-१९ वरील लस तयार करून ती वापरासाठी उपलब्धही करून दिली आहे. सध्या ज्या दोन लशी दिल्या जात आहेत, त्यापैकी ‘कोविशिल्ड’ ही लस परदेशात विकसित करण्यात आली; परंतु तिचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या भारतीय कंपनीकडून केले जात आहे. भारत बायोटेकने तयार केलेली ‘कोवॅक्सिन’ लस ही भारतातच विकसित करण्यात आली आहे आणि मोठ्या प्रमाणावर तिचे उत्पादनही होत आहे. आपल्या देशातील शास्त्रज्ञांबरोबरच अन्य देशांमध्ये लस विकसित करण्यासाठी काम करणा-या सर्वच तज्ज्ञांचे आपण आभार मानले पाहिजेत, कारण एखादी महामारी पसरल्यानंतर वर्षभराच्या आत लस उपलब्ध होण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. गेल्या दोन महिन्यांत प्रामुख्याने आरोग्य कर्मचा-यांना आणि महामारीविरुद्धच्या लढाईतील बिनीच्या शिलेदारांना लस दिली गेली आहे.

लसीकरणाचे जे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, ते पाहता सध्याचा लसीकरणाचा वेग वाढविण्याची नितांत गरज आहे. लसीकरणाचा वेग कमी असण्याचे एक कारण असे की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम यापूर्वी कधीच हाती घेण्यात आलेला नव्हता. आतापर्यंत केवळ लहान मुलांनाच विविध प्रकारच्या लशी दिल्या जात होत्या. प्रौढांमध्ये केवळ गर्भवती महिलांचेच लसीकरण केले जाते. प्रौढांचे एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण करण्याचा हा आपला पहिलाच अनुभव आहे. दुसरे कारण कदाचित असे असू शकेल की, लसीकरणासाठी जे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे, त्यात काही अडचणी आहेत. त्या दूर करायला हव्यात. गेल्या दीड-दोन महिन्यांत आपल्याला जे अनुभव आले ते त्रुटी शोधून काढून त्या दूर करण्यासाठी पुरेसे असून, त्या अनुभवांच्या आधारावर आगामी काळात लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. आता आपल्याला काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. एक म्हणजे, लशीची उपलब्धता कमी होता कामा नये. दुसरी गोष्ट अशी की, एवढ्या व्यापक प्रमाणावर सरकारे लसीकरण करू शकत नाहीत. अशा स्थिती खासगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढे येणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. एक मार्चपासून सुरू झालेल्या टप्प्यात खासगी रुग्णालयांमध्येही लस दिली जाणार आहे आणि सरकारने लशीचे दर निश्चित केले आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह आहे.

खासगी लसीकरण केंद्रात जास्तीत जास्त २५० रुपयांपर्यंत रक्कम लसीकरणासाठी घेता येऊ शकेल. लशीबद्दल लोकांच्या मनात धाकधूक आणि शंका असल्यामुळेही लसीकरणाचा वेग कमी आहे. शंकेचे एक कारण असे आहे की, संसर्गाचे प्रमाण कमी होत असेल तर लसीची गरजच काय, अशी शंका काहींच्या मनात आहे. अशा वेळी आपल्याला जागरूकता निर्माण करण्यासच प्राधान्य द्यावे लागेल. संसर्गाच्या प्रमाणात घसरण झाली आहे, याचा अर्थ संसर्ग नाहिसा झाला असा नाही, हे लोकांना पटवून देणे आवश्यक आहे. दिल्लीचेच उदाहरण घेतले तरी आपल्याला असे दिसून येते की, सुमारे पन्नास टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाविरुद्ध प्रतिरोधक क्षमता विकसित झाली आहे, असे सिरो सर्वेक्षण सांगते. याचा अर्थ असा की, लोकांना संसर्ग झाला आहे; मात्र तो अनेकांच्या बाबतीत कळून आला नाही. उर्वरित पन्नास टक्के लोक संसर्गाची शिकार होऊ शकतात, हे आपण विसरून चालणार नाही. संधी मिळेल त्या क्षणी विषाणू पुन्हा आक्रमक होऊ शकतो. गेल्या काही दिवसांत देशाच्या अनेक भागात अशा प्रकारे संसर्ग वाढत चालल्याचे दिसून आले आहे. ज्या ठिकाणी रोगप्रतिकार क्षमता कमी असेल, त्या ठिकाणी विषाणू आपला प्रसार सुरू करेल. अशा स्थितीत हात सातत्याने धुणे, मास्क लावणे आणि एकमेकांपासून अंतर राखणे हे उपाय कायम ठेवून संधी मिळेल त्या क्षणी लस घेतली पाहिजे.

संचारबंदी शिथील होताच बाजारपेठ, बँकांत गर्दी!

यासंदर्भात विषाणूच्या नवनवीन रूपांचाही विचार आपल्याला केला पाहिजे. विषाणूची तीन रूपे सध्या जगभरात अशी आहेत, जी अत्यंत धोकादायक ठरली आहेत. एक इंग्लंडमधील विषाणू आहे, दुसरा दक्षिण आफ्रिकेतील आहे तर तिसरा ब्राझीलमधील आहे. भारतात या तीनही प्रकारचे विषाणू आढळले आहेत; परंतु समाधानाची एकमेव गोष्ट म्हणजे या विषाणूंची लागण झालेले लोक परदेशांमधून आलेले आहेत आणि त्यांची ओळख पटलेली आहे. या नव्या विषाणूंपासून स्थानिक पातळीवर अद्याप संसर्ग झालेला नाही. ज्या लशी आतापर्यंत उपलब्ध झाल्या आहेत किंवा ज्या नजीकच्या भविष्यात उपलब्ध होणार आहेत, त्या विषाणूंच्या काही रूपांवर कमी प्रभावी ठरतील हे खरे; मात्र त्या पूर्णपणे प्रभावहीन आहेत, असा त्याचा अर्थ नाही. भारतात आपल्याला हे तीन विषाणू तसेच नव्याने येऊ शकणारी रूपे यावर काटेकोरपणे नजर ठेवली पाहिजे आणि संशोधनही सुरू ठेवले पाहिजे. ज्या ठिकाणी अधिक संख्येने लोकांना संसर्ग झाला आहे, त्या ठिकाणी संशोधन अधिक प्रमाणात व्हायला हवे आणि तेथे नवीन प्रकारच्या विषाणूचा प्रसार तर होत नाही ना, हे तपासले पाहिजे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की, लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. विषाणू कुणालाही सोडत नाही, हे आपल्याला वारंवार लोकांना सांगावे लागेल. अगदी छोटीशी चूकसुद्धा आपल्याला कोरोनाचा संसर्ग देऊ शकते, हे अधोरेखित करून वारंवार लोकांना सांगितले गेले पाहिजे. संसर्गापासून बचावासाठी तीन महत्त्वाचे नियम पाळणे आणि वेळ येताच लस घेणे आपल्या संरक्षणासाठी महत्त्वाचे आहेच; शिवाय ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याचा अर्थ संसर्ग संपुष्टात आला, असा काढणे धोक्याचे ठरेल.
(लेखक आयसीएमआरच्या संक्रमण विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

डॉ. ललित कांत
वैद्यकीय तज्ज्ञ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या