32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeविशेषमंगळस्वा-यांना गती

मंगळस्वा-यांना गती

एकमत ऑनलाईन

आपल्या सूर्यमालेतील एकमेव ‘सजीव ग्रह’ असलेल्या आपल्या पृथ्वीवर सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग ही जीवनाची सर्वांत महत्त्वाची अट बनली आहे. कदाचित याच कारणामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळ ग्रहावर एका पाठोपाठ एक तीन देशांची याने पोहोचली, तेव्हा ‘‘ही याने तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळतील ना,’’ असा विनोद करण्याचा मोह शास्त्रज्ञांनाही आवरता आला नाही. शतकानुशतके मानवी सावलीपासून दूर राहिलेल्या मंगळावरील सध्याचे चित्र मात्र ‘ट्रॅफिक जाम’सारखे दिसू लागले आहे. मर्सियन म्हणजेच मंगळावरील रहिवासी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत की नाही, कोण जाणे! परंतु जर असतीलच तर पृथ्वीवासीयांकडून होत असलेल्या ‘हल्ल्यां’ची चर्चा त्यांच्यात सध्या रंगली असेल.

वस्तुत: तत्कालीन सोव्हिएत संघाने १९६० मध्ये सुरू केलेल्या मंगळ मोहिमेपासूनच मंगळाविषयी संशोधनाचे काम सुरू झाले होते. परंतु हा लाल ग्रह आता मात्र आपल्या अजेंड्यावर ठळकपणे आला आहे. अगदी आजअखेर अंतरिक्ष संशोधनात कुठेच न दिसलेल्या संयुक्त अरब अमिरातीसारख्या (यूएई) देशाचे लक्षही मंगळाने वेधून घेतले आहे. यावर्षी मात्र मंगळावर पोहोचलेल्या यानांमध्ये पहिले याच देशाचे होते. या देशाच्या अंतरिक्ष संस्थेने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ९ वाजता होप हे मंगळयान या ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचविले. ही मोहीम होप मार्स मिशन नावाने १९ जुलै २०२० रोजी जपानच्या तांगेशिमा स्पेस सेंटरपासून सुरू झाली होती. अरब जगतातील यूएई हा अशा प्रकारची मोहीम हाती घेणारा पहिला देश ठरला असून, हे यान दोन वर्षे मंगळाच्या कक्षेत कार्यरत राहील.

दुसरीकडे चीन जणू काही यूएईचा पाठलागच करीत होता. १० फेब्रुवारी २०२१ रोजी चीनचे तियानवेन-१ हे यान मंगळाच्या कक्षेत जाऊन पोहोचले. चीनने गेल्या वर्षी २३ जुलै रोजी हे यान सोडले होते. चीनच्या मोहिमेचे वैशिष्ट्य असे की, यानात एक रोव्हर असून, मंगळाच्या पृष्ठभागावर उतरून ते काही प्रयोग करणार आहे. यानासमवेत हे रोव्हर मे २०२१ मध्ये मंगळाच्या पृष्ठभागावर उतरविले जाईल. अर्थात चिनी यान आता काही स्वस्थ बसलेले नाही. मंगळाच्या परिक्रमा करून ते मंगळाची छायाचित्रे घेत आहे आणि मंगळावरील जमीन, पाणी किंवा बर्फ असण्याची शक्यता, वातावरण आदींची आकडेवारी गोळा करीत आहे. मे महिन्यात मंगळावरील यूटोपिया प्लॅनिटिया या जागी ते उतरविले जाईल.

अमेरिकेचे पर्सिव्हरन्स हे यान मात्र काहीसे उशिराने १८ फेब्रुवारी रोजी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले. एक हजार किलोग्रॅम वजनाचे हे यान मंगळावरील जेजोरो क्रेटर या ठिकाणी सुरक्षितपणे उतरले. या यानात रोव्हरबरोबरच दोन किलोग्रॅम वजनाचे एक हेलिकॉप्टरही आहे. मंगळावरून प्रथमच एक हेलिकॉप्टर उड्डाण करणार आहे. याखेरीज रोव्हरची खास बाब अशी की, पहिल्यांदाच एक यान आण्विक ऊर्जेवर म्हणजे प्लूटोनियम इंधनावर कार्यान्वित केले जात आहे. त्यामुळे मंगळाच्या पृष्ठभागावर यानातील रोव्हर तब्बल दहा वर्षे काम करू शकेल. मंगळावरील मातीचा अभ्यास करणे आणि मातीतील खनिजांचा शोध घेणे हे त्याचे काम असेल.

…अन्यथा आणखी कठोर निर्णय

ही तीनही याने जवळजवळ एकाच वेळी पृथ्वीवरून रवाना का झाली, यामागील कारण खगोलशास्त्रीय आहे. सूर्याभोवती फिरताना पृथ्वी आणि मंगळ यांमधील अंतर कधी साडेनऊ कोटी किलोमीटर एवढे वाढते तर कधी साडेपाच कोटी किलोमीटरपर्यंत घटते. नुकतेच पृथ्वी आणि मंगळ ग्रह जवळ आले होते आणि मंगळावर पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे, हे शास्त्रज्ञांनी जाणले. कोरोनाच्या संकटकाळातही याने मार्गस्थ झाली. मंगळाविषयी उत्सुकता वाढण्याचे आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे, कोरोनासारखे संसर्ग वारंवार डोके वर काढू लागले तर पृथ्वीच्या बाहेर मनुष्यास राहण्यासाठी योग्य ग्रहाचा शोध शास्त्रज्ञांना घ्यायचा आहे. अर्थात ही संकल्पना जुनीच आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या बाहेर मानवी वस्त्या उभारण्यासाठी संशोधन करणे आवश्यक मानले होते. परंतु मंगळाविषयी सध्या जेवढे ज्ञान आपल्याला उपलब्ध आहे, त्यावरून तेथे वस्ती करणे ही खूपच दूरची गोष्ट वाटते.

सध्याच्या गतीने जर याने मंगळाच्या दिशेने सोडली गेली, तर एका वेळच्या प्रवासातच सात महिन्यांचा मोठा कालावधी उलटून जाईल. खाण्यापिण्याच्या वस्तू, ऑक्सिजन आणि दूरच्या अंतरिक्ष प्रवासासाठी योग्य ती तयारी करून जरी मानव मंगळापर्यंत पोहोचला, तरी पुढे काय करणार हा प्रश्न आहेच. अमेरिका, चीन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या ताज्या मंगळ मोहिमांवरून काही भावनिक आणि काही वैज्ञानिक महत्त्व असलेल्या बाबी समोर येतात. मानवाला मंगळावर पाठविण्याच्या संकल्पनेपेक्षा या बाबी भिन्न आहेत.

अरब देशांमध्ये मंगळाबद्दल जी उत्कंठा वाढली आहे, त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे यूएईची मंगळ मोहीम. ब्रिटिशांच्या गुलामगिरीपासून यूएईला मुक्तता मिळून पन्नास वर्षे झाली असून, त्यानिमित्ताने मिळालेले हे यश यूएईमध्ये जल्लोषाचे कारण ठरले आहे. परंतु केवळ कच्च्या तेलाच्या बळावर ज्यांचे अस्तित्व अवलंबून आहे, अशा अरब देशांना ज्ञानशाखांमध्ये प्रगती करण्याची तसेच अंतरिक्ष संशोधनासारख्या क्षेत्रात उतरण्याची इच्छा झाली, यातच सर्वकाही आले. कच्च्या तेलासारखे ऊर्जास्रोत सोडून जेव्हा जगात हरितऊर्जेवर अधिकाधिक भर दिला जाऊ लागेल, त्यावेळी तेलाच्या भरवशावर बांधलेले इमले ढासळण्यास वेळ लागणार नाही, याची जाणीवही अरब देशांना झाली असावी आणि त्यामुळे प्रगतिशील देशांच्या पंक्तीत बसता येईल, अशा गोष्टी हे देश करू लागलेले दिसतात. सौदी अरेबियात आनंदाच्या मोजमापासाठी मंत्रालय स्थापन करणे असो वा यूएईने मंगळावर पाठविलेले यान असो, यात अरब देशांच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब दिसून येते. तेलाच्या समृद्धीतून झालेला विकास नकली असून, त्यातून मिळणा-या आनंदापेक्षा मनाची प्रसन्नता आणि ज्ञानाचा, माहितीचा पाठलाग करण्यातील आनंद शाश्वत आहे, हे या देशांना पटले असावे.

अर्थात यूएईच्या मोहिमेच्या तुलनेत चीनची आणि अमेरिकेची मंगळ मोहीम अधिक ठोस कारणे आणि उद्दिष्टे असलेली वाटते. स्पिरिट आणि अपॉर्च्युनिटी या दोन रोव्हर्सपैकी एक तर मंगळाच्या धरतीवर उतरविण्यात अमेरिकेच्या नासा या अंतरिक्ष संशोधन संस्थेस आताच यश आले आहे. परंतु पर्सिव्हरन्स या रोव्हरच्या माध्यमातून काहीतरी मोठे मिळविण्याच्या प्रयत्नांत अमेरिका आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे यावेळी अमेरिकेने मंगळावर पाठविलेले दोन किलोग्रॅम वजनाचे हेलिकॉप्टर होय. मंगळ यानावर मानवाने तयार केलेल्या हेलिकॉप्टरचे उड्डाण ही मानवी इतिहासातीलच नव्हे तर खगोलशास्त्राच्या इतिहासातील पहिली घटना ठरणार आहे. हेलिकॉप्टरने जर यशस्वी उड्डाण केले तर मंगळाच्या असीमित भागाची पाहणी करणे शक्य होणार आहे. एवढेच नव्हे तर यापुढील मंगळ मोहिमेअंतर्गत पर्सिव्हरन्स हे रोव्हर २०२५ मध्ये परत पृथ्वीवर आणण्याचेही उद्दिष्ट अमेरिकेने ठेवले आहे. रोसेलिंड फ्रँकलिन हे यान २०२३ मध्ये मंगळावर पोहोचेल. याच यानातून पर्सिव्हरन्स रोव्हर परत आणण्याची योजना आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशन-२ म्हणजेच मंगलयान-२ ची स्थिती काय आहे, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या मंगळयानाबरोबर तीन अंतराळवीरांनाही मंगळाकडे रवाना केले जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज ब-याच दिवसांपासून बांधला जात आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या (इस्रो) म्हणण्यानुसार २०२२ पर्यंत मंगळावर दुसरे यान पाठविले जाणार आहे. परंतु अंतराळवीरांना पाठविण्याच्या मुद्यावर इस्रोचे उत्तर असे आहे की, चांद्रयान-३ आणि गगनयान हे सध्याचे प्राधान्यक्रम आहेत. भारताच्या पहिल्या मंगळयानाने आतापर्यंत उत्कृष्ट काम करून हजारो छायाचित्रे पाठविली आहेत. मंगळावर सोडण्यात येत असलेली याने आणि मोहिमांचा उद्देश मुख्यत्वे तेथे मानवी वस्ती करण्याच्या शक्यता पडताळणे हे आहे. पूर्वीच्या अंदाजानुसार मंगळावर केवळ कोरडे माळरानच नव्हे तर अन्य अनेक बाबी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही शतकांपूर्वी तेथे पाणी असणे शक्य आहे, असेही सांगितले जात आहे. एकंदरीत, मंगळाकडे सर्वच जगाचे लक्ष वेधले असून, या सर्व देशांच्या संशोधनातून मंगळाविषयी बरीच नवीन माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

प्रा. विजया पंडित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या