22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeविशेषमसाल्याचा डब्बा

मसाल्याचा डब्बा

एकमत ऑनलाईन

कधी कधी वाटतं मसाल्याचा डब्बा व गृहिणीं मधे नक्कीच काही तरी ऋणानुबंध असावेत.तसं पाहिलं तर स्वयंपाकाची लज्जत वाढवणारे जिन्नस हे त्या डब्ब्यात सामावलेले असतात.परंतु तरीही स्वयंपाक घरात सर्वात दुर्लक्षित वस्तू कोणती असेल तर मसाल्याचा डब्बा. लहानपणी मला त्यातल्या सात छोट्या छोट्या गोल डब्ब्यांचं फार कुतुहल वाटायचं.आईने जेव्हा केव्हा तो डब्बा धुवायला घेतला की मी मनसोक्त खेळायचे त्या डब्ब्यां सोबत.

छोट्या छोट्या डब्ब्या म्हणजे घरातील लहान लहान व्यक्तीच जणू..पण सर्व एकत्रित पणे मोठ्या डब्ब्यात म्हणजेच घरातील करत्या सवरत्या व्यक्तीच्या छत्र छाये खाली राहणारी. तर असे हे सात छोटे व एक मोठा असे आठ जणांचे कुटूंबच असते.
मसाल्याच्या डब्ब्यातल्या जिन्नसा घराघरात सारख्याच असतात.एक दोन वस्तू कमीजास्त होत असतील.त्या पदार्थांचे व गृहिणीच्या स्वभावा मधे काय साधर्म्य आहे ते जाणून घेऊ…

१)मोहरी-

मोहरी बाई फारच चपळ बरं का…तिला कळून चुकतं आता आपला पहिलाच नंबर लागणार..मग जसं तिला बोटाच्या चुकटीत किंवा चमच्यात घेतलं की ती सरळ सटकून खालीच पडते व स्वत:ची सुटका करून घेते.तरीही काही दाणे तर जाताच की गरम तेलाच्या तोंडात.मग काय..मोहरी सरळ उडते आणि गृहिणीच्या हातावर,गालावर किंना नाकावर जाऊन बसते..मला गरम कढईत टाकले ना..घे भोग आता शिक्षा.. असाच काहीसा आविर्भाव असतो तिचा.
कधी कधी घरातली स्त्री पण घरातल्यांवर इतकी वैतागते की ती मोहरी सारखीच घरातील लोकांना शाब्दिक किंवा मौखिक चपराक द्यावी असे तिला वाटते.शेवटी मानवी मनच ते प्रतिकार तर करणारच ना.पण सर्वांनाच हे जमत नाही बरं का.

२) जिरे-

मोहरी नंतर तेलात पडते ती जिऱ्याची चुटकी.जिरं बिच्चारं आतल्या आत जळत रहातं.त्याच प्रमाणे गृहिणी सुद्धा कित्येक भावना,इच्छा व संवेदना मनातच ठेवून जिऱ्या सारखी झुरत असते.जिरे जास्त तडतडले की काळे पडते पण कुणाला त्रास देत नाही किंवा भाजीच्या चवीत पण फरक पडत नाही.अगदी तसेच गृहिणी सुद्धा सहनशील होत जाते.काही स्त्रिया तर आयुष्यभर अश्याच जळत राहतात जिऱ्यासारख्या.

३) हिंग-

मग येते हिंगाची पाळी.मस्त डब्बीत पहुडलेला हिंग झाकणावर येतो आणि टपकन मोहरीच्या अंगावर जावून बसतो.काय खमंग वास येतो तेव्हा.पोटातली भुक चाळवायला सुरूवात होते.हिंगाच्या अस्तित्वाची जाणीव ही तेलात पडल्यावरच प्रकर्षाने जाणवते.अगदी त्याच प्रमाणे जेव्हा घरातली स्त्री आजारी पडते व स्वयंपाक करायला कुणीच पुढे येत नाही व भुकेने घरातल्यांचा जीव व्याकुळ होतो तेव्हा घरातल्या अन्नपूर्णेच्या त्यागाची जाणीव होते.

४)तिखट-

तिखटा शिवाय तर भाजीला चवच येत नाही.मला सांगा तिखट नसेल तर भाजी कुणी तोंडात घेईल का? नाही ना…अगदी तसच बाईचं असतं.ती नसेल तर कुणालाही घरात रहावेसे वाटत नाही.तिच्या अस्तित्वाची जाणीव हरघडी घरात होत असते.कधी कधी तिखट जास्त पडलं तर मात्र जिभेचे काय हाल होतात आपणास ठाऊकच आहे.आईने जर मुलांच्या किंवा पत्नीने नवऱ्याच्या जास्त चौकश्या केल्या तर मिरची झोंबतेच ना नाकाला??

५)हळद-

किती किती गुणधर्म आहेत हळदीचे.मला वाटतं आयुर्वेदात हळदी इतकं महत्व दुसऱ्या कोणत्याही वस्तूला नसावं.जंतूनाशक,आरोग्यवर्धक,रुपवर्धक,रंगवर्धक,पुजे मधे तर हमखास असावीच अशी हळद म्हणजे संपूर्ण घराची संजीवनी आहे.त्याच प्रमाणे गृहिणी म्हणजे All in One च तर असते.कधीही,कुठेही व केव्हाही तिची गरज पडत असते.

६)धणे पुड

—- बऱ्याचदा ताजी कोथिंबीर घरात नसते अश्या वेळी काम अडायला नको व भाजीची चव बिघडायला नको म्हणून धणे पुड कामात येते.कुठलाही पर्याय शोधून चलती का नाम गाडी हेच सूत्र अवलंबत घरातल्या स्त्रिया नेटाने संसार करत असतात.मुलं भाजी पोळी खात नाहीत ही नेहमीचीच तक्रार आपण ऐकत असतो.पण भाजी तर पोटात गेलीच पाहिजे.मग काय इथेच तर गृहिणीला धणे पुड व्हावे लागते.ती पिझ्झा,बर्गर,फ्रैंकीचे आकार देत मुलांना सर्व भाज्या खाऊच घालते.आहे की नाही गंमत?

७) गरम मसाला

सर्वात शेवटचा पण अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे गरम मसाला.ह्याच्या शिवाय तर पनीरची भाजी व रस्सा भाजीला चवच येत नाही.अगदी सूं..सूं..आवाज करत,डोळ्यातून पाणी आणत पण आपण कौतुक करत करत तिखट असली तरी भाजी खातोच.अगदी तसच हो…तिने कितीही त्रागा केला,चिडली,वैतागली तरीही ती आपल्याला घरात हवीच असते…बायको म्हणून,आई म्हणून,वहिनी म्हणून आणि सून म्हणून…कारण ती नसेल तर घराला घरपण येणार तरी कसं? तिच्या शिवाय घरात एक मिनिट सुद्धा राहू वाटत नाही.चार दिवस माहेरी जाते असं जर ती बोलली…तर मग विचारूच नका..सासू बाईंना अचानक चक्कर येतील,सासरे बुवांची शुगर वाढेल व नवरोबा वर तर जागतिक संकटच कोसळतं.
मुलं तर रडून,चिडून किंवा बोलून आपलं मत जाहिर करतात.
थोडक्यात काय तर…मसाल्याच्या डब्ब्यातल्या जिन्नसांचे महत्व पटतय हो सर्वांना पण ते उघडपणे स्विकारलेत तर पदार्थ अजूनच चविष्ट लागेल ना.हो तेच म्हणतेय मी…तिच्या समोर तिचे तोंडभर कौतुक केलेत ना तर बघा रस्सा भाजी सारखीच ती पण कशी चविष्ट होते ते…
जीवनाची व जेवणाची मजा काही औरच होईल बघा…

मनिषा वाणी ©, सुरत

[email protected]

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या