24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषवडिलांच्या स्वप्नामुळे लढण्याची ताकद

वडिलांच्या स्वप्नामुळे लढण्याची ताकद

एकमत ऑनलाईन

वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ रवी सिहागने पूजाची पूर्ण काळजी घेतली. वडिलांच्या स्वप्नांसाठी तुला खेळायचे आहे, याची आठवण वारंवार तिला करून दिली. आईचीसुद्धा साथ मिळाल्याने ती लवकरच धक्क्यातून सावरली आणि खेळू लागली. १९९७ मध्ये जन्मलेली पूजा सध्या राजस्थान पोलिसांत उपनिरीक्षक आहे. पहाटे चार वाजता उठून ती दररोज सहा तास सराव करत असे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हरियाणाच्या हंसी येथील पूजा सिहागने कुस्तीत देशासाठी कांस्यपदक पटकावले. परंतु एक काळ असा होता जेव्हा पूजाला कुस्ती सोडायची होती. २०२० मध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीदरम्यान तिच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर ती भावनिकदृष्ट्या खचून गेली होती. परंतु मुलगी एक दिवस मोठी कुस्तीगीर होईल हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूजा पुन्हा एकदा मॅटवर उतरली. सर्व लढती प्राणपणाने लढवल्या आणि पदक निश्चित केले. राष्ट्रकुल स्पर्धेचे ठिकाण असलेल्या बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथून परतल्यावर पूजा हिने सांगितले की, तिचे वडील प्रेमाने तिला पैलवान म्हणायचे; परंतु तिला या खेळाची फारशी माहिती नव्हती. अर्थात तिने भारत केसरी, हिंदकेसरी सारखी जेतेपदे मिळवावीत, असे तिच्या वडिलांना वाटायचे. त्यांच्याच इच्छेखातर तिने ११व्या वर्षी मॅटवर सरावाला सुरुवात केली.

वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ रवी सिहागने तिची पूर्ण काळजी घेतली. वडिलांच्या स्वप्नांसाठी तुला खेळायचे आहे, याची आठवण वारंवार तिला करून दिली. आईचीसुद्धा साथ मिळाल्याने ती लवकरच धक्क्यातून सावरली आणि खेळू लागली. १९९७ मध्ये जन्मलेली पूजा सध्या राजस्थान पोलिसांत उपनिरीक्षक (पीएसआय) आहे. पहाटे चार वाजता उठून ती दररोज सहा तास सराव करत असे. सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास. अनेकदा सराव पूर्ण होण्यास रात्रीचे बारा वाजायचे. अशा वेळी ती केवळ चारच तास झोपू शकत असे. झोपेअभावी अनेकदा तिला संध्याकाळचा सराव करावासा वाटत नसे. परंतु नंतर तिला तिच्या वडिलांचे स्वप्न आठवत असे आणि मग ती मनापासून सरावात गढून जात असे. आशियाई कुस्ती स्पर्धेत २०१४, २०१५, २०१६ आणि २०१७ मध्ये सलग दोन कांस्य आणि रौप्यपदक जिंकणा-या पूजाला अद्याप सुवर्णपदकाची ओढ आहे.

पूजाच्या म्हणण्यानुसार, कुस्ती हा ताकदीचा खेळ आहे, असेच अनेकांना वाटते. त्यामुळे फक्त शरीर मजबूत असणेच कुस्तीसाठी आवश्यक मानले जाते. परंतु हे अर्धसत्य असल्याचे स्पष्ट करताना ती म्हणते की, हा शरीर आणि मनाचा समतोल साधण्याचा खेळ आहे. तुम्हाला तुमच्या मनाने मॅटवर प्रतिस्पर्ध्याला सतत कमकुवत करावे लागेल. त्याचबरोबर असा डाव लावावा लागतो, की समोरचा चितपट होईल. मुलींना कुस्तीत पुढे यायचे असेल तर त्यांना शारीरिक आणि मानसिक संतुलनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. याखेरीज आहार हाही खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर आम्ही त्यावेळी लिक्विड डाएट अधिक फॉलो करतो. कारण वजन राखणे हेदेखील कुस्तीपटूसाठी मोठे आव्हान असते, असे ती सांगते.

-श्रीकांत देवळे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या