22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeविशेषशक्तिवर्धक मालकांगोणी

शक्तिवर्धक मालकांगोणी

एकमत ऑनलाईन

मालकांगोणी ही आयुर्वेदिक औषधी वेल उष्ण, उपोष्ण व समशितोष्ण हवामानाच्या कटिबंधीय प्रदेशात वाढलेली आढळते. ज्योतिष्मती या आधाराने वाढणा-या वेलीचे मूळस्थान भारत असावे असा अंदाज आहे. या मोठ्या पानझडी वेलीचा प्रसार हिमालयाच्या खालच्या पट्ट्यामध्ये झेलमपासून पूर्वेस असलेल्या उंच प्रदेशात झाला आहे. ही वेल भारतात सर्वत्र प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम, केरळ, कर्नाटक, बिहार, ओरिसा राज्याच्या डोंगराळ भागात वाढलेली आहे. भारताशिवाय श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, ब्रह्मदेश, मलाया, नेपाळ, भूतान, चीन, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपाईन्स या देशांतही ही आढळते. मालकांगोणीचे वेल डोंगर उतारावर, खडकाळ जमिनीवर नदीनाल्याच्या काठावर तसेच कुंपणाला चांगले वाढलेले आढळतात.

उपयोग : मालकांगोणीच्या बियामध्ये शक्तिवर्धक गुणधर्म आहेत. त्यामुळे बियांचा उपयोग अशक्तपणा कमी होऊन शक्ती प्रदान करण्यासाठी उपयोगी आहे. त्यासाठी मालकांगोणीच्या बिया तुपामध्ये भाजून त्यात समभाग साखर मिसळून त्याचे चूर्ण तयार करावे. हे एक चमचा चूर्ण दररोज दोन वेळा सकाळ-संध्याकाळ सहा आठवडे नियमितपणे सेवन करावे त्यामुळे शारीरिक दुर्बलता कमी होते. ज्योतिष्मती उदासीनता किंवा औदासिन्य यावर रामबाण उपाय मानला जाते. त्यासाठी मालकांगोणी बियाचे चूर्ण व ब्राह्मी चूर्ण समप्रमाणात एकत्र मिसळावे. हे तयार केलेले चूर्ण एक चमचा दररोज दोन वेळा सकाळ-संध्याकाळ नियमितपणे सेवन करावे. त्यामुळे मेंदूवरील ताण-तणाव कमी होऊन मानसिक शक्ती वाढण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये मालकांगोणी वनस्पतीला बुद्धी आणि स्मृती वाढविणारे औषध असे संबोधतात. यासाठी मालकांगोणीच्या बिया, वेखंड, देवदार, अतिविषा समप्रमाणात घेऊन बारीक वाटून त्याचे चूर्ण तयार करावे. हे एक चमचा चूर्ण दररोज दोन वेळा सकाळ-संध्याकाळ गायीच्या शुध्द तुपाबरोबर नियमितपणे काही दिवस घेतल्यास फायदा होतो.

अल्झायमर हा मेंदूशी संबंधित विकार असून प्रामुख्याने जास्त वयाच्या लोकांत अधिक प्रमाणात आढळतो. या आजारामुळे रुग्णाची स्मरणशक्ती हळूहळू कमी होऊन विसराळूपणा वाढतो. त्यासाठी ज्योतिष्मती दररोज दोन वेळा नियमितपणे घेतल्यास स्मृतिभ्रंश कमी होतो. अफू मादक असल्यामुळे नशा येण्यासाठी तिचे सेवन केले जाते व पुन्हापुन्हा सेवन केल्यामुळे मनुष्य व्यसनात अडकला जातो. हे व्यसन दूर करण्यासाठी मालकांगोणी अत्यंत गुणकारी आहे. त्यासाठी या वेलीची ताजी पाने स्वच्छ धुऊन व बारीक वाटून स्वरस तयार करावा. हा २ चमचे रस पाण्यात दररोज तीन वेळा पिल्यास अफूचा तिरस्कार निर्माण होतो. ज्योतिष्मती वात-कफनाशक आहे. वात-कफ दोष वाढल्यामुळे दम्याचा त्रास होतो. त्यासाठी या वनस्पतीच्या बिया व विलायची समभाग घेऊन चूर्ण करावे. हे एक चमचा चूर्ण अर्धा चमचा मधाबरोबर सकाळ-संध्याकाळ चाटावे. असे नियमितपणे एक महिना केल्यास श्वासाचे सर्व विकार कमी होण्यास मदत होते. त्वचेच्या पांढ-या डागावर उपचार करण्यासाठी ज्योतिष्मतीला विशेष महत्त्व आहे. त्यासाठी ज्योतिष्मती बियाचे तेल व बावचीच्या बियाचे तेल समभाग मिसळून एका कुपीमध्ये ठेवावे. हे तेल दररोज दोन वेळा सकाळ-संध्याकाळ पांढरे डाग असलेल्या भागावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. काही दिवसांतच त्वचा डागविरहित होते. एखाद्या पुरुषाला नपुंसकत्व असेल तर शरमेची बाब वाटते.

त्यासाठी मालकांगोणी तेलाचे १० थेंब खाण्याच्या पानावर (नागवेल) लावून ती पाने खावीत. तसेच य वनस्पतीच्या बियांचे दोन ग्रॅम चूर्ण खिरीमध्ये मिसळून दररोज एक वेळा नियमितपणे २ ते ३ महिने सेवन केल्यास लैंगिक दुर्बलता कमी होण्यास लाभदायक होते. अनेक वेळा शौचाद्वारे रक्त पडते व वेदना होतात. त्यासाठी ज्योतिष्मतीच्या बिया अत्यंत गुणकारी आहेत. अशावेळी या बिया पाण्यामध्ये बारीक वाटून त्याचा लगदा (पेस्ट) तयार करावा. हा लगदा मोडावर लेप करावा त्यामुळे मोड नरम होतात. तसेच या बियांचे तेल मोडावर नियमितपणे लावल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळी नियमितपणे येण्यासाठी मालकांगोणी अत्यंत उपयोगी आहे. बायकांना आलब (महिन्यास येणारा विटाळ) साफ येत नसल्यास मालकांगोणी बिया, सुंठ आणि ओवा समभाग घेऊन चूर्ण करावे. या चुर्णामध्ये मध मिसळून हरभ-याएवढ्या गोळ्या कराव्यात. या गोळ्या कोमट पाण्याबरोबर रोज २ वेळा घेतल्यास फायदा होतो. सांधे दुखणे, सांध्यास सूज येणे, हात-पाय दुखणे, लटपटणे या विकारावर सुंठ, ओवा व मालकांगोणीच्या बियांचे चूर्ण समप्रमाणात घेऊन मधामध्ये त्याच्या लहान गोळ्या करून सकाळ-संध्याकाळ दोन-दोन गोळ्या कोमट पाण्याच्या घोटाबरोबर घ्याव्यात व वरून या बियाचे तेल चोळल्यास फायदा होतो.

अनेक लोकांना कामाच्या व्यापामुळे व तणावामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. त्यासाठी ज्योतिष्मतीच्या बियांचे तेल व बदामाचे तेल समभाग घेऊन एकत्र मिसळावे. या मिश्र तेलाचे दोन थेंब बत्ताशावर टाकून दररोज सकाळी अनुशापोटी खावे व नंतर एक कप दुधाचे सेवन करावे. असे काही दिवस केल्यास डोकेदुखी कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते. अनेकांना कमी वयामध्ये दृष्टी अंधूक झाल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी मालकांगोणीच्या बियाच्या तेलाचा वापर रामबाण उपाय आहे. त्यासाठी या बियांचे तेल पायाच्या तळव्यांना लावून चांगला मसाज करावा. अनेकांना झोपेची समस्या असते. त्यावर ज्योतिष्मतीच्या बिया अत्यंत प्रभावी औषध आहे.

त्यासाठी सर्पगंधा, जटामासी व ज्यातिष्मतीच्या बिया आणि साखर समप्रमाणात घेऊन बारीक वाटून चूर्ण तयार करावे. हे तयार केलेले चूर्ण एक चमचा मधाबरोबर दररोज दोन वेळा नियमितपणे सेवन केल्यास फायदा होतो. कोणत्याही प्रकारची जखम लवकर भरून येण्यासाठी मालकांगोणीसारखे औषध नाही. त्यासाठी याचे तेल म्हणजे पिंगवेल तेलाची घडी जखमेवर निरंतर ठेवावी. त्यामुळे जखमेत पू होण्याचे बंद होऊन जखम लवकरात लवकर भरून येण्यास लाभदायक होते. त्वचेवर ब-याच वेळा गजकर्ण, खरूज यासारखे त्वचेचे विकार होतात. त्यामुळे त्वचा सुजून वेदना होतात व खाज वाढते. त्यासाठी त्वचेवर बियांचे तेल लावावे किंवा बिया गोमूत्रात वाटून लावल्यास फायदा होते. अर्धांगवायूच्या आजारावर मालकांगोणी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी सुंठ, ओवा व मालकांगोणीच्या बिया समभाग घेऊन बारीक वाटून मधात हरभ-याएवढ्या गोळ्या तयार कराव्यात व कोमट पाण्यात रोज घ्याव्यात. मात्र आज एक तर उद्या दोन या प्रमाणे पन्नासपर्यंत चढवाव्यात तसेच मालकांगोणीचे (पिंगवेल) तेल चोळून जिरवावे, अर्धांगवायू बरा होतो. टिप : वनौषधीचा वापर करताना आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या