26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeविशेषविद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश

विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
नविन शैक्षणिक वर्षाची सुरूवात सोमवार दि. १३ जून पासून होत आहे. नविन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला सर्व विद्यार्थी नविन गणवेशाने प्रवेशित व्हावे, यासाठी शासन स्तारावरून विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना एकाच गणवेशावर समाधान मानावे लागत होते. मात्र यावर्षी दोन गणवेशाचा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्फत गणवेश खरेदीची प्रक्रिया पार पडत आहे.

लातूर जिल्हयातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील मुले-मुली, खुल्या प्रवर्गातील मुली व दारिद्रय रेषेखालील मुला-मुलींसाठी समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजना शासनाच्यावतीने राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या १ हजार २७८ व मनपाच्या २१ अशा १ हजार २९९ शाळेतील ८५ हजार २३७ विद्यार्थ्याना मोफत गणवेशासाठी ५ कोटी ११ लाख ४२ हजार २०० रूपये शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांच्या खात्यावर शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला आहे. २०१९ साली प्रति विद्यार्थी दोन गणवेश देण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षापासून शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश देण्यात येत होता. मात्र या वर्षापासून पुन्हा विद्यार्थ्यांना दोन गणवेशाची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या १ हजार २७८ व मनपाच्या २१ शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वीच्या वर्गातली ५९ हजार ४४९ सर्व मुली, १४ हजार ८५९ अनुसूचित जातीतील मुले, २ हजार ५३८ अनुसूचित जमातीतील मुले, ८ हजार ३९१ बीपीएल मुले अशा प्रकारे ८५ हजार २३७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार आहे. शाळा स्तरावर शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्फत गणवेशाच्या संदर्भाने विद्यार्थ्याची मापे घेणे, कपडे शिवून देणे आदी सर्व प्रक्रिया पार पडणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या