18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeविशेषराजस्थानातील सुंदोपसुंदी

राजस्थानातील सुंदोपसुंदी

एकमत ऑनलाईन

राजस्थानात भाजपात अनेक गट निर्माण झाले आहेत. यामुळे भाजप कार्यकर्ते अद्याप गोंधळलेल्या स्थितीत आहेत. राजस्थानात भाजपाच्या अंतर्गत संघटितपणाचा अभाव दिसून येत आहे. या कारणामुळे केंद्रीय नेतृत्वाने सर्वकाही आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्येसुद्धा गटबाजी आहेच. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात खुर्चीसाठी सतत संघर्ष सुरूच आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्यातील द्वंद्व उघडच आहे. मात्र राजकीय वारे गेहलोत यांच्या दिशेने असल्याचे दिसून येते. मल्लिाकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतरसुद्धा राजस्थानात काँग्रेसमध्ये खांदेपालट केले जातील याबाबत शक्यता कमीच दिसते.

राजस्थानचे राजकारण वेगाने बदलत आहे. एकीकडे २०२३च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने शंखनाद केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनेसुद्धा दंड थोपटले आहेत. एकप्रकारे राजस्थानात राजकारणाला आखाड्याचे स्वरूप आले आहे. राजस्थानात दोन्ही पक्षांत गटबाजी दिसून येते. भाजपासारख्या पक्षातसुद्धा येथे गटबाजीने संघर्षाचे रूप धारण केल्यामुळे शेवटी पक्षाला संघटित होण्याचे निर्देश द्यावे लागले. भाजपाची कोअर कमिटी बोलावण्यात आली होती. कारण अनेक गटांत विभागलेल्या पक्षाला एकत्रित आणता येईल. खरे तर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गट शक्तिशाली असल्याचे दिसून येते. धार्मिक यात्रेच्या माध्यमातून ते वातावरणनिर्मिती करीत आहेत. कारण पुढे मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या गटाकडे दुर्लक्ष व्हायला नको. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांची पक्षावरील पकड कमकुवत होत चालली असल्याचे दिसून येते. ते प्रयत्न तर खूप करीत आहेत मात्र ते एकाकी पडत आहेत.

भाजपातही अनेक गट
राजस्थानात भाजपात अनेक गट निर्माण झाले आहेत. यामुळे भाजप कार्यकर्ते अद्याप गोंधळलेल्या स्थितीत आहेत. एकीकडे वसुंधरा राजे आहेत, तर दुसरीकडे गजेंद्र सिंह शेखावत. तर अर्जुन मेघवाल आणि लोकसभा स्पीकर ओम बिर्ला आपल्या गटाचा नेता पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपाचे नेते २०२३ मध्ये सत्ता येण्याचा दावा एकाच आधारावर करीत आहेत तो म्हणजे, एकदा काँग्रेस सत्तेत असते तर दुस-या वेळी भाजप. त्यानुसार सध्या काँग्रेस सत्तेवर असल्यामुळे २०२३ मध्ये भाजपचे सरकार येणार, असे त्यांचे मत आहे. राजस्थानात भाजपाच्या अंतर्गत संघटितपणाचा अभाव दिसून येत आहे. या कारणामुळे केंद्रीय नेतृत्वाने सर्वकाही आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राजस्थानात सभा घेतली. मेवाडच्या आदिवासी क्षेत्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहोचण्यापूर्वीच काही दिवस अगोदर पंतप्रधान मोदी आपल्या पक्षासाठी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहेत. जोपर्यंत राहुल गांधी राजस्थानात असतील तोपर्यंत नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होत राहतील, अशी दाट शक्यता आहे.

७ डिसेंबरला राजस्थानात पोहोचणार राहुल गांधी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ डिसेंबरला मध्य प्रदेशच्या सीमेवरून झालावाड मार्गे राजस्थानात प्रवेश करेल. राजस्थानात ही यात्रा २० दिवस चालू राहील. त्या दरम्यान राहुल गांधी यांच्या चार सभा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसबाबत बोलायचे झाल्यास भाजपाच्या तुलनेत काँग्रेस मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येईल. मात्र काँग्रेसमध्येसुद्धा गटबाजी आहेच. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात खुर्चीसाठी सतत संघर्ष सुरूच आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्यातील द्वंद्व उघडच आहे. मात्र राजकीय वारे गेहलोत यांच्या दिशेने असल्याचे दिसून येते. मल्लिाकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतरसुद्धा राजस्थानात काँग्रेसमध्ये खांदेपालट केले जातील याबाबत शक्यता कमीच दिसते. काँग्रेसची तयारी बूथ स्तरापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या मते, काँग्रेस संघटनेत १९ लाख सक्रिय कार्यकर्ते आहेत. पक्ष बूथ स्तरावर अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि मंडल अध्यक्षापासून जिल्हास्तरापर्यंत कार्यकारिणी बनली आहे. पक्ष मोठ्या प्रमाणात आमदारपदाचे चेहरे बदलण्याच्या विचारात आहे. राहुल गांधी राजस्थानात पोहोचण्याअगोदरच संघटना पूर्णपणे सक्रिय झाली असेल. कारण भारत जोडो यात्रेचा लाभ पक्षाला मिळवता येईल.

‘राजस्थान’मुळेच खर्गे अध्यक्षपदी
विशेष म्हणजे खर्गे काँग्रेस अध्यक्ष बनण्यामागे राजस्थानातील घटनाच कारणीभूत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष होतील, हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. मात्र त्यांना राजस्थानची खुर्ची सोडायची नव्हती. नंतर राजस्थानातील काँग्रेस आमदारांनी राजीनामा अस्त्र उगारल्यानंतर हे घटनाचक्र उलटे फिरले आणि अशोक गेहलोत हे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले. गेहलोत हे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतरच खर्गे यांचे नाव पुढे आले आणि अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले. खरेतर या संपूर्ण प्रकरणामुळे सोनिया गांधी गेहलोत यांच्यावर नाराज होत्या आणि या कारणामुळेच गेहलोत यांना सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान माफी मागावी लागली होती.

खर्गेंना गेहलोत यांचे उघड समर्थन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत यांनी उघडपणे खर्गे यांचे समर्थन केले. सुरुवातीपासून ते याबाबत उघडपणे बोलत होते की, अनुभवाला पर्याय नाही. खर्गे यांचा मोठा अनुभव पाहता त्यांच्याच गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडावी, असे गेहलोत यांचे मत होते. याबाबत एक व्हीडीओसुद्धा व्हायरल झाला होता. त्यात ते उघडपणे खर्गे यांना मत देण्याबाबत सांगत होते. या व्हीडीओमुळे वादाला तोंड फुटले होते. अशा स्थितीत आता खर्गे हे गेहलोत यांच्या विरोधात जातील असे वाटत नाही. त्यामुळे राजस्थान आणि गेहलोत यांच्याबाबतीत खर्गे जपून पावले टाकतील.

खर्गेंसमोरील आव्हाने
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना राजकारणातील जादूगार मानले जाते. त्यांना याबाबत पूर्ण माहिती आहे की, कोणता डाव केव्हा खेळला पाहिजे. जसे खर्गे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आल्यानंतर त्यांनी उघडपणे आपले समर्थन खर्गेंना जाहीर केले. खर्गे अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेहलोत सर्वांत पुढे होते. सचिन पायलट यांनीसुद्धा खर्गे यांना शुभेच्छा देताना म्हटले की, आता आम्ही एकत्रित सर्व संकटांचा सामना करणार. अशीही चर्चा होती की सचिन पायलट यांना पक्षनेतृत्वाकडून मुख्यमंत्रिपद दिले जाण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अशोक गेहलोत आणि त्यांचे समर्थक अजूूनही पायलट यांना विरोध करत असल्याचे दिसून येतात. अशा स्थितीत आता सर्वांची नजर खर्गे काय निर्णय घेतात याकडे लागली आहे. खर्गे यांच्या राजकीय गुणांची पहिली परीक्षा राजस्थानमध्येच होणार आहे.
गेहलोत यांच्यासमोरील आव्हाने अशोक गेहलोत यांच्यासमोर आता राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेची तयारी करण्याचेही आव्हान आहे. दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि मुकुल वासनिकसहित पक्षाच्या अनेक नेत्यांनी गेहलोत यांच्याशी भारत जोडो यात्रेबाबत चर्चा करण्यात आली.

काँग्रेसने भारत जोडो यात्रेची तारीख घोषित केली आहे. मात्र विस्तृत कार्यक्रम अजून ठरवलेला नाही. भारत जोडो यात्रा ६ डिसेंबर ते २३ डिसेंबर म्हणजे जवळपास १८-२० दिवस राहणार आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशसह राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा पुढील दोन महिने हिंदी पट्ट्यात राहणार आहे. विशेष म्हणजे राजस्थान एकमात्र असे काँग्रेसशासित राज्य आहे जेथे भारत जोडो यात्रा जाणार आहे. या यात्रेच्या मार्गात सचिन पायलट यांचा प्रभाव असलेले दौसा, सवाई माधोपूर, अलवर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या यात्रेच्या दरम्यान कोटा आणि दौसा येथे राहुल गांधी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची इच्छा असेल की, या यात्रेदरम्यान राजस्थानात काँग्रेस पक्षाची २०२३ आणि २०२४ च्या निवडणुकांसाठी केलेली तयारी आणि शक्तीही दाखवता येईल. आणि भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना सहभागी करून येणा-या निवडणुकांचा शंखनाद या यात्रेदरम्यानच करता येईल.

-विनिता शाह

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या