25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeविशेषसुशांत प्रकरण व बिहार निवडणूक !

सुशांत प्रकरण व बिहार निवडणूक !

एकमत ऑनलाईन

कोविड-१९ या विषाणूने, या एकमेव विषयाने २०२० हे वर्ष पूर्णत: व्यापून टाकले आहे. संपूर्ण जग गेल्या सहा-सात महिन्यांपासून याच एका विषयाभोवती फिरते आहे व अजून किमान सहा महिने तरी हाच केंद्रबिंदू असणार आहे. मात्र या संकटाला लोक हळूहळू सरावत चालले आहेत. संसर्ग कमी झालेला नाही, रुग्णांची, मृतांची संख्या दिवसोंदिवस वाढतेच आहे. पण पेशन्ट वाढत असले तरी लोकांचा पेशन्स संपला आहे. पुढील काही काळ कोरोनाबरोबर जगावं लागेल हे वास्तव सर्वसामान्य लोक स्वीकारत आहेत. अर्थात त्यांच्यासमोर दुसरा पर्यायही नाही. सात पिढ्या बसून खातील एवढी क्षमता काही मूठभरांकडे आहे. पण बहुतांश लोकांचा चरितार्थ रोजच्या कमाईवर चालतो. त्यामुळे स्वाभाविकच लोकांना संसर्गाचा धोका पत्करून कोरोनाबरोबर जगण्याचा पर्याय स्वीकारणे भाग आहे.

धोका संपलेला नसला तरी सरकार एकेक निर्बंध दूर करत चालले आहे व लोकही निर्बंध व धोक्याची फारशी तमा न करता बाहेर पडताना दिसत आहेत. लोकांना सध्याच्या चिंतेच्या वातावरणातून, या मानसिकतेतून बाहेर काढणे आवश्यक असल्याने प्रसारमाध्यमांनी कोरोनाबाबत नकारात्मक बातम्या टाळाव्यात, त्यावरील फोकस कमी करावा, असा सल्लाही दिला जातो आहे. कदाचित याच उदात्त हेतूने कोरोनाच्या या संकटाच्या काळातही राम मंदिराच्या भूमिपूजनाचा निर्णय घेण्यात आला असावा. याबरोबरच चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या गाजते आहे. काही राजकीय पक्षांनी व वृत्तवाहिन्यांनी हा राष्ट्रीय मुद्दा बनवला आहे.

सुशांत या धडाडीच्या उदयोन्मुख कलाकाराने १४ जूनला मुंबईतील आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. नावारूपाला येत असलेल्या या कलावंताने एवढे टोकाचे पाऊल उचलणे हे धक्कादायक होते. त्यामुळे त्यामागील कारणांचा, शक्यतांचा बराच ऊहापोह झाला. बॉलिवूडमधील घराणेशाही, त्यामुळे गॉडफादर नसलेल्या लोकांची होणारी परवड, त्यांचा संघर्ष यावर भरपूर चर्चा झाली, टीका झाली. अनेक बड्या निर्मात्यांवर, कलाकारांवर कंपूशाहीचे आरोप झाले. त्यांनी केलेल्या उपेक्षेमुळेच सुशांतने टोकाचे पाऊल उचलल्याचे दावे केले गेले. नंतर या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचे नाव चर्चेत आले. मुंबई पोलिस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत. सुशांतने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे. आत्महत्या असेल तर त्यासाठी कोणी प्रवृत्त केले का? याचाही शोध पोलिस घेत आहेत. परंतु आता राजकीय मंडळी यात उतरल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

Read More  आयपीएलच्या १३ व्या हंगामाला केंद्र सरकारची मंजुरी

बिहार पोलिसांचा मुंबईत समांतर तपास !
सुशांतच्या कुटुंबियांना किंवा त्याच्या चाहत्यांना त्याच्या मृत्यूबद्दल शंका वाटते आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास केला जावा ही त्यांची मागणी योग्यच आहे. त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचेही कारण नाही. सुशांतच्या बहिणीने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याबद्दलही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, तेथील भाजप नेते व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी हा बिहारच्या अस्मितेचा मुद्दा करून याला वेगळेच वळण दिले आहे. मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असताना सुशांतच्या वडिलांनी बिहारच्या राजीवनगर पोलिस ठाण्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध तक्रार केली. रियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून या गुन्हांचा  तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे.

दुस-या राज्यातील प्रकरणाचा तपास करताना स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते. पण तसे न करता प्रथम बिहार पोलिसांनी मुंबईत समांतर तपास सुरू केला. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासाची माहिती व कागदपत्रे आपल्याला द्यावीत अशी मागणीही बिहारच्या या तपास पथकाने केली. मुंबई पोलिस याला नकार देऊ शकले असते. परंतु त्यांनी बिहार पोलिसांना संबंधित कागदपत्रे देऊन त्यांना तपासकामात सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मुंबई आणि बिहार पोलिस या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी मात्र महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवत काही गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.

सीबीआय चौकशीची मागणी !
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी या प्रकरणावरून थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली आहेत, महाराष्ट्रात गेलेल्या बिहारमधील पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. सुशांतसिंग बिहारचा असल्यामुळे महाराष्ट्र पोलिस सहकार्य करत नाहीत, अशी आरोपांची राळ या मोदींनी उठवली. यापूर्वीही महाराष्ट्रात बिहारी लोकांसोबत दुर्व्यवहार झालेला आहे. लॉकडाऊनमध्ये देखील बिहारी मजुरांना परत पाठविण्यावरून महाराष्ट्राने अडेलतट्टू भूमिका घेतली होती.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे कोट्यवधी बिहारवासी दु:खात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी. सुशांतला न्याय देण्यासाठी बिहार सरकारची कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी असल्याचे मोदी यांनी जाहीर केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एवढी तिखट भाषा वापरली नाही. पण त्यांनीही बिहारच्या सुपुत्राचा मुद्दा लावून धरला आहे. महाराष्ट्र भाजपानेही हे प्रकरण उचलून धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी केली आहे. बिहार निवडणुकीत हा मुद्दा गाजणार हे लक्षात आल्यावर लालुप्रसाद यादव यांचे चिरंजीव व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, तसेच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव व एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली आहे. एकीकडे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी सुरू असताना दुसरीकडे अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) या प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

Read More  बारा ज्योतिर्लिंगे

निवडणुकीवर डोळा असल्याचा आरोप !
या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. कोरोनामुळे निवडणुकीचे वेळापत्रक थोडेफार पुढे जाण्याची शक्यता आहे. पण जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा सुशांतच्या आत्महत्येचा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरण्याची भाजपची खेळी असल्याचा आरोप होतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुशांतच्या मृत्यूचे राजकारण केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सुशांतचे कुटुंबीय, चाहत्यांच्या भावना आपण समजू शकतो; पण कृपा करून त्यांनी या विषयावर होत असलेल्या राजकारणाचा भाग बनू नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

या प्रकरणाचा छडा लावण्यास मुंबई पोलिस पूर्णपणे सक्षम आहेत. जो कोणी दोषी असेल त्याविरुद्ध कठोर कारवाई निश्चित होईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. परंतु बिहार निवडणुकीपर्यंत हा विषय सुरू ठेवून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न सुरू राहील अशी चिन्हं आहेत. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांना ते खुशाल करून द्यावे. पण मुंबई पोलिस मात्र आपल्या लौकिकाला जागून या प्रकरणाचा छडा लावतील व सुशांतच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे.

निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह!
महाराष्ट्राच्या मागच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या फेसबुक पेजचे काम भाजप जनता युवा मोर्चाच्या पदाधिका-याच्या कंपनीला देण्यात आले होते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तसेच सामाजिक कार्यकर्ते संकेत गोखले यांनी केला असून आयोगाच्या निष्पक्ष भूमिकेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिका-यांनी फेसबुकवर निवडणुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ‘चिफ इलेक्ट्रोरल ऑफिसर’ या नावाने पेज सुरू केले होते. त्यावर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या.

हे पेज तयार करणा-या कंपनीचा व फडणवीस सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम ‘साईनपोस्ट इंडिया’ या जाहिरात कंपनीचा पत्ता एकच असल्याचे आढळून आले आहे. ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीचा देखील हाच पत्ता आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या युवक आघाडीचा (भाजयुमो) माहिती तंत्रज्ञान व समाजमाध्यम विभागाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवे याच्या संकेतस्थळावर त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदी’ इत्यादी पेजेसची संस्थापक असल्याचे नमूद केले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यानुसार केंद्रीय आयोगाने अहवाल मागवला होता. त्यावर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिका-यांनी मुख्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अंतरिम अहवालात याप्रकरणी भाजपला क्लिन चीट दिली असल्याची चर्चा आहे. या आरोपामुळे आधीच वेगवेगळ्या प्रकरणांमुळे वादात आलेल्या निवडणूक आयोगाच्या निष्पक्ष भूमिकेवर आणखी एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यांच्याकडून योग्यवेळी स्पष्टीकरण येईलच, पण राज्याच्या सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलेल्या या आरोपाची शहानिशा करण्याची तसदी सत्तेत बसलेली मंडळी घेतील अशी अपेक्षा आहे.

मुंबई वार्तापत्र
अभय देशपांडे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या