26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeविशेषसुशांत सिंह : शापित राजकुमार

सुशांत सिंह : शापित राजकुमार

तो आज जिवंत असता तर ३५ वर्षांचा असता. केवळ वयाचाही हा मुद्दा नाही. तरुण पिढी त्याच्यात भावी सुपरस्टार बघत होती. पण त्याने अकस्मात स्वत:ला संपविले अन् इथल्या तरुणाईच्या स्वप्नांचा चुराडा करून तो अनंताच्या प्रवासाला निघून गेला. सुशांत सिंह याचा १४ जून हा पहिला स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्याच्याविषयी थोडेसे...

एकमत ऑनलाईन

खरे तर त्याचे जायचे वय नव्हते… त्याचा काळ तर खरा आत्ता सुरू झाला होता… खूप अपेक्षा होती त्याच्याकडून… सौंदर्य, अभिनय या सा-या कसोट्यांवर खरेपणाने उतरत त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवले होते. कोणतीही पार्श्वभूमी (नेपोटिझम) नसताना तो सुपरस्टार म्हणून लवकरच नावारूपाला आला असता… तशी वाटचालही सुरू झाली होती… पण काय अवदसा आठवली माहिती नाही… जग कोरोनाच्या महामारीत झगडत असताना १४ जून २०२० ला त्याने मुंबई या महानगरीत स्वत:च्या फ्लॅटमध्ये स्वत:ला फाशी घेत संपवून टाकले. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं ..पुढे मग चार-सहा महिने त्याच्या या आत्महत्येची उलट-सुलट चर्चा केली गेली….अजूनही ती संपलेली नाही, संपणारही नाही कारण या आत्महत्येचाही काहींनी इव्हेंट केला. काहींनी राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. तर काही चॅनलवाल्यांनी टीआरपी मिळतोय या नावाखाली या आत्महत्येला वेगवेगळे रंग-रूप-जात-धर्म याची वेष्टने घालून पेश केले. या सगळ्यात शेवटच्या क्षणी त्याची मन:स्थिती कशी असेल याचा मात्र मागोवा घेण्याची गरज कुणालाच वाटली नाही.

यासाठी, कारण नव्या पिढीतील अनेक तरुण-तरुणी सुशांतसारख्यांना आदर्श मानत फिल्म इंडस्ट्रीत पाय ठेवू पाहतात. या क्षेत्रातील अस्थिरतेची कल्पना त्यांनाही आहे. कुणीतरी गॉडफादर हवा याचीही जाणीव त्यांना आहे, मात्र एखादा सुशांत सिंह जेव्हा कुणी गॉडफादर नसतानाही यशस्वी होताना दिसतो तेव्हा कुठेतरी या तरुणांना आशेचा दीप दिसू लागतो. पण जेव्हा सुशांत स्वत:ला संपवतो तेव्हा तो एकटा या जगातून जात नाही तर अनेक तरुण-तरुणींच्या आशा-आकांक्षा संपवून तो जात असतो. बिहारसारख्या थोड्या मागास राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातील माहिरा हे त्याचे मूळ गाव. वडील सरकारी नोकरीत. चार बहिणींच्या पाठीवरचा हा एकुलता एक. अठरा वर्षांपूर्वी त्याची आई गेली. त्याचा मानसिक आघात त्याच्यावर कायम राहिला. कारण आईवर त्याचे खूप प्रेम होते. ही जागा ना त्याच्या वडिलांना भरून काढता आली, ना बहिणींना. ती रिकामी जागा उरात ठेवून तो मोठा झाला. प्राथमिक शिक्षण पाटण्यात झाले. इंग्रजी माध्यमात शिकलेला सुशांत लहानपणापासूनच चुणचुणीत, हुशार. पुढे शिकायला दिल्लीत गेला. दिल्लीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल शाखेत प्रवेश घेतला. त्याला खगोलशास्त्राची आवड होती. नभातील तारे-चंद्र-ग्रह हे त्याचे कुतुहलाचे विषय होते. या ता-यांमध्ये तो स्वत:च्या आईला शोधायचा.

त्याने इंडस्ट्रीत यश मिळाल्यावर, पैसा हाती आल्यावर चंद्रावर जागाही बुक केली होती म्हणतात. याचा अर्थ त्याला कुतुहल होते पृथ्वीच्या पलिकडचे. तो या जगात रमणारा नव्हताच फार. भौतिकशास्त्रात राष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये त्याने सुवर्णपदक प्राप्त केलेले, तर इंजिनीअरिंगच्या प्रवेश पात्रता परीक्षेत तो सातवा आलेला. एवढी प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या पोराला सांभाळताना आई-वडिलांची कसोटी लागत असते. त्यातच त्याला डान्स आणि अभिनयाची आवड होती. इंजिनीअरिंगचे शेवटचे वर्ष पूर्ण न करता त्याने मुंबई गाठली. श्यामक डावरच्या ग्रुपला तो जॉईन झाला. त्यानंतर नादिरा बब्बरच्या एकजूट थिएटर समूहासोबत दोन वर्षे काम केले. स्वत:वर प्रचंड विश्वास असलेल्या सुशांतने मुंबईत राहून करिअर करण्याचा निर्णय घेतला. आणि सन २००८ मध्ये टीव्ही सीरिअलव्दारे त्याने पदार्पण केले. ‘किस देश में है दिल मेरा’ ही पहिली हिंदी धारावाहिक मिळाली. त्यानंतर ‘जरा नच के दिखा, झलक दिखला जा’ या डान्स शो मध्ये तो दिसला. त्याला खरी ओळख मिळाली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेतील मानव या पात्राद्वारे.

मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठीच लढा

नव्या पिढीत त्याची लोकप्रियता वाढली. ‘कुमकुम भाग्य’, ‘सीआयडी’ या मालिकांमध्येही तो काम करू लागला आणि अवघ्या पाच वर्षांत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सन २०१३ मध्ये अभिषेक कपूरच्या ‘काय पोछे’ या हिंदी चित्रपटात त्याला अभिनेता म्हणून संधी मिळाली. चित्रपट फार चालला नाही; मात्र सुशांतच्या अभिनयाची तारीफ झाली. अनेक दिग्दर्शकांचे लक्ष वेधले गेले. ‘शुद्ध देसी रोमान्स’ या वाणी कपूर, परिणीती चोपडा यांच्या सोबतच्या चित्रपटांचीही चर्चा झाली. ‘केदारनाथ’ या चित्रपटाला फार प्रतिसाद मिळाला नाही. तर ‘सोन चिडिया’ला देखील यश मिळाले नसले तरी सुशांतच्या अभिनयाने लक्ष वेधून घेतले. सन २०१४ मध्ये ‘काय पोछे’ मधील भूमिकेबद्दल सुशांतला बेस्ट डेब्यू मेल अभिनेताचा पुरस्कार प्राप्त झाला. सुशांतची बॉलिवूडमध्ये खरी ओळख निर्माण झाली ती सन २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाव्दारे. हा तसा चरित्रात्मक (बायोपिक) चित्रपट. त्यामुळे तो किती चालेल याविषयी शंका होती.

चित्रपटाचे दिग्दर्शक होते नीरज पांडे. त्यांनी एम. एस. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांतचे नाव अगोदरच निश्चित केले होते. हा रोल स्वीकारणे तसे नव्याने पदार्पण केलेल्या सुशांतसाठी धोकाही होता आणि आव्हानही. धोका यासाठी की, एकदा का तुमची चरित्रात्मक चित्रपटात ओळख झाली की, त्याच टाईपचे चित्रपट वाट्याला येण्याची भीती अधिक असते. आणि आव्हान यासाठी होते की, धोनी हा सर्व भारतीयांचा लाडका क्रिकेटपटू असल्यामुळे त्याची भूमिका करणा-या अभिनेत्यावर दर्शकांचे विशेष लक्ष होते. सुशांतने हे आव्हान स्वीकारले. तसा तो धूर्त असल्यामुळे या चित्रपटाला सक्सेस मिळाले तर ‘अपनी लाईफ हो जायेगी’ याची त्याला जाणीव होती. अक्षरश: सुशांतमध्ये दर्शकांनी धोनीला पहिले. इतका तो धोनीमय झाला होता. त्यासाठी त्याने किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सराव केला. धोनीच्या अनेक मॅचच्या व्हीडीओंचा अभ्यास केला.

धोनीची मैदानावरील हालचाल, मैदानाबाहेरील हालचाल, निर्णयक्षमता शारीरिक फिटनेस, यष्टीमागे असतानाच्या हालचाली, बॅटिंग करतानाच्या हालचाली, कर्णधार म्हणून मैदानावर सहकारी खेळाडूंशी चर्चा करतानाचा ‘कुलपणा’. त्याचे गाजलेले हेलिकॉप्टर शॉट याचा सखोल अभ्यास अनेक महिने केला. गौतम मंगेला यांच्याकडे क्रिकेटचे बेसिक प्रशिक्षण घेतले. सरावादरम्यान तो जायबंदी झाला तरीही त्या जखमा त्याने अभिमानाने मिरवल्या. अभ्यास करताना तीन वेळा तो धोनीला भेटला आणि शंकांचे समाधान करून घेतले. स्वत: सुशांत म्हणाला होता. ‘‘धोनी आणि माझ्या आयुष्यात अनेक गोष्टींत साम्य आहे, त्यामुळे भूमिका साकारणे सोपे गेले!’’ विश्वास बसणार नाही, परंतु या चित्रपटाने १३० कोटींवर कमाई केली आणि सुशांत हा अधिक उजळून निघाला.

मधल्या काळात खान नावाच्या खानावळीला दर्शक जरा कंटाळलेलेही होते. त्यांना नवा चेहरा हवा होता तो सुशांतच्या रूपात त्यांना दिसला. त्यातही कोणत्या घराण्याचा वारसा त्याच्या पाठीशी नव्हता. घराणेशाहीला धक्के देणारे हवे असतात. ते सुशांतने द्यायला सुरुवात केली होती. अगोदरच गावाकडून मोठ्या शहरात आल्यावर आणि हाती प्रचंड पैसा आल्यावर बिघडायचा जो धोका एखाद्या तरुणाच्या बाबतीत असतो तसा तो सुशांतच्या बाबतीतही झाला. वयाच्या तिशीत तो कोट्यवधीमध्ये खेळू लागला. निर्माते तो म्हणेल तेवढे मानधन देऊ लागले. त्यातूनच मग यशाची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंड, व्यसन, गाड्या या भौतिक-शारीरिक सुखाच्या तो अधीन झाला. अंकिता लोखंडे, रिया चक्रवर्ती, सारा अली अशा अनेकजणी त्याच्या आयुष्यात आल्या. फार्महाऊसवर पार्ट्या होऊ लागल्या. नवनवीन चारचाकी गाड्या त्याच्या ताफ्यात आल्या.

ड्रग्जच्या आधीन तो झाल्याची चर्चा होऊ लागली. मेहनतीने मिळविलेले हे यश सांभाळताही आले पाहिजे. ज्या सुशांतकडे फिल्मी बॅकग्राऊंड नाही म्हणून त्याच्या सोबत काम करायला ज्या अभिनेत्री एकेकाळी टाळत होत्या त्या अभिनेत्री देखील आता सुशांतच्या लाडक्या झाल्या होत्या. त्यामुळे सुशांतचे पाय जमिनीवर कुठे राहिले? तो हे सगळे फिल्मी जगणे फ्लॅट-गाड्या-मुली-व्यसन यात गुरफटला आणि नेमक्या या संधीचा फायदा घेत प्रस्थापितांनी त्याची बदनामी सुरू केली. हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे हे ओळखणा-यांनी शर्यतीतून बाद करण्यासाठी त्याच्या हातातील काही चित्रपट अक्षरश: ओढून घेतले .

यश पचवता आले पाहिजे. त्यासाठी पाय सदैव जमिनीवर हवेत हा बॉलिवूडचा पहिला नियम आहे पण या नियमाला फाट्यावर मारणारा सुशांत आपली होत असलेली कोंडी पचवू शकला नाही. यातून तो नैराश्याकडे जाऊ लागला. एकाकी पडला. तुमच्या यशात सहभागी व्हायला हजारो बाप येतात परंतु अपयश, नैराश्य यामध्ये कुणी सहभागी व्हायला तर दूरच पण सांत्वन करायलाही कुणी येत नाही. सुशांतच्या बाबतीत तेच झाले. त्यामुळेच अशा एकाकीपणात त्याला बालपणातील आईच्या प्रेमाच्या आठवणी होऊ लागल्या आणि त्या तो सोशल मीडियावर शेअर करू लागला. त्यातच त्याची माजी व्यवस्थापक दिशा सॅलीयनने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली, तेव्हा सुशांत अधिकच धास्तावला. आलेला ताण झेलण्याची ताकद त्याच्यात नव्हती. मनाने तो कमकुवत झाला होता.

एखादा स्टार आपल्या प्रतिस्पर्ध्याला भीत नसेल तेवढा तो आपल्या सावलीला भीत असतो. आपण नैराश्याने वेढलोय हे कळाले तर मार्केटमधली पत संपेल या भीतीपोटी चेह-यावर उसने अवसान आणून ही स्टार मंडळी जगत असते. सुशांतने तेच केले आणि एका अवसान गळालेल्या क्षणी स्वत:ला फाशी घेत संपवून टाकले. नव्या पिढीत संयमीपणा, सहनशक्ती राहिलेली नाही हेसुद्धा तितकेच खरे. खूप लवकर त्यांना यशाची शिडी गाठयचीय. मग त्याच शिडीवरून घरंगळताना स्वत:ला बघायची ताकद मात्र त्यांच्यात नाही. ही ताकद, ही सहनशक्ती ज्यांच्यात आहे त्यांनी यापुढे तरी बॉलिवूडमध्ये पाय ठेवण्याचे स्वप्न पहावे, एवढा धडा तरी सुशांतच्या आत्महत्येतून नव्या पिढीने शिकला तरी खूप झाले.

डॉ. विशाखा गारखेडकर
मोबा.: ९४२१६ ६५६५८

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या