18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeविशेषस्वप्नरंजन

स्वप्नरंजन

एकमत ऑनलाईन

काय भयानक स्वप्नं पडतात एकेक! दचकून जागा झालो ना राव! लोक काहीतरी बोलतात, मीडियावाले त्याच्या बातम्या करतात, आपण त्या पेपरात वाचतो, टीव्हीवर न्यूज चॅनेलमधल्या ‘फ्री-स्टाईल चर्चा’ सतत सुरूच असतात. कोण काय बोलतंय, हे पाहताना समजत नाही हे खरं; पण नंतर स्वप्नात येतो तो द्वेष, तो संताप, तो जोश, तो आवेश… आणि तो अर्थशून्य हलकल्लोळ! न्यूज अँकर तर स्वप्नात येऊन आम्हाला कायम वेड्यात काढतच असतात; पण काही दिवसांपूर्वी एका नेत्यानं स्वप्नात येऊन विनाकारण आमच्या थोबाडीत मारली. कारण विचारेपर्यंत स्वप्नच संपलं. नंतर एका नेत्यानं सरळसरळ आमचा कोथळा बाहेर काढला.

खडबडून जाग आली तरी पुढे तासभर पोट दुखत राहिलं. कधी उगीचच घरात फूट पडलीय, असं स्वप्न पडतं. कधी-कधी स्वप्नात आम्ही जमिनीवर उभे असतो. दोन्ही पायांवर खंबीरपणे! पण आजूबाजूनं सगळे ओरडतात ‘पडणार… पडणार… पडला… पडला… नाही जमणार, पडणार…’ आणि जाग आल्यावर कळतं की आपण बेडवरून खाली पडलो आहोत. एकदा तर आम्ही स्वप्नात ‘घर बदलण्याची’ धमकी कुटुंबीयांना दिली. ‘आमचा उचित सन्मान होत नाहीये,’ असं घरच्यांना ठणकावून आम्ही शेजा-यांना फोन लावला. ‘मला तुमच्या घरात प्रवेश द्याल का,’ असं विचारलं आणि शेजारीसुद्धा ‘कोणत्याही क्षणी स्वागत आहे,’ असं म्हणाले हो!

झोपेत चालण्याची सवय नसल्यामुळं त्या दिवशी आम्ही बचावलो. नाहीतर अपरात्री शेजा-यांची डोअरबेल वाजवली असती. आपल्यासारख्याचं असं जंगी स्वागत होत नसतं; पण स्वप्नात दिसतं. एवढंच कशाला, कोविडकाळात उत्पन्न आटल्यामुळं चिंतेत असतानासुद्धा आम्हाला घरावर ईडीचा छापा पडल्याचं स्वप्न पडलं होतं, आता बोला! आम्ही तंबाखूसुद्धा खात नाही; पण कधी-कधी आपल्या घरात पोलिसांना गांजा सापडलाय, असं स्वप्न पडतं. काल तर स्वप्नरंजनाचा कळस झाला. सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखानं सुरक्षा व्यवस्था नाकारल्याचं स्वप्न आम्हाला पडलं. ‘‘आमच्या सुरक्षिततेवर एवढा खर्च कशाला? आम्ही गुण्यागोविंदानं नांदू… कुणाला एक शब्दही उलटून बोलणार नाही. प्रतिपक्षातल्या नेत्यांना सन्मानानं वागवू. अपशब्द सोडाच; पण कठोर शब्दही कधी बोलणार नाही. मग आमच्या जिवाला धोकाच राहणार नाही. सबब आम्हाला सुरक्षा कवच नको,’’ असं नेतेमंडळींनी लेखी दिलं. खरोखरच सगळे एकमेकांशी प्रेमानं वागू लागले.

प्रतिपक्षातल्या नेत्यांच्या खांद्यावर हात टाकून, एकमेकांना टाळ्या देऊन हसत-खेळत गप्पा मारू लागले. दचकून आम्हाला जाग आली आणि आम्ही स्वप्नाचा तपशील आठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रत्येक नेत्याच्या हातात किंवा खिशात होमिओपॅथीच्या पांढ-या गोळ्यांची डबी आपल्याला दिसली, हे आम्हाला आठवलं. मग मात्र झोप पुरती उडाली.

या विचित्र स्वप्नाचं विश्लेषण करताना लक्षात आलं, की आज नेत्यांनी किंवा टीव्ही अँकरनी नव्हे तर चक्क एका कायदेतज्ज्ञानं आपली झोप उडवलीय. होमिओपॅथीच्या एका पुस्तकाचं प्रकाशन अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झालं तेव्हा ते म्हणाले, ‘‘होमिओपॅथी शारीरिक-मानसिक आजारांवर उपयुक्त आहे. भाषा सुधारण्यासाठी नेत्यांना होमिओपॅथीच्या गोळ्या द्या; म्हणजे त्यांना झालेला द्वेषाचा रोग नाहिसा होईल.’’ ही बातमी आम्ही वाचली होती, त्यामुळंच मेंदूनं झोपेत भरा-या मारल्या होत्या.

हिमांशू चौधरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या