27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeविशेषगोडवा संक्रांतीचा

गोडवा संक्रांतीचा

एकमत ऑनलाईन

आपला देश संस्कृतीप्रधान आणि सणावारांचा देश आहे. वर्षाचा प्रत्येक महिना किंवा प्रत्येक दिवस काही ना काही सणवार असतात. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात संक्रांत हा सण येतो. संक्रांत म्हणजे संक्रमण करणारा म्हणजे वाढ करीत जाणारा वर्धिष्णु सण! या दिवसापासून दिवस वाढत जातो. रात्र कमी होते. वातावरणातील थंडावा कमी होऊन उष्मा वाढत जातो. सूर्याचा मकर राशीत होणा-या आगमनाचा पहिला दिवस म्हणजे संक्रांत होय! अनेकांच्या मनात दरवर्षी हा प्रश्न पडतो की दरवर्षी संक्रांत त्याच तारखेला का येते? याचे कारण सूर्य सौरगणनेनुसार म्हणजे सूर्यकॅलेंडरनुसार १४, फारच झाले तर १५ जानेवारी याच दिवशी संक्रांत हा सण येतो. आशिया खंडात हा संक्रांतीचा सण बहुतांश देशात साजरा केला जातो. नेपाळमध्ये तो माधी या नावाने, थायलंडमध्ये सोंक्रांत तर म्यानमारमध्ये थिंगयान या नावाने हा सण साजरा करतात.

भारतात विविध प्रांतात विविध नावांनी वेगळ्या प्रकाराने हा सण साजरा केला जातो. केरळमध्ये पोंगल, लोहरी अशी या सणाची नावे आहेत. राजस्थान, गुजरातमध्ये हा दिवस पतंगाचा दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी गुजरात, राजस्थानमध्ये पतंग उडवण्याच्या कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पतंग उडविण्याचा मोह आवरता येत नाही. त्यादिवशीचे आकाश लाल, पिवळ्या, निळ्या विविध रंगांनी सजलेले असते. संक्रांतीचा हा उत्साह कितीतरी दिवस मनात रेंगाळत राहतो. अशा उत्साहात नवीन वर्षाची सुरुवात होते. म्हणूनच जानेवारी महिना उत्साहाचा, नववर्षागमनाचा आणि आनंदाचा असतो.

हाच आनंद द्विगुणित करणारा, वाढवणारा सण म्हणजे संक्रांत! या दिवसाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन कारणांमुळे महत्त्व आहे. वैज्ञानिक कारण म्हणजे, या दिवसानंतर रात्र लहान होऊ लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो. थंडीचा जोर पूर्णपणे नसला तरी थोड्या प्रमाणात कमी होऊ लागतो. हवामान कोरडे असते. अशा वेळी तीळ आणि गूळ यांचा आहारात समावेश करणे हा आरोग्यसल्ला अतिशय गुणकारक ठरतो. तिळाचा स्निग्धपणा आणि गुळाचा उष्णपणा याचे परिणाम तब्येतीसाठी उत्तम! तसेही आपल्याकडे ऋतुमानानुसार सणांचे, देवांचे, प्रसाद असतात. म्हणूनच संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, वड्या, गूळपोळ्या हा प्रमुख पदार्थ असतो. उत्सवप्रिय अशा आपल्या देशात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वातावरणातला उत्साह, सळसळता आनंद, हवेच्या झुळकीबरोबर अंगाला मनाला स्पर्श करीत असतो. या दिवसातले वारे संक्रांतीचे वारे म्हणून प्रसिद्ध आहेत. या वा-यांवर अनेक मराठी कविता, भावगीते बेतलेली आहेत. हीच वा-याची अनुकूलता पतंग उडविण्यासाठी योग्य असते आणि म्हणूनच पतंगाचा खेळ या दिवसात खेळला जातो. नववर्षाची सुरुवात अशा आनंददायक सणाने होत असते. यातच २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या विशेषत्वाची भर पडते. भारतीयांना या दुग्धशर्करा योगाची खुशी होते.

संक्रांतीनिमित्त दिल्या जाणा-या तिळगुळाच्या विविध पदार्थांमागचा उद्देश देखील अतिशय चांगला आहे. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत आपण एकमेकांना भेटतो यामागील उद्देश असा की, वर्षभरात जो काही मनमुटाव, वाद आपल्यात झाले असतील, ज्या काही कटू घटना आपल्या आयुष्यात घडल्या असतील त्या मागे टाकून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करूया! असा गोड संदेश हा सण देतो.
भारतीय परंपरेवर, संस्कृतीवर नजर टाकल्यास असे लक्षात येईल की, आपल्या प्रत्येक सणामधून एक चांगला संदेश नेहमीच असतो. प्रत्येक सणाला एक कथानक असते. त्या-त्या सणांची देवता असते. अशाच प्रकारच्या अनेक कथा रूपकं या सणाशी जोडलेले आहेत. यावर्षी १४ जानेवारी (शुक्रवार) २०२२ रोजी संक्रांत आहे. याचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांत देवीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. अशा प्रकारची वर्णने सर्वत्र वाचनात येतात. पौराणिक कथा काहीही असल्या तरी त्यामुळे संक्रांतीचा उत्साह मात्र अबाधित असतो.
संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्यात तीळ टाकून चविष्ट भाजी बनवली जाते. या भाजीला लेकुरवाळी भाजी म्हणतात. यासोबत बाजरीची, ज्वारीची आणि मक्याची भाकरी, वालाच्या शेंगांची भाजी, मुगाची खिचडी, गुळाची पोळी असा नैवेद्य देवाला दाखवितात. या दिवशी प्रत्येक ठिकाणी तिळाचा वापर केला जातो. इतके अनन्यसाधारण तिळाला महत्त्व आहे. स्त्रियांना या सणाचे अपार कौतुक असते. नवविवाहितांचे तर अधिक कौतुक होते. पहिल्या संकांतसणाच्या आठवणी आजही एखाद्या प्रौढेच्या चेह-यावर नवतारुण्याचे तेज आणतात. काळी साडी, हलव्याचे दागिने, हळदी-कुंकू अशा अनेक आठवणी या संक्रांतीशी जोडलेल्या असतात. लहान बाळांचे देखील असेच कौतुक होते. काळे झबले, हलव्याचे दागिने, लूट अशा प्रकाराने आनंद साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी संक्रांतीपूर्वी हलवा देखील घरी बनविला जात असे. पुरेसा हलवा तयार झाल्यावर हलव्याचे दागिने बनविले जात. नवीन नवरी, नवं बाळ यांना या दागिन्यांनी सजवत कौतुक करीत असत. आजही प्रत्येकाच्या आल्बममध्ये हलव्याचे दागिने आणि काळी साडी घातलेला एकतरी फोटो निश्चित सापडेल.

आजही, मॉडर्न युगात या गोष्टी आवर्जून केल्या जातात. काळ्या साड्या ते आता ड्रेस मटेरियल असा प्रवास असला तरी त्याचे अस्तित्व आढळून येते. घरोघरी हळदीकुंकू, वाणं देणं असे कार्यक्रम गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे थांबल्यासारखे झालेत. बंद मात्र नाहीत. यावर्षी कोरोना कमी प्रमाणात आहे. त्यामुळे पुन्हा उत्साहाने खरेदी होत आहे. कारण मनुष्य मुळातच आनंद देणारा आणि घेणारा आहे. अर्थात हा आनंद लुटताना कोरोनाच्या जबाबदारीचं भान असायला हवं. कारण ती आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शेवटी मनुष्य हा आनंदप्रिय असला तरी तो समाजशील प्राणी आहे. तेव्हा आपापल्या जबाबदा-या सांभाळत संक्रांतीचा सण गोड व्हावा यासाठी खूप खूप शुभेच्छा! आपापसातील मतभेद, वाद कडू आठवणी सर्वकाही विसरून एकमेकांना तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला! मस्त तिळगूळ खा! नवीन कपडे घाला! आणि पतंग उडविण्याचा आनंद लुटा!

-अरुणा सरनाईक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या