23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeविशेष‘टार्गेट’...पंजाबी गायक!

‘टार्गेट’…पंजाबी गायक!

एकमत ऑनलाईन

सुप्रसिद्ध गायक मूसेवाला यांच्या हत्येमुळे पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सद्यस्थितीत गँगस्टरनी पंजाबी गायकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामागे राजकीय शक्तीचा देखील अप्रत्यक्षपणे हात आहे. नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गँगस्टरचे मनोधैर्य वाढतच गेले आहे. २०१९ मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तत्कालीन डीजीपी दिनकर गुप्ता यांना नेते आणि गँगस्टर यांच्यात असलेल्या मिलीभगतची चौकशी करण्याचे आदेश दिले. ही चौकशी आजपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही.

पंजाबचे प्रसिद्ध गायक मूसेवाला यांची रविवारी हत्या करण्यात आली. अवघ्या २८ वर्षांच्या सिद्धूच्या हत्येने संपूर्ण पंजाब हादरला आहे. पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये गोल्डी ब्रारने लिहिले होते की, आज मूसेवालाची पंजाबमध्ये हत्या करण्यात आली. मी, सचिन बिश्नोई, लॉरेन्स बिश्नोई याची जबाबदारी घेतो. हे आमचं काम आहे. आमचे बंधू विक्रमजीत सिंग मिदुखेरा आणि गुरलाल ब्रार यांच्या हत्येप्रकरणी मूसेवालाचे नाव पुढे आले होते. पण पंजाब पोलिसांनी मूसेवालावर कोणतीही कारवाई केली नाही. अंकितच्या एन्काऊंटरमध्ये मूसेवालाचा सहभाग असल्याचे आम्हाला समजले. मूसेवाला आमच्या विरोधात काम करत होता. दिल्ली पोलिसांनी त्याचे नावही घेतले होते, पण मूसेवाला प्रत्येक वेळी राजकीय ताकदीचा वापर करून स्वत:ला वाचवत होता.’ एका गायकाची हत्या करून इतक्या उघडपणाने स्वत:चे नाव जाहीर करून जबाबदारी स्वीकारण्यापर्यंत गँगस्टरची गेलेली मजल हे कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणा-यांचे घोर अपयश आहे. या हत्येच्या एक दिवस अगोदरच पंजाब सरकारने शुभदीप सिंग सिद्धू ऊर्फ सिद्धू मूसेवालासह ४२४ जणांची व्हीआयपी सुरक्षा काढून घेतली होती. हल्लेखोरांनी हाच डाव साधला आणि दुस-याच दिवशी सायंकाळी मूसेवाला याची हत्या झाली. यावरून पंजाबमधील व्हीआयपी कल्चर किती धोक्यात आले आहे आणि गुन्हेगारांचे प्रस्थ आणि बळ किती वाढले आहे, हे लक्षात येते.

आज पंजाबमधील बहुतांश गायक आणि कलाकार हे गुंडांच्या टोळीच्या रडारवर आहेत. अलीकडच्या काळात या गुंडांकडून खंडणी वसुलीचे प्रकारही वाढले आहेत. कारण या क्षेत्रात आलेला प्रचंड पैसा. हीर-रांझा, मिर्झा, जुगनी, छल्ला आणि मुंदरी, लौंग आणि कैंठा हा पंजाबी गायकांचा आत्मा राहिला आहे. परंतु बदलत्या काळाने गायकांच्या मनावर गुंडांची दहशत राज्य करत आहे. बंदूक, जबरदस्ती, गुंडगिरी, धमकी या गोष्टींचा परिणाम दिसत आहे. दिवसेंदिवस गायन क्षेत्रात गुंडांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. पूर्वी देखील पंजाबची परंपरा पुढे नेण्यासाठी पंजाबी गायक सर्व पातळीवर कला सादर करायचे. पारंपरिक रचनांचा उपयोग करत संस्कृती जोपासायचे. पण आता चित्र बदलले आहे. आता गायकांना गँगस्टर लोकांसाठी आणि प्रमोशनसाठी गाणे म्हणावे लागत आहे. पंजाबी लोकगीताची एक बाजू जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे सादरीकरण करते. परंतु यात बंदुकीची गोळी कधी शिरली हे समजलेदेखील नाही. गायकीत ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी आल्याने गँगस्टर मंडळींचा वावर देखील वाढला आहे.

पंजाबची बहरलेली शेती, गावोगावी भरणा-या जत्रा यांची गावकरी आतुरतेने वाट पाहात असत. पंजाबी गायक तेथे बल्ले बल्ले करत असत आणि पंजाबी परंपरेचा उत्सव व्हायचा. आसा सिंग मस्ताना, सरदूल सिकंदर, सुरजित बिंदरखिया, गुरदास मान, मनमोहन वारस, कमल हीर आदी गायकांनी पंजाबी गीत संस्कृती नेहमीच आघाडीवर ठेवली आहे. पंजाबच्या गायकीचा बोलबाला कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि अन्य युरोपीय देशांपर्यंत पोचला. बडे कलाकार देखील परदेशात शो करू लागले. डॉलरच्या झगमगाटाची सर्वांना भुरळ पडली आणि पंजाबचे गीतकार सभ्यता, संस्कृती विसरून शस्त्रास्त्राच्या संस्कृतीकडे वळले. अशा काळातच बब्बू मान यांच्यापासून ते सिद्धू मूसेवाला या गायकांचा प्रवेश झाला.

सिद्धू मूसेवालाने आपल्या करिअरची सुरुवात गीतकार म्हणून केली होती. ‘लायसन्स’ या गाण्याचे बोल त्याने लिहिले होते. सिद्धू मूसेवाला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता तेव्हा त्याला संगीताची आवड निर्माण झाली. मूसेवालाने त्याच्या महाविद्यालयीन जीवनापासून संगीत शिकण्यास सुरुवात केली. सिद्धू मूसेवाला ‘सो हाय’ गाण्यामुळे अधिक चर्चेत आला. परदेशात शो आणि अल्बम रिलिज झाल्याने कोट्यवधी रुपये आले आणि मूसेवाला गँगस्टरच्या रडारवर आले. पंजाबच्या नामांकित गायकांकडून खंडणी वसुली सुरू झाली. सर्वांत पहिला बळी ठरला तो पंजाबचा नवोदित गायक परमीश वर्मा. गँगस्टर लोकांनी त्याच्याकडे खंडणी मागितली आणि त्याने नकार दिल्याने १४ एप्रिल २०१८ रोजी त्यावर हल्ला केला. सुदैवाने गोळी पायाला लागली आणि तो बचावला. या हल्ल्याची जबाबदारी दिलप्रित ढाहा बाबाने घेतली आणि ‘पुढील वेळेस तू वाचणार नाहीस ’, अशी धमकी दिली. दिलप्रित बाबा गँगस्टरने पंजाबी गायक ग्रेवालकडून देखील खंडणी मागितली होती. गँगस्टरच्या रडारवर मनकिरत औलख देखील आहेत. गायक बलकार सिद्धूकडून देखील दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. रॉय जुझारलादेखील अश्लील पंजाबी गीतांवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मोहालीत डेराबस्सी येथे पंजाबी गायक नवज्योत यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा उलगडा अद्याप झालेला नाही.

सद्यस्थितीत गँगस्टरनी पंजाबी गायकांत दहशत निर्माण केली आहे. त्यामागे राजकीय शक्तीचा देखील अप्रत्यक्षपणे हात आहे. नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गँगस्टर लोकांचे मनोधैर्य वाढतच गेले आहे. २०१९ मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तत्कालीन डीजीपी दिनकर गुप्ता यांना नेते आणि गँगस्टर यांच्यात असलेल्या मिलीभगतची चौकशी करण्याचे आदेश दिले. ही चौकशी आजपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. यादरम्यान गुरदासपूर जिल्ह्यात माजी अकाली सरपंच दलबीर ढिंलवा यांच्या हत्येनंतर गदारोळ निर्माण झाला होता. फाजिल्का येथे राहणारा गँगस्टर रॉकीची दुस-या टोळीने हत्या केली. त्याच्या शोकसभेत अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. म्हणूनच अशा प्रकारच्या राजकीय अभयामुळेच लॉरेन्स बिश्नोईसारख्या लोकांचे फावत आहे. त्याच्यावर असंख्य गुन्हे दाखल असून तो आजही तिहार तुरुंगातून आपले नेटवर्क चालवतो. पंजाबची गायकी सध्या खंडणीबहाद्दर आणि गुंडांच्या विळख्यात अडकली आहे. गायन क्षेत्रात देशात आणि परदेशात मिळणारा प्रचंड पैसा पाहून गुंडांची वक्रदृष्टी या क्षेत्रावर पडली आहे. त्यांना वेळीच पायबंद घातला नाही तर अन्य क्षेत्रातही त्यांची घुसखोरी होण्यास वेळ लागणार नाही.

-व्ही. के. कौर

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या