एका प्रतिष्ठित इंग्लिश विद्यापीठाच्या प्राध्यापकाने असे म्हटलेय की, इतिहास म्हणजे जे काही असते ते घडून गेलेल्या गोष्टीच्या लिखित स्वरूपातल्या नोंदी आणि त्यावर आधारित अशी कागदपत्रे की जी आपल्या भावी पिढ्यांच्या माहितीसाठी ठेवलेली असतात. कालौघात व्यक्ती किंवा संघटना या टिकतात वा नष्ट पावतात, पण संग्रहित माहिती (डाटा) आणि भाष्य हे कायम राहते आणि तोच आपला वारसा असतो. हे बरोबर आहे की, आपल्याकडे पुष्कळ माहिती, साहित्य आहे; पण त्याला व्यवस्थितपणे संग्रहित करावे लागेल आणि काळ आणि भविष्यातील पिढ्याच सांगू शकतील की, आपण जे काही दस्तऐवज तयार केलेत ते ‘ऐतिहासिक’ या संज्ञेस पात्र आहेत की नाहीत.
हे सारं कितीही खरं असलं तरी निदान त्यादृष्टीने तसे प्रयत्न तरी झाले पाहिजेत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याला आणि संपूर्ण मराठवाड्यालाच एक स्वतंत्र इतिहास आणि वारसा आहे. परंतु लिखित वा दस्तऐवज स्वरूपात त्याची नोंद होणे गरजेचे आहे. आणि हे काम भावी पिढ्यांच्या माहितीसाठी खूपच महत्त्वाचे ठरते. लिखित स्वरूपातल्या अशा नोंदी या अभ्यासक्रमाचा भाग बनला पाहिजे.
ज्या जिल्ह्यात, गावात आपण राहतो; तिथली भौगोलिक, ऐतिहासिक माहिती आपल्याला असलीच पाहिजे. डॉ. जनार्दन वाघमारे म्हणतात तसे, इंग्लंडसारख्या देशात जसे तिथल्या स्थानिक इतिहासाला महत्त्व आहे. तिथल्या त्या-त्या ठिकाणच्या अभ्यासक्रमाचा तो एक भाग असतो; तसंच आपणही केलं पाहिजे. डॉ. वाघमारे म्हणतात, आपल्या परिसराला जसा इतिहास असतो तसा भूगोलही असतो. भूगोल व इतिहास यांच्यामध्ये एक ऋणानुबंध असतो. आपल्या जीवनाला हा संदर्भ असला पाहिजे. म्हणून आपल्या प्राथमिक शिक्षणात स्थानिक भूगोल व इतिहास शिकवला पाहिजे.
ही कल्पना चमकदार तर आहेच पण ती खूपच चांगली आहे आणि ती अमलात आणण्याकरिता; तसे दस्तऐवजही निर्माण होणे आवश्यक आहे. लातूर जिल्हा व शहर, यांना जे व्यक्तिमत्त्व डॉ. वाघमारेंच्या कल्पनेतले लाभलेले आहे; त्या व्यक्तिमत्त्वाचाच अनेक अंगांनी शोध घेणारा प्रयत्न किंबहुना संशोधन प्रकल्प म्हणून डॉ. जयद्रथ जाधव व त्यांच्या सहका-यांनी संपादित केलेला दस्तऐवज ‘लातूर : वसा आणि वारसा’ या तब्बल आठशे सोळा पानांच्या ग्रंथाकडे पहावे लागेल. हे केवळ एक पुस्तक वा ग्रंथ नसून तो त्या जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोलही आहे आणि दोन्हीतला ऋणानुबंध स्पष्ट करणारा वसा आणि वारसा देखील आहे. उदाहरणार्थ लातूरला हिंदू-मुस्लिम दंगा झालेला नाही. इथले सामाजिक वातावरण सौहार्दपूर्ण आहे. कासीम रझवी, हा रझाकाराचा नेता लातूरचाच.
Read More स्वदेशी लसीचा निर्माता
तरी देखील; लातूर शहरात जातीय तणाव कधी निर्माण झाला नाही. त्यादृष्टीने लातूर जिल्ह्यातले औसा, रेणापूर, किनगाव, निलंगा, लातूर आदी ठिकाणचे सूफी संतांचे दर्गे प्रसिध्द आहेत. त्याचबरोबर सामाजिक सलोख्याच्या साथीने, लातूर जिल्हा हे विविध चळवळींचे ऊर्जाकेंद्र राहिलेले आहे. या साºया चळवळीचा इतिहासदेखील एकत्रितपणे सलगरीत्या लिखित स्वरूपात उपलब्ध नाही.
लातूर जिल्ह्यात मठ परंपरा देखील आहेत. जैन, दशनामी, लिंगायत, महानुभाव, वारकरी, दत्तसंप्रदायी असे मठ जिल्ह्यात आहेत. औशाच्या हिरेमठ संस्थानाला केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याचा मान आहे. आता ही गोष्ट किती लोकांना माहीत आहे? लातूर जिल्हा हे पर्यटन क्षेत्र म्हणूनसुध्दा नावारूपाला येऊ शकते. खरोसा, हासेगाव, कळमगाव येथील प्राचीन लेण्या, निळकंठेश्वर मंदिर (निलंगा), विठ्ठल मंदिर (पानगाव), महादेव मंदिर (गणेशवाडी), अनंतपाळ मंदिर (शिरू अनंतपाळ), भीमाशंकर मंदिर (टाका), सिध्देश्वर मंदिर (झरी बु.), सिध्देश्वर मंदिर (लातूर), पापविनाश मंदिर (लातूर), अशी कितीतरी मंदिरे व तेथील शिल्पकला आजही सुस्थितीत आहेत. त्यांना इतिहास देखील आहे. परंतु लिखित दस्तऐवज सलग व एकत्रित नव्हता.
‘लातूर : वसा आणि वारसा’ या प्रकल्पाच्या मागची संपादक मंडळाची प्रामाणिक भूमिका डॉ. जाधव यांच्या म्हणण्यानुसार अशी की, कितीतरी संपन्न आणि प्राचीन इतिहासाचा वारसा या जिल्ह्याला लाभला आहे. पण त्यांचे संदर्भ आपल्याला ज्ञात नाहीत. लातूरच्या सांस्कृतिक इतिहासाचा प्रारंभ थेट मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, बदामीचे चालुक्य, यादव वंश, बहामनी, बरीदशाही, मुघल, निझाम आदी राजवंशांनी होतो. चार ताम्रपट व अठ्ठावीस शिलालेख आहेत. इ.स. ५९९ चा कासारशिरसीचा ताम्रपट, इ.स. ११५० चा गरसोळी (ता. रेणापूर), यावरून हे समजते की; लातूरसह मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचाच वारसदार आहे.
लातूर जिल्ह्यात नद्या किती आहेत. मांजरा, तावरजा, रेणा, मन्याड, तिरू, देव, घरणी आदी नद्या जिल्ह्यातून वाहतात. क्षेत्रफळ किती, लोकसंख्या किती; अशा गोष्टीसोबतच जिल्ह्यातील किल्ले, मंदिरे, निजामाबरोबरच्या संघर्षाचा इतिहास; जिल्ह्यातीलच तांदुळजा येथील बावणेच्या गढीत या प्रदेशाला ‘मराठवाडा’ नाव कसे पडले; अशा असंख्य घटनांचा व संदर्भाचा समावेश या दस्तऐवजात केलेला आहे.
मुख्य म्हणजे हे सारं संग्रहित रूपाने आपल्याला एकाच दस्तऐवजात भेटते. एवढेच नव्हे तर, तब्बल नऊ विभागांत हा संशोधन प्रकल्प साकारला असून, लातूरचा भूगोल व इतिहास, हैदराबाद मुक्ती आंदोलन व लातूर, शिक्षण व विचारधारा, राजकारण, विविध चळवळी, साहित्य, कला व संस्कृती, इथली प्रबोधनाची परंपरा, शेती व सहकार आणि नवव्या संकीर्ण विभागात जिल्ह्यातील महामार्ग, उद्योग, न्यायालये, जिल्ह्यातील आरोग्यसेवा, सिंचन आदींची विस्तृत माहिती आहे.
Read More आहे स्वागतार्ह तरीही…
लातूर जिल्ह्यातले वर्तमान आणि इतिहास यांची यथाशक्ती सांगड घालून हा अनमोल दस्तऐवज तयार झाला असून त्याला सर्व क्षेत्रातील ७४ लेखकांनी भर घातली आहे. हा वसा आणि वारसा; खास करून भावी पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा तर आहेच, परंतु असे प्रकल्प मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत होणे गरजेचे आहे. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली सगळ्याच जिल्ह्यांत हा लातूर पॅटर्न वसा आणि वारशाचा राबविला जावा. परंतु त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक जयद्रथ जाधव आणि त्यांना साथ देणारे सहकारी निर्माण व्हावे लागतील. अशी संग्रहित माहिती (डाटा) ही येणाºया कित्येक दशकातील आणि भावी पिढ्यांच्या धन्यवादास नक्कीच पात्र असेल.