23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home विशेष आस्वाद आणि आक्षेप....कोरोनाचा सरकारला रेड अलर्ट

आस्वाद आणि आक्षेप….कोरोनाचा सरकारला रेड अलर्ट

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढतच आहे. देशातील एक चतुर्थांश रुग्ण तर मृत्यूंची संख्या देखील देशात सर्वांत अधिक आहे. देशातील मृत्यूंची संख्या पस्तीस हजारांवर तर महाराष्ट्रातील पंधरा हजारांवर पोहोचलीय.ही चिंताजनक बाबच म्हणावी लागेल. लॉकडाऊन कडक न पाळला गेल्याने आता रोज नवनवीन ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करूनही फारसा फरक दिसत नाही . दरम्यान आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात वाढवली गेली नाही हे स्पष्टच आहे. कोणत्या भागात काय कमी पडतेय हे जाणून घेण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना सोबत घेऊन स्वत: शरद पवारांना राज्यात दौरे करावे लागत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी दौरे केले व सरकारच्या त्रुटी उजागर केल्या म्हणून पवार देखील दौरे करत आहेत असे म्हणून हा प्रश्न दुर्लक्षित करण्याजोगा नाही.

परिस्थिती खरोखरच बिकट बनत चालल्यावर आता ऊठसूठ लॉकडाऊनच्या पर्यायावर देखील नव्याने विचार करणे भागच आहे. आणि त्यासंदर्भातला निकालसुध्दा पवारांनाच घ्यावा लागेल हेही तितकेच खरे. सध्या तरी सरकारचे स्टिअरिंगच नव्हे तर चावी देखील पवारांच्याच हातात आहे हे आरोप नसून वस्तुस्थितीही तीच आहे. मुंबईतले बाँबस्फोट असोत की लातूरचा भूकंप, आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव असणा-या शरद पवारांनीच आता काही करणे गरजेचे आहे. शेवटी हे सरकार स्थापण्यामागे हात त्यांचाच आणि महत्त्वाची गृह, अर्थ व आरोग्य ही खातीदेखील त्यांच्याच पक्षाकडे आहेत. अशा तीन पक्षीय सरकारच्या कामगिरीचा विचार करताना अंकाऊंटॅबिलिटीचा सवाल उभा राहतोच. निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसकडे नाहीत म्हणून काँग्रेस मंत्र्यांच्या अधूनमधून तक्रारीही मीडियासमोर येणे चालूच असते.

कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली असताना काहीही कारण नसताना आधी शरद पवार आणि नंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. कोरोनानंतरची अर्थव्यवस्था कशी सावरायची याची चिंता पवारांनी वाहिली आणि काही मार्गदर्शनही केले. मात्र मुलाखतीतून आणि नंतरच्या दौ-यातही त्यांनी मुख्यमंत्री घरातच बसून आहेत, या आरोपावर स्पष्टीकरण देत त्यांची पाठराखण केली. प्राप्त स्थितीत प्रशासन म्हणजे पालिका , पोलिस, आरोग्य विभाग, जागोजागचे कलेक्टर हे उत्तम काम करत आहेत त्यांच्या मर्यादेत राहून. भूकंप आणि त्याआधी मुंबईतील बाँबस्फोट काळात प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधीसुध्दा रस्त्यावर उतरून नागरिकांना मदत करत असलेले दृश्य दिसले; परंतु आता ते दिसत नाही काही अपवाद वगळता. म्हणजे सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह विरोधकांकडून लावले जात असताना मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतून ठोस असे नेमके काय आले? तर, रुग्ण वाढले तरी बरेही होत आहेत.

Read More  ती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ….

मृत्यूचे प्रमाण कमी ठेवणे हे आव्हान आहे. संपूर्ण जग, देश आणि महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहे. पांढ-या कपड्यातील देवदूतावर विश्वास ठेवावाच लागेल. राज्य सरकार जनतेबरोबर आहेच. गेली सहा महिने विविध आव्हाने आली. मी हळूहळू एक-एक गोष्ट उघड करत चाललोय. उगाचच फिरणे जनतेने टाळायला हवे. मंत्रालयात कमी गेलो तरी कामाचा धडाका चालूच आहे . अर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्याची चिंता ही करावीच लागणार. हे सरकार म्हणजे गरिबाची तीन चाकी रिक्षाच आहे.स्टिअरिंग माझ्या हातात म्हणजे मी पुढे बसलेलो आणि इतर दोन पक्ष मागे बसलेले आहेत .

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत झालीय. परंतु त्यातून मार्ग काढू. ध्यानीमनी नसताना पद मिळाले वगैरे वगैरे. यावर प्रश्नकर्त्याचा सवाल, पण तुम्ही जनतेच्या मनात होता. हो , मग जनतेचे स्वप्न मी पूर्ण करणार. मी डोनाल्ड ट्रम्प नाही. माझी माणसं मी मरू देणार नाही. मी काही फेविकॉल लावून बसलेलो नाही आणि शेवटी ही मुलाखत चालू असताना हे सरकार पाडून दाखवा, असे विरोधकांना थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले. मुलाखतीमध्ये प्रश्नकर्ते थेट अनेकदा लीड करत होते म्हणजे स्वत:च आधी उत्तरे सांगत मग प्रश्न विचारणे असं.

प्रत्यक्षात अशा मुलाखतींचे प्रयोजन काय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणारच. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला कुठली दिशा मिळणार किंवा आरोग्य सेवेत भविष्यात कुठल्या सुधारणा होणार, एकंदरीत नियोजन कसे असणार यावर काहीही दिशादर्शन किंवा व्हिजन नाही.शेवटी शरद पवारांनाच जाहीर खुलासा करणे भाग पडले की , आम्ही लोकांनीच त्यांना सांगितले की तुम्ही घरीच एका ठिकाणी बसा म्हणजे निर्णय घेता येतो. म्हणजे औरंगाबादला बेड कमी किंवा आणखी नाशिकला, पुण्यात कुठे काय कमी, या सगळ्या गोष्टी आम्ही लोक फिरून सांगणार त्यांना वगैरे.

Read More  महानिर्वाण शताब्दी विशेष : गांधीजी, गोखले आणि लोकमान्य टिळक

थोडक्यात काय तर , मी पुन्हा येणार या गाजलेल्या घोषणेच्या दडपणाखाली मै हूँ ना या भूमिकेत खुद्द पवारांना या वयात देखील फिरावे लागतेय. आणि आता पुन्हा त्यांनी सांगितलेय की मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून जनतेत जाऊन लोकांना धीर दिला पाहिजे. राज्यात चार लाखांवर कोरोना रुग्णसंख्या गेलीय. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. मृत्यू संख्या वाढलीय आणि या बाबतीत महाराष्ट्राने जगात पहिल्या पाचात स्थान मिळवलेय, हा सरकारला रेड अलर्टच म्हणावा लागेल.

अ‍ॅड. प्रभाकर येरोळकर
लातूर , मोबा.: ९८६०४ ५५७८५

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow