पाश्चात्त्य देशांमध्ये कसली ना कसली सर्वेक्षणं नेहमी सुरूच असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जातं, वेगवेगळ्या विषयांत जागतिक क्रमवा-या लावल्या जातात आणि वारंवार त्या प्रसिद्धही केल्या जातात. ज्या विषयाचा पेपर आम्हाला अवघड जातो, तो विषय आम्ही सरळसरळ ऑप्शनला टाकतो किंवा संबंधित आकडेवारी, माहिती, निष्कर्ष, क्रमवारी मुळासकट नाकारतो. कारण आपलं बरं चाललेलं जगात कुणाला बघवत नाही, हे खरंच आहे. तरीही काही एजन्सीज आपल्या बाजूनं आहेत आणि तेवढ्याच ख-या आणि विश्वासार्ह आहेत. यातल्या काही आंतरराष्ट्रीय संघटनांच्या एजन्सीज असतात, काही विशिष्ट देशांच्या सरकारांनी स्थापन केलेल्या असतात तर अनेक एजन्सीज खासगी किंवा एनजीओसंचलित असतात. या संस्था, कंपन्या, संघटनांकडून जी सर्वेक्षणं केली जातात, ती सगळीच विश्वासार्ह असतात असं नाही, त्याचप्रमाणं सगळी गंभीर असतात असंही नाही. मूड येईल तेव्हा कोणत्याही विषयावर या संस्था सर्वेक्षण करतात. ती महत्त्वाची नसली तरी मनोरंजक निश्चितच असतात. आता हेच पाहा ना, यूगॉव्ह ग्रुप नावाच्या एका गटानं ‘अंगावर काढले जाणारे टॅटू’ या विषयावर सर्वेक्षण केलंय, आता बोला! आपल्याकडे ज्याला गोंदण म्हणतात, त्याचंच आधुनिक नाव टॅटू. गोंदण सामान्यत: गरीब, ग्राम्य, निरक्षर, मागास समाजांमध्ये पूर्वीपासूनच प्रचलित होतं. पण नाव बदलून आल्यावर मात्र ते महानगरातल्या हाय-फाय समाजाचं ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरलं.
सुरुवातीला टॅटू पार्लर अगदी स्वस्त वस्तूंच्या बाजारपेठेत असत. तरुण वर्गाची प्रचंड प्रसिद्धी टॅटूला आजही आहे. परंतु संस्थेच्या निष्कर्षानुसार ब्रिटनमध्ये २६ टक्के लोकांच्या अंगावर टॅटू आहेत आणि चाळीस ते साठ वयोगटातल्या लोकांमध्ये टॅटूची क्रेझ जास्त प्रमाणात बघायला मिळते. पूर्वी जे टॅटू पार्लर अगदीच कोप-यात कुठेतरी असत, ते आता मोठमोठ्या मॉलमध्ये असतात. टॅटू काढणा-या कलाकारांचे मोठमोठे एअर कंडिशन्ड स्टुडिओ आहेत. टॅटू काढणं म्हणजे उथळपणा, असं पूर्वी मानलं जात होतं. पण आता त्याला ‘अभिव्यक्ती’ म्हणून पाश्चात्त्य समाजात मान्यता मिळालीय. आपल्याकडे प्रेमाच्या व्यक्तीचं नाव हातावर गोंदवून घेण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. परंतु आता टॅटूच्या रूपानं प्रिय दिवंगत व्यक्तीचं नाव आजन्म शरीरावर वागवण्यामागची भावना पाश्चात्त्य समाजालाही कळून चुकलीय. पोक्त, परिपक्व आणि शहाणपणाचे विचार टॅटूमधून व्यक्त व्हावेत, याचीही काळजी वरिष्ठ नागरिक घेतायत. ‘मेरा बाप चोर है’ या गोंदणावरून ‘दीवार’ चित्रपटात केवढं रामायण घडलं होतं! मनगटावर आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाबरोबरच आराध्य दैवताचं चित्र गोंदवून घेणारे लोक जुन्या पिढीत कितीतरी भेटतात.
-हिमांशू चौधरी