27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषजीवन संपवणा-यांचा सांगावा

जीवन संपवणा-यांचा सांगावा

एकमत ऑनलाईन

एखादी व्यक्ती आयुष्याला कंटाळून आत्महत्या करते, तेव्हा जीव देण्याइतके एवढे काय झाले होते,’ असा प्रश्न करत आपण हळहळ व्यक्त करतो. पण आत्महत्येच्या कारणांचा ना विचार करत, ना त्याच्या परिणामांचा. व्यक्तीला वेळीच मानसिक आधार आणि दिलासा मिळाला तर त्याच्या मनातील कल्लोळ शांत होण्यास मदत होते आणि जीवनाकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याची उमेदही मिळते. पण जेव्हा सगळेच मार्ग खुंटतात तेव्हा व्यक्ती स्वत:लाच संपवण्याचा निर्णय घेते.
अलिकडेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की २०२१ मध्ये देशात १,६४,०३३ आत्महत्या झाल्या आणि त्यात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. २०२० मध्ये हा आकडा १,५२,०५२ इतका होता. म्हणजे आत्महत्येच्या प्रमाणात ७.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आत्महत्या करणा-यांमध्ये समाजातील सर्वच स्तरांतील लोक आहेत. पण रोजंदारीवर काम करणा-या कामगारांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. हे प्रमाण जवळजवळ २५.६ टक्के इतके आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाणही खूप वाढले होते. महाराष्ट्रात तर शेतक-यांच्या आत्महत्या हा विषय अजूनही ज्वलंत आहे. आता प्रत्यक्ष शेत मालकांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होत आहे, पण शेतमजुरांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या अहवालात आत्महत्येच्या कारणांचाही विमर्श घेण्यात आला आहे. त्यानुसार नोकरी किंवा करिअर, एकटेपणा, छळ, हिंसाचार, कौटुंबिक कलह, मानसिक आजार, व्यसनाधीनता, आर्थिक नुकसान आणि जुनाट आजार ही काही प्रमुख कारणे आत्महत्येमागे असतात.

आकडेवारीनिशी पहायचे झाले तर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे २२,२०७ जणांनी आत्महत्या केली, त्यानंतर तामिळनाडूत १८,९२५ आणि मग मध्य प्रदेशात १४,९५५ जणांनी आत्महत्या केली. पश्चिम बंगालमध्ये १३,५०० आणि कर्नाटकांत १३,०५६ इतक्या आत्महत्या झाल्या आहेत. थोडक्यात या पाच प्रमुख राज्यांत एकूण आत्महत्यांच्या ५०.४ टक्के आत्महत्या होतात हे या अहवालातून स्पष्ट होते. उर्वरित २३ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून ४९.६ टक्के आत्महत्या होतात. सर्वात विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात आत्महत्या करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीत आत्महत्या जास्त होतात. महिलांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढलेले आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गृहिणी असलेल्या महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्यार्थिनींमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.

भारताच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता आत्महत्येचे हे वाढते प्रमाणही आपल्या नगण्य वाटू शकते. पण ते वाढू लागले आहे याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आतापर्यंत आत्महत्येची ज्या कारणांची चर्चा होत असे ती अधिकांश व्यक्तीच्या मानसिक स्थितीबाबत असे. खूप संपन्न घरातील एकाकी व्यक्ती, अपेक्षांचे ओझे न झेपणारे विद्यार्थी किंवा कर्जात बुडालेले शेतकरी किंवा सर्वसामान्य लोक यांच्यातच आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे असे मानले जात असे. पण प्रत्यक्षात तसे नाही. रोजंदारीवर जाणारा कामगारही आत्महत्या करायला प्रवृत्त होत असेल तर आपल्या समाजातील सामाजिक आणि आर्थिक जीवन बिकट आहे असेच म्हणावे लागेल.

आर्थिक उदारतेचे धोरण भारताने स्वीकारल्यावर एक नवश्रीमंतांचा वर्ग निर्माण झाला होता. नंतर आयटी क्षेत्र खुले झाल्यावर तेथेही असाच नवश्रीमंतांचा वर्ग तयार झाला. हा वर्ग चिक्कार पगार घेऊन जीवतोय मेहनत करत होता. यात स्पर्धा वाढली तशी आपण मागे पडू नये यासाठी हव्या नको त्या सर्व तडजोडी करत होता. त्यातूनच संताप, नैराश्य वाढत जायचे आणि त्याची परिणती आत्महत्येत किंवा गंभीर आजारात होत असे. आताही या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पण यात जेव्हा शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार यांचाही जेव्हा समावेश होतो तेव्हा चिंता वाढते. दोन वेळचे जेवण सुखाने मिळावे यासाठी काबाडकष्ट करणा-या या लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ का येते याचा शोध घेण्याची गरज आहे.

मूल शाळेत जाऊ लागले की अभ्यास आणि इतर अ‍ॅक्टीव्हिटींच्या चक्रात गुरफटून जाते. कॉलेजला गेल्यावर अभ्यास आणि करिअरच्या वाटा शोधण्यात गर्क होते आणि एकदा करिअर निश्चित झाल्यावर आई-वडील आणि जोडीदाराच्या अव्वाच्या सव्वा अपेक्षांचे ओझे त्याच्या मनावर असते. यातून मार्ग काढता आला तर ठीक नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय दिसत नाही. हे झाले मध्यमवर्गीय व्यक्तीचे. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील व्यक्तींच्या आकांक्षा आणि आर्थिक मिळकत यांचा मेळ बसत नाही. आज गरीब घरातही मोबाईल, टीव्ही असतात आणि त्यातून जो काही चंगळवादाचा मारा होत असतो, त्यातून बाहेर पडणे या लोकांना शक्य होत नाही. रोजंदारीवर काम करणा-या कामगाराला काम तर मिळते पण अपेक्षित वेतन मिळत नाही. मग सणवार, घरातील खर्च भागवण्यासाठी कर्ज घेतले जाते आणि त्याचा विळखा वाढत जातो. देशातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य झाले नाही तर नैराश्य येते आणि त्यातून आत्महत्या घडतात. कोरोनाच्या काळात शारिरीक प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आपण औषधे घेत होतो, आत्महत्या या आजाराला नामोहरम करायचे असेल तर मनाची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपाय योजना कराव्या लागतील.

-अभिमन्यू सरनाईक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या