18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeविशेषचेहरा बदलून येतोय दहशतवाद...

चेहरा बदलून येतोय दहशतवाद…

एकमत ऑनलाईन

दहशतवादाचे स्वरूप बदलले आहे, हे आपल्याला आता मान्य केले पाहिजे. किंबहुना आपल्या गुप्तचर संस्थांनी हे मान्य केलेच आहे. नवे तंत्रज्ञान आणि पद्धती वापरल्यामुळे दहशतवाद अधिक भयावह बनला आहे. दहशतवादी ड्रोनसारखी उपकरणे सर्रास वापरू लागले आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक देशांवर त्यांनी हल्ले केले आहेत. भारतही यापासून दूर राहू शकत नाही. आत्मघातकी पथके तयार करीत असल्याचे तालिबानने उघडपणे स्वीकारले आहे. नव्या पद्धती वापरून हल्ले होण्याआधीच भारताने त्यापासून बचावाची यंत्रणा उभारली पाहिजे.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात छापे टाकून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सहा दहशतवाद्यांना पकडले आहे. सणासुदीच्या दिवसांत देशात अशांततेचे वातावरण तयार करण्याचा त्यांचा कट होता, असा दावा आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर जी शक्यता व्यक्त करण्यात येत होती, त्यालाही या अटकसत्रामुळे पुष्टी मिळाली आहे. काबूलमध्ये सत्तांतर झाल्यानंतर संपूर्ण क्षेत्रात दहशतवाद वाढेल आणि दहशतवाद्यांना अधिक पाठबळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादापुढे अमेरिकेसारखी बलाढ्य शक्ती आणि मित्रराष्ट्रांच्या फौजांनी नांगी टाकल्यामुळे एक प्रकारे पाकिस्तानचाच विजय झाला

असून, तोही असा आहे की पराभव होऊनसुद्धा अमेरिकेचे पाकिस्तानविषयक धोरण नरमाईचेच आहे. त्यामुळे पाकिस्तानपोषित दहशतवाद्यांचा भारताविरुद्ध अधिक वापर केला जाईल, असा कयास आहे. नुकत्याच झालेल्या अटकसत्रानंतर ही शक्यता खरी होताना दिसत आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणा तत्पर आहेत आणि देशविरोधी षड्यंत्रांचा तातडीने पर्दाफाश करीत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु वास्तव असे आहे की, हल्ला करण्यात दहशतवाद्यांना एकदा जरी यश आले, तरी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेला आरोपीच्या पिंज-यात उभे केले जाईल. गेल्या काही दिवसांपासून असे प्रयत्न होतही आहेत. उदाहरणार्थ, काश्मीरमध्ये सध्या दहशतवादी कारवायांमध्ये एक प्रकारे वाढ होताना दिसत आहे. उत्तर काश्मीरमध्ये सामान्यत: परिस्थिती चांगली असते, तिथेच सीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे, अशीही बातमी आहे. गेल्या महिनाभरापासून तिथे चकमकींमध्ये वाढ झाली आहे.

सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांवरही हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानात उत्साहाचे वातावरण आहे, हे यावरून उघडपणे दिसून येते. १९९२ मध्ये जेव्हा अफगाणिस्तानात डॉक्टर नजीबुल्लाह यांचे सरकार दहशतवाद्यांनी उलथवून टाकले होते, त्याही वेळी पाकिस्तानात अशाच प्रकारे आनंद साजरा केला गेला होता. काश्मीरच्या शांत खो-यात सीमेपलीकडून दहशतवादाचे धुके पसरण्यास त्याच दरम्यान सुरुवात झाली होती, हे विशेषत्वाने उल्लेख करण्याजोगे आहे. आज पुन्हा एकदा तोच धोका आपल्यापुढे डोके वर काढू पाहत आहे.

दहशतवादाचे स्वरूप बदलले आहे, हे आता मान्य केले पाहिजे. किंबहुना आपल्या गुप्तचर संस्थांनी हे मान्य केलेच आहे. नवे तंत्रज्ञान आणि पद्धती वापरल्यामुळे दहशतवाद अधिक भयावह बनला आहे. दहशतवादी ड्रोनसारखी उपकरणे सर्रास वापरू लागले आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक देशांवर त्यांनी हल्ले केले आहेत. भारतही यापासून दूर राहू शकत नाही. भारताला असलेला प्रमुख धोका असा आहे की, आपण आत्मघातकी पथके तयार करीत असल्याचे तालिबानने उघडपणे स्वीकारले आहे. त्यामुळे आज ना उद्या आपल्यावर असे हल्ले होणार हे स्पष्ट आहे. अशा प्रकारे नव्या पद्धती आणि तंत्रज्ञान वापरून दहशतवाद्यांनी हल्ले करण्याआधीच भारताने त्यापासून बचावाची यंत्रणा उभारली पाहिजे.

बदलत्या दहशतवादाचा अन्य एक पैलू असा की, बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस उन्नत होत चालले असून, त्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे. असे प्रयत्न केवळ अयशस्वी करून आणि ते करणा-यांचा बुरखा फाडून आपल्याला थांबता येणार नाही, तर आपण या बाबतीत खोलात जाऊन काम केले पाहिजे. काश्मीर खो-यात सध्या जी सुरक्षा व्यवस्था आहे ती १९९० च्या दशकाच्या तुलनेत खूपच चांगली आहे. परंतु जेव्हा आपण आपल्या सुरक्षा व्यवस्थेची प्रगती करण्यासंबंधी बोलतो, तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, सुरक्षा दलांना पारंपरिक धोक्यांपासून संरक्षण मिळणे गरजेचे आहेच; परंतु केवळ तेवढ्यावर थांबता येणार नाही. नव्या प्रकारच्या तंत्रज्ञानाधारित हल्ल्यांपासूनही त्यांना सुरक्षा कवच दिले पाहिजे.

नव्या धोक्यांपासून बचावासाठी देशात नवीन तंत्रज्ञानाचा शोध, नवीन प्रकारचे प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञानावर विश्वास आणि गुंतवणूक केली जाणे आवश्यक आहे. एक मोठा धोका दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल्सकडूनही आहे. अशा प्रकारच्या मोड्यूलमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन सर्वसामान्य लोकांमध्ये पाठविले जाते. काही काळ ते त्या ठिकाणी अगदी सामान्य जीवन व्यतीत करतात. हे दहशतवादी समाजात मिसळून गेलेले असतात; त्यामुळे त्यांचा कुणाला संशयसुद्धा येत नाही आणि सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरही ते कधी येत नाहीत. परंतु जेव्हा दहशतवाद्यांना त्यांची गरज असते, तेव्हा ते त्यांना तातडीने कोणत्याही कामासाठी उपलब्ध होतात.

सुशांत सरीन,
सामरिक विश्लेषक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या