24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ....

ती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ….

एकमत ऑनलाईन

शनिवार, दिनांक १ ऑगस्ट … एक विलक्षण दिवस आहे. लोकमान्यांच्या स्मृतिदिनाची १०० वर्षे याच दिवशी होतात. तरुण पिढीने टिळक, गांधी किती वाचले, अभ्यासले माहीत नाही. पण, टिळक महाराजांना शनिवार, दिनांक १ ऑगस्ट रोजी स्वर्गवास होऊन १०० वर्षे होतील. १ ऑगस्ट १९२० ते १ ऑगस्ट २०२०… अक्राळ-विक्राळ काळाच्या दाढेत शंभर वर्षे फस्त झाली. टिळक-गांधी युग माझ्या अगोदरच्या पिढीने पाहिले. नेहरू युग माझ्या पिढीला पाहता आले. देशासाठी सर्व जीवन देणारी ही माणसं आता होणे नाही. लोकमान्य हे एक विलक्षण रसायन होते. एका व्यक्तिमत्त्वात किती गुणविशेष असावेत. शिक्षक, संपादक, प्राध्यापक, गणितज्ञ, इतिहास, खगोलशास्त्राचे अभ्यासक, क्रांतिकारी नेते, देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील तेल्या-तांबोळ्यांमध्ये स्वातंत्र्याची चळवळ पोहोचविणारा पहिला नेता, गीतेचे भाष्यकार, हिंदू-मुस्लिम यांना एकत्र घेऊन ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुध्द लढणारा महानायक.. अशी टिळकांची असंख्य रूपे आहेत.

२२ जुलै १९०८ला मंडालेच्या तुरुंगात त्यांना ६ वर्षांची शिक्षा देऊन पाठविण्यात आले आणि या तुरुंगातून ८ जून १९१४ ला परत आलेले टिळक बोटीतून उतरताच लोकमान्य झाले. लोकमान्य ही पदवी लोकांनीच दिली.टिळकांच्या मृत्यूशताब्दीपूर्वीच ३० डिसेंबर १९१७ रोजी टिळकांनी लखनौ येथे दिलेल्या- ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच…’ या महान ऐतिहासिक घोषणेला ३ वर्षांपूर्वी १०० वर्षे झाली आणि आज लोकमान्यांच्या स्मृतिदिनाची शताब्दी देशभर साजरी होतेय. ब्रिटिश सरकारच्या विशेष परवानगीने टिळकांचा अन्त्यविधी गिरगावच्या चौपाटीवर झाला. आज त्याठिकाणी लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा ताठ मानेने उभा आहे. प्रख्यात कवी कुसुमाग्रज चौपाटीवरून जात असताना टॅक्सीतून उतरले. पुतळ्यासमोर उभे राहिले, अभिवादन केले. नाशिकला घरी गेल्यावर…. ‘टिळकांच्या पुतळ्यापाशी’ ही कविता लिहीली. त्यातल्या चार ओळी आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात केवढी प्रचंड ऊर्जा निर्माण करतात.

‘ती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ
आदळतो जीवर अजून पश्चिम वात
ती अजिंक्य छाती ताठर, रणशील
जी पाहून सागर थबके, परते आत ’

टिळकांच्या सा-या आयुष्याचं सार या अजिंक्य छातीत आहे. ब्रिटिशांंच्या न्यायालयासमोर उभे राहून सहा वर्षांची शिक्षा ऐकल्यावर त्या न्यायाधीशाला सुनावणारे टिळक… ‘तुमच्यापेक्षा श्रेष्ठ अशा परमेश्वराच्या न्यायालयात मी निर्दोष आहे, ही गर्जना करणारे टिळक हे त्या युगातले महानायकच होते. त्यांच्या चितेला भडाग्नी दिला, ज्वाला आकाशात धडकल्या आणि अन्त्ययात्रेतल्या महागर्दीतून एका मुस्लिम तरुणाने चितेमध्ये धाडकन् उडी घेतली. टिळकांच्या निधनाने देशातल्या नागरिकांची काय अवस्था होती, त्याची प्रचीती त्या तरुणाच्या चितेवर उडी मारण्याच्या निर्धारातून दिसून आली.

पोलिसांनी त्याला पेटत्या चितेतून बाहेर काढले. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले पण लोकमान्यांच्या पाठोपाठ या तरुणाचा अन्त झाला. लोकमान्यांचे जाणे सहन न झालेला देश गांधीजींच्या राजकीय प्रवेशाने पुन्हा सावरला आणि मग गांधीयुग सुुरू झाले. या देशाच्या स्वातंत्र्याची दोन महान प्रतीके आहेत- टिळक आणि गांधी. गांधींनी सा-या देशाला आपल्या पाठीशी उभे केले. सा-या जगात गांधी गेले, गांधी विचार गेला. आज जगातल्या ६०० विद्यापीठांत महात्मा गांधी शिकवले जातात. जगातला हा एकमेव नेता असा आहे, जो एवढ्या विद्यापीठांत शिकवला जातो.

Read More  चिंता वाढली : लातूर जिल्ह्यात कोरोनाबळीचे शतक

आम्हा पत्रकारांचे पहिले गुरू बाळशास्त्री जांभेकर असतील पण लोकमान्यांच्या प्रखर पत्रकारितेने त्या पिढीनंतरच्या पत्रकारांसमोर सगळ्यात मोठा आदर्श टिळकांची पत्रकारिता हाच आहे. लेखणी कुणासाठी वापरायची हे सांगणारे टिळक…. वेळप्रसंगी सरकारला धारेवर धरून ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा ब्रिटिश सरकारच्या विरोधात पेटत्या निखा-यासारखा अग्रलेख लिहिणारे टिळक. यांच्याच पत्रकारितेची आज गरज आहे. पण आज आमच्यात ते तेज राहिले आहे कुठे? टिळक महाराज त्यांच्या ‘केसरी’त लिहायचे, ‘परदेशी कपड्यांची होळी करा…’ अग्रलेख वाचून हजारो तरुण रस्त्यावर उतरायचे आणि परदेशी कपड्यांची होळी करायचे. आज आम्ही पत्रकारांनी लिहील्यामुळे कोणी कसलीही होळी करणार नाही. उलट बाहेर कशाची होळी झाली तर आम्हाला लिहावे लागते आहे. फरक एवढा पडलेला आहे. हा लेखणीचाच फरक नाही, चारित्र्याचा फरक आहे. समर्पणाच्या भावनेचा फरक आहे. आम्हा पत्रकारांचे मूळ कूळ जांभेकर, टिळक, आंबेडकर असले तरी, त्या तेजस्वी नावांचा आणि आमचा फारसा संबंध राहिलेला नाही. त्यामुळे ‘केसरी’चा अग्रलेख हा आमच्या कौतुकाचा विषय झालेला आहे. आदराचा विषय आहे पण आमच्या आवाक्यातला विषय नाही.

टिळकांची अन्त्ययात्रा महाअन्त्ययात्रा होती. या अन्त्ययात्रेत महात्माजी सामील झाले होते, असे वाचायला मिळाले. स्वातंत्र्य आंदोलनात टिळकांनी सामान्य माणसाला जागवले. शिवउत्सव, गणेशोत्सव यातून लोकजागरण केले. स्वदेशीचा आग्रह धरला. काँग्रेसमधला जहाल लोकांचा पहिला गट टिळकांच्याच नेतृत्वाखाली स्थापन झाला.सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्यांची कल्पना तर विलक्षण मानली पाहिजे. स्वातंत्र्य चळवळ उभी करण्याची ताकद या उत्सवामधून निर्माण झाली. त्यावेळचे मेळे, त्यावेळची गीते, त्यावेळचे पोवाडे, गल्ली-गल्लीत उत्साहाने बसविलेले सार्वजनिक गणपती, त्या गणपतीसमोर टिळकांची होणारी जहाल व्याख्याने आणि ते प्रबोधन.. आता सारे वाहून गेले आहे. आता टिळक नाहीत, गांधी नाहीत, गणपती उत्सवही ‘गल्लीतला राजा’ झाले. धंदेवाईक झाले. कसलीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्रभर प्रबोधन करणारे त्यावेळचे ते वक्ते आता कुठे राहिले आहेत. आज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली जे काही घडते आहे, ते पहायला टिळक नाहीत हे केवढे समाधान आहे. त्यांनी दिलेला वारसा आणि वसा त्यांच्या चारित्र्याने आपण चालवलेला आहे का? याची खंतही आम्हाला आज नाही. हा टिळकांचा पराभव नाही, हा आमचाच पराभव आहे.

लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महान नेत्यांच्या नावाने देशामध्ये किती रस्ते झालेले आहेत. हे सगळे रस्ते एकत्र केले तरी, या महान नेत्यांच्या विचारापर्यंत आज आपल्याला पोहोचता येईल का? या तीनही नेत्यांना देश कसा घडवायचा होता? हे ७० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर या देशाला खरेच कळले आहे का? टिळक नाहीत, लोकमान्य नाहीत, गांधी आहेत पण महात्मा नाहीत, नेहरू आहेत पण जवाहर नाहीत. पटेल आहेत पण सरदार नाहीत, आझाद आहेत पण मौलाना नाहीत आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर,चव्हाण आहेत पण यशवंतराव नाहीत….

उत्तर-दक्षिण
मधुकर भावे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या