20 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home विशेष तो लढा, ती जिद्द, ते नेते...१९४२ चा क्रांतीचा जयजयकार

तो लढा, ती जिद्द, ते नेते…१९४२ चा क्रांतीचा जयजयकार

एकमत ऑनलाईन

बघता-बघता ७८ वर्षे झाली. दोन वर्षांनी ऑगस्ट क्रांतीदिनाचा तोे पवित्र दिवस आठव्या दशकात प्रवेश करेल. ७८ वर्षांपूर्वी मुंबई, महाराष्ट्र आणि सारा देश एका विलक्षण भावनेने प्रभावी झालेला होता. मोहरून गेलेला होता. ‘चले जाव’ या दोन शब्दांत केवढ्या प्रचंड सामर्थ्याची प्रचीती येत होती. कारण या शब्दामागे राजकीय चारित्र्य होते. रसरसलेली देशभक्ती होती. वज्रनिर्धार होता. तेव्हा देशात फोन नव्हते. ब-याच ठिकाणी वीज नव्हती. फॅक्स, मोबाईल, व्हॉटस् ऍप, फेसबुक नव्हते. सगळ्या भौतिक प्रगतीपासून शेकडो मैल दूर असलेला देश संध्याकाळी ७ वाजले की, अंधारात गुडूप होणारा त्यावेळचा ग्रामीण भारत. त्या देशाला महात्माजींचा विलक्षण प्रकाश लाभलेला होता. त्या प्रकाशात काय नव्हते? त्याच प्रकाशामुळे आंधळा डोळस होता, पंगू पर्वत चढू शकत होता… थकलेले, भागलेले सारे काही उत्साहाने चेतवलेले होते.

‘मला देशासाठी काहीतरी करायचं आहे’ या भावनेने चेतवलेले ते वातावरण होते. त्यावेळचे सगळे नेते त्याग आणि सेवेचे आदर्श होते. जगातल्या कोणत्याही स्वातंत्र्याच्या लढाईत एकाचवेळी बिनीचे, आघाडीवरचे असलेले डझनभर नेते कुठेही पहायला मिळत नाहीत. नेपोलियन असेल, हो-चि-मिन्ह असेल, द गॉल असेल, स्टॅलिन, लेनिन हे सगळे त्या-त्यावेळचे त्या-त्या देशातले नेते एकमेव नेते होते. एकास एक असा दुसरा नव्हता. भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींभोवती त्याग, सेवा आणि समर्पण अशा राजकीय चारित्र्यावर उभी असलेली दिग्गज नेत्यांची रांग होती. गांधी-नेहरूंच्या पाठोपाठ नेताजी सुभाषचंद्र, सरदार पटेल, खान अब्दुल गफार खान, मौलाना आझाद, राजेंद्रबाबू, मदन मोहन मालविय, सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, अच्युतराव पटवर्धन, डॉ. लोहिया, एस. एम. जोशी, युसुफ मेहरअली… किती नावे सांगावीत?

ही सगळी नावे आज आठवली, तो काळ, ती वेळ आठवली, ते वातावरण आठवलं, आज अंगावर रोमांच उभे राहतात. जगाच्या इतिहासातील शक्तिमान सत्तेविरोधातील अजिंक्य मनांची निर्धाराची ती वेगळी लढाई होती. हातात बंदुका घेतलेले पोलिस विरुध्द मनाच्या निर्धाराने, निधड्या छातीने त्यांच्यासमोर जाणारी अजिंक्य मने. ‘इन्कलाब जिंदाबाद’ चा नारा, मला काहीतरी करायचं आहे, देशासाठी मरायचं आहे ही भावना अत्युच्च होती. मला काही मिळवायचं आहे, ही भावना कुठेही नव्हती, मिळवायचं होतं पण ते स्वातंत्र्य. त्यासाठी एका छोट्या मंत्राचा जागर देशभर झाला, तो मंत्र होता ‘चले जाव’… ‘ छोडो भारत’ ‘क्विट इंडिया’, ‘चलो दिल्ली’, ‘जय हिंद’… सगळे दोन शब्द… जगात फक्त दोन शब्दांनी ब्रिटिशांच्या विरोधातील लढाई जिंकलेला भारत हा एकमेव देश आहे आणि या लढाईचे सेनापती महात्मा गांधी आहेत. लढाई विषम होती, पण निर्धार बंदुकांना पराभूत करणारा होता.

Read More  माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून निलंगेकर कुटुंबीयांचे सांत्वन

या लढाईत परदेशी कपड्यांच्या लॉरीपुढे अडवा पडणारा आणि प्राणाची आहुती देणारा बाबू गेनू… त्याच्या घरी महात्मा गांधी त्याला सांगायला गेले नव्हते की, ‘तू परदेशी कपड्यांच्या लॉरीपुढे आडवा पड’, नंदुरबारचा छोटा शिरीषकुमार त्याने आपल्या चिमुकल्या जिवाचं बलिदान केलं, त्याच्या घरी त्याला कोणी सांगायला गेले नव्हते. खंडप्राय देशात तेव्हा फोन नव्हते, अशी धिंगाणा घालणारी चॅनेल नव्हती, वृत्तपत्रे खेड्यापाड्यांत जात नव्हती. पण भारलेल्या वातावरणातून बिनतारी संदेश, देशभक्तीच्या मनामनाचे संदेश वाहत्या वा-याबरोबर पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण असे सर्वत्र पोहोचवत होते. त्यामुळेच ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी आणि सर्व नेत्यांना अटक करून पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये कोंबून ठेवल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. आम माणसाच्या मनात ही चळवळ पेटली, स्वातंत्र्याचा हा असा लढा जगात कुठेही पहायला मिळत नाही. ज्यांनी आपले आयुष्य देशासाठी करपवून टाकले… जे हसत हसत त्यापैकी कोणीही कोणत्याही अपक्षेने हे बलिदान केलेले नाही. जी स्वप्ने त्यांनी पाहिली होती, त्याचे पुढे नेमके काय झाले? ते आपण पहायचे आहे.

स्वातंत्र्याची चळवळ कोणत्या मार्गाने निघाली होती, त्याचे टप्पे किती आदर्श होते, त्यातील साधी साधी माणसे किती तेजस्वी होती… आणि आज आपण नेमके कुठे निघालो आहोत? आपल्याला कुठे जायचे आहे, कोणत्या प्रश्नासाठी स्वातंत्र्य मिळवले होते… याची चर्चा करायला आपल्याकडे वेळही नाही. चुकीच्या प्रश्नांसाठी देशाचा अमूल्य वेळ फुकट चालला आहे. तथ्यहीन काम जास्त होत आहे, मुद्याचे काम होत नाही. ‘मन की बात’ होते, ‘दिल की बात’ होते…. काम की बात होत नाही.
७८ वर्षांपूर्वी या चळवळीत जे असतील त्यातील अनेक नेते आज पश्चिमेच्या संध्या छाया अनुभवत असतील. त्यांच्या मनात निश्चित गोष्ट येत असेल, याचसाठी आपण का हा खटाटोप केला होता.

१९४२ चा तो लढा, १५ ऑगस्ट १९४७ चे ते स्वातंत्र्य, त्यानंतर तरुण झालेल्या देशाच्या दोन-तीन पिढ्या आणि आताची तरुण पिढी यामध्ये कमालीचे अंतर पडत आहे. हे अंतर विचाराचे, संस्कृतीचे आणि चारित्र्याचेसुध्दा आहे. दोन-तीन पिढ्यांच्या अंतरानंतर आताच्या तरुण पिढीला माझ्या पिढीने ‘४२ ची चळवळ काय होती, स्वातंत्र्याचा लढा काय होता..’ हे आपण सांगितले आहे का? या तरुण पिढीला आपण या देशाचा तेजस्वी इतिहास सांगितलेला नाही. ग्रामीण जीवनात आज काय हलाखी आहे. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातले ३० कोटी लोक आणि आज १३७ कोटींच्या भारतात…. ३० कोटींपेक्षा अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली अजून आहेत.

Read More  १३७५ जणांची अँटीजन टेस्ट; २१७ पॉझिटीव्ह

नेमके कोणत्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचे आहे, नेमकी कोणाला शक्ती द्यायची आहे, याचे भान सुटलेले आहे. अजूनही ग्रामीण भागात काळोख पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला शौचाला बसणा-या भगिनींची लाखांमध्ये संख्या आहे, हे सगळे दृश्य बदलावे यासाठी जिवाची बाजी लावून काम होताना दिसले नाही. ग्रामीण भगिनींच्या डोक्यावरचा हंडा आजही आम्ही खाली उतरवू शकलो नाही. तिच्या कष्टामध्ये १०० पटींनी वाढ झाली. साधे पिण्याचे स्वच्छ पाणी आपण ग्रामीण भागात पोहोचवू शकलो नाही. ‘कोका-कोला आणि पेप्सी’ ग्रामीण भागात पोहोचली. स्वच्छ पाणी पोहोचू शकले नाही. वाढती बेकारी, बंद पडणारे कारखाने आणि चंगळवादाची चटक यामुळे देश भलतीकडे जात आहे.

अजूनही आम्ही राजकीय वातावरणाच्या बाहेर पडत नाही. सामाजिक प्रश्नांचे भान राहिलेले नाही, जात अजून नष्ट झालेली नाही, जातीच्या बाहेर आम्ही अजून जात नाही, गावकुसाच्या बाहेर पसरलेला समाज आज देशाच्या मुख्य विकास प्रवाहात आम्ही अजून आणू शकलो नाही. असंख्य गरीब जाती अशा आहेत की, त्या जातीतल्या सामान्य माणसाला आम्ही अजून जवळ केलेले नाही, त्याला प्रतिष्ठा दिलेली नाही. त्याचे आर्थिक प्रश्न सोडवलेले नाहीत, १०० कोटींच्या देशात खूप काही झालं असलं तरी, अजून खूप खूप काही करायचं आहे. मुख्य म्हणजे सामान्य माणसाला हे सरकार आपलं वाटत नाही. ज्यांचं कुणी नाही अशी कोट्यवधी गरीब माणसं आहेत, त्यांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी कोण? याचे उत्तर ७८ वर्षांत मिळालेले नाही.

गेल्या काही वर्षांत गरिबाला कुचलून टाकायचे अशी एक मुजोरी नकळत निर्माण होत चाललेली आहे आणि त्याला सत्ताधारी पाठी घालतात. आज दोन नंबरच्या पैशाने गब्बर झालेली माणसं दारू आणि कसिनोचे समर्थन करतात आणि ज्या गांधींच्या देशात गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाले त्याच गांधींच्या देशात दारू दुकानातील दारू विक्रीसाठी पोलिसांचा बंदोबस्त पुरवला जातो. कोरोनाच्या या पाच-सहा महिन्यांत गरीब माणसाला घरात कोंडून मारले गेले. त्याचा रोजगार हिरावला गेला, ४ कोटींच्यावर रोजगार गेलेले लोक आहेत, पण दारूच्या विक्रीसाठी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त दिला गेला, हे स्वातंत्र्य कशाकरिता मिळाले, कोणाकरिता मिळाले, सरकार कोणाकरिता? याचे कोणतेही भान आज जागेवर आहे असे वाटत नाही. त्यामुळे ६०-७० वर्षांनंतरसुध्दा आपण भलतीकडे चाललो आहोत.

Read More  लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवून गावाचा सामाजिक विकास करावा

ज्या काळात भौतिक सुधारणा जवळपास नव्हत्या. वीज नव्हती, फोन नव्हते, वाहतूक साधने नव्हती, उपचाराची व्यवस्था नव्हती, तेव्हा गावात मन:शांती होती, आज गावागावांत वीज आली, प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आला, जिल्ह्या-जिल्ह्यात विमानं उतरू लागली. विमान आले पण इमान गेले.. भौतिक प्रगती झाली पण माणुसकी संपली. माणसांमध्ये भिंती निर्माण झाल्या, त्या भिंती जातीच्या झाल्या, पैशाच्या झाल्या, मुजोरीच्याही झाल्या. ६०-७० वर्षांपूर्वी गावातल्या एका गल्लीतले लग्न सगळ्या गावातले लग्न असायचे. आज तो जिव्हाळा संपला, ती आत्मीयता संपली, सगळा पैशाचा व्यवहार सुरू झाला. सुबत्ता आली पण नीतिमत्ता हरवली आणि त्याबद्दल कोणाला काही वाटेनासं झालं ही तर आणखी भयानक गोष्ट होत आहे, अशा स्थितीत ७८ वर्षांपूर्वीचा तो महान संग्राम ज्या जिद्दीने या नेत्यांनी लढवला तो सगळा काळ आज कुठे गेला आहे. जाती-धर्मात विखार वाढलेला आहे.

७८ वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी…. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’  गीत लिहीले. आज कुसुमाग्रज नाहीत, तसे लिहीणारे राहिले नाहीत आणि अशी गीते गाणारे लोकही राहिलेले नाहीत, त्या अरुणा असफ अली कोणाला माहीत तरी आहेत का? आणि आम्ही घरातल्या मुलांना हा स्वातंत्र्याचा लढा सांगितला आहे का?

-मधुकर भावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या