25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeविशेषअर्थव्यवस्थेचा ‘कणा’ अडचणीत

अर्थव्यवस्थेचा ‘कणा’ अडचणीत

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे छोटे आणि मध्यम व्यवसाय अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. असे व्यवसाय चालविणा-यांकडे कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत व्यवसाय संचालित करण्याइतकाही आत्मविश्वास उरलेला नाही. म्हणजेच पुढील सहा महिन्यांनंतर आपण व्यवसाय सुरू ठेवू शकू असे त्यांना वाटत नाही. या उद्योगांना टिकण्यासाठी मदतीची गरज आहे.

एकमत ऑनलाईन

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून राष्ट्रीय पातळीवर ४ कोटी रोजगार क्षेत्रातून निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्रात ही संख्या २७ लाख इतकी आहे. राज्यात दरवर्षी २० हजार एमएसएमई नव्याने तयार होत असतात. राज्यात ८७ टक्के औद्योगिक रोजगार एमएसएमईमध्ये आहेत. देशपातळीवरील ३.५ कोटी एमएसएमईंमध्ये १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. या उद्योगांकडून दरवर्षी सुमारे ४३ लाख कोटींची उलाढाल होत असते. देशातील उत्पादन असेल किंवा निर्यात, यामधील ४० टक्के वाटा एमएसएमईंचा आहे. उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्रात १५ लाख एमएसएमई काम करतात आणि ७९ लाख रोजगार या क्षेत्रातून निर्माण झालेले आहेत. आर्थिक व्यवस्थेतील पोकळी भरून काढण्याचे व स्पर्धात्मक बनवण्याचे महत्त्वाचे काम या उद्योगाकंडून पार पाडले जाते. म्हणूनच त्यांना अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते.

आज कोरोना विषाणूच्या फैलावामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात छोटे आणि मध्यम व्यवसाय अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. दरम्यान, भारतात छोटे आणि मध्यम व्यवसाय (एसएमबी) मोठ्या प्रमाणावर बंद होत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. छोटे आणि मध्यम व्यवसाय चालविणा-यांकडे कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत आपला व्यवसाय संचालित करण्याइतकाही आत्मविश्वास उरलेला नाही. म्हणजेच पुढील सहा महिन्यांनंतर आपण व्यवसाय सुरू ठेवू शकू असे त्यांना वाटत नाही. एका ताज्या फेसबुक जागतिक अहवालात तसा दावा करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानात छोटे आणि मध्यम व्यवसाय बंद होण्याचे प्रमाण खूपच जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यात भारतातील ३२ टक्के तर पाकिस्तानातील २८ टक्के उद्योग बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सँडबर्ग यांनी याबाबत म्हटले आहे की, लस बाजारात येणे हे आशा निर्माण होण्याचे कारण आहे. अशा स्थितीत आमच्या ग्लोबल स्टेट ऑफ स्मॉल बिझनेस रिपोर्ट या अहवालामुळे एक इशारा वेळेत देणे शक्य झाले आहे. तो म्हणजे, अनेक व्यवसाय कमकुवत झाले असून, त्यांना मदतीची गरज आहे. ज्यांना महामारीचा प्रभाव विशेषत्वाने जाणवला आहे, अशा व्यवसायांमध्ये महिला आणि अल्पसंख्याकांकडून चालविल्या जाणा-या उद्योगांचा प्रामुख्याने समावेश आहे. जेव्हा-जेव्हा मोठी संकटे येतात, तेव्हा-तेव्हा सर्वांत कमकुवत वर्गावरच पहिल्यांदा हल्ला करतात, या वास्तवाची या निमित्ताने पुन्हा आठवण झाली आहे. सर्वेक्षणानुसार, मिस्र आणि भारतात अनुक्रमे ३१ टक्के आणि ३९ टक्के लहान आणि मध्यम उद्योगांच्या संचालकांना कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत आपला व्यवसाय चालविण्याची क्षमता आपल्याकडे असल्याबद्दल भरवसा वाटतो. दुसरीकडे अमेरिकेत ६८ टक्के, बेल्जियममध्ये ७२ टक्के, जर्मनीत ७४ टक्के आणि ऑस्ट्रेलियात ७९ टक्के लहान आणि मध्यम उद्योजकांना असा भरवसा वाटतो.

अहवालात म्हटले आहे की, भारतात संचालित होत असलेल्या निम्याहून अधिक लहान आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगार घटले आहेत. लहान आणि मध्यम उद्योगांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांत त्यांनी पूर्वी कामावर असलेल्या कामगारांना पुन्हा कामावर ठेवले आहे. परंतु अशा उद्योगांची संख्या ४२ टक्के असल्याचे दिसत आहे. आशिया प्रशांत क्षेत्रात ऑक्टोबरनंतर बंद होणा-या उद्योगांच्या संख्येत सरासरी सात टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी फेसबुकने फेब्रुवारीत २७ देशांमधील आणि अन्य क्षेत्रांमधील ३५ हजार लहान आणि मध्यम उद्योगांच्या संचालकांशी बोलून सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणादरम्यान एक चतुर्थांश म्हणजे २४ टक्के उद्योजकांनी असे सांगितले की, त्यांचे उद्योग बंद झाले आहेत.

अभिजित कुलकर्णी,
उद्योगजगताचे अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या