27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeविशेषयादवी युद्धाची सुरुवात...

यादवी युद्धाची सुरुवात…

तालिबानला कडाडून शह देणा-या पंजशीरची हाराकिरी ही अफगाणिस्तानातील पुढील स्थितीची स्पष्ट कल्पना देणारी आहे. पंजशीरविरोधातील लढाईमध्ये तालिबानला पाकिस्तान आणि चीनची खूप मोठी मदत झाली आहे. अमेरिकेने मागे सोडलेली शस्त्रास्त्रे आणि पाकिस्तानकडून मिळालेली ड्रोन्सची मदत, चिनी उपग्रहांनी पंजशीरच्या ठावठिकाणांची दिलेली अचूक माहिती यामुळे तालिबान्यांना पंजशीरला नामोहरम करण्यात यश आले. त्याच वेळी तालिबानमध्ये आता सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी अंतर्गत संघर्षाची ठिणगी पेटली आहे. मुल्ला बरादरवर हक्कानी गटाकडून झालेला हल्ला हा पुढील यादवी युद्धाचा ओनामाच म्हणावा लागेल.

एकमत ऑनलाईन

अमेरिकेने काढता पाय घेत आपल्या फौजा पूर्णत: माघारी घेतल्यानंतर अफगाणिस्तानवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेल्या तालिबानने आता पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. पण हा दावा खरोखर आहे का? आणि असल्यास आता अफगाणिस्तान, भारत आणि जगासमोर कुठली आव्हाने उभे राहतील याविषयी विश्लेषण करणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम तालिबानने केलेल्या दाव्याबाबत साशंकता आहे. याचे कारण अफगाणिस्तानमधून परस्परविरोधी बातम्या येत आहेत. काही वृत्तांनुसार, पंजशीर हा भाग म्हणजे एक खोरे आहे. त्याच्या बाजूला अतिशय उंच असे डोंगर आहेत. तालिबान कदाचित पंजशीरच्या तोंडावर येऊन पोहोचले असेल; पण या भागात आत जाणे एवढे सोपे नाही. कारण खो-यामध्ये मोठी शस्त्रं वापरता येतात. परंतु उंचावर जे पंजशीरचे लढवय्ये वसलेले असतील त्यांना बाहेर काढेपर्यंत ही लढाई जिंकली असे म्हणता येत नाही. पंजशीरवर याअगोदर अनेकांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु ते सोपे नाही. म्हणून जोपर्यंत पूर्ण सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत तालिबानच्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही. पंजशीरजवळ असणा-या ७-८ जिल्ह्यांपैकी पाच किंवा सहा किल्ल्यांवर तालिबानचा कब्जा झालेला आहे. परंतु जो पंजशीरचा गड आहे तिथपर्यंत तालिबानी अजून पोहोचले नसावेत.

दुसरा प्रश्न असा येतो की तालिबानने ही लढाई पुष्कळशी जिंकलेली आहे. पंजशीरमधील विविध गट एकत्र आलेले होते म्हणून असे झाले का? आज ज्याला नॉर्दन अलायन्स असे म्हटले जाते त्यामध्ये ताझिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे गट आहेत. परंतु यामध्ये सर्वाधिक लढवय्ये ताझिकिस्तानचे होते. या गटांमध्ये एक नसल्याने तालिबानला यश मिळाले का? याचे उत्तर नाही असे आहे. या लढाईमध्ये तालिबानला जे यश मिळाले त्यामध्ये सर्वांत मोठा वाटा पाकिस्तानचा आहे. तालिबानला सर्वाधिक मदत झाली ती पाकिस्तानच्या सैन्याची. असे म्हटले जाते की अमेरिकेने तिथे जी शस्त्रसामग्री सोडली होती त्यातील ड्रोन, हेलिकॉप्टर्स, फायटर एअरक्राफ्ट यांचा वापर पंजशीरविरोधात करण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या हवाईदलाने स्मार्ट बॉम्बचा वापर करून पिंगपॉईंट टार्गेटवर हल्ला केला आहे. ज्या-ज्या भागांची माहिती मिळाली होती तिथे अचूक अस्त्रशस्त्रांचा प्रहार करून पंजशीरच्या योद्ध्यांना मारण्यात आले. पाकिस्तानी सैन्याकडे या भागाची उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे होती. विशेष म्हणजे ही छायाचित्रे त्यांना चीनने पुरवली होती. चीनकडे संपूर्ण जगावर लक्ष ठेवणारे सॅटेलाईट्स आहेत.

आपण उघड्या डोळ्यांनी जमिनीवर काय चालले आहे हे जसे पाहू शकतो, तशा प्रकारची माहिती चीन आपल्या सॅटेलाईटच्या मदतीने पाकिस्तान आणि तालिबानला देत होता. त्यामुळे पंजशीरमध्ये विविध टार्गेटवर हल्ला करणे तालिबानच्या कार्यकर्त्यांना सहजसुलभ झाले. यासाठी हेलिकॉप्टर आणि इतर एअरक्राफ्टचा वापर करण्यात आला. असेही मानले जाते की चीन पाकिस्तानला ड्रोनचा पुरवठा करत असतो. पण चीनपेक्षाही तुर्कस्तानचे ड्रोन अचूकतेच्या बाबतीत अधिक सरस आहेत. तुर्कस्तानच्या ड्रोननी एक लढाई पूर्ण जिंकलेली आहे. काही महिन्यांपूर्वी आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यामध्ये झालेल्या तुंबळ युद्धामध्ये तुर्कस्तानचेच ड्रोन वापरण्यात आले होते, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना लॉर्डिंग ड्रोन म्हटले जाते. म्हणजेच ५० ड्रोनचा एक झुंड एकत्र आकाशात यायचा आणि अचानक निर्धारित लक्ष्यावर तुफान हल्ला करायचा. तुर्कस्तानने तयार केलेल्या ड्रोन्सचा त्या लढाईमध्ये खूप वापर केला गेला होता. आता तर त्यामध्ये अधिक सुधारणाही घडवून आणल्या आहेत. त्यामुळे ते ड्रोन अतिशय अद्ययावत बनले आहेत. अशा ड्रोनचा वापर करून पंजशीरांचे तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि अफगाणिस्तान रेझिस्टन्स फोर्सचे प्रमुख बनलेले अमरुल्लाह सालेह हे आता कोणती भूमिका घेतात आणि तालिबानसमोर कुठले आव्हान उभे करतात हे पाहणे आवश्यक ठरणार आहे. असे म्हटले जाते की सालेह यांचे निवासस्थान असणा-या राजवाड्यावरही मिसाईलच्या मदतीने हल्ला केला गेला होता. या हल्ल्यात हा राजवाडा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला. सुदैवाने, हल्ला झाला त्यावेळी सालेह तिथे नव्हते. त्यामुळे ते बचावले. पण ते पंजशीर खो-याच्या आत कोठे तरी लपलेले आहेत, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर काहींच्या मते ते ताझिकिस्तानमध्ये गेलेले असावेत. सालेह हे राजकीय नेते होते. याखेरीज सैन्याचे प्रमुख असणारे अहमद मसूर हेदेखील सुरक्षित असल्याचे समजते. पण हे दोघे मिळून तालिबानसमोर आव्हान उभे करू शकतील का? त्यांच्याकडे लढण्याची क्षमता आहे. परंतु जोपर्यंत त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत त्यांना लढता येणार नाही. याकामी त्यांना ताझिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान या देशांकडून मदत मिळणे गरजेचे आहे. कारण या देशांच्या सीमा अफगाणिस्तानला लागून आहेत. वास्तविक त्यांना रशियाकडून मदत मिळणे अधिक फायदेशीर ठरले असते. ही मदत मिळाली तरच ते लढू शकतात आणि लढाई चालू ठेवू शकतात.

या सर्वांमध्ये जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे तो पंजशीरच्या लढाईमध्ये पाकिस्तानकडून तालिबानला केली गेलेली मदत. वास्तविक, त्यात नवीन काही नाही. गेली अनेक वर्षे पाकिस्तान तालिबानला मदत करत आला आहे. अमेरिकेला माहीत असूनही पाकिस्तानने अनेक तालिबानी दहशतवाद्यांना अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर लपवले होते. इतरत्र गुहेत लपवले होते. त्यांना सर्व प्रकारची मदत पाकिस्तानकडून केली जात होती. तालिबानचा संग्राम सुरू झाला त्यावेळचे सर्व नियोजन पाकिस्तानी सैन्याने केले होते. या लढाईचा कमांड आणि कंट्रोल हा आयएसआय किंवा पाकिस्तानी सैन्याने दिला होता. गुप्तहेर माहिती तसेच लॉजिस्टिक मदतही पाकिस्तानकडून मिळत होती. इतकेच नव्हे तर तालिबानी गटांसाठी नेतृत्व म्हणून पाकिस्तानी सैन्य किंवा त्यांचे कंमाडोज पुरवले जात होते. चीनही पाकिस्तानच्या माध्यमातून तालिबानला मदत करत होता. खास करून गुप्तहेर माहिती उपलब्ध करून देण्यामध्ये चीनचे मोठे सहकार्य लाभत होते. या सर्वांमुळे तालिबानला एकसुद्धा गोळी फायर न करता ही लढाई जिंकता आली.

पंजशीरमध्ये झालेल्या लढाईत शेकडो तालिबानी मारले गेलेले आहेत. याचाच अर्थ आता खरोखर गृहयुद्ध होते आहे. परंतु ते अजून किती दिवस चालेल ही बाब अहमद मसूदला किती मदत मिळते यावर अवलंबून असेल. पाकिस्तानी मंत्री रहेमान मलिक यांनी तालिबानला कुठलीही मदत केली नाही, असे म्हटले असले तरी ते सपशेल खोटे आहे. पाकिस्तानचे सैनिक तालिबानच्या बरोबर होते याची छायाचित्रेही आता उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे सत्य काय आहे, हे संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. हे सगळे पुरावे भारताने एकत्र करण्याची गरज आहे. तसेच ते सर्व पुरावे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेपुढे भारताकडून मांडले गेले पाहिजेत. यातून पाकिस्तान हा दहशतवाद्यांना मदत करणारा देश आहे, हे जगाला दाखवता येईल.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयचे प्रमुख अफगाणिस्तानमध्ये होते. आज काबूलच्या आसपासच्या परिसरावर राज्य करणारा हक्कानी गट हा पाकिस्तानच्या आयएसआयचा उजवा हात मानला जातो. हा एक दहशतवादी गट असून तो पाकिस्तानसाठी नेहमीच अतिशय महत्त्वाची कामगिरी करत असतो. याखेरीज लष्कर-ए-तैय्यबा, जैश-ए-मोहम्मद यांच्या लढवय्यांचाही इथे वापर करण्यात आला. नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार हक्कानी दहशतवादी गट आणि तालिबान यांच्यामध्ये गोळीबार झाला असून त्यामध्ये मुल्ला बरादर जखमी झाला आहे. मुल्ला बरादर हा तालिबानचा दुस-या क्रमांकाचा नेता मानला जातो. ही लढाई कशामुळे झाली? याचे कारण तालिबान हक्कानी गटाला जास्त महत्त्वाचे पद द्यायला तयार नाहीये. हक्कानी नेटवर्कला संरक्षण मंत्र्याचे पद हवे आहे. त्याच्या माध्यमातून पाकिस्तानला तालिबानवर पूर्ण नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे. पण यासाठी मुल्ला बरादर तयार नाहीये. त्यातूनच हा गोळीबार झाला असण्याची शक्यता आहे. ही घटना तालिबानमध्ये आता अंतर्गत संघर्षाच्या ठिणग्या पेटत जाणार असल्याचे संकेत देणारी आहे. सत्तेसाठी तालिबानमधील गटांमध्ये लढायांची सुरुवात झाली आहे. यामध्ये शस्त्रास्त्रांचा वापर केला जात आहे. अमेरिकेने मागे सोडलेली शस्त्रास्त्रे वेगवेगळे गट आपली ताकद वाढवण्यासाठी करत आहेत. काही शस्त्रास्त्रे लुटली गेली आहेत.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या