22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeविशेषमलेरियाच्या अंताची सुरुवात

मलेरियाच्या अंताची सुरुवात

मलेरियावर लस शोधून काढण्याची प्रक्रिया सुमारे ८० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू आहे. परंतु त्याला आता यश आल्याचे दिसत आहे. मलेरिया ज्या परजीवीमुळे होतो, त्याचा जीवनक्रम किचकट असल्यामुळे तसेच प्रत्येक अवस्थेत या परजीवीभोवतीचे प्रथिनाचे आवरण बदलत असल्यामुळे त्यावर लस शोधून काढणे जवळजवळ अशक्य मानले जात होते. आता हे शक्य झाले असून, विशेषत: आफ्रिकेतील लाखो बालकांना त्याचा लाभ होईल.

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या संकटापूर्वीच मलेरियामुळे जगभरात दरवर्षी चार लाख लोकांचा बळी जात होता. अनेक दशकांपासून या आजारावर लस तयार करणे हे एक मोठे आव्हान बनले होते. आता पहिल्यावहिल्या मलेरिया लसीवर जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) शिक्कामोर्तब झाले आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडमन यांनी या घातक आजाराशी सुरू असलेल्या लढाईतील एक ऐतिहासिक दिवस, असे या घटनेचे वर्णन केले आहे. या लसीचा वापर आफ्रिकी देशांमधील मुलांसाठी केला जाईल, कारण त्यांना मलेरियाचा सर्वाधिक धोका आहे. मलेरियावर इलाज शोधण्याचा प्रयत्न सुमारे ८० वर्षांपासून सुरू आहे आणि सुमारे ६० वर्षांपासून आधुनिक लस विकसित करण्यावर संशोधन सुरू आहे. अखेर, या आजारावर लस शोधून काढण्यास एवढी वर्षे का लागली? आता शोधून काढलेल्या लसीने हे नेमके कसे साध्य करून दाखविले? हे प्रश्न जगभरातील लोकांना पडले आहेत.

प्लास्मोडियम फाल्सिपॅरम नावाच्या परजीवीमुळे मलेरियाचा प्रसार होतो. अ‍ॅनाफिलिस डासाच्या दंशामुळे हा आजार मानवी शरीरात दाखल होतो. या परजीवीचे जीवनचक्र इतके जटिल असते, की त्याला रोखण्यासाठी लस तयार करणे हे इतक्या वर्षांपासून जवळजवळ अशक्यच मानले जात होते. या डासाची मादी जेव्हा माणसाला दंश करते आणि प्लास्मोडियमचे स्पोरोजॉइट (पेशी) शरीरात सोडते, तेव्हा या परजीवीचे जीवनचक्र सुरू होते. हे स्पेरोजॉइट माणसाच्या यकृतात वाढीस लागतात आणि त्यांचे रूपांतर मीरोजॉइटमध्ये होते. हळूहळू ते रक्तातील लाल पेशींना लक्ष्य करतात आणि त्यांची संख्या वाढतच जाते. त्यामुळे ताप, डोकेदुखी, सर्दी, स्नायूंमध्ये वेदना आणि अनेकदा अ‍ॅनिमियासुद्धा होतो. परजीवीच्या प्रजननासाठी आवश्यक असलेले गमीटोसाईटसुद्धा हे मीरोजॉइट रक्तात सोडतात. जेव्हा दुसरा डास संबंधित व्यक्तीला चावतो, तेव्हा त्याच्या रक्ताबरोबर हे गमीटोसाईट डासाच्या शरीरात जातात. यातील मुख्य आव्हान असे आहे की, जीवनचक्राच्या प्रत्येक अवस्थेत या परजीवीच्या भोवतीचे प्रथिनाचे आवरण बदलत जाते. त्यामुळे शरीरातील मूळ रोगप्रतिकार शक्तीपासून तो स्वत:चा बचाव करू शकतो. लसी प्रामुख्याने या प्रथिनाला लक्ष्य करूनच तयार केल्या जातात आणि त्यामुळेच आतापर्यंत मलेरियाची लस शोधून काढण्यात यश मिळत नव्हते.

मॉस्क्विरिक्स ही लस नेमकी याच ठिकाणी कार्यक्षम असल्याचे दिसून आले आहे. ही लस स्पेरोजॉइट अवस्थेत असतानाच परजीवीवर हल्ला करते. परजीवीवर ज्या प्रथिनाचे आवरण या अवस्थेत असते, तेच प्रथिन या लसीतही असते. शरीराची रोगप्रतिकार संस्था या प्रथिनाची ओळख पटवते आणि शरीरात रोगप्रतिकार शक्ती तयार करते. मॉस्क्विरिक्स लस १९८० च्या दशकात बेल्जियममध्ये स्मिथ क्लाईन-आरआयटी समूहाने तयार केली होती. सध्या हा ग्लॅक्सो स्मिथ क्लाईनचा (जीएससी) एक भाग आहे. अर्थात, या लसीलाही दीर्घकालीन यश मिळाले नाही. सन २००४ मध्ये ‘द लॅन्सेट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यास निबंधात म्हटले होते की, या लसीची मोठी चाचणी मोझांबिकमधील १ ते ४ वयोगटातील ४००० मुलांवर करण्यात आली होती. लसीकरणानंतर सहा महिन्यांनी संसर्ग ५७ टक्क्यांनी कमी झाला. त्यानंतर मिळालेली माहिती क्रमश: निराशाजनकच होती. सन २००९ ते २०११ च्या दरम्यान ७ आफ्रिकी देशांमध्ये चाचणी घेण्यात आली होती. तेव्हा ६ ते १२ आठवड्यांच्या मुलांना पहिल्या डोसनंतर कोणतीच सुरक्षितता मिळाली नसल्याचे दिसून आले होते. अर्थात, पहिला डोस १७ ते २५ आठवड्यांच्या मुलांचा संसर्ग ४० टक्के तर गंभीर संसर्ग ३० टक्क्यांनी कमी करण्यात यशस्वी झाला होता.

संशोधन यानंतरही सुरूच राहिले आणि २०१९ मध्ये डब्ल्यूएचओने घाना, केनिया आणि मालावी येथे एक पथदर्शक कार्यक्रम सुरू केला. याअंतर्गत आठ लाख मुलांना लस दिली गेली. या चाचणीच्या निष्कर्षांच्या आधारावर डब्ल्यूएचओने लसीच्या वापराला मंंजुरी दिली आहे. २३ लाखांपेक्षा अधिक डोस दिले गेल्यानंतर गंभीर रुग्णांच्या बाबतीत ३० टक्क्यांनी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या अभ्यासात मुलांना दिलेल्या अन्य लसींच्या परिणामकारकतेवर किंवा आजारांवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये मलेरियाचे ९२ टक्के रुग्ण आफ्रिकेतील सब-सहारा विभागात आढळून आले होते आणि उर्वरित रुग्ण आग्नेय आशिया तसेच पूर्व भूमध्य समुद्र भागात आढळले होते. निम्मे रुग्ण नायजेरिया, काँगो, मोझांबिक, भारत आणि युगांडामध्ये आढळून आले होते. जगभरात २०१७ मध्ये मलेरियामुळे ४.३५ लाख मृत्यू झाले होते. त्यापूर्वीच्या आकडेवारीपेक्षा यावर्षी मृतांची संख्या घटली होती. आता या लसीला केवळ आफ्रिकेतील देशांपुरत्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर जगभरात ही लस प्रसारित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. ही लस म्हणजे एक शक्तिशाली अस्त्र आहे; पण कोविड-१९ प्रमाणे केवळ लसीवरच भरवसा ठेवून चालणार नाही, तर मच्छरदाण्यांसह डासांच्या निर्मूलनाचे सर्व उपाय योजावेच लागतील, असे डब्ल्यूएचओच्या प्रमुखांचे म्हणणे आहे.

अनेक वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर परवानगी देण्यात आलेली ही लस आरटीएसएस नावाने ओळखली जाते. मानवाला पछाडणा-या एखाद्या परजीवीच्या नि:पातासाठी डब्ल्यूएचओने परवानगी दिलेली ही पहिलीच लस आहे. शास्त्रज्ञ कितीतरी दशके या लसीच्या संशोधनासाठी प्रयत्नशील होते, यावरूनच या लसीचे शास्त्रीय महत्त्व लक्षात येऊ शकते. मलेरिया हा मानवजातीला ग्रासणारा आजार दीर्घ काळापासून अस्तित्वात आहे. विशेषत: १९५० च्या दशकात भारतात दरवर्षी मलेरियाचे सुमारे सात कोटींपेक्षा अधिक रुग्ण आढळत असत आणि आठ लाखांच्या आसपास मृत्यू नोंदविले जात असत. सध्या भारतात इतकी वाईट परिस्थिती नाही; परंतु जगात अन्यत्र काही देश विशेषत: आफ्रिकी देश या आजारामुळे खूपच त्रस्त आहेत. सामान्यत: पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुले या आजाराला प्रामुख्याने बळी पडतात. अर्थात मलेरियापासून बचावासाठी केल्या जाणा-या उपाययोजनांची यादीही मोठी आहे. २०१९ मध्येच मलेरिया नियंत्रण आणि निर्मूलनावर तीन अब्ज डॉलर खर्च करण्यात आले होते. परंतु तरीसुद्धा आफ्रिकी देशांमध्ये मलेरियाची दहशत कायम आहे. या भागातील लोकांसाठी ही लस निश्चितच दिलासादायक ठरेल.

अर्थात, तरीही पूर्णपणे या लसीवरच अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. पथदर्शी कार्यक्रमादरम्यान या लसीच्या चाचणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक आले असले, तरी लसीला काही मर्यादा आहेतच. पहिली गोष्ट अशी की, मलेरिया पसरविणा-या परजीवीचे शंभराहून अधिक प्रकार आहेत. आरटीएसएस लस ही प्लास्मोडियम या एकाच परजीवीविरुद्ध लढण्यास सक्षम असल्याचे दिसून आले आहे. अर्थात, हाच परजीवी सर्वाधिक भयावह मानला जातो. आफ्रिकी देशांत सर्वाधिक प्रकोपही याच परजीवीचा आहे. दुसरी गोष्ट अशी की, ही लस प्रभावी ठरण्यासाठी प्रत्येक बालकाला या लसीचे चार डोस देणे आवश्यक ठरणार आहे. यातील पहिले तीन डोस क्रमश: पाच, सहा आणि सात महिन्यांच्या बालकांना तर चौथा डोस १८ महिन्यांच्या बालकांना देण्याची गरज आहे. दुर्गम भागांमधील मुलांना वेळेवर चार डोस देणे व्यावहारिकदृष्ट्या सोपे नसेल. अर्थात, चांगली योजना तयार करून या अडचणीवर मात करता येऊ शकेल.

मलेरियावर औषध शोधून काढण्याच्या प्रक्रियेचे निष्कर्षही फारसे समाधानकारक नाहीत. औषध बनविणा-या कंपन्यांना गरीब देशांमध्ये या आजारावरील औषध तयार करून फारसा नफा कमावता आला नसता म्हणून कंपन्यांनी मलेरियाचे औषध बनविलेच नाही, असाही आरोप केला जातो. हे आरोप कंपन्यांनी खोडून काढले पाहिजेत. ज्याप्रमाणे एक सक्षम लस विकसित झाली, तसेच एक सक्षम औषध तयार होणे मलेरियाच्या निर्मूलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. मलेरियावर तयार झालेल्या या लसीच्या परिणामकारकतेची टक्केवारी कमी असली, तरी आफ्रिकेतील बालकांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने लसीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इतक्याच चिवटपणे मलेरियावरील औषधावरही संशोधन झाले आणि त्याला यश आले, तर तो सुदिन असेल.

डॉ. संजय गायकवाड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या