25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeविशेषजोजोबा तेलाचे फायदे

जोजोबा तेलाचे फायदे

एकमत ऑनलाईन

जोजोबा तेलामध्ये आपल्या डोक्याच्या केसाची जलद वाढ करण्याची क्षमता आहे. त्यासाठी दररोज या तेलाने मालीश करावी. त्यासाठी जोजोबाच्या दोन चमचे तेलामध्ये रोजमेरी तेलाचे १० थेंब टाकून हे मिश्रण मंद आचेवर गरम करावे. नंतर या मिश्रणात कापसाचा बोळा बुडवून टाळूवर (डोक्यावर ) ठेवून हळूहळू मसाज करावा. नंतर वीस मिनिटांनी स्वच्छ धुऊन काढावे. असे आठवड्यातून दोनदा करावे. प्रत्येकाला आपले केस सुंदर व दाट असावेत असे वाटते; परंतु कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही. जोजोबा तेलामध्ये केसाची घनता वाढण्याचे गुणधर्म आहेत. त्यासाठी या तेलाने आठवड्यातून दोनदा मसाज करावा. त्यामुळे हे तेल केसांच्या मुळापर्यंत पोहोचते व त्यामुळे केस गळती होत नाही. जोजोबा तेल सीरम (मलमासारखे द्रव्य) प्रमाणे निरोगी आणि आकर्षक चमक देते.

१) कोरड्या, निस्तेज आणि कुरळ्या केसांसाठी एक नैसर्गिक ओलावा प्रदान करते. जोजोबा तेलामध्ये प्रथिने आणि खनिजे विपुल प्रमाणात असतात. ज्यामुळे आपल्या केसांचे नुकसान होण्यापासून प्रतिबंध होतो. उन्हाळ्याच्या दिवसांतसुद्धा आपल्या केसांचे सौंदर्य आणि चमक कायम राहते. मुळापासून ते टोकापर्यंत लावून हलक्या हाताने मसाज करावा. नंतर ३० मिनिटांनी केस धुऊन काढावेत. ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. महिलांमध्ये आखीव-रेखीव, आकर्षक आणि दाट केसांच्या भुवया म्हणजे सौंदर्याचे प्रतीक आहे. जोजोबाच्या तेलाच्या मदतीने भुवयाचे केस दाट केले जाऊ शकतात. त्यासाठी अ‍ॅलोवेरा जेलमध्ये एक चमचा जोजोबा तेल मिसळावे. हे मिश्रण मस्करा (अंजन) सारखा भुवयावर व पापण्यांवर लावावे व पंधरा मिनिटांनंतर स्वच्छ धुऊन काढावे त्यामुळे भुवयांचे केस आकर्षक व दाट होण्यास मदत होते. जोजोबा तेल मुरुमावर नियंत्रण ठेवते. कारण या तेलामध्ये सूक्ष्म जीवाणूविरोधी गुणधर्म आहेत. तसेच हे तेल त्वचेवरील रंध्रांचा आकार कमी करते त्यामुळे चेह-याची त्वचा तेलकट होत नाही.

जोजोबा तेलामध्ये जीवनसत्व ‘ई’ व ‘ब’ बरोबरच अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचेचे पोषण आणि संरक्षणसुद्धा होते. त्याबरोबरच त्वचेमधील पाण्याचे संतुलन (आर्द्रता) ठेवण्यास मदत करते. या पोषक तत्त्वामुळे त्वचेतील पेशींचे जोमाने नवनिर्माण होण्यास मदत होते. काही सूक्ष्म जंतूंमुळे कातडीचा दाह होतो. पुरळ येतात आणि खाजसुद्धा सुटते. तसेच ब-याच वेळा त्वचेवर लाल डाग पडतात. सूज येते, जळजळ होते व तापसुद्धा येतो. त्यासाठी जोजोबा तेल अत्यंत उपयुक्त आहे कारण या तेलामध्ये सूक्ष्म जीवाणूविरोधी व सूजविरोधी गुणधर्म आहेत म्हणून जोजोबा तेलाने त्वचेवर हलकासा मसाज करावा.

रेमडेसिवीर देता का कुणी… रेमडेसिवीर; रूग्णांचे नातेवाईक नटसम्राटच्या भुमिकेत

कोरड्या टाळूमुळे केसात कोंड्याची समस्या होऊन खाज सुटते. जोजोबा तेलामध्ये सूक्ष्म विषाणूविरोधी गुणधर्म असल्याने जीवाणूचा संसर्ग होत नाही व त्यामुळे कोंडा होत नाही. तसेच कोरड्या टाळूचे पीएच संतुलन राखण्यास मदत होते. त्यासाठी जोजोबा तेलाचे काही थेंब बदाम किंवा खोब-याच्या तेलात मिसळून गरम करावे. या मिश्रणात कापसाचा बोळा भिजवून टाळूवर मालिश करावी व ३० मिनिटांनी शाम्पू लावून धुऊन काढावे ज्यामुळे टाळूचा कोरडेपणा कमी होतो.
जोजोबा तेलामध्ये सूक्ष्म जीवाणूविरोधी तत्त्वे आहेत.

त्यामुळे याचा वापर केल्यानंतरच त्वचेवर कोणत्याही जीवाणू किंवा बुरशीचा संसर्ग होत नाही. तसेच स्वयंपाक करताना ब-याच वेळा कापल्यामुळे जखम होते तेव्हा कापलेल्या भागावर जोजोबा तेल लावावे त्यामुळे कोणताही संसर्ग होत नाही. तसेच या तेलात अ‍ॅन्टिऑक्सिडंटस् असल्यामुळे झालेल्या जखमा लवकर ब-या होण्यास फायदा होतो. प्रामुख्याने महिलांमध्ये गरोदरपणानंतर त्वचेवर लांब आणि अरुंद रेषा दिसतात. त्यालाच स्ट्रेचमार्क म्हणतात. याचे कारण म्हणजे त्वचेच्या वाढीपेक्षा बाळाची वाढ जलद गतीने असते आणि त्वचा ताणली गेल्यामुळे त्या भागातील त्वचा थोडी फाटते. पोट, स्तन आणि नितंबाकडील भागात वजन जास्त वाढल्यामुळे त्या भागात स्ट्रेचमार्क्स विकसित होतात. त्यासाठी या प्रभावित भागांना जोजोबा तेल लावून तेल शोषून घेईपर्यंत गोलाकार मसाज केल्यास लाभदायक होते.

जोजोबा तेलामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. त्यामुळे बदलत्या हवामानानुसार महिन्यातून दोनवेळा जोजोबा तेलाने मालीश करावी. जोजोबा तेल ओठांचे सौंदर्य वाढविण्यास मदत करते. ब-याच वेळा ओठ कोरडे पडतात किंवा फाटतात. जोजोबा तेल आपल्या ओठांसाठी मॉईश्चरायझर म्हणून काम करते त्यामुळे या तेलाचा वापर विविध प्रकारच्या लिप बाम (ओठांना लावण्याचे क्रीम) मध्ये केला जातो. प्रामुख्याने महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप (चेह-याची सजावट) करण्यासाठी विविध प्रकारच्या क्रीम व पावडरचा वापर करतात. हे सर्व काढून टाकण्यासाठी (रिमूव्ह) जोजोबा तेल अत्यंत उपयुक्त आहे. आपण याद्वारे लिक्विड आयलायनर आणि क्रीम अगदी सहजपणे काढू शकता. त्यासाठी हे तेल कापसाच्या बोळ्याने चेह-यावर लावून हळुवारपणे चोळून थोड्या वेळाने क्लींजरने स्वच्छ केल्यास मेकअप निघून जाते.

ब-याच वेळा पायांना किंवा बोटांना घट्टे पडतात. ते कमी करण्यासाठी पेडीक्योरचा वापर करतात. त्याच्या समवेत जोजोबा तेलाचा वापर अत्यंत उपयोगी आहे. हे तेल फाटलेल्या टाचांना प्रतिबंध करते व घट्टे कमी होऊन पाय व बोटे मऊ, गुळगुळीत व सुंदर दिसतात. जोजोबा तेलामध्ये सुक्ष्म जीवाणूच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असल्यामुळे त्वचेवर होणारा दाह, जळजळ, सूज व लालसरपणा कमी होतो. त्यासाठी अ‍ॅलोवेरा जेलमध्ये या तेलाचे काही थेंब मिसळून प्रभावित भागावर लावून मालिश करावी त्यामुळे सूज व जळजळ कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या