27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषमनाला भुरळ घालणारी कविता ‘छंद देई आनंद’

मनाला भुरळ घालणारी कविता ‘छंद देई आनंद’

एकमत ऑनलाईन

विपुल बालसाहित्य लेखन करणारे आणि विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवांकित झालेले बालसाहित्यकार एकनाथ आवाड यांचा ‘छंद देई आनंद’ हा नवा बालकवितासंग्रह पुण्याच्या ख्यातनाम दिलीपराज प्रकाशनगृहाने नुकताच प्रकाशित केला असून यात एकूण ४२ विविधरंगी सुंदर बालकविता आहेत. मुलांच्या संवेदनशील अशा भावविश्वाचा अविभाज्य घटक असणा-या आई, बाबा, परी, त्यांची स्वप्ने आदी विषयांवरील या बालकविता अगदी साध्या-सोप्या शब्दांचे योजन करून कवीने लिहिलेल्या आहेत. या कवितांमधून मुलांचे अंतरंग, भाव-भावना, विचार आणि त्यांची भावस्वप्ने सामर्थ्याने प्रकटतात.उदा. सर्व मुलांच्या भावविश्वातली परीताई प्रत्यक्ष घरी प्रकटल्यानंतर घडणारी जमाडी-गंमत टिपताना कवी ‘परीताई’ कवितेत
म्हणतो :
मी म्हटलं – परीताई
चल माझ्या घरी
आई करेल तुझ्यासाठी
आमरस नि पुरी
याचा अर्थ ‘छंद देई आनंद’ संग्रहातली कविता मुलांना केवळ
मौज, आनंद देऊन त्यांचे मनोरंजनच करते असा नाही, तर त्यासोबतच यातील काही कवितांतून मुलांना ज्ञानरूपी रत्ने मिळण्याचा मंत्रही मिळतो. उदा. ‘ग्रंथसखा’ या कवितेत मुलांना ग्रंथवाचनाची महती आणि माहात्म्य सांगताना कवी म्हणतो :
पुस्तके जरी छोटी मोठी
विचार नवा देतात
ग्रंथसखा होऊन आपल्या
आयुष्याला घडवतात
याशिवाय या संग्रहातील काही बालकविता अगदी सहजसुंदरतेने आणि अकृत्रिमतेने आपला इतिहास,
भूगोल, पर्यावरण, संस्कृती यांची सार्थ ओळख मुलांना करून देणा-या आहेत. उदा. मुंबई या शहराचा नेमका परिचय करून देताना कवी म्हणतो :
आपल्या भारत देशाची
ही आर्थिक राजधानी
तिच्या नावाचा डंका
वाजे सा-या जगातुनी
तसेच मानवी जीवनात अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे महत्त्व छंदांचे असते हे विशद करताना कवी ‘छंद देई आनंद’ कवितेत म्हणतो :
छंदामुळे होते रंजन
होते मन ताजेतवाने
नवनिर्मितीच्या आनंदामुळे
आकाशही वाटते ठेंगणे
थोडक्यात छोट्या मुलांचे आवडते कवी एकनाथ आवाड यांच्या ‘धंद देई आनंद’ या बालकवितासंग्रहात घर, शाळा, शेत, निसर्ग, आकाश अशा भिन्न विषयांवरील अगदी बहारदार अशा एकापेक्षा एक सरस कविता असून त्या फक्त मुलांनाच नव्हे तर प्रौढ वाचकांनाही पुन:पुन्हा वाचाव्याशा वाटाव्यात एवढ्या त्या वाचनीय आणि आनंददायी आहेत. प्रस्तावनेत ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख म्हणतात त्याप्रमाणे ‘ही बालकविता मुलांचे मनोरंजन करता करता त्यांना भावसंपन्न आणि ज्ञानसंपन्नही करणारी आहे’ हे नक्की ! तसेच संपूर्णत: आर्टपेपरचा वापर केलेला हा रंगीत रेखाचित्रांचा बालकवितासंग्रह मुलांना खूपच आवडेल, असा विश्वास वाटतो. हेच कवी एकनाथ आवाड यांचे यश आहे.
छंद देई आनंद – (बालकविता)
कवी – एकनाथ आवाड
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन, पुणे.
पृष्ठे – ६४, मूल्य – रु. १५०/-

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या