27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeविशेषरॅगिंगमधील क्रौर्याचे आव्हान

रॅगिंगमधील क्रौर्याचे आव्हान

एकमत ऑनलाईन

नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातील रॅगिंगचे प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. तिकडे दिब्रुगड विद्यापीठात घडलेल्या रॅगिंगच्या घटनेने पुन्हा एकदा रॅगिंगबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. विद्यार्थ्यांची आपापसातील गंमतजंमत म्हणून सुरुवातीला रॅगिंगविषयी फारशी चिंता वाटत नसे. परंतु कालोघात त्याला बिभत्स आणि क्रौर्याचे स्वरुप आले आहे. विशेषत: शिक्षण क्षेत्रात राजकारण, गुंडगीरी, बाहेरच्या विद्यार्थ्यांची घुसखोरी सुरू झाली तेव्हापासून रॅगिंगमधील गंमत जाऊन केवळ दडपशाही उरली. याबाबत महाविद्यालय प्रशासनाने कणखर भूमिका बजावणे गरजेचे आहे.

दिब्रुगड विद्यापीठात घडलेल्या रॅगिंगच्या घटनेने पुन्हा एकदा रॅगिंगबाबत प्रश्न उपस्थित केले. त्या पाठोपाठ नागपुरातील शासकीय महाविद्यालयातील रॅगिंगचे प्रकरण समोर आले. या घटनांवरून विद्यार्थ्यांच्या आपापसातील गंमतजंमत म्हणून ओळखले जाणारे रॅगिंग हिंसात्मक बनले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. रॅगिंग या शब्दाचा अर्थ पाहिल्यास अमेरिकन इंग्रजीत रॅगिंग म्हणजे एखाद्याला चिडवणे असा अर्थ आहे. ब्रिटिश इंग्रजीत हा शब्द एखाद्याला गमतीने, पण क्रूर त्रास देणे या अर्थाने वापरला जातो. १७९० आणि १८०० च्या दरम्यान ब्रिटनमध्ये या शब्दाची उत्पत्ती झाली, असे मानले जाते. भारतात १८५७ मध्ये कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास विद्यापीठांची स्थापना झाल्यानंतर रँगिगची सुरुवात झाली होती, असे सांगितले जाते.

केवळ चिडवण्यापासून सुरू झालेली कृती कालोघात छळ करणे, अभद्र बोलणे, अश्लील कृत्ये करणे असे करत आज विकृतीकडे गेली आहे. पूर्वीचाया काळी जुन्या विद्यार्थ्यांकडून नव्या विद्यार्थ्यांवर बॉसिंग करण्यासाठी रॅगिंग केले जायचे. मात्र जेव्हापासून शिक्षण क्षेत्रात राजकारण गुंडगिरी आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांची घुसखोरी सुरू झाली तेव्हापासून रॅगिंगचे स्वरुपच पालटले. जुन्या विद्यार्थ्यांनी नव्या विद्यार्थ्यांवर गुंडगीरी करणे, त्याला न जुमानल्यास मारझोड करणे, त्यांचे शोषण करणे असे प्रकार दिसू लागले. या दबंगशाहीत अश्लाघ्य कृत्ये करण्यास भाग पाडली गेल्याची उदाहरणे समोर आली. शाळा-महाविद्यालयांत रॅगिंग व्हावी की नाही, याबाबत विद्यार्थ्यांची मते जाणून घेतल्यास बरेचसे विद्यार्थी मिश्किलीच्या, खोडकरपणाच्या स्वरुपातील रॅगिंगला हरकत नसल्याचे सांगतात. नव्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची कार्यप्रणाली, जुने विद्यार्थी, कॉलेज कॅम्पसमधील वर्चस्ववाद यांची ओळख व्हावी, त्यांच्यातील संकोच दूर व्हावा आणि मुख्य म्हणजे त्यातून कल्ला करता यावा यासाठी रॅगिंग हवेच असे मानणारा एक वर्ग आहे.

बाकावर उभे राहून गाणे म्हणायला लावणे, केसांना रंग लावून येणे, जुन्या विद्यार्थ्यांची कामे करणे यांसारख्या प्रकारांमुळे नवे विद्यार्थी महाविद्यालयाच्या वातावरणात सहज मिसळून जातात, असे काही तरुण सांगतात. मात्र हा प्रकार तेवढ्यावर कधीच थांबत नाही. तसे असते तर त्याला विरोध केला गेला नसता. पण कालोघात रॅगिंगमध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या नावाखाली नव्या विद्यार्थांवर एक प्रकारे अत्याचारच केला जातो. ज्युनियर विद्यार्थ्याच्या डोक्यावर बूट ठेवणे, जबरदस्तीने सिगारेट ओढायला लावणे, दारू प्यायला लावणे, अंगावर केवळ अंतर्वस्र ठेवून महाविद्यालयाच्या इमारतीला फेरी मारायला लावणे, मुलींची छेड काढण्यास सांगणे, अश्लील चाळे करणे यांसारखे प्रकार रॅगिंगच्या नावाखाली केले जात असतील तर त्याचे समर्थन कसे करता येईल? यातील महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग केले जाते ते ‘सिनियर’ बनताच बदल्याच्या भावनेने नव्याने दाखल होणा-या विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा विचार करतात. यातून रॅगिंगची परंपराच पुढे चालू राहते. तसेच त्यात बदल्याची भावना आल्यामुळे क्रौर्याचा अंतर्भाव होतो. त्यात या विद्यार्थ्यांना गैरही काही वाटत नाही. अनेक वेळा तर रॅगिंगचे स्वरूप इतके भयानक असते की पीडित विद्यार्थ्याला महाविद्यालयच सोडून जावे लागते. अशा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. अशा स्थितीत रॅगिंग रोखणे गरजेचे ठरते.

विद्यार्थी जीवनात या कुप्रथेचा फैलाव का होत आहे, असा प्रश्न पडतो. अलीकडील काळातील घटना पाहिल्यास अशा बहुतांश प्रकरणांमध्ये सामाजिक तत्त्वांना पायदळी तुडवले जाते. यामागे गर्दीचे मानसशास्त्र असते. कारण कोणताही एकटा सीनियर विद्यार्थी रॅगिंग करत नाही. कारण त्याच्यासाठी त्याला मानसिक बळ तयार करता येत नाही. मात्र जेव्हा सीनियर विद्यार्थ्यांचा गट तयार होऊन रॅगिंगचे कृत्य करतो तेव्हा त्यांच्यात सामूहिक सहमती झालेली असते. ही सामूहिक सहमती भविष्यात जाऊन एखादे बेकायदेशीर कृत्य घडवून आणू शकते. म्हणूनच ही कुप्रथा रोखणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडूनच पाऊल उचलले गेले पाहिजे. महाविद्यालय प्रशासन दरवर्षी याबाबत कडक पावले उचलत असतात; मात्र अजूनही त्यांना फारसे यश हाती आलेले नाही.

– सुचित्रा दिवाकर

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या