22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषकारस्थान ओळखायला हवे!

कारस्थान ओळखायला हवे!

एकमत ऑनलाईन

जहांगीरपुरीच्या हिंसाचाराने पुन्हा एकदा दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशाला घाबरवून सोडले आहे. हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर २०२० च्या जातीय हिंसाचाराची पुनरावृत्ती दिल्लीत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. हिंसाचार आणि जाळपोळीची सर्व माहिती समोर आल्यानंतर दिल्लीला पुन्हा एकदा जातीय हिंसाचाराच्या आगीत ढकलण्याची तयारी सूत्रधारांनी केली होती, असे मानायला हरकत नाही. हिंसाचाराचे व्हीडीओ फुटेज पाहिल्यानंतर उत्तेजना वाढणे खरे तर स्वाभाविक होते; परंतु दिल्लीतील जनतेने धैर्य आणि संयम सोडला नाही, याबद्दल लोकांचे कौतुकच करावे लागेल. या प्रकरणी पोलिस प्रशासनानेही घटनेनंतर तातडीने कारवाई करून हे प्रकरण पुढे चिघळू नये यासाठी अनेक उपाययोजना केल्या. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वसमावेशक विचार आणि त्यानुसार व्यवस्था करण्याची गरज आहे. भारतातील काही राजकीय पक्ष आणि विचारवंत तसेच कार्यकर्त्यांच्या एका मोठ्या वर्गाला यातील सत्य पुढे येऊ द्यायचे नाही. परंतु अखेर व्हीडीओ फुटेज चुकीचे असू शकत नाही. एवढ्या मोठ्या संख्येने हल्लेखोर आले कुठून? दगड, विटा, काचेच्या बाटल्या इत्यादी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोळा करता येत नाहीत.

हनुमान जयंती मिरवणुकीतील लोकांच्या कृत्यांमुळे वातावरण बिघडल्याचा कोणताही पुरावा आतापर्यंत मिळालेला नाही. मिरवणुकीत महिला, पुरुष, लहान मुले, वृद्ध आदी सर्वजण सहभागी झाले होते. या बाजूने हिंसाचार झाला असता तर त्याचे पुरावेही सापडले असते. शोभायात्रेतील वाहनांवर चढलेले हल्लेखोर तलवारी, काठ्या आदी फिरवत असताना व्हीडीओमध्ये दिसत आहेत. हे सगळे बघूनही आपण दुर्लक्ष करतो किंवा त्याकडे डोळेझाक करणार असू तर भाग वेगळा; अन्यथा सत्य समोर आहे. अल्पसंख्याकांच्या नावाखाली या हल्लेखोरांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे काहीही भले करत नाहीत. धर्मांध घटक कोणत्याही समाजासाठी हानिकारकच असतात. मिरवणुकीच्या बाजूने पहिला हल्ला झाला असे ज्यात दिसून येईल, असा एक तरी पुरावा या लोकांनी आणावा. जर हे खरे नसेल तर त्याचा पुरावा असूच शकत नाही.

पोलिस एकाच बाजूच्या लोकांना पकडतात असा आरोप करणे सोपे आहे. जर गुन्हेगार एकाच बाजूचे लोक असतील तर केवळ कारवाई संतुलित वाटावी यासाठी दुस-या बाजूच्या लोकांना जाणूनबुजून कसे पकडले जाईल? दोन गटांमधील हाणामारी किंवा हिंसाचाराची ही घटना साधी नाही. महत्त्वाच्या धार्मिक उत्सवांमध्ये मिरवणूक आणि शोभायात्रांची परंपरा जुनी आहे. हनुमान जयंती ही त्यापैकीच एक. बरेच लोक या दिवशी उपवास करतात आणि तेही यात्रेत सहभागी होतात. शोभायात्रेतील वातावरण भक्तीचे असते. जरी भक्तिभाव नसलाच तरी एखादी धार्मिक यात्रा विशिष्ट समूहाला अस कशी होऊ शकते? एखाद्या धार्मिक आयोजनाबाबत तुम्ही इतके सहिष्णु झालात की त्यावर हल्ला करून मारायला आणि मरायला तयार असाल, तर त्याला काय म्हणावे? या घटनेकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास यात गुंतलेल्या लोकांची मानसिकता समजून घ्यावी लागेल. खरे तर धार्मिक कट्टरतावादाची ही अशी घातक विचारसरणी आहे, जी रोखणे गरजेचे आहे.

ही केवळ दिल्लीची परिस्थिती आहे असे नाही. एप्रिलच्या सुरुवातीपासून आतापर्यंत राजस्थानमधील करौलीपासून मध्य प्रदेशातील खरगोन आणि गुजरातमधील खंबातपर्यंत अशाच धार्मिक मिरवणुकांवर पूर्वनियोजित भीषण हल्ले झाल्याची दृश्ये आपण पाहिली आहेत. या सर्व घटनांवर कारवाई सुरू असून, सर्वत्र हिंसाचाराची हीच पद्धत अवलंबिण्यात असल्याचे तपासातून समोर येत आहे. गुप्तपणे तयारी करण्यात आली, हिंसाचाराचे साहित्य गोळा करण्यात आले. या सर्वांसाठी निधीचीही व्यवस्था करण्यात आली, षड्यंत्र रचून माणसे तयार करण्यात आली आणि गरजेनुसार बाहेरून बोलावण्यातही आली. याचा सरळ निष्कर्ष असा की, धार्मिक कमरतेची मानसिकता असणा-यांनी भारताला जातीय हिंसाचाराच्या आगीत ढकलण्याचे मोठे षड्यंत्र रचले होते. सर्व राज्यांच्या हल्ल्यांचा सूत्रधार एकच नसला, तरी विचारांच्या स्तरावर एकाच ठिकाणाहून प्रसार करण्याचा प्रयत्न झाला आहे.

राजस्थानमधील करौलीमध्ये हिंसाचार उसळला तेव्हा अशा प्रकारची ही एकमेव घटना असेल असे वाटत होते. त्यानंतर गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील खंबात, साबरकांठा आणि द्वारका येथे हिंसाचार उसळला. कदाचित यासुद्धा वेगवेगळ्याच घटना असाव्यात असे त्यावेळी वाटले. मात्र १० एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी अशाच प्रकारे मिरवणुकांवर ठिकठिकाणी हल्ले झाले. त्यानंतर हनुमान जयंतीला दिल्लीला लक्ष्य करण्यात आले.असा हिंसाचार करण्याच्या तयारीत कुठे आणि किती लोक सामील आहेत, हे सांगता येत नाही. मुख्य प्रश्न विचारसरणीचा आहे. अशा प्रकारची विचारसरणी जर मोठ्या प्रमाणावर पसरली असेल, तर भारतासारख्या विविधतेने संपन्न देशासमोर ते मोठे आव्हान आहे. खरे सांगायचे झाल्यास हा धोका दहशतवादी हिंसाचारापेक्षा कमी धोकादायक नाही. हल्ल्यानंतर होणारी जीवितहानी यावेळी फारशी नाही; परंतु यापुढे असू शकते. आता देशापुढील मोठा प्रश्न असा आहे की, अशा मानसिकतेवर तोडगा काय काढायचा? राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हे गंभीर आव्हान आहे. ही धोकादायक मानसिकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे काही चेहरे नक्कीच आहेत.

– विनायक सरदेसाई

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या