24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeविशेषजोर ओसरला; पण...

जोर ओसरला; पण…

एकमत ऑनलाईन

विषाणू हा असा एक सूक्ष्म जीव आहे जो सजीवतेच्या आणि निर्जिवतेच्या सीमारेषेवर जगणारा आहे. त्याला सजीव म्हणावे की निर्जीव हा प्रश्न याचा अभ्यास करणा-या तज्ज्ञांपुढेही पडलेला आहे. कारण तो जिवंत पेशीबाहेर स्वत:ची वाढ करू शकत नाही. त्यामुळे त्याला वाढण्यासाठी कोणता ना कोणता एक जीव लागतो. त्यामुळे तो जेव्हा एखाद्या जिवंत पेशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या पेशीतील घटकांचा किंवा साहित्याचा वापर करून विषाणू स्वत:ची वाढ करत राहतो. साधारणपणे विषाणूंची वाढ ही झेरॉक्सप्रमाणे असते. म्हणजेच आपण ज्याप्रमाणे एका कागदाच्या अनेक प्रती काढतो, तशाच प्रकारे विषाणू आपल्याच व्हायरस पार्टिकलच्या अनेक कॉपी तयार करतो. हे करत असताना ज्यापद्धतीने आपल्या जशा स्पेलिंग मिस्टेक्स होतात तशाच प्रकारे विषाणूंमधील प्रथिनांमधील अमिनो अ‍ॅसिड्सचा क्रम बदलतो. या बदलाला आपण म्युटेशन किंवा उत्परिवर्तन असे म्हणतो.

कोविड-१९ संसर्गाच्या गेल्या दीड वर्षामध्ये आपण म्युटेशनची चर्चा अनेकदा ऐकली आहे. या म्युटेशनमुळे या विषाणूचे नवनवे व्हेरियंट तयार झालेले दिसून आले. यामध्ये अल्फा, बिटा, डेल्टा यांचा समावेश होतो. आरएनए प्रकारच्या विषाणूंमध्ये म्युटेशन अधिक प्रमाणात होत असते. कोविडचा विषाणू याच धाटणीचा आहे. त्यामुळे त्यात सातत्याने बदल होताना दिसून आले. भारतामध्ये जी दुसरी लाट आली ती कोविड विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटमुळे आली. पहिली लाट जेव्हा आली तेव्हा चीनमधील वुहानमधून आलेला मूळचा विषाणू प्रबळ होता. गतवर्षाखेरीस ती लाट ओसरल्यानंतर मार्च २०२१ मध्ये आपल्याकडील काही भागामध्ये डेल्टा व्हेरियंटचा प्रसार सुरू झाला आणि तोच संपूर्ण राज्यभर पसरला. दुसरी लाट येण्यास हाच डेल्टा व्हेरियंट कारणीभूत ठरला. आताची परिस्थिती पाहता असे लक्षात येते की, डेल्टा विषाणूने आता मूळ विषाणूची जागा घेतली आहे. महाराष्ट्रात सर्वदूर आढळणारा विषाणू हा मुख्यत्वे डेल्टाच आहे. तथापि, आपल्याकडे आधीच डेल्टा व्हेरियंटमुळे दुसरी लाट येऊन गेलेली होती आणि या लाटेत बाधितांची संख्या खूप मोठी होती.

तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरणही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे या विषाणूच्या विरोधात समाजात प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे. आज आपण हर्ड इम्युनिटी किंवा कळपाची प्रतिकारशक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यामुळे डेल्टा विषाणू आज कमजोर पडताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर कोविडबाधितांची संख्या आता दिसत नाहीये. याचे कारण या विषाणूच्या विरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. त्यामुळे त्याचा प्रसाराचा वेग कमी होत आहे. कोणताही व्हेरियंट तयार होतो तेव्हा साधारणत: दोन-तीन वैशिष्ट्ये त्या विषाणूला प्राप्त होतात. एक म्हणजे त्याच्या प्रसाराचा वेग वाढू शकतो, दुसरे म्हणजे त्या आजाराची तीव्रता वाढू शकते आणि तिसरे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती भेदून जाण्याची ताकदही त्याला मिळू शकते. या दोन्हीही गोष्टी घडल्यामुळे दुसरी लाट आली होती.

मात्र ज्या विषाणूमुळे देशभरात इतकी मोठी साथ आली त्या विषाणूचा जोर आता ओसरला आहे. यासंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोविडचा विषाणू कमजोर होऊ लागल्यानंतर आता इतर विषाणू डोके वर काढू लागले आहेत. त्याबाबत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड संक्रमणात झालेली घट ही आशादायक आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण घटत चालले आहे. याचे कारण म्हणजे सर्वसामान्य लोक कोविड अनुरूप वर्तन करण्यावर भर देत आहोत. त्यामुळे लोकसहभाग हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरीकडे, आपण लसीकरण खूप मोठ्या प्रमाणावर केलेले आहे. राज्यातील सात ते आठ कोटी जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. या सर्वांमुळे कोविडचा संसर्ग कमी झालेला दिसत आहे. अर्थात यामुळे आपली कोविडविरुद्धची लढाई संपलेली नाहीये.

कोविड विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) आपण नियमितपणे अभ्यासत आहोत. महाराष्ट्र सरकार दिल्लीतील सीएसआयआर प्रयोगशाळेसोबत काम करत आहे. त्यानुसार दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० नमुने आपण पाठवत आहोत आणि विषाणूमध्ये आणखी काही बदल होत आहेत का हे अभ्यासत आहोत. अशाच अभ्यासातून आपण डेल्टा व्हेरियंट शोधला होता. तशा प्रकारचे उत्परिवर्तन नव्याने होत नाहीयेना यावर लक्ष दिले जात आहे. सुदैवाने, गेल्या तीन महिन्यांमध्ये कोविड विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही ठळक बदल झालेला दिसून आलेला नाहीये. त्यामुळे विषाणू जर बदलला नाही, त्यात ठळक बदल झाले नाहीत तर तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु विषाणूत जर उत्परिवर्तन झाले तर मात्र लाट येऊ शकते. थोडक्यात, लाट येणे अथवा न येणे हे विषाणूच्या जनुकीय रचनेवर अवलंबून आहे. आता डेल्टा विषाणूच्या विरुद्ध समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती तयार झालेली असल्याने डेल्टा प्रकारचा विषाणू वाढण्याची शक्यता नाही.

परंतु तरीही आपल्याला बेजबाबदारीने वागून चालणार नाही. खास करून गर्दीच्या ठिकाणी शारीरिक अंतर राखण्याचे भान ठेवणे आणि मास्क वापरणे याबाबत हलगर्जीपणा केला जाता कामा नये. जोपर्यंत ही साथ संपली आहे, याची खात्री होत नाही तोपर्यंत कोविड अनुरूप वर्तन कायम ठेवणे गरजेचे आहे. आज परदेशातून भारतात येणा-या प्रवाशांसाठी लसीची, आरटीपीसीआर चाचणीची अट घालण्यात आलेली आहे. थोडक्यात सामाजिक आणि आर्थिक जीवन पुनर्प्रस्थापित करत असताना आजाराचे प्रमाण, रुग्णसंख्या वाढू नये यासाठी आपण सर्व पातळ्यांवर खबरदारी घेत आहोत. अर्थातच, शासन-प्रशासन पातळीवरील प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळणे आवश्यक आहे. यासाठी कोविड संदर्भातील नियमांचे पालन करतानाच लसीकरणासाठीही सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.
(लेखक महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे साथरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

डॉ. प्रदीप आवटे
साथरोगतज्ज्ञ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या