Saturday, September 23, 2023

शिक्षणप्रवाह थांबू नये

ग्रामीण भागातील जे बहुसंख्य विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतात, त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे शक्य नाही. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेचे काम सामुदायिक पातळीवर विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात केंद्रित आहे. ऑनलाइन शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास, सर्वप्रथम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परस्परांशी जोडणे आवश्यक आहे. शिक्षणाची ही व्यवस्था एकमेकांपासून दूर राहून संचालित केली जाते. त्यामुळेच या मार्गात अनेक प्रकारची आव्हानेसुद्धा आहेत.

सर्वाधिक समस्या ग्रामीण भागात सरकारी शाळांमध्ये शिकणाºया मुलांसंबंधीची आहे. कारण मूळ समस्या शिक्षणोपयोगी तंत्रज्ञान आणि इंटरनेट यांचा मर्यादित विस्तार हीच आहे. अशा स्थितीत सध्या सर्व शाळा बंद आहेत, तर यातून मार्ग कसा काढायचा? कोणत्या प्रकारचे पर्याय उपयोगात आणायचे? असा प्रश्न उभा राहतो. विशेषत: बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांमधील समस्या लक्षात घेता आम्ही दोन-तीन मुद्यांवर काम करीत आहोत.

आॅनलाईन शिक्षणाचा ट्रेण्ड आता सुरू झाला आहे. परंतु खेडोपाडी सरकारी शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही. अशा परिस्थितीत संपर्काची सध्या उपलब्ध असलेली माध्यमे वापरून विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधता आल्यास तो प्रभावी उपाय ठरेल. सध्या ज्या शाळा-महाविद्यालयांनी आॅनलाईन शिक्षणाची सुविधा दिली आहे, त्यांचा निकाल आणि अन्य बाबींचाही अभ्यास करावा लागेल.

ज्यांच्याकडे इंटरनेट, लॅपटॉप आदी सुविधा आहेत, ते ऑनलाइन शिक्षण प्रणालीशी स्वत:ला जोडून घेऊ शकतात. त्याचबरोबर ज्या शाळांमध्ये तांत्रिक ज्ञानाशी मिळतेजुळते घेण्याजोगे वातावरण असेल, अशा शाळांमध्ये ते विद्यार्थी असतात; परंतु आम्ही ग्रामीण शाळांसोबत आणि गावपातळीवर काम करतो. मुलांचे गट आणि छोट्या विद्यार्थ्यांच्या मातांचे गट तयार करून आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधत राहिलो.

Read More  घणी गई थोड़ी रही, या में पल पल जाय। एक पलक के कारणे, युं ना कलंक लगाय।।

एक गोष्ट स्पष्ट आहे ती अशी की, आजही स्मार्टफोनची सुविधा खूपच कमी लोकांना उपलब्ध आहे. परंतु सर्वसामान्य मोबाईल बहुतांश लोकांकडे आहेत. आम्ही रोज मोठ्या प्रमाणावर एसएमएस पाठवीत आहोत. एसएमएसच्या माध्यमातून आम्ही लोकांना काही गमतीदार शैक्षणिक प्रश्न पाठवितो. उदाहरणार्थ, तुमच्या घरात किती पाण्याचा वापर होतो? आंघोळीसाठी, पिण्यासाठी आणि जेवण तयार करण्यासाठी किती पाणी खर्च होते? बादलीच्या मापावरून तुम्ही अंदाज लावून आम्हाला कळवा, अशा काही कृती त्यांना आम्ही सांगतो. एसएमएसला चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. काही लोक फोनही करतात. त्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात.

आठवड्यातून एक दिवस कृतींविषयी आमची चर्चा होते आणि लोकांकडून सूचनाही घेतल्या जातात. अशा प्रकारे दुतर्फा संवाद सुरू असल्यामुळे आम्ही बरेच काही शिकलो आहोत. पालकांची विचार करण्याची पद्धत कशी असते, हे आम्हाला माहीत झाले आहे. या गोष्टी फोनवरील थेट संभाषणातून आम्हाला समजतात. त्यानुसार आम्ही पुन्हा एसएमएस पाठवितो. अशा प्रकारे हा कामाचा एक स्तर झाला. संपूर्ण देशातील १२००० गावांमध्ये एसएमएसच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण मुलांशी जोडले गेलो आहोत. हा प्रयोग आम्ही कोविडच्या साथीदरम्यान केला आहे. यानंतरही आम्ही पालकांशी अशा प्रकारचा संवाद सुरूच ठेवणार आहोत. शाळांनीही अशा प्रकारे संपर्क साधला पाहिजे. या प्रक्रियेत स्मार्टफोनचा अजिबात वापर होत नाही, तर जुन्या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच संपर्क सुरू आहे.

Read More  दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

अनेक राज्यांच्या सरकारबरोबर आम्ही एका प्रकल्पावर काम सुरू केले आहे. उदाहरणार्थ, नुकतेच आम्ही महाराष्टÑ सरकारसोबत काम सुरू केले आहे. उत्तर प्रदेशातही हा प्रकल्प सुरू होत आहे. तिथे रेडिओच्या माध्यमातून आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा अर्ध्या तासाचा कार्यक्रम प्रसारित होतो. या रेडिओ कार्यक्रमातून एसएमएसद्वारे झालेल्या चर्चेविषयी विस्ताराने सांगितले जाते, जेणेकरून रेडिओच्या माध्यमातूनही लोकांना एक आधार मिळावा.

सध्याच्या परिस्थितीत जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्याच्या मदतीने काय-काय करता येणे शक्य आहे, याविषयी आपण विचार करायला हवा. हा प्रयत्न सरकारी आणि संस्थात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर होणे गरजेचे आहे. महाराष्टÑातील नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांमध्ये हे काम सुरू आहे. तिथे अनेक ग्रामपंचायती रेडिओवरील कार्यक्रम ध्वनिवर्धकाच्या माध्यमातून प्रसारित करतात. या प्रयत्नांमुळे गावातील लोकांचा सहभाग वाढतो, असे आढळून आले आहे. प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध असलेल्या मोजक्या साधनांच्या सहाय्याने काहीतरी करता येऊ शकते, याचे हे केवळ एक उदाहरण आहे. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वाढेल, लोकांकडे लॅपटॉप उपलब्ध होतील, तेव्हा आणखी प्रयत्न करता येऊ शकतील.

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असते. अशा स्थितीत शिक्षकांनी फोनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांशी जोडून घेतले तर काहीतरी घडू शकते. या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही शिक्षणातील रुची वाढेल. संवादाचे हे असे माध्यम आहे, ज्यातून शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तिगतरीत्या ओळखतात असा संदेश दिला जाऊ शकतो. वस्तुत: हा ठोस पर्याय नाही, हे खरे आहे. परंतु अनेकातील एक मार्ग नक्की असू शकतो. आपण बिर्याणी बनवू शकत नाही, तर कमीत कमी खिचडी बनवून तरी खाऊ शकतो.

Read More  सहा तालुक्यात कोरोनामुळे २६ जणांचा मृत्यू

आम्ही पालकांपर्यंत पोहोचलो आहोत. ही प्रक्रिया शाळा सुरू झाल्यानंतरही कायम राहायला हवी, असे मला वाटते. अशिक्षित पालकही सकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. कारण मुलांची शैक्षणिक प्रगती ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांना वाटते. शिक्षकाने जर आपल्या मुलाला घरी फोन केला, तर निश्चितच तो एक सुखद अनुभव असेल. अशा प्रकारच्या संपर्काला प्रोत्साहन दिले जाण्याची गरज आहे. आता ऑनलाइन शिक्षणाचा जो ट्रेण्ड सुरू झाला आहे, तो कितपत प्रभावी ठरतो हे आपल्याला पाहावे लागेल. ज्या शाळा आणि महाविद्यालये ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देत आहेत, त्यांचा परिणाम काय होतो? मुलांना किती उपयोग होतो? या सा-याचे अवलोकन केले जाण्याची गरज आहे. ज्या चांगल्या बाबी असतील, त्या भविष्यात कायम ठेवाव्या लागतील आणि ज्या त्रुटी, कमतरता आहेत, त्या भरून काढाव्या लागतील.

डॉ. रुक्मिणी बॅनर्जी
सीईओ, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या