22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeविशेषभारूड परंपरेचे वैभव

भारूड परंपरेचे वैभव

भारूडरत्न निरंजन भाकरे यांचे नुकतेच निधन झाले. कोरोनाकाळात भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करत असताना याच रोगाने त्यांचा ठाव घेतला. रहिमाबादसारख्या दुर्गम भागातून आलेल्या भाकरेंचे सामाजिक भानही तितकेच प्रखर होते. लोककलांचे जतन, संवर्धन व्हावे म्हणून धडपड करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. पण सपत्निक देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत होते. कला आणि माणुसकीप्रती अविचल निष्ठा जपणारा हा कलावंत ख-या अर्थाने भारूड लोककला परंपरेचे वैभव होता.

एकमत ऑनलाईन

निरंजन भाकरे यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद नावाच्या छोट्याशा गावात स्वत:चं घर नसलेल्या मुरलीधर शिंपी यांच्या घरी झाला. वडील शिवणकाम करीत. घरची परिस्थिती खूप हलाखीची. त्यातच त्यांच्या वडिलांची सात अपत्ये जन्मत:च देवाघरी गेलेली. हातातोंडाची जेमतेम भेट होणा-या या शिंपी कुटुंबात पुन्हा मुरलीधर आप्पांच्या पत्नीला म्हणजेच कस्तुराबाईंना दहाव्यांदा गर्भधारणा झाली. कस्तुराबाईंची तब्येत पाहता डॉक्टरांनी आप्पांना बाजूला बोलावून विचारलं आपणास पत्नी हवी की पोटातलं बाळ? आप्पा धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांनी निपट निरंजन महाराज समाधीला हात जोडून नवस केला. बाळंतपण सुखरूप झालं. बाळ आणि आईही सुखरूप वाचली अणि १० जून १९६५ रोजी निपट निरंजन महाराज यांच्या नावावरून भारूडकार निरंजन भाकरेंचा जन्म झाला.

भाकरे अवघे सात वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना आजाराने घेरले. महिन्याभरातच वडील त्यांना सोडून गेले. अशातच १९७२ चा भीषण दुष्काळ मराठवाड्याने अनुभवला. परिस्थिती हलाखीची बनली. भाकरेंच्या आईपुढे अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला. पण फांदीच्या भाजीचा पाला आणि मिळेल तेव्हा जवसाच्या भाकरी खाऊन त्यांनी दिवस काढले. पतीचा वियोग आणि मुलांची चिंता यात त्यांची आई भ्रमिष्ट बनली. मुलं आईचा सांभाळ करू लागली. तशात दुष्काळी भागात शासनाच्या वतीने नालाबंडिंगची कामं सुरू झाली. भाकरे आणि त्यांची बहीण या कामाला जाऊ लागले. संध्याकाळी दमूनभागून घरी परतल्यावर आई गळ्यात पडून ढसाढसा रडत असे. दिवसांमागून दिवस सरत गेले. वेदनेने गाठलेल्या परिसीमेमुळे ओठांतून गाणी उमटू लागली. भाकरे मजुरांसमोर वाटीवर ठेका धरत गाणी गाऊ लागले.

खरे तर भाकरेंना वडिलांकडूनच भजनाची परंपरा लाभली. वडील झोळणीत घालून झोका देत भजन, पोवाडे गात. यातूनच नकळत त्यांच्यावर कलेचे संस्कार होत गेले. शालेय शिक्षण झाल्यावर पुढे औरंगाबाद एमआयडीसीमध्ये लुपीन या औषधनिर्मिती कंपनीत १० रुपये हजेरीने कामाला लागले. लग्न झालं, आणि संसाराचा गाढा ओढत त्यांनी छोट्या-मोठ्या कलापथकांतून पेटीवादक म्हणून पैसा कमवण्यास सुरुवात केली. अशातच कलापथकाच्या दौ-यावर असताना ठाणे जिल्ह्यात चहाच्या टपरीवर ‘लोकसत्ता’ वाचताना अशोक परांजपे यांचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं आणि जणू त्यांना आशेचा नवा किरण दिसू लागला.

धर्माबाद नगरपालिकेच्या ११ सफाई कामगारांची फरफट

भाकरेंनी अशोकजींची भेट घेण्यासाठी औरंगाबाद गाठले. अशोकजींनी विचारपूस करत ‘तुला लोककलेबद्दल काही येतंय का?’ असं विचारताच भाकरेंनी त्यांना भारूड म्हणून दाखवलं. त्यांना ते आवडलं व पुढे भाकरे त्यांच्याच कुटुंबाचा भाग असल्याप्रमाणे दर शनिवार, रविवार घरी जाऊ लागले. अशोकजींनीसुद्धा भारूड कलेबद्दल त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. पुढे अशोकजींना सोंगी भारुडाचे शूटिंग करायचे होते. अशोकजींनी इंडियन नॅशनल थिएटरच्या तंत्रज्ञांच्या सोबतीने भाकरेंना घेऊन सोंगी भारुडाचे शूटिंग केले. त्यांना आणि आय.एन.टी.च्या कर्मचा-यांना ते फारच आवडले. इथूनच निरंजन भाकरेंच्या भारूड प्रवासाला ख-या अर्थाने सुरुवात झाली.

भाकरेंची भारुडं महाराष्ट्रभर गाजू लागली. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळवली. पुढे त्यांनी १९९६ ते २००० मध्ये व्यसनमुक्ती पहाट अभियानात सतत चार वर्षे प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. अशीच यशाची उंच शिखरे गाठत असताना पुन्हा अशोकजींनी भाकरेंचे सोंगी भारूड मुंबईकरांना दाखवायचे ठरविले. त्या अनुषंगाने अशोकजी निरंजन भाकरेंच्या भारुडाची जाहिरातसुद्धा वर्तमानपत्रातून स्वत: प्रसिद्ध करत होते.

या प्रयोगानंतर निरंजन भाकरेंचे आयुष्यच बदलून गेले. त्यातच पुढे दया पवार प्रतिष्ठान संकल्पनेतून तसेच डॉ. प्रकाश खांडगे यांच्या लेखणीतून लोकोत्सव हा कार्यक्रम ठाणे येथे संपन्न होणार होता. त्या कार्यक्रमातदेखील भारूड सादर करण्याची संधी भाकरेंना चालून आली. भाकरेंनी सादर केलेला बुरगुंडा अशोक हांडेंना खूप आवडला. पुढे त्यांनी ‘मराठी बाणा’ या आपल्या कार्यक्रमात भाकरेंना बुरगुंडा सादर करण्याची संधी दिली आणि भारूडकार निरंजन भाकरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले. भारूडकार म्हणून प्रकाशझोतात असतानाच त्यांना २००७ चा राज्य सांस्कृतिक लोककला पुरस्कार त्यांच्या पत्नीसह जाहीर झाला.

‘मराठी बाणा’मुळे महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश इतकेच काय तर अमेरिकेतील शिकागो इथल्या रसिकांनादेखील त्यांच्या बुरगुंडा भारुडाची जादू अनुभवायला मिळाली. परंतु या दरम्यान, वडीलभावाने भाकरेंना घर आणि गावापासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. संपत्तीचे वाटप व्हावे म्हणून तगादा लावला. अमेरिकेच्या दौ-यावर असताना सोबतीला असलेले कलावंत त्यांच्यापासून तोडले. पण त्याही परिस्थितीत शिवसिंग राजपूत या सोंगाड्या सहका-याने भाकरेंना मदतीचा हात दिला. हिमतीने भाकरेंनी पुन्हा पार्टी बांधली. पुन्हा एकदा एकनाथी भारूड गाजू लागले. त्याचेच फळ म्हणून सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, धिना धिन धा, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, दम दमा दमा, मराठी पाऊल पडते पुढे, अखिल भारतीय नाट्य संमेलने, साहित्य संमेलने, लोककला संमेलने, संत गाथा अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमांतून त्यांनी आपले लोककलेचे सादरीकरण केले.

आपल्या प्रतिभेच्या जोरावर निरंजन भाकरे परव्युतर पदवी घेणा-या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत येऊन विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रशिक्षण देत होते. पौराणिक दृष्टांत देत आज २१व्या शतकातील समकालीन नमुन्यांची त्यास जोड देत होते. रहिमाबादसारख्या दुर्गम भागातून आलेल्या भाकरेंचे सामाजिक भानही तितकेच प्रखर होते. लोककलांचे जतन, संवर्धन व्हावे म्हणून धडपड करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. पण सपत्निक देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत होते. कला आणि माणुसकीप्रती अविचल निष्ठा जपणारा हा कलावंत ख-या अर्थाने भारूड लोककला परंपरेचे वैभव होता.

डॉ. गणेश चंदनशिवे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या