29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeविशेषमान्सून अंदाजांची सुवार्ता

मान्सून अंदाजांची सुवार्ता

कोरोना विषाणूच्या महासंसर्गाच्या दुस-या लाटेने सबंध देश भयभीत आणि अस्वस्थ झालेला असतानाच यंदा मान्सून समाधानकारक बरसणार असल्याची सुवार्ता आली आहे. यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणा-या संस्थेने वर्तवला आहे. कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनचा जबरदस्त फटका बसलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला गतवर्षी कृषी क्षेत्राने मोलाचा हात दिला होता. यंदाही कोरोनाच्या दुस-या लाटेने उद्योग-व्यवसायांच्या अर्थचक्राला तडाखे बसत असताना आलेला मान्सूनचा अंदाज अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक आहे.

एकमत ऑनलाईन

सेवाक्षेत्राचा जीडीपीतील हिस्सा कितीही वाढलेला असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आजही कृषी क्षेत्रच आहे. आजही देशातील ६० टक्के लोकसंख्या शेतीवरच आधारित आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्थैर्य आणि तिच्या विकासासाठी अजूनही शेती क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा लॉकडाऊनमुळे सबंध देशातील उद्योगव्यवस्था ठप्प राहिल्यामुळे जीडीपी उणे २३ अंकांपर्यंत घसरला, तेव्हा अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राची संजीवनी लाभली. भारतीय शेती ही मान्सूनवर आधारलेली आहे. त्यामुळेच दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये वर्तवण्यात येणा-या मान्सूनच्या अंदाजांकडे कृषी क्षेत्राबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. मान्सून सरासरीएवढा असेल तर देशात भरघोस पीक आणि संपन्नता येण्याच्या शक्यताही वाढतात. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला तर भेगाळलेली जमीन आणि दुष्काळसदृश परिस्थितीची क्रूर छाया देशाच्या काही भागांवर पसरल्याचे दिसून येते.

पर्जन्यमापक यंत्रांनी केलेल्या गणनेनुसार, सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर त्याला कमकुवत मान्सून म्हटले जाते. ९० ते ९६ टक्क्यांदरम्यान झालेला पाऊस कमकुवत ते सामान्य यादरम्यानच्या गटात मोडतो. जर पाऊस ९६ ते १०४ टक्क्यांदरम्यान असेल तर तो सामान्य मानला जातो. १०४ ते ११० टक्क्यांपर्यंत झालेला पाऊस सामान्य ते चांगला पाऊस मानला जातो. ११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी मानली जाते. देशात भारतीय हवामान खात्याबरोबरच स्कायमेट ही खासगी संस्थाही दरवर्षी मान्सूनचा अंदाज वर्तवत असते. नुकतेच या संस्थेने मान्सूनच्या दीर्घकालीन अनुमानाविषयी माहिती दिली असून चालू वर्षी भारतात सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता संस्थेने वर्तवली आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये देशाच्या उत्तर भागात काही ठिकाणी, तसेच ईशान्येकडे काही भागांत कमी पावसाची शक्यता आहे. कोकणात सरासरीहून पाऊस कमी असू शकेल.

कर्नाटकाच्या अंतर्भागांमध्येही जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडू शकेल, असे स्कायमेटकडून सांगण्यात आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबरमध्ये देशातून माघार घेत असताना संपूर्ण देशात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वर्षी मान्सून काळामध्ये ला निना स्थिती तटस्थ असेल आणि मान्सूनदरम्यान एल निनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. आपल्याकडे दोन प्रकारचे मान्सून असतात. एक म्हणजे नैऋत्य मोसमी आणि दुसरा असतो तो ईशान्य मोसमी. ईशान्य मोसमी मान्सूनला परतीचा पाऊस म्हटले जाते. मान्सूनचा अंदाज सरासरीच्या १०० टक्के असा वर्तवण्यात आला असला तरी पावसाचे वितरण कशा प्रकारे होते हे पाहणे महत्त्वाचे ठरते. दोन पावसांमध्ये दीर्घकालीन खंड पडला तर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच मान्सूनचे आगमन लांबले तरीही दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे केवळ सरासरीचा आकडा हा पिकांसाठी उपयुक्त ठरणारा आहे असे मानता येणार नाही. मान्सूनचे वर्णन करण्यासाठी लहरी हा शब्द वापरला जातो. त्यामुळे मान्सून कशा प्रकारे बरसतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. मान्सूनचे वितरण योग्य पद्धतीने झाले तर देशाचा आर्थिक विकास दर वाढण्यास मदत होते.

मोहोळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर

गेल्या दोन वर्षांपासून मान्सून समाधानकारक बरसताना दिसत आहे. परंतु दुष्काळाचा फेरा आल्यानंतर धावाधाव आणि आरडाओरड करणारे आपण या मान्सूनचा लाभ घेण्यामध्ये आजही पुरेशी जागरूकता दाखवताना दिसत नाही, हे वास्तव आहे. गेल्या १०० वर्षांचा इतिहास पाहिल्यास साधारणत: दर चार-पाच वर्षांनी दुष्काळाची आपत्ती येते. ती आल्यानंतर जागे होण्यापेक्षा चांगले पर्जन्यमान असण्याच्या काळात जलसंचयाची, जलसंवर्धनाची धडाकेबाज मोहीम राबवणे गरजेचे आहे. डोंगराच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत पडणा-या पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांवर पाणी लिफ्टने अथवा उपसा सिंचनपद्धतीने नेले जात नव्हते. किल्ल्यावरच पाणी साठवले जात होते. तशाच प्रकारे आता शासनाने त्या-त्या ठिकाणचे पाणी त्या-त्या ठिकाणी साठवता-जिरवता-मुरवता येईल यासाठीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर चांगल्या पावसाची सुवार्ता हा मुहूर्त साधून अतिशय मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवगडीचा कार्यक्रम हाती घेतला जाणे आवश्यक आहे.

आज कोरोनाच्या काळात लॉकडाऊनसारखे उपाय योजले जात आहेत. कठोर निर्बंध आणले जात आहेत; गर्दी टाळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. परंतु लोकांना घरांमध्ये बंदिस्त करून ठेवतानाच यातील श्रमशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीसाठी करता येईल का, याचा विचार करायला हवा. शेतीतील कामे असोत किंवा वृक्षलागवड असो याठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन सहज करता येऊ शकते. त्यामुळे वृक्षलागवडीच्या मोहिमेतून कोरोना संसर्ग वाढण्याच्या शक्यता फारशा राहात नाहीत. या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊनमुळे रिक्त झालेल्या हातांना हे पर्यावरण संवर्धनासाठीचे मोलाचे काम देऊन त्यांना त्याबदल्यात आर्थिक मोबदलाही देऊ केल्यास त्यातून वेगळ्या प्रकारचा सकारात्मक बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही.
दुसरीकडे, चांगल्या मान्सून अंदाजांच्या पार्श्वभूमीवर खरिपासाठीच्या उपाययोजनांनाही गती दिली पाहिजे. यामध्ये बी-बियाणांची उपलब्धता महत्त्वाची आहे. गतवर्षी बोगस बियाणांमुळे मान्सून चांगला असूनही अनेक शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. याची पुनरावृत्ती यंदा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

महाराष्ट्रात नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमध्ये कृषी क्षेत्राशी निगडित सेवांना सवलत देण्यात आली आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. कारण शेतीतील कामांसाठी हा काळ महत्त्वाचा असतो. उद्योग उत्पादनव्यवस्थेत आजचे उत्पादन उद्या-परवा घेता येऊ शकते; परंतु शेतीबाबत तसे होत नाही. मान्सूनच्या पूर्वीची कामे ही त्याकाळातच करावी लागतात. शेतकरी ती करतच असतात. पण त्याचवेळी शासन यंत्रणेची जबाबदारीही योग्य प्रकारे पार पाडली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी बी-बियाणे, खतपुरवठा, कर्जपुरवठा, पीकविमा आदी गोष्टींबाबतच्या कामांमध्ये खंड पडणार नाही किंवा कोरोनामुळे अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यायला हवी.

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शहरीकरण आणि औद्योगीकरणापासून मुक्ती मिळण्याचे उपाय ग्रामीण अर्थव्यवस्थेत शोधायला हवेत, असा संदेशही या महामारीने दिला आहे. एकाएकी लॉकडाऊन जारी झाल्यानंतर महानगरांमधून गावी जाण्यासाठी झुंबड आपण पाहात आहोत. त्याची पुनरावृत्ती होता कामा नये आणि यासाठी कृषी क्षेत्र आणि पिकांवरील संस्करणासह सा भूत उत्पादनांवर संशोधन व्हायला हवे. नवे पर्याय शोधायला हवेत. युवाशक्ती गावांमध्ये केंद्रित राहिल्यास आणि शेतीसह पूरक व्यवसायांमध्ये व्यस्त राहिल्यास छोट्या कृषिपूरक उद्योगांची साखळीच तयार होऊ शकेल. देशातील युवकांना अशा प्रकारे स्वावलंबी बनविण्यात यश मिळाले तर देशाला कोरोनासारख्या आपत्तींशी लढा देणे भविष्यात खूपच सोपे जाईल. जलवायू परिवर्तनाच्या सध्याच्या काळात कोरोनासारख्या आपत्ती कोणत्याही क्षणी दत्त म्हणून समोर उभ्या ठाकू शकतात, याची जाणीव यापुढे आपल्याला ठेवावीच लागणार आहे आणि त्यानुसार शेतीआधारित व्यवसायवृद्धीचे नियोजन करावे लागणार आहे.

प्रा. रंगनाथ कोकणे
पर्यावरण अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या