आपल्या भारत देशामध्ये हजारो वर्षापासून वर्णव्यवस्था होती. यामध्ये ब्रम्ह, क्षत्रिय, वैश्य, शुद्र हे होते. त्यामुळे या वर्णव्यवस्थेने देशातील प्रत्येक व्यक्तिला कोणत्या ना कोणत्या वर्णामध्ये बंंदिस्त केले होते. परंतु डॉ. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातुन ही वर्णव्यवस्था संपुष्टात आणून समता, स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण केली. म्हणून प्रत्येक भारतीयाला जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपले जीवन जगता येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ तर आईचे नाव भिमाबाई हे होते. डॉ. बाबासाहेबांचा जन्म झाला तेंव्हा त्यांचे वडील भारतीय सैन्यामध्ये सुभेदार होते आणि त्यांची नेमणूक इंदोर येथे होती १९०४ साली त्यांचे वडील रामजी सपकाळ निवृत्त झाले.
आणि संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील साता-याला स्थलांतरित झाले. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे हे आहे. महार जातीतील असल्यामुळे डॉ. बाबासाहेबांना अंबावडे या गावी सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव सहन करावा लागला. शाळेमध्ये सुद्धा त्यांना जातीच्या कारणावरून भेदभावाला सामोरे जावे लागे. त्यांना शाळेतील सार्वजनिक नळाचे पाणी पिण्याची परवानगी नव्हती शाळेचा चपराशी त्यांना वरून हातावर पाणी टाकून पिण्यास देत असे. जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाणी पिण्यास देखील मिळत नव्हते.
डॉ.बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले. त्यानंतर मुंबईमध्ये एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी दहावीची परीक्षा पास केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. कुशाग्र बुद्धी असल्यामुळे प्रत्येक परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होत असत. १९१२ साली मुंबई विद्यापीठातून डॉ. बाबासाहेबांनी बी.ए.ची पदवी प्राप्त केली.
बाबासाहेब आंबेडकर बडोदा सरकारच्या शिष्यवृत्ती वर न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठांमध्ये उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी १९१३ साली अमेरिकेत गेले. यादरम्यान त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती त्यांच्या पत्नी रमाबाई मुंबईमध्ये मोलमजुुरी करून आपल्या मुलांचा सांभाळ करीत असत. परंतु डॉ. बाबासाहेबांना कधीही त्यांनी आपल्या गरिबीची जाणीव होवू दिली नाही. १९१५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मंजुर केलेल्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानवी विज्ञान, अर्थशास्त्र, या विषयांमध्ये एम. ए. ची पदवी प्राप्त केली. सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती संपल्यानंतर डॉ. बाबासाहेबांना भारतात यावे लागले.
भारतात परत येत असताना त्यांनी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एमएससी आणि डी. एस्सी. तसेच कायद्याची पदवी घेण्यासाठी बार ऍट लॉसाठी त्यांनी नोंदणी केली करुन भारतात परत आले. भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रथम नियमानुसार बडोदा येथील राजांच्या संस्थानात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची जबाबदारी स्वीकारली. राज्याचे रक्षा सचिव या पदावर देखील त्यांनी काम केले. परंतु वडोदा संस्थानमध्ये त्यांना जातीयतेचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांनी तेथील नोकरी सोडून ते मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. या दरम्यान त्यांनी आपल्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमविले आणि पुढील शिक्षणासाठी ते भारताबाहेर इंग्लंडला गेले. १९२१ साली त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या महाविद्यालयामधून मास्टर डिग्री प्राप्त केली. लगेच दोन वर्षानंतर डीएससीची पदवी प्राप्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बॉन, जर्मनी विश्वविद्यालयात देखील अध्ययन केले. १९२७ झाली त्यांनी अर्थशास्त्रातून डीएससी केले. कायद्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ब्रिटिश बार कॉन्सिलमध्ये बॅरिस्टर म्हणून काम केले. ८ जून १९२७ साली त्यांना कोलंबीया विद्यापीठामधून डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. तसेच या पदव्यांंचा उपयोग आपल्या देशातील मागासवर्गीय, उपेक्षित, वंचित घटकांच्या हितासाठी केला.
देशातील सामाजिक विषमता संपुष्टात आणण्यासाठी तसेच मागासवर्गीय जाती-जमातींचे वास्तव जगणे सरकार दरबारी मांडण्यासाठी १९२० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक वृत्तपत्राची सुरूवात केली. त्यानंतर बहिष्कृत भारत, जनता, प्रबुध्द भारत ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी देशातील उपेक्षित समाजाला न्याय देण्याचे कार्य केले. देशातील समाजव्यवस्थेने प्रत्येक माणसाला माणुस म्हणून वागवावे त्याला समानतेची वागणूक द्यावी म्हणून हजारो अस्पृश्य बांधवांसोबत त्यांनी २ मार्च १९३० रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह, २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यावे त्यांना समतेची वागणूक येथील व्यवस्थेने द्यावी म्हणून सत्याग्रह केला. तसेच १३ नोव्हेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना अमरावती येथील अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला.
आपल्या मागासवर्गीय समाजबांधवांना सत्तेमध्ये सहभागी होता यावे म्हणून त्यांनी १९३६ स्वतंत्र मजूर संघाची स्थापना केली. या पार्टीने १९३७च्या केंद्रीय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये १५ जागा जिंकल्या नंतर यात स्वतंत्र मजुर पक्षाला अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ अर्थात ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन असे नाव दिले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना व्हाईसरॉय इन्स्टिट्यूटिव्ह कौन्सिलमध्ये मजूर मंत्री व रक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री झाले. देशातील महिलांच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी १९५१ मध्ये हिंदू कोड बिल तयार केले. ते हिंदू कोड बिल भारतीय संसदेमध्ये मंजूर न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. शिक्षण हेच मनुष्याच्या विकासाचे एकमेव साधन आहे. या देशातील उपेक्षित समाजाने शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून डॉ. बााबासाहेबांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन या संस्थेच्यावतीने १९४६ मध्ये मुंबईमध्ये सिध्दार्थ महाविद्यालय, १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिध्दार्थ वाणिज्य व अर्थशास्र महाविद्यालय, १९५६ मध्ये सिध्दार्थ विधी महाविद्यालय स्थापन केले.
डॉ. बाबासाहेबांचे प्रगाढ ज्ञान, विद्वत्ता, आणि देशाच्या विकासाबद्दलची निष्ठा पाहून २९ ऑगस्ट १९४७ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रीमंडळाने निवड केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे ११ महिने १७ दिवस अथक परिश्रम घेऊन देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधीत ठेवणारे सर्व भारतीयांना विकासाकडे नेणारे, आज घडीला ४४८कलमे आणि १२ परिशिष्टे असणारे भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण करून तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपुर्द केले. या संविधानाची २६ जानेवारी १९५० पासून अंमलबजावणी होवून आजपर्यंत हजारो जाती जमाती असलेला, २८ राज्ये आणि ८ केंद्रशासीत प्रदेश असलेला १३५ कोटी लोकसंख्येचा विविधतेत एकता असलेला भारतदेश एकसंघ ठेवला आहे.
हे भारतीय संविधानाची आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची देशाला अमूल्य अशी देण आहे. जमिनीचे राष्ट्रीयकरण करुन सर्व समाजघटकांना त्यात राज्यांनी सामावून घ्यावे, विमा, बँकिंग सार्वजनिक प्राथमिक व्यवसाय, या उपक्रमांना राज्यांच्या अखत्यारीत आणून सर्वांना रोजगाराच्या संधी मिळवून द्याव्यात असे डॉ. बाबासाहेबांचे मत होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोग, नियोजन आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरुषांकरिता समानता, राज्य पुनर्गठन, मोठ्या आकारांच्या राज्यांना लहान आकारात संघटित बनविणे, राज्याचे निती निर्देश तत्त्व, मूलभूत अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, निर्वाचन आयुक्त आणि राजनीतिक संरचना मजबूत करणारी सशक्त सामाजिक, आर्थिक शैक्षणिक व विदेशी धोरणं तयार करुन आयुष्यभर डॉ. बाबासाहेबांनी देशहिताला प्राधान्य दिले आहे. देशामध्ये बौध्द धम्माचा देशभर प्रचार, प्रसार व्हावा तसेच बौध्दांचे संघटन मजबूत व्हावे म्हणून ४ मे १९५५ रोजी भारतीय बौध्द महासभेची स्थापना डॉ. बाबासाहेबांनी केली. तसेच राष्ट्रीय पातळीवर सर्व मागासवर्गीय, बहुजन समाजाचा राजकिय पक्ष असावा म्हणून डॉ. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राष्ट्रीय पक्षाची घटना तयार केली होती. परंतु तो पक्ष त्यांच्या हयातीत उदयास येवू शकला नाही. म्हणून त्यांच्या अनुयायांनी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्याची स्थापना केली. परंतु आज या पक्षाची अनेक शकले उडाली आहेत.
देशातील सामाजिक विषमता संपुष्टात येत नाही म्हणून डॉ. बाबासाहेबांनी १९३५ साली मी हिंदू धर्मात जरी जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी येवले येथे घोषणा केली. त्यानंतर देशातील सर्व प्रमुख धर्मांचा १९५६ पर्यंत चिकित्सक अभ्यास करून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या ५ लाख अनुयायांसोबत बौध्द धम्माची दिक्षा घेतली. देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय निर्माण होवून देशातील सर्व समाजघटकांचा सर्वांगीण विकास व्हावा अशी आपल्या विद्वत्तेने देशाची उभारणी करणारे कायदेपंडित, परमज्ञानी, महान देशभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी नवी दिल्ली येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या त्यागाला, विचारांना, कार्याला कोटी कोटी प्रणाम.
-भैय्यासाहेब तुकाराम गोडबोले
रा. जवळा ता. लोहा जि. नांदेड
मो.९०११६३३८७