34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषनायिका बनताहेत दिग्दर्शिका

नायिका बनताहेत दिग्दर्शिका

एकमत ऑनलाईन

दिग्दर्शक हा चित्रपटाचा कर्णधार असतो. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला दिशा देण्याचे काम दिग्दर्शक करत असतो. बहुतांश कलाकारांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाची धुरा देखील वाहिली. यात राज कपूर, गुरू दत्त, मनोज कुमार, फिरोज खान, आमिर खान, अजय देवगण, रजत कपूर, अनुपम खेर यासारख्या मंडळींचा समावेश आहे. यात आता नायिका देखील मागे राहिलेल्या नाहीत. त्यांनीही दिग्दर्शनाचे काम समर्थपणे हाताळले आहे. २०२१ च्या प्रारंभी ‘बरेली की बर्फी’, ‘दम लगा के हईशा’ यासारख्या चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री सीमा पाहवा या ‘रामप्रसाद की तेरहवी’च्या दिग्दर्शिका आहेत. त्याचवेळी रेणुका शहाणे यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ‘त्रिभंग’ सारखा चित्रपट साकारला. सीमा पाहवा यांनी आपण योगायोगाने दिग्दर्शन क्षेत्रात आल्याचे म्हटले आहे.

अनेक जाणकारांच्या मते, महिलांचा दृष्टिकोन हा पुरुषांपेक्षा वेगळा असतो. अलीकडेच प्रदर्शित झालेला सीमा पाहवाचा ‘रामप्रसाद की तेरहवी’चे उदाहरण देत त्या म्हणतात की, माझ्या दृष्टीने हा चित्रपट अप्रतिम आहे. पात्र, प्रॉडक्शन डिझाईन, आर्ट, वेशभूषा, भाषा या सर्व गोष्टी अगदी परिणामकारकरीत्या सादर करण्यात आल्या आहेत. हा चित्रपट सर्वोत्तम आहे. सोमेया यांच्या मते, जेव्हा एखादी महिला चित्रपटाचे दिग्दर्शन करते तेव्हा आपल्याला नवीन दृष्टिकोन पाहावयास मिळतो. याबाबत दिग्दर्शक अरुणा राजे यांच्या ‘रिहाई’चा उल्लेख करता येईल. यात स्थलांतरित कामगारांची गोष्ट सांगितली आहे. ‘हम लोग’ सारख्या संस्मरणीय मालिकेचा भाग राहिलेल्या सीमा पाहवा म्हणतात की, गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत बदल झाले आहेत. आतापर्यंत हाताळले न गेलेले विषय हाताळले जात आहेत. त्या म्हणतात, अलीकडच्या काळात महिला दिग्दर्शकांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्या कथानकात नवीन दृष्टिकोन पाहावयास मिळतो.

दिग्दर्शन क्षेत्रात आपण अगोदर का आलो नाही, याची खंत सीमा पाहवा यांना वाटते. आता त्यांच्याकडे अनेक कथानक असून त्यासाठी त्या निर्मात्यांच्या शोधात आहेत. दिल्ली क्राईमच्या माध्यमातून जगभरात पोचलेल्या शेफाली शाह यांनी लॉकडाऊनच्या काळात दोन लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. शेफाली शाहचा एक चित्रपट ‘सम डे’ हा लॉकडाऊनच्या काळात एकटेपणाच्या भावनेतून राहणा-या महिलेचे व्यक्तिचित्र साकारले आहे. हा चित्रपट फेस्टिव्हलसाठी पाठवण्यात येत आहे. दुसरे कथानक ‘हॅप्पी बर्थ डे मम्मीजी’ असून तो दररोजच्या कामकाजात अडकलेल्या महिलांवरील विनोदीपट आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता दासने चित्रपट ‘फिराक’मध्ये गुजरात दंगलग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. २०१८ मध्ये त्यांनी मंटो यांच्या जीवनाला चित्रपट कथानकाचे रूप दिले आणि सर्वत्र कौतुक झाले. दक्षिणेतील अभिनेत्री रेवतीने १९८०-१९९० च्या दशकात अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. तिने २००२ मध्ये दिग्दर्शनाचा मार्ग निवडला. ‘मित्र’, ‘माय फ्रेंड’ यासारखे चित्रपट तयार करून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. २००४ मध्ये रेवतीने एचआयव्हीबाधित लोकांवर संवेदनशील ‘फिर मिलेंगे’ चित्रपट तयार केला. अलीकडच्या काळात काही नायिकांनी दिग्दर्शनाची कास धरली. त्यात कोंकणा सेन, सेन शर्मा, टिस्का चोप्रा, श्रेया पिळगावकर आदींचा उल्लेख करता येईल.

नायिकांनी दिग्दर्शक व्हावे, ही नवीन बाब नाही. आपल्याकडे नेहमीच महिलांनी दिग्दर्शनात पुढाकार घेतला आहे. १९७९ च्या दशकात अभिनेत्री अपर्णा सेनने ‘३६ चौरंगी लेन’चे कथानक लिहिले तेव्हा त्या सत्यजित रे यांच्याकडे गेल्या. कारण त्यांना दिग्दर्शनाचा अनुभव नव्हता. परंतु सत्यजित रे म्हणाले, की या कथानकात त्याच्या भावना गुंतलेल्या असल्याने तूच दिग्दर्शन करायला हवे. तेव्हा शशी कपूर यांनी निर्माता म्हणून पुढाकार घेतला. १९४३ मध्ये ‘रामराज्य’मध्ये सीतेची भूमिका साकारणा-या शोभना समर्थ यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यात ‘हमारी बेटी’, ‘छबीली’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपट ‘कोहिनूर’, ‘कालाबाजार’, ‘हम दोनो’ यासारख्या १९५० च्या दशकातील चित्रपटात काम करणा-या लीला चिटणीस यांनी १९५५ मध्ये ‘आज की बात’चे दिग्दर्शन केले आणि निर्मितीही. प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेखने ‘कोरा कागज’चे दिग्दर्शन केले. हेमा मालिनी, साधना, दीपा साही, नीना गुप्ता आणि अन्य नायिकांनी देखील चित्रपट आणि मालिकांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली.

आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने पुरुष दिग्दर्शकांचाच दबदबा राहिला आहे. परंतु आता महिलांनी देखील स्थान मिळवले आहे. महिला किंवा पुरुष जर संवेदनशील असतील तर ते संवेदनशील कथानक तयार करू शकतात. उदा. अनुभव सिन्हा यांनी तापसी पन्नू यांच्यासमवेत ‘थप्पड’ हा चित्रपट तयार केला. तो खूपच संवेदनशील होता.

गेल्या दशकात अनेक महिलाप्रधान चित्रपटांची निर्मिती झाली आणि त्याचे कौतुकही झाले. यात ‘क्वीन’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘नो वन किल जेसिका’, ‘नीरजा’, ‘तुम्हारी सुलू’, ‘पिंक’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि ‘मेरी कोम’ आदी. कथानकातील लैंगिक समानतेबाबत रेणुका शहाणे म्हणते की, महिला आता केवळ कॅमे-यासमोर नाही तर कॅमे-याच्या मागेही काम करत आहेत. महिला जर पुरुषप्रधान चित्रपटात असतील तर त्यांचे स्थान काय असेल. आता खूप महिला एडिटर्स आहेत, सिनेमेटोग्राफर्स आहेत, सहायक आहेत. आता हळूहळू बदल होत आहेत. माझ्या कथानकात मी सशक्त पात्र रेखाटले आहेत. सीमा पाहवाच्या मते, पुरुष खूपच व्यावहारिक असतात आणि महिला भावनिक. दोघांचा विचार करण्याची पद्धत वेगळीच असते. त्यांनी अनेक पुरुष दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केले आहे. एखाद्या पात्रांबाबत भावनात्मक मत जेव्हा मांडले जायचे तेव्हा दिग्दर्शक मान्य करतीलच असे नव्हते. त्याची गरज नसल्याचे सांगून मत फेटाळले जायचे. महिला मात्र लहानसहान गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतात. याकडे पुरुषांचे दुर्लक्ष होते आणि परिणामी त्या गोष्टी उपेक्षित राहतात. मात्र ज्या चित्रपटांचे दिग्दर्शन महिला करतात, तेथे या लहानसहान गोष्टींची झलक पाहावयास मिळते.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठच दिवसाचे, आठ मार्चला अर्थसंकल्प

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या