27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषशेवटची लढाई

शेवटची लढाई

एकमत ऑनलाईन

लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप दोन वर्षांचा कालावधी असला तरी सत्ताधारी भाजपची घोडदौड रोखण्यासाठी आणि सत्तेच्या जोरावर सुरू असलेल्या मनमानीला लगाम घालण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न मात्र जोरदार सुरू आहेत. अलीकडेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचणे हीच आपली शेवटची लढाई आहे, असे मत व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयातून पश्चिम बंगालवरील आपली पकड मजबूत असल्याचे दीदींनी दाखवून दिले असले तरी राष्ट्रीय राजकारणात आजही त्यांना सर्वमान्यता नाही ही बाब लक्षात घ्यावी लागेल.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या नेहमीच आक्रमक वक्तव्यांबाबत चर्चेत येत असतात. अलीकडेच त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवरून नवीन मत मांडले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्तेवरून भाजपला खेचणे हीच आपली शेवटची लढाई आहे, असे त्या म्हणाल्या. एका सभेत ममता म्हणाल्या की, २०२४ मध्ये कोणत्याही स्थितीत भाजपला हरवायचे आहे. केंद्रातून भाजपला हद्दपार करण्यासाठी दिल्लीतील माझी ही शेवटची लढाई असेल. या वक्तव्याचा धागा पकडत भाजपकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली. २०२४ च्या निवडणुकीनंतर राजकारण सोडणार का? हे ममता यांनी स्पष्ट करायला हवे, अशी मागणी केली. अर्थात सभेत ममता यांनी राजकीय निवृत्तीबाबत कोणतेही विधान केले नाही.

कोलकाता येथील एका सभेत बोलताना ममता म्हणाल्या की, २०२४ च्या निवडणुकीत भाजपला हरविण्याचे ध्येय निश्चित केले आहे. भाजपला कोणथ्याही स्थितीत सत्तेवरून खाली खेचू. सध्याच्या काळात पश्चिम बंगाल वाचवण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्याला धमकावले जात असेल तर त्यास उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ममता यांनी आपल्या भाषणात काँग्रेसशक्तीची आठवण करून दिली. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या. परंतु १९८९ च्या निवडणुकीत राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या लढाईत पराभवाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यासही पराभवाचे तोंड पहावे लागले होते. ममता म्हणाल्या की, आज भाजपकडे ब-यापैकी शक्ती आहे. त्यांच्याकडे ३०० पेक्षा अधिक खासदार आहेत, परंतु त्यांची पकड आता ढिली होत चालली आहे. बिहार भाजपच्या हातातून निसटले आहे. येत्या काही काळात अन्य राज्ये देखील भाजपच्या हातातून जातीत, असे भाकितही दीदींनी वर्तवले आहे.

बिगर भाजप नेत्यांना भ्रष्टाचारी असल्याचे भाजप नेत्याकडून चित्र निर्माण केले जात असल्याचे ममता बॅनर्जी यांंचे म्हणणे आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैशाच्या बळावर विरोधी पक्षाचे सरकार पाडण्याचे कारस्थान रचले जात असल्याचाही आरोप ममता यांनी केला. त्या म्हणतात की, भाजप स्वत:ला पवित्र आणि दुस-याला चोर असल्याचे म्हणतो. फिरहाद हकीम आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासह तृणमूलच्या दुस-या नेत्यांविरुद्ध मोहीम राबविली जात असल्याचे त्या म्हणाल्या. विरोधकांचे सरकार पाडण्यासाठी हजारो कोटी रुपये कोठून मिळत आहेत, हे भाजपने जाहीर करावे, असा सवालही केला. माझ्याविरुद्ध भाजपने गुन्हा दाखल केल्याचे समजले आहे. मला अटक करा आणि मग पाहा, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. गुजरातमधील बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार करणा-या लोकांना सोडून दिल्याबद्दलही ममता यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सोडून देण्याच्या कृतीवरून भाजप आणि त्यांच्या नेत्यांची मानसिकता लक्षात येते, असेही ममतांनी नमूद केले.

ममता बॅनर्जी यांनी २०२४ साली शेवटची लढाई असल्याचे जाहीर केल्याने भाजपने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारण सोडणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ममता यांनी शेवटची लढाई असल्याचे म्हटले आहे, परंतु राजकारण सोडण्याबाबत स्पष्ट केलेले नाही. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर २०२४ मध्ये देखील भाजप हॅट्ट्रिक करेल, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. अशा वेळी ममता यांनी भाषणात मांडलेल्या मुद्याचे स्पष्टीकरण द्यायला हवे, अशीही मागणी होत आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी नितीशकुमार यांच्या इच्छेवर ममता बॅनर्जी पाणी फेरू शकतात. तृणमूल काँग्रेस २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा विचार करू शकते आणि निवडणुकीनंतर विरोधकांशी संख्येनुसार आघाडीचा विचार करू शकते.

मध्यंतरी पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये ममता दीदींच्या मंत्रिमंडळातील पार्थ चटर्जी यांना ईडीने अटक केली. या घोटाळ्याची चर्चा राष्ट्रीय प्रसार माध्यमांतून काहीशी मागे पडली असली तरी या प्रकरणामुळे ममतांच्या सरकारविषयीची नाराजी पसरली. किंबहुना या प्रकरणामुळे आधीपासूनच भाजपावर आगपाखड करणा-या ममता अधिक उद्विग्न झाल्या. कदाचित म्हणूनच आता त्या आरपारच्या लढाईची भाषा करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सर्वशक्ती पणाला लावूनही विधानसभा निवडणुकीत तुटपुंजे यश मिळाले. यावरून ममतांची या राज्यावरची पकड किती मजबूत आहे हे संपूर्ण देशाला कळून चुकले; परंतु राष्ट्रीय राजकारणात आजही त्यांच्या चेह-याला सर्वमान्यता नाही ही बाब तितकीच खरी आहे. यासाठी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेणे, गोव्यासारख्या राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये सहभागी होणे अशा प्रकारचे प्रयत्न ममतादीदी करत असल्या तरी त्यांची परिणामकारकता अद्यापही दिसून आलेली नाही.

-सरोजिनी घोष

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या