22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेष‘फॉक्सकॉन’चा धडा

‘फॉक्सकॉन’चा धडा

एकमत ऑनलाईन

वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातेत उभारण्यात येणार असल्याची घोषणा ही महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीच्या प्रवासातील एक नकारात्मक घडामोड म्हणावी लागेल. या उद्योगामुळे मोठी रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच अर्थकारणालाही मोठी उभारी मिळाली असती; परंतु राजकीय साठमारीत गुजरातने बाजी मारली आणि महाराष्ट्राची उपेक्षा झाली. कोणताही उद्योजक उद्योगउभारणी करताना निर्मितीखर्च आणि उत्पादनखर्च किमान कसा राहील याचा विचार प्राधान्याने करतो. त्याला पूरक धोरणे राज्य सरकारांनी राबवायला हवीत, हाच या प्रकरणाचा धडा आहे.

महाराष्ट्राच्या औद्योगिक विश्वासाठी आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने एक अत्यंत नकारात्मक घटना म्हणून फॉक्सकॉन-वेदांताकडून गुजरातला दिलेल्या पसंतीकडे पाहायला हवे. जगभरातील वाहननिर्मिती क्षेत्रासह अन्य क्षेत्रे गेल्या काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा सामना करताहेत. या तुटवड्यामुळे वाहनांची निर्मिती प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे अलीकडील काळात वाहनांच्या पुरवठ्यावरही प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसले आहे. अशा स्थितीत सेमीकंडक्टर निर्मिती करणारा तब्बल पावणेदोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचा फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात उभा राहणे हा एक प्रकारे राज्याच्या औद्योगिक विश्वाचा शिरोमणी ठरला असता.

या महत्त्वाकांक्षी उद्योगामुळे महाराष्ट्रात रोजगारही उपलब्ध होणार होता. मात्र हा प्रकल्प आता गुजरातला नेण्यात आला असल्याने शिंदे-फडणवीस सरकार टीकेचे धनी ठरत आहेत. विरोधकांच्या मते, वेदांता व फॉक्सकॉनने महाराष्ट्रात आपला प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर केले होते. वेदांताच्या अनिल अग्रवाल यांच्याशी याबाबत उद्धव ठाकरे सरकारमधील उद्योगमंत्री आणि आदित्य ठाकरे यांंची चर्चाही झाली होती आणि त्या चर्चेदरम्यान अग्रवाल यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे स्पष्ट केले होते, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. तसेच संबंधित कंपनीने पुण्याजवळील तळेगाव येथे प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले होते. त्यावर केवळ सह्या होणे बाकी होते. काही महिन्यांपूर्वी वेदांता समूहाने महाराष्ट्रासह चार राज्यांकडे आपल्या उद्योगासाठी कोणकोणत्या सवलती दिल्या जाणार याची विचारणा केली होती. यामध्ये गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांचा समावेश होता. परंतु यामध्ये गुजरातने अधिक सवलतींचे माप पदरात टाकले असल्यामुळे वेदांता समूहाने हा निर्णय घेतला असल्याचे दिसते आहे.

गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रगतीबाबत नेहमीच स्पर्धा राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा कल हा नेहमीच महाराष्ट्रापेक्षा गुजरातकडे अधिक राहिला आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक राष्ट्र असूनही अनेक प्रकल्पांना महाराष्ट्राऐवजी गुजरातला प्राधान्य दिले जाते ही बाब लपून राहिलेली नाही. मागे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे अवगुण दाखवून गुजरातची केलेली स्तुती ही भाजपचा महाराष्ट्राविषयीचा दृष्टिकोन आधोरेखित करणारी होती. गुजरात ते महाराष्ट्र या दोन राज्यादरम्यान प्रस्तावित असलेल्या बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्राला होण्याऐवजी गुजरातलाच अधिक होणार आहे. किंबहुना गुजरातच्या फायद्यासाठीच ही बुलेट टेÑन आणण्याचा मोदी यांचा डाव असल्याने महाराष्ट्रातून अनेक स्तरांतून या प्रकल्पावर टीका करण्यात आली होती. या उदाहरणावरून मोदी सरकार महाराष्ट्राकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून गुजरातला झुकते माप देत असल्याची टीका होत आली आहे. फॉक्सकॉनमुळे याला पुष्टी मिळाली आहे.

याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे संयुक्त महाविकास आघाडी सरकार जवळपास अडीच वर्षे सत्तेवर होते. केंद्रात भाजपचे सरकार आणि महाराष्ट्रात बिगरभाजपचे सरकार असल्यामुळे त्या काळात केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय झाला असता तर तो स्वाभाविक मानला गेला असता. पण सध्या महाराष्ट्रात भाजपचेच सरकार असूनही तोच कित्ता गिरवला जात असेल तर त्याचे समर्थन कसे करता येईल? राज्या-राज्यांमध्ये विकासात्मक स्पर्धा असायला हवी आणि प्रत्येक राज्याने आपापल्या क्षमतेनुसार, कल्पकतेच्या जोरावर उद्योगधंद्यांना आकर्षित केले पाहिजे, ही बाब खरी असली तरी तो आदर्शवाद झाला; प्रत्यक्ष पडद्यामागे घडणा-या घडामोडींमध्ये सत्तेचा दबाव हाही एक घटक कारणीभूत ठरत असतो. फॉक्सकॉनच्या प्रकरणामध्येही हा घटक कारणीभूत ठरला नसेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.

अर्थात, आता कारणांची मीमांसा करणे म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ असे होईल. फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प जवळपास पावणेदोन लाख कोटी रुपयांचा आहे. या उद्योगासोबत १६० लहान उद्योगदेखील सहभागी होणार होते. त्यामुळे महाराष्ट्रात ७० हजार ते १ लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार होती. असा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जाण्याची हानी मोठी आहे. पूर्वीच्या काळी कोणत्याही मोठ्या उद्योगासाठी पहिला पर्याय महाराष्ट्र असे. आर्थिक राजधानी म्हणून नावाजलेल्या मुंबईसारख्या जगद्विख्यात औद्योगिक शहरात अनेकांनी किंबहुना परदेशातील गुंतवणूकदारांनी पहिली पसंती दिलेली दिसून येते. मात्र मोदी सरकार केंद्रात आल्यापासून जवळपास आठ वर्षे महाराष्ट्रात कोणकोणते मोठे उद्योग उभे राहिले किंवा कोणकोणत्या परदेशी गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात प्रकल्प उभे केले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. विशेष म्हणजे या आठ वर्षांतील पाच वर्षे भाजपचेच सरकार महाराष्ट्रात होते. त्यावेळीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात उद्योगधंद्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असायचे; परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या वेळीही मुंबईतील अनेक उद्योगकेंद्रे अहमदाबादला गेली.

तेव्हा त्यांनी कधीही केंद्रातील या उणिवांवर बोट ठेवले नाही. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या प्रकल्पाबाबत बोलताना पंतप्रधानांनी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगताहेत. तसा प्रकल्प आल्यास त्याचे स्वागतच आहे; परंतु त्यामुळे हातातून निसटलेल्या प्रकल्पामुळे होणारे नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे केंद्रीय सत्तेवर अवलंबून न राहता महाराष्ट्राने आपल्या औद्योगिक विकासासाठी, आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि देशातीलच नव्हे तर जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘फॉक्सकॉन’प्रकरणाकडे खडबडून जाग आणणारी घटना म्हणून पाहायला हवे. आगामी काळात येऊ घातलेले क्युबिक, एअर बस हे प्रकल्प तरी महाराष्ट्रात येणार का, यावरही ‘फॉक्सकॉन’च्या घटनेमुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचा विकासगाडा पुढे नेण्यासाठी, राज्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी आणि राज्यातील बेरोजगार हातांना काम देण्यासाठी औद्योगिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. विरोधकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढून आणि महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करून जनतेचे तात्पुरते सांत्वन केले जाईल. परंतु या राजकीय साठमारीपलीकडे जाऊन विकासासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत तर जनतेच्या नाराजीचे धनी होण्यावाचून पर्याय राहणार नाही.

-विनायक सरदेसाई

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या