22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeविशेषगौरवाचा ‘अमृत’क्षण...

गौरवाचा ‘अमृत’क्षण…

एकमत ऑनलाईन

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या क्रीडा इतिहासातील अविस्मरणीय क्षणांचा उल्लेख केल्यास १९४८ मध्ये लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक, १९८३ मध्ये क्रिकेट विश्वचषक, २०११ मध्ये क्रिकेट विश्वचषक, १९७५ मध्ये हॉकी विश्वचषक, २०२१ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे सुवर्णपदक यासारख्या देदीप्यमान यशाचा समावेश करता येईल. थॉमस कप पुरुष गटातील जेतेपद हे याच श्रेणीत मोडते. भारतीय बॅडमिंटनच नाही तर क्रीडा क्षेत्रासाठी थॉमस कप जिंकणे ही बाब ऐतिहासिक क्षण ठरणारी आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या क्रीडा इतिहासातील अविस्मरणीय क्षणांचा उल्लेख केल्यास १९४८ मध्ये लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक, १९८३ मध्ये क्रिकेट विश्वचषक, २०११ मध्ये क्रिकेट विश्वचषक, १९७५ मध्ये हॉकी विश्वचषक, २०२१ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे सुवर्णपदक यासारख्या देदीप्यमान यशाचा समावेश करता येईल. थॉमस कप पुरुष गटातील जेतेपद हे याच श्रेणीत मोडते. भारतीय बॅडमिंटनच नाही तर क्रीडा क्षेत्रासाठी थॉमस कप जिंकणे ही बाब ऐतिहासिक क्षण ठरणारी आहे. यामागची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे आतापर्यंतचे यश पाहिल्यास त्यात सहभागी होणा-या देशांची संख्या कमीच दिसून येते. परंतु बॅडमिंटनचा खेळ जगातील १५० देश खेळतात. यात उच्च स्थानावरच्या ५० खेळाडूंचा समावेश असतो आणि त्यांचा दर्जा एकसारखाच आहे. एखादा दुसरा मागेपुढे होत असतो. अशावेळी भारताने थॉमस कपवर नाव कोरणे संस्मरणीय म्हणावे लागेल. वैयक्तिक खेळात भारतीय खेळाडूंनी नाव कमावले आहे. परंतु सांघिक खेळाचा विचार करता थॉमसमधील यश अलौकिक आहे. दुसरे म्हणजे या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ हा डेन्मार्क, इंडोनेशिया, मलेशियाला पराभूत करत थॉमस कप जिंकेल असे म्हटले असते तर खिल्ली उडविली असती. याचाच अर्थ हा कप जिंकण्याचा दावा बलाढ्य संघ देखील सहजपणे करू शकत नाहीत. अर्थात ही विजयाची माळ अचानक भारताच्या गळ्यात पडलेली नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बॅडमिंटनमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. आज आपण लक्ष्य सेन किंवा श्रीकांतसारख्या खेळाडूंची चर्चा करत असाल आणि ते योग्यही आहे, परंतु थॉमस कपपर्यंत पोचण्यासाठी अनेकांचे मोलाचे योगदान राहिले आहे. प्रकाश पदुकोणच्या काळातच त्याची पायाभरणी झाली होती आणि त्यास पुलेला गोपीचंदने पुढे नेले. तेव्हा त्याने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर पी. व्ही. सिंधू, सायना नेहवालने नवीन अध्याय जोडला. पडद्यामागे असणारे आरिफ साहबसारख्या लोकांनी बॅडमिंटनला पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली. या मंडळींमुळे दीड वर्षात या खेळासाठी पोषक वातावरण तयार झाले. थॉमस कपच्या यशाने आता भारत हा बॅडमिंटन क्षेत्रात दमदार संघ म्हणून नावारूपास आला आहे. आपण खेळाचा इतिहास पाहिला तर साधारणपणे नावाजलेले खेळाडू हे विश्वसनीय प्रशिक्षक होत नाहीत. परंतु गोपीचंद यांनी अगोदर खेळाडू आणि नंतर प्रशिक्षक म्हणून कमाल केली आहे. त्याची तुलना भारतीय क्रीडा क्षेत्रातील एकाच व्यक्तीशी करता येऊ शकते आणि ती म्हणजे राहुल द्रविडशी. या दोघांनी प्रशिक्षक म्हणूनही छाप पाडली.

गोपीचंद अकॅडमीत खेळाडूंवर अ, ब, क, ड म्हणजेच सुरुवातीपासूनच प्रशिक्षण दिले जाते. गोपीचंद यांच्या प्रशिक्षणात ते स्वत:ची प्रतिमा कधीही येऊ देत नाहीत. देशात मोठ्या खेळाडूंच्या नावावर अनेक अकॅडमी सुरू आहेत. परंतु तेथे ते वर्षातून एक-दोनदा जातात, उर्वरित काळात स्थानिक प्रशिक्षकाकडून धडे दिले जातात. गोपीचंद यास अपवाद आहेत. ते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सकाळपासून ते संस्था बंद होईपर्यंत तेथेच थांबतात. यामुळे खेळाडूंच्या मनात आत्मीयता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विश्वास निर्माण झाला आहे. जेव्हा सायना नेहवाल मैदानात उतरली तेव्हा ही त्यांच्या प्रतिभेची कमाल असल्याचे बोलले गेले. अर्थात प्रतिभा, कर्तृत्व ही महत्त्वाची बाब आहे. परंतु चांगले प्रशिक्षण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. सिंधूने बॅडमिंटन कोर्टवर पाऊल टाकले तेव्हा लोकांनी तिचा गोपीचंदच्या अकॅडमीतील आणखी एक दर्जेदार खेळाडू असा उल्लेख केला. विमल कुमार आणि प्रकाश पदुकोण यांनी देखील चांगले योगदान दिले आहे. गोपीचंद यांनी ज्या भावनेतून काम केले आहे, त्याचे चांगले परिणाम आपल्यास पाहावयास मिळत आहेत. अर्थात ही गोष्ट अन्य खेळाला देखील लागू पडते. या विजयाने भारतीय बॅडमिंटनमध्ये मोठा इतिहास घडला आहे. आतापर्यंत असे घडायचे की, कोणत्याही खेळातून एकाचे नाव पुढे यायचे आणि त्याच्याच नावाने खेळ पुढे जायचे. परंतु बॅडमिंटनमध्ये अनेक नायक-नायिका पुढे आल्या आहेत. थॉमस कपचा विजय हा संघाचा विजय आहे आणि जगातील सर्वांत नामांकित स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा असून त्यात भारताने देदीप्यमान यश मिळवले आहे. भविष्यात आपल्याला खूप काम करायचे आहे. कारण या खेळाच्या क्रमवारीत आघाडीच्या देशांत अजूनही आपला देश सामील नाही.

आगामी चार-पाच वर्षांपर्यंत आपल्याला विजयी परंपरा कायम ठेवावी लागेल. त्यामुळे देशभरात असलेल्या प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करावे लागेल. सर्व खेळाडू हैदराबाद किंवा बंगळुरूमध्ये तर प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे गोपीचंद अकॅडमीच्या आधारावर अन्य ठिकाणी देखील प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. यात राज्य सरकार तसेच खासगी संस्थांना सक्रिय व्हावे लागेल. बॅडमिंटन हा एक कौशल्याचा खेळ आहे आणि आपल्याकडे गुणवत्तेला कमतरता नाही. शारीरिक क्षमता आणि फिटनेसमध्येदेखील आपले खेळाडू अन्य खेळाडूंच्या तुलनेत कमी नाहीत. आता आपले खेळाडू शेवटच्या सेटपर्यंत मुकाबला करून विजयाचा ढोल वाजवत आहेत. एकंदरीत थॉमस कपच्या विजयाने आत्मविश्वास वाढला आहे आणि आशाही.

-नितीन कुलकर्णी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या