24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home विशेष राजकारणातील ध्रुवतारा काळाच्या पडद्याआड

राजकारणातील ध्रुवतारा काळाच्या पडद्याआड

एकमत ऑनलाईन

प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील मिराती (मिराटी) या लहान गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. प्रणव मुखर्जी यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी (के. के. मुखर्जी) आणि आई सौ. राजलक्ष्मी मुखर्जी यांच्या पोटी जन्मलेले पुत्ररत्न म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होय. ग्रामीण बंगालमधील बीरभूममध्ये वाढलेल्या प्रणव मुखर्जी यांना ‘पोल्टू’ व ‘प्रणवदा’ अशा दोन टोपण नावांनी ओळखले जात असे. प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचे नाव सुरवा (शुभ्रा) मुखर्जी तर त्यांना अभिजित व इंद्रजित अशी दोन मुले आणि एक मुलगी शर्मिष्ठा अशी तीन अपत्ये आहेत.

प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजित मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून काम पाहिले. ते आजही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (आयएनसी) सदस्य आहेत. त्यांची मुलगी शर्मिष्ठा एक उत्कृष्ट नर्तकी आहेत. प्रणव मुखर्जी यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी हे याच प्रदेशातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी होते आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावत १० वर्षांहून अधिक काळ देशासाठी तुरुंगवास भोगला. प्रणव मुखर्जी यांचे वडील १९२० पासून इंडियन नॅशनल काँग्रेस (अखिल भारतीय काँग्रेस) चे सक्रिय कार्यकर्ते होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते १९५२ ते १९६४ या काळात पश्चिम बंगाल विधानपरिषदेचे सदस्य होते आणि पश्चिम बंगाल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते.

केवळ वडिलांचा वरदहस्त असल्याने व घरात असणा-या राजकीय वातावरणामुळे प्रणव मुखर्जींनी राजकारणात प्रवेश केला.
कौटुंबिक वातावरण पाहता प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळणे स्वाभाविक होते. वडील के. के. मुखर्जी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी राजकारणात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. प्रणव मुखर्जी यांनी कलकत्ता विद्यापीठातून तत्कालीन ‘सुरी विद्यासागर महाविद्यालयातून’ पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कलकत्ता विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर (एम.ए.) पूर्ण केले. कोलकाता विद्यापीठातूनच कायद्याचे (छं६) शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी सुरू केली.

कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात प्रणव मुखर्जी यांनी शिक्षक आणि वकील म्हणून बराच काळ काम केले. प्रणव मुखर्जी यांनी कोलकाता येथील डेप्युटी अकाऊंटंट जनरल कार्यालयात लिपिक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू ठेवली. त्यांनी सुप्रसिद्ध ‘बांगला प्रकाशन संस्थेच्या’ देश-डाक मातृभूमीच्या कॉलसाठी काम केले. त्यानंतर ते ‘बंगीय साहित्य परिषदेचे’ विश्वस्त झाले. वॉल्व्हर हॅम्प्टन विद्यापीठाने प्रणव मुखर्जी यांना डी.लिट पदवी प्रदान केली.

प्रणव मुखर्जी हे एक गंभीर व शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व असलेले नेते होते. बंगाली कुटुंबातील असल्याने त्यांना ‘रवींद्र संगीत’मध्ये प्रचंड रस होता. पश्चिम बंगालमधील इतर रहिवाशांप्रमाणेच प्रणव मुखर्जी यांनासुद्धा आई दुर्गादेवीचे उपासक मानले जाई आणि ते दुर्गापूजनाच्या वेळी आई दुर्गादेवीची उपासना करत असत. प्रणवदांचे आवडते खाद्य म्हणजे फिश करी. मंगळवार वगळता ते जवळजवळ दररोज फिश करी खात असत. ते दररोज सकाळी लवकर उठायचे. देवाची पूजा-अर्चा करूनच ते आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करायचे. दिवसातून दुपारी एक तास झोप घ्यायचे. रात्री झोपायच्या आधी ते एखाद्या पुस्तकाचे वाचन करायचे.

त्यांचे राजकारणात आगमन नैसर्गिक आणि स्वाभाविक होते. प्रणव मुखर्जी यांचे राजकीय जीवन १९६९ पासून सुरू झाले, जेव्हा ते राज्यसभेवरून निवडून आल्यानंतर पहिल्यांदा संसदेत आले. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या या गुणवत्तेवर प्रभावित होऊन सन १९६९मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभेचे सदस्य केले. त्यानंतर १९७५, १९८१, १९९३ आणि १९९९ मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले.

त्यानंतर ३ वर्षांच्या आतच प्रणव मुखर्जी यांनी केंद्र सरकारच्या औद्योगिक विकास मंत्रालयात १९७३ मध्ये उपमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. प्रणव मुखर्जी १९७४ मध्ये केंद्र सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री झाले. १९८२ते १९८४ पर्यंत प्रणव मुखर्जी अनेक मंत्रिमंडळात निवडून गेले. त्यानंतर १९८४ मध्ये ते प्रथमच भारताचे अर्थमंत्री झाले. प्रणव मुखर्जी यांनी १९८२-८३ या वर्षाचे पहिले बजेट सभागृहात मांडले. ते ७ वेळा कॅबिनेट मंत्री होते. ज्यात २ वेळा वाणिज्यमंत्री, २ वेळा परराष्ट्रमंत्री आणि एकदा संरक्षणमंत्री अशा मंत्रिमंडळांच्या महत्त्वपूर्ण पदांचा समावेश होतो. १९८२-८३ मध्ये जेव्हा ते भारताचे अर्थमंत्री होते, तेव्हा ‘युरोमनी’ मासिकात जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला गेला.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी यांचा राजीव गांधी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. दरम्यान, १९८६ मध्ये प्रणव मुखर्जी यांनी स्वतंत्र ‘राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस’ (नॅशनल काँग्रेस सोशालिस्ट पार्टी) ची स्थापना केली. पण १९८९ मध्ये राजीव गांधींशी हातमिळवणी करून त्यांच्यातील वाद मिटल्यानंतर प्रणव मुखर्जींनी त्यांचा ‘राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस’ पक्ष ‘राष्ट्रीय काँग्रेसमध्ये’ विलीन केला. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा प्रणव मुखर्जी यांना पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीत आणण्यात महत्त्वाचा वाटा होता. प्रणव मुखर्जी हे १९७८ मध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च कार्यकारी समिती (ू६ू) चे सदस्य झाले. १९८५ पर्यंत प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगाल काँग्रेस समितीचे अध्यक्षही होते.

२००४ मध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर ते पुन्हा ज्येष्ठ सदस्य म्हणून मंत्रिमंडळात गेले. २००४ मध्ये जेव्हा काँग्रेसने आघाडी सरकारचे नेते म्हणून सरकार स्थापन केले, तेव्हा काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग केवळ राज्यसभेचे खासदार होते. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांना लोकसभेचे सभागृह नेते केले गेले. मुखर्जी यांची अतूट निष्ठा आणि क्षमता यामुळे ते सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या खूपच जवळ आले. यामुळे जेव्हा २००४ मध्ये पक्ष सत्तेत आला, तेव्हा त्यांना संरक्षणमंत्रिपद देण्यात आले. २४ ऑक्टोबर २००६ रोजी त्यांची नियुक्ती भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून झाली. त्यावेळी त्यांच्याकडील संरक्षणमंत्रिपद ए. के. अँटोनी यांच्याकडे दिले. ए. के. अँटोनी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दक्षिणी केरळ राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेले होते. २४ जानेवारी २००९ पासून यूपीए सरकारमध्ये अर्थमंत्रिपद सांभाळण्याची जबाबदारी प्रणव मुखर्जी यांच्याकडे देण्यात आली.

प्रणव मुखर्जी यांना मिळालेला राष्ट्रपतिपदाचा कार्यकाल १२ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७ पर्यंत होता. ते भारताचे पहिले बंगाली राष्ट्रपती होते. त्यांनी आपल्या आयुष्याची ४० वर्षे भारतीय राजकारणाला दिली. प्रणव मुखर्जी यांनी भारताच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने त्यांची कामे कधीच विसरता येणार नाहीत. त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देण्यात आला.

प्रणव मुखर्जी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार :
४१९८४ : जगातील पहिल्या पाच अर्थमंत्र्यांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश. ४१९९७ : संसदेतील सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून पुरस्काराने सन्मानित ४२००८ : पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित ४२०१९ : भारतरत्न पुरस्काराने सन्मानित

प्रणव मुखर्जी यांच्याशी संबंधित वाद :
४प्रणव मुखर्जी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्याच वेळी, चुकीचे वैयक्तिक निर्णय घेण्यासारखे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता, परंतु इंदिरा गांधी सत्तेत येताच हे प्रकरण फेटाळून लावण्यात आले.

परराष्ट्रमंत्री म्हणून बांगलादेशी वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना नजरकैदेत ठेवण्याच्या प्रणव मुखर्जींच्या निर्णयावर जवळपास सर्व मुस्लिम समुदायांनी आक्षेप घेत प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला. परिणामी तस्लिमा नसरीनला २००८ मध्ये भारत सोडून जावे लागले होते. प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील आर्मीच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. प्रणव मुखर्जी यांच्यावर १० ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या कारणाने त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातच ते कोरोना पॉझिटिव्ह देखील आढळले होते.

८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. पण नियतीला ते मान्य नव्हते. दि. ३१-०८-२०२० (सोमवार) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रूपाने व्यासंगी, विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेले व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले. ते काँग्रेस पक्षाचे संकटमोचकच होते.

प्रा. युवराज भानुदासराव बालगीर
नणंद, जि. लातूर मोबा.: ९७३०६ ००९१२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या