22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेषधार्मिक धु्रवीकरणातून अस्तित्वाचा ‘राज’मार्ग?

धार्मिक धु्रवीकरणातून अस्तित्वाचा ‘राज’मार्ग?

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्राने सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यासाठी काही वेळा मोठी किंमतही चुकवावी लागली आहे. सहिष्णुता व बंधुभावाचे बंध अतूट ठेवण्यासाठी असंख्य लोकांनी प्राणाचे बलिदान दिले आहे. आज महाराष्ट्राचा औद्योगिक, शैक्षणिक आणि अन्य क्षेत्रात जो विकास आणि प्रगती झाली त्याचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकार व पोलिस यंत्रणांनी राखलेली कायदा व सुव्यवस्था. येथील अनेक विकास योजना देश व अन्य राज्यांसाठी पथदर्शी म्हणून स्वीकारल्या आहेत. असे असले तरी शांतताप्रिय महाराष्ट्रातील धार्मिक सौहार्द व सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्न काही सत्तांध शक्तींनी यापूर्वी केले होते व आजही करीत आहेत.
महाराष्ट्राचे नवनिर्माण घडवून आणण्यासाठी धर्मनिरपेक्षता व लोककल्याणकारी राज्यकारभार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय जय करीत शिवसेनेला फारकत दिलेले राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठा मेळावा घेतला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाची नवीन राजकीय संघटना जन्मास घातली.

राज ठाकरेंची तडाखेबंद भाषणे व त्यांच्यातील महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची धमक, ऊर्मी तसेच मराठी बाणा या बाबींना मोहित होऊन काही पक्षांतील अनेक अतृप्त आत्मे राजच्या वळचणीला विसाव्यासाठी दाखल झाले. मराठीवाद, प्रादेशिकवाद, कर्मठ हिंदुत्व आणि परप्रांतीयांना विरोध याच्या रसायनातून राज ठाकरे यांनी ‘मनसे’चा अजेंडा तयार केला. त्याला विविध जाती-जमाती व धर्मांतील लोक विशेषत: बेरोजगार तरुण भुलले. आज मात्र या भुललेल्या लोकांचा व तरुणांचा भ्रमनिरास झाला आहे. राज ठाकरे यांनी गेल्या २ एप्रिल रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर मेळावा घेतला. हिंदू धर्मियांच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा तो दिवस होता. या दिवशी त्यांनी गुढी उभारली ती धार्मिक तेढीची. या प्रसंगी त्यांनी धार्मिक आणि सामाजिक तणाव वाढविणारी घोषणा केली. महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे हटवा, नाहीतर ज्या मशिदींवर भोंगे वाजतील त्या मशिदींसमोर आम्ही भोंगे वाजवू आणि हनुमान चालिसाचे पठण करू असा इशारा मशिदीचे व्यवस्थापन तसेच महाराष्ट्र सरकारला दिला. धर्म स्थापन झाला तेव्हा भोंगे होते का? असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा प्रश्न हा आहे की, कोणताही धर्म स्थापन झाला तेव्हा आताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान होते काय? आज सर्वच धर्मांच्या प्रार्थनास्थळी भोंगे, मोबाईल फोन, मोटारगाड्यांचा वापर होतो.

धर्मगुरू व धर्मप्रसारक या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. मग त्याचा तसा वापर करण्यास मज्जाव करणे किंवा तेव्हा कुठे असे तंत्रज्ञान होते असा पोरकट प्रश्न केला तर तो हास्यास्पद ठरणार नाही तर काय? गेल्या १२ एप्रिल रोजी ठाणे येथे राज ठाकरे यांची उत्तर सभा झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार व पोलिस यंत्रणेला ‘अल्टिमेटम’ देऊन टाकला. येत्या ३ मे पर्यंत (रमजान ईद) मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर जेथे भोंगे वाजतील तेथे हनुमान चालिसा वाजवली जाईल असा इशारा दिला. मशिदीवरील भोंगे अनधिकृत असतील, मोठ्या आवाजाचे असतील तर ते बंद केले पाहिजेत. ती जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. ती त्यांनी पार पाडावी परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करीत मशिदींवर भोंगे वाजत असतील तर न्यायालयाला आव्हान देणारे राज ठाकरे न्यायालयापेक्षा मोठे आहेत काय? असा प्रश्न शांतताप्रेमींना पडल्याशिवाय रहात नाही. भारतीय समाज आजही मोठ्या प्रमाणात धर्मग्रस्त व जातीग्रस्त आहे. धर्म-जाती वर्चस्ववादाची व्याधी समाजाला जडली आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार, सामाजिक विषमतेविरुद्ध समाज म्हणावा तसा रस्त्यावर उतरत नाही परंतु धर्म व जातीच्या रक्षणासाठी समाज संघटितपणे रस्त्यावर उतरतो, हिंसाचार करतो, दंगली घडवतो व प्रसंगी माणसांचे खून पाडण्यासही तो मागेपुढे पाहत नाही हे आजचे वास्तव आहे.

ही सामाजिक मानसिकता हेरूनच काही धर्म-जातवर्चस्वादी चतुर प्रकृती धर्मा-धर्मात व जाती-जातीत श्रेष्ठत्वासाठी कलह निर्माण करीत आहेत. द्वेषाचे जहर उपद्रवखोरांच्या टाळक्यात पेरून सत्तेचे तजेलदार पीक हस्तगत करीत आहेत. या प्रवृत्तीचा संसर्ग प्रबोधनकार ठाकरे यांच्या एका नातवाला जडावा ही बाब महाराष्ट्रासाठी चिंतनीय आहे. भारतीय राजकारणात मागील चार दशकांत प्रामुख्याने धर्म व जातीच्या आधारावर राजकारण करीत सत्ता व खुर्ची मिळविण्याचा मोह भल्याभल्यांना अनावर झालेला आहे. कर्मठ लोकांना धर्माचे इंजेक्शन द्यायचे, त्यांचा मेंदू बधिर करायचा, धर्मा-धर्मात भेद निर्माण करायचा व त्यांची मते मिळवून सत्तेचा मलिदा लाटायचा असे राष्ट्रद्रोही तंत्र विकसित केले गेले आहे. भारतात हिंदू ७४ टक्के आहेत, मुस्लिम १५ टक्के आहेत तर इतर ११ टक्क्यांत इतर धर्मीय आहेत. हे लक्षात घेऊन धार्मिक बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक, हिंदू विरुद्ध मुस्लिम, मंदिर विरुद्ध मशीद असा वाद निर्माण करून सत्तेचे गुलगुले मिटक्या मारीत खाणा-या चतुरांची एक नवी जमात आपल्या देशात पैदा झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये ओबीसी, मराठा, दलित, मुस्लिम, भटक्या-विमुक्त जातीतील कार्यकर्ते व समर्थक सुमारे ९० टक्के आहेत. नेतृत्व मात्र राज ठाकरे करणार. मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर त्याच मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करण्यास बहुजनातील तरुणांना चिथावणी देणार, पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार, प्रसंगी दखलपात्र गंभीर गुन्ह्यांची कलमे लावणार, तुरुंगात सडणार, कार्यकर्त्यांचे आयुष्य बरबाद होणार, पोलिसांच्या काळ्या यादीत जाणार, नोकरीला मुकणार तथापि नेत्यांची पोरे मात्र आलिशान वातानुकूलित खोलीत सुरक्षित राहणार. असे अनुभव आल्याने समर्थक कार्यकर्ते संघटना सोडून निघून चालले. संघटनेची राजकीय ताकद क्षीण झाली म्हणून तर २००९ मध्ये १३ आमदार आणि मुंबई महापालिकेत ३० नगरसेवक निवडून आणणा-या मनसेत आज एक आमदार व मुंबईत केवळ एक नगरसेवक आहे. ही घसरण थांबावी व २०२४ मध्ये महाराष्ट्रात होणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेला किमान २००९ सारखे यश मिळावे ही महत्त्वाकांक्षा बाळगून राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचे निमित्त करून धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे राजकीय यशासाठी हा दुही निर्माण करणारा धोपट ‘राज’मार्ग निवडला असे वाटते तरीही महाराष्ट्रातील सर्वधर्मियांनी ऐक्य अबाधित ठेवले त्याबद्दल जनतेला सॅल्यूट केला पाहिजे.

-रामराव गवळी
लातूर, मोबा. ९४२३३ ४५७९२

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या