23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeविशेषमैत्रीचे विज्ञान

मैत्रीचे विज्ञान

एकमत ऑनलाईन

जगातील सर्वांत श्रीमंत कोण, या प्रश्नाचे उत्तर ज्याच्याकडे सर्वाधिक पैसा आहे तो, असे रूढार्थाने मानले जात असले तरी मानसशास्त्रीयदृष्ट्या ज्याला सर्वाधिक मित्र आहेत तो जगातील सर्वांत श्रीमंत आणि आनंंदी होय ! यावरूनच मैत्री या संकल्पनेची गरज आणि ताकद लक्षात येते. आपल्याला मित्र का हवे असतात, या प्रश्नाचा मानसशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून आणि मेंदूविज्ञानाच्या दृष्टीने विचार करता अनेक पैलू उलगडतात. असे म्हणतात की, मित्रांमुळे आपले आयुर्मान वाढते, डिप्रेशन दूर होते. निरोगी किंवा हेल्दी राहण्यासाठी सकस अन्न, व्यायाम, चांगली जीवनशैली यांबरोबरीने मैत्रीही खूप मोठी भूमिका निभावत असते. ‘फे्रंडशिप डे’च्या निमित्ताने मैत्रीची ही शास्त्रीय बाजूही जाणून घेऊया…

यारो दोस्ती बडी ही हसीन है,
ये ना हो तो क्या फिर
बोलो ये जिंदगी है…
या गाण्याने लाखो तरुण-तरुणींना वेड लावणा-या केके या गायकाच्या स्मृती जागवत यंदाचा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्रीदिन साजरा होणार आहे. ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार मैत्रीच्या नावाने सेलिब्रेट करण्याच्या परंपरेला ६०-७० वर्षांचा इतिहास आहे. उपलब्ध माहितीनुसार हा दिवस ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा होण्यामागे तीन कहाण्या आहेत. यातील पहिल्या कहाणीनुसार, हा दिवस सुरू करण्याचे श्रेय एका व्यापा-याला जाते. १९३० मध्ये जोएस हॉल नावाच्या एका व्यापा-याने असे ठरवले की, वर्षातून एक दिवस सर्व मित्रांनी परस्परांना शुभेच्छापत्रं द्यायची आणि हा दिवस संस्मरणीय बनवायचा. यासाठी त्याने २ ऑगस्ट हा दिवस निवडला. त्यानंतर युरोप आणि आशियातील काही देशांमध्ये मैत्रीदिन साजरा केला जाऊ लागला. दुस-या कहाणीनुसार, २० जुलै १९५८ रोजी डॉ. रमन आर्टिमियोने एका डिनर पार्टीचे आयोजन करून मैत्रीदिन साजरा करण्याचे ठरवले.

पॅराग्वेमधील या घटनेनंतर जगभरात फे्रंडशिप डे साजरा करण्याकडे लक्ष वेधले गेले. तिस-या कहाणीनुसार, या दिवसाची सुरुवात १९३५ मध्ये अमेरिकेत झाली. तत्कालीन अमेरिकन सरकारने ऑगस्टच्या पहिल्या दिवशी एका व्यक्तीची हत्या केली. हे वृत्त समजल्यानंतर त्याच्या मित्राने आत्महत्या केली. त्यानंतर बराच गदारोळ झाला आणि तेव्हापासून ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फे्रंडशिप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. मैत्रीदिनाचा इतिहास काहीही असो, पण मैत्रीचं नातं हे हजारो वर्षांपासून चालत आलेलं आहे. कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीच्या उदाहरणाची उजळणी आजही घराघरांमध्ये केली जाते. राजकारणातल्या मैत्रीविषयीची असंख्य उदाहरणे भारतात आणि महाराष्ट्रात आपण पाहात आलो आहोत. त्यामुळे फे्रंडशिप डेचा इतिहास काहीही असो, त्यानिमित्ताने आपल्या जिवाभावाच्या मित्राला त्याच्याशी असणा-या मैत्रीप्रतीच्या भावना व्यक्त करण्याची संधी यामुळे मिळाली ही खूप मोठी बाब आहे.

आपल्याला मित्र का हवे असतात, या प्रश्नाचा मानसशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून विचार करता अनेक पैलू उलगडतात. असे म्हणतात की, मित्रांमुळे आपले आयुर्मान वाढते. निरोगी किंवा हेल्दी राहण्यासाठी सकस अन्न, व्यायाम, चांगली जीवनशैली यांबरोबरीने मैत्रीही खूप मोठी भूमिका निभावत असते. मित्र आपल्याला सक्रिय राहण्यास मदत करतात. जीवनाविषयीचे स्वारस्य कायम राखण्याचे काम मैत्रीमुळे होते. आयुष्यात मित्रच नसतील तर जगणे नीरस होऊन जाईल. काही अभ्यासकांच्या मते, जगातील सर्वांत जुने मानवी नाते हे मैत्रीचे आहे. कुटुंब आणि कुटुंबनिर्मितीसाठी आवश्यक असणा-या शरीरसंबंधांची गरजही मैत्री आणि मित्रांनंतर आहे. २०११ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, मानवी मेंदूतील ज्या रसायनांमुळे आपल्याला अनेक गोष्टी आवडू लागतात ते रसायन स्रवण्यामध्ये मित्रांची मोठी मदत होत असते. कदाचित म्हणूनच या भूतलावर एकही व्यक्ती असा शोधून सापडणार नाही ज्याला मित्र नसतील ! मित्र निवडण्यासाठी भलेही काही कौशल्ये वापरली जात असतील पण निरंतर टिकणारी मैत्री ही सहजभावाने होते. ती एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. ती सक्तीने होत नाही.

त्यामुळेच जगातील सर्वांत श्रीमंत कोण या प्रश्नाचे उत्तर मानसोपचारतज्ज्ञ ‘ज्याच्याकडे सर्वाधिक मित्र आहेत तो’ असे देताना दिसतात. २०१६ मध्ये काही संशोधकांना असे आढळून आले की, जेव्हा दोन मित्र आपापसांत संवाद साधतात, गप्पा मारतात किंवा एकमेकांविषयी विचार करतात, भांडतात तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये ऑक्सिटॉसिनची निर्मिती होते. मैत्री मेंदूतील एका अशा भागाला चेतना देते ज्यामुळे आपण असंख्य ताणतणाव असतानाही मित्रांसोबत अत्यंत आनंदाने राहू शकतो. डॉ. लॉरेन ब्रेंट या वैज्ञानिकाच्या मते, मैत्रीची भावना ही मानवाच्या विकासवादी परंपरेचा एक भाग आहे. कारण मानव हा समाजशील प्राणी म्हणून ओळखला जातो. उत्क्रांत होण्यापूर्वी मानव जेव्हा माकड म्हणून अस्तित्वात होता तेव्हाही तो समूहात राहात होता आणि हा समूह मित्रांचाच असायचा. त्यामुळेच आजही माणूस आपल्याला होणारा प्रत्येक आनंद हा समूहाबरोबर साजरा करण्याला प्राधान्य देतो. एकाकीपणात अथवा एकटेपणात या आनंदाचा अनुभव फारसा घेता येत नाही. तात्पर्य, मैत्रीची प्रक्रिया ही मानवी अस्तित्वात अंतर्भूतच आहे. आपण मैत्री करायला शिकत नाही, कारण आपल्या गुणसूत्रांमध्ये ती अव्यक्त संकल्पना दडलेली आहे.

असे असले तरी मानववंशशास्त्राच्या काही अभ्यासकांच्या मते, मैत्री या संकल्पनेची बीजे असुरक्षिततेत दडलेली आहेत. प्राचीन मानवी इतिहासात जवळपास एक लाख वर्षे मानव भयानक हिंस्त्र श्वापदांनी भरलेल्या जंगलात वास्तव्यास होता. साहजिकच तेव्हा जीवनाविषयीची जोखीम सदोदित असायची. प्रत्येक क्षणाला असुरक्षिततेची भावना असायची. या असुरक्षिततेतूनच मैत्रीचा जन्म झाला. आता आधुनिक अभ्यासानुसार, डिप्रेशन किंवा नैराश्य दूर करण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी मित्रांची संख्या वाढवा, असा सल्ला दिला जातो. प्रोसिडिंग्ज ऑफ रॉयल सोसायटीच्या जर्नलमध्ये काही वर्षांपूर्वी एक संशोधन अभ्यास प्रसिद्ध झाला होता. त्यासाठी डिप्रेशनची लक्षणे असणा-या २००० विद्यार्थ्यांवर संशोधन करण्यात आले होते. त्यांच्या निरीक्षणातून असे दिसून आले की, ज्या विद्यार्थ्यांच्या मित्रांची संख्या वाढत गेली त्यांच्यात डिप्रेशनची लक्षणे हळूहळू कमी होत गेली.

एनल्स ऑफ बिहेवियरल मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार मैत्रीचे वर्तुळ आपल्याला आनंदी ठेवण्यामध्ये सर्वोच्च भूमिका बजावते. ब्रिटेनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, मित्रांची साथ आपल्याला खासगी आयुष्यातच नव्हे तर कार्यालयीन कामातही आनंदी ठेवण्यास मदत करते. यासाठी केलेल्या पाहणीदरम्यान ६६ टक्के लोकांनी असे सांगितले की, मित्रांमुळे ऑफिसमध्ये काम करण्याचा उत्साह वाढतो. यातील ५७ टक्के लोकांनी असेही नमूद केले की, मित्रांच्या सहवासामुळेच आमची क्षमताही वाढते. २०२० मध्ये झालेल्या या पाहणीनुसार ७७ टक्के लोक आपल्या कार्यालयीन सहका-यांसोबत सकारात्मक मैत्रीसंबंध राखतात असे दिसून आले. ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ आणि संशोधक रॉबिन डनबार यांच्या मते, एक व्यक्ती १५० हून अधिक मित्रांशी मैत्री निभावू शकत नाही. यातील मोजकेच मित्र त्याच्या अगदी जवळचे असतात. ही संख्या किती असते यावर त्यांचे उत्तर आहे पाच. प्रत्येकाच्या आयुष्यात जास्तीत जास्त पाचच व्यक्ती अशा असतात ज्यांच्याशी ते आयुष्यातील कोणतीही गोष्ट शेअर करू शकतात. बारकाईने विचार केला तर त्यांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आढळेल ! आपल्या आयुष्यातील असे पाच जण कोण आहेत पहा आणि त्यांना त्यांच्या या स्थानाविषयीची कृतज्ञता आजच्या दिवशी नक्की व्यक्त करा !

– हेमचंद्र फडके

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या