31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeविशेष‘पठाण’च्या यशाचे रहस्य

‘पठाण’च्या यशाचे रहस्य

एकमत ऑनलाईन

प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोव-यात अडकलेला आणि चर्चेत राहिलेला शाहरूख खानचा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले. अर्थात अशा प्रकारच्या कमाईची वाट केवळ ‘पठाण’चे निर्मातेच नाही तर अख्खी बॉलिवूडनगरी पाहत होती. कारण कोरोनाच्या लाटेने बॉलिवूडचा हिशेब चौपट झाला. या पार्श्वभूमीवर ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेले यश हे केवळ शाहरूखसाठीच नाही तर संपूर्ण मायानगरीला संजीवनी देणारे ठरले आहे. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शनापर्यंत निर्माण झालेल्या अनेक वादांवर शाहरूख खानने कोणतेही मत न मांडण्याची घेतलेली खबरदारी ही त्याला यश मिळवून देणारी ठरली.

हुचर्चित ‘पठाण’ चित्रपटाने एक आठवडा होण्याच्या आतच बक्कळ कमाई केली. पहिल्या दोन दिवसांतच चित्रपटाने १२२ कोटी रुपये कमावले. हे उत्पन्न ‘केजीएफ-२’ आणि ‘बाहुबली-२’पेक्षा अधिक आहे. अर्थात उत्पन्नाची ही एक बाजू झाली. परंतु ‘पठाण’साठी शाहरूख खान आणि त्याच्या युनिटने घेतलेली मेहनत पाहता त्याचे आकलन केवळ कमाईवरून करता येणार नाही. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ६०० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले आहे. अर्थात हा विक्रम आगामी काळात मोडणे सोपे राहणार नाही. येत्या विकेंडपर्यंत पठाण हा ‘दंगल’चा विक्रम मोडू शकतो. ‘पठाण’ने ३०० कोटी कमावलेले असताना ‘दंगल’ने पहिल्या आठवड्यात ३८७ कोटी कमावले. त्यामुळे हा विक्रम कधीही मोडला जाऊ शकतो.

‘पठाण’च्या यशामागे अनेक कारणे आहेत. शाहरूख खानने प्रदर्शनापूर्वी कोणत्याही प्रकारची पत्रकार परिषद घेतली नाही किंवा माध्यमांना मुलाखती दिल्या नाहीत. वास्तविक शाहरूख खानला चित्रपटाच्या अगोदर कोणत्याही वादाला निमंत्रण द्यायचे नव्हते. यापूर्वी ‘दिलवाले’, ‘फॅन’ आणि ‘हरी मेट सेजल’च्या प्रदर्शनापूर्वी शाहरूख खानने पत्रकार परिषदा घेतल्या आणि वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. म्हणून त्याने यंदा पत्रकारांसमोर, माध्यमांसमोर जाण्याचे टाळले. एवढेच नाही तर प्रदर्शनानंतर शाहरूख हा पहिल्यांदा माध्यमांना सामोरे गेला तेव्हा त्याने केवळ आपली भूमिका मांडली. पण प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. याउलट त्याने चाहत्यांशी सोशल मीडियावरून संवाद साधला. ट्विटरवर त्याने प्रश्नांची उत्तरे दिली. या रणनीतीमुळे त्याला सोशल मीडियावर चर्चेत राहण्याची संधी मिळाली आणि मेनस्ट्रिम मीडियाने या प्रश्नोत्तराच्या बातम्या केल्या.

याशिवाय एसआरके कोलकाता चित्रपट महोत्सव ते ऑटो एक्सो आणि देशाबाहेरच्या कार्यक्रमांना हजर राहिला. तेथेही त्याने केवळ आपले म्हणणेच मांडले. दुबई येथील ‘बुर्ज खलिफा’वर चित्रपटाचे ट्रेलर झळकावले. परिणामी त्याची लोकप्रियता आणखीच वाढली. यादरम्यान ‘बेशर्म रंग’ गाण्याच्या प्रदर्शनावरून वाद झाला. अनेक संघटनांनी रस्त्यावर आंदोलन केले तसेच सोशल मीडियावरही दीपिकाच्या बोल्ड आणि बिकिनीच्या रंगावरून तीव्र विरोध नोंदविला गेला. या विरोधामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे ट्रेलर तसेच निश्चित केलेल्या वेळापत्रकात बदल करावा लागला. अशा कठीण स्थितीतही शाहरूख खानने मौन बाळगणे पसंत केले. कालांतराने हा वाद मागे पडला. अर्थात विरोधामुळे हे गाणे अधिकच हीट झाले. यूट्यूबवर हे गीत २६ कोटीपेक्षा अधिक लोकांनी पाहिले. शाहरूख खानचे गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपट पडले. दुसरीकडे टायगर, टायगर जिंदा है, वॉर, तानाजी : द अनसंग वॉरियर, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’सारख्या देशभक्तीपर चित्रपटाने बंपर यश मिळवले. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर यशाचा फॉर्म्युला सेट झाला होता. त्यामुळे ‘फॅन’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘झीरो’ यासारखे फ्लॉप चित्रपट देणा-या शाहरूख खानने यशाची हमखास खात्री देणा-या देशभक्त फॉर्म्युल्याचा आधार घेतला. याचा त्याला लाभही झाला. पडद्यावर प्रथमच गुप्तचर एजंटची भूमिका बजावणा-या शाहरूख खानला लोकांनी डोक्यावर घेतले.

त्याचवेळी ‘पठाण’ चित्रपटामुळे रोमँटिक ते अ‍ॅक्शन हीरो होण्याची त्याची मनीषाही पूर्ण झाली. भारतीय प्रेक्षकांचा बदलता ट्रेंड हा मार्वलच्या सुपरहिट एव्हेंजर्स चित्रपटांनी निदर्शनास आणून दिला. भारतीय प्रेक्षक आता सिनेमॅटिक युनिव्हर्सकडे वळत असल्याचे भारतीय निर्मात्यांना सांगितले गेले. सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये निर्माते हे प्रेक्षकांसमोर नवीन विश्व उभारतात. यात सुरुवातीला वेगवेगळी पात्रं येतात, परंतु त्यांचे कथानक एकमेकांत जोडले जाते. यातील काही पात्रं अन्य चित्रपटांतही झळकतात. परंतु ही सर्व पात्रं शेवटी एकत्र येऊन खलनायकाचा पाडाव करतात. बॉलिवूडमध्ये आदित्य चोप्राने ‘टायगर’ आणि ‘वॉर’ या चित्रपटांच्या माध्यमातून स्पाय युनिव्हर्सची सुरुवात केली. शाहरूखने ‘पठाण’च्या माध्यमातून या वेगळ्या विश्वात एन्ट्री केली आणि यशस्वी ठरली. स्पाय युनिव्हर्स चित्रपट असल्याचा ‘पठाण’ला लाभ मिळाला. म्हणूनच प्रेक्षक या चित्रपटावरून खूपच उत्सुक होते. आमिर खान, शाहरूख खान आणि सलमान खान या तिघांचे मागील काही चित्रपट पाहिले तर त्यांच्या चित्रपटाचे कथानक ब-यापैकी असले तरी ते बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतात. परंतु चित्रपटातील कथानक बेकार असेल तर प्रेक्षक त्याला नाकारतात. शाहरूखच्या ‘पठाण’चे कथानक फार खास नाही आणि टाकाऊ देखील नाही. याशिवाय मारधाडीचे दृश्य असल्याने प्रेक्षकांनी त्याला उचलून धरले. चित्रपटाचे संपादन अचूक राहिल्याने केवळ अडीच तासाच्या चित्रपटाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवले.

‘पठाण’च्या यशाने चार वर्षांनंतर शाहरूख खानचे कमबॅक जोरदार राहिले. तोच किंग खान आहे, पुन्हा एकदा सिद्ध झाले. सोशल मीडियावर ‘पठाण’ चित्रपट पाहणा-या चाहत्यांचा आनंद व्हायरल होत आहे. पडद्यावर गाणे सुरू असताना प्रेक्षकांच्या उत्साहाला आलेले उधाण पाहता शाहरूखची लोकप्रियता लक्षात येते. महाराष्ट्राचा विचार केला तर ‘सैराट’नंतर प्रथमच टॉकिजवर एवढी गर्दी प्रथमच पाहवयास मिळाली. ही गर्दी केवळ मुंबई, दिल्लीसारख्या महानगरातील मल्टिप्लेक्समध्येच नाही तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानात बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या सिंगल स्क्रीनच्या टॉकीजमध्ये देखील दिसत आहे. एकंदरीत मरणावस्थेत पोचलेल्या सिंगल स्क्रीनच्या मालकांना ‘पठाण’ने जीवनदान दिले. आणखी एक बाब म्हणजे सध्या ‘कॅन्सल कल्चर’ म्हणजेच बहिष्कार तंत्राचा ट्रेंड प्रकर्षाने दिसतो. कोणताही नवीन चित्रपट येतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जाते. ‘लाल सिंह चढ्ढा’ सारखा बिग बजेट चित्रपट फ्लॉप होण्यामागे हे प्रमुख कारण मानले जाते. या स्थितीमुळे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार देखील अशा ट्रेंडबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. हा ट्रेंड अर्थातच चित्रपटसृष्टीला धोकादायक आहे. काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या
कार्यक्रमात चित्रपटाबाबत वादग्रस्त, आक्षेपार्ह विधान करणा-या नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. असे असतानाही ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू होता. प्रदर्शनानंतरही अनेक शहरांतील टॉकीजबाहेर काही नागरिकांनी आंदोलन केले, प्रदर्शनाला अडथळे आणले. पण चित्रपटाच्या यशाने संकुचित विचारसरणी बाळगणा-या मंडळीचे मनसुबे उधळले गेले आहेत.

-सोनम परब

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या