29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home विशेष सिनेकलाकारांचे जोडधंदे

सिनेकलाकारांचे जोडधंदे

एकमत ऑनलाईन

कोविड संसर्गामुळे जगातील ९० टक्के लोकांचे अर्थकारण बदलले आहे. रोजगार गमावणा-या लोकांची संख्या लाखोत आहे. एवढेच नाही तर अनेकांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. या कारणामुळे कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे. मग सर्वसामान्य कुटुंबातील नोकरदार असो किंवा सेलिब्रिटी असो. परंतु काही सेलिब्रिटी असे आहेत की ते केवळ अभिनयावर अवलंबून नाहीत. ते पर्यायी व्यवसायातून दरमहा लाखो रुपये कमवत असल्याचे चित्र आहे. जाहिरात, वस्त्रोद्योग, निर्मिती कंपनी, रिअल इस्टेट व्यवसाय, हॉटेल साखळी, बुटीक व्यवसाय, ब्युटी पार्लर, योगा क्लब या माध्यमातून ही मंडळी उत्पन्नाचे स्रोत सुरूच ठेवतात.

अभिनेत्री करिना कपूरने तर गरोदरपणातही जाहिरातीची कामे केली आणि उत्पन्नाचा झरा कायम ठेवला. वयाच्या सत्तरीतही अभिनेते अमिताभ बच्चन हे रिअ‍ॅलिटी शो किंवा जाहिरातीत काम करताना दिसतात. यावरून सेलिब्रिटी मंडळी देखील अर्थकारणाबाबत सजग असतात, हे दिसून येते. कोरोनाच्या काळात काम नसल्याने काही कलाकार निराश झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. म्हणूनच अशा प्रकारच्या आर्थिक आणि मानसिक ताणतणावापासून वाचण्यासाठी बरीच मंडळी उत्पन्नाचा अन्य स्रोत देखील सुरू ठेवतात. त्यास बॉलिवूडचे कलाकारही अपवाद नाहीत. सध्याच्या काळात बहुतांश सर्वच कलाकार हे पर्यायी व्यवसाय करतात. यात काही जण व्यावसायिक आहेत तर काहींचे दागिन्यांचे स्टोअर्स आहेत. मग अमिताभ बच्चन असो किंवा सलमान खान असो. सुष्मिता सेन असो किंवा सुनील शेट्टी असो, ही मंडळी कलाकारांबरोबरच उद्योजक देखील आहेत. एवढेच नाही तर सेलिब्रिटीच्या कुटुंबातील व्यक्ती देखील व्यवसाय करत असल्याचे चित्र आहे. शाहरूख खानची पत्नी गौरी खान, अजय देवगणची पत्नी काजोल आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याशिवाय जुही चावला, प्रीती झिंटा यादेखील उद्योजिका आहेत.

शाहरूख खान : बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान हा पर्यायी व्यवसाय किंवा उद्योगात कमाई करणा-या सेलिब्रिटीत आघाडीवर आहे. तो आयपीएलची टीम कोलकाता नाईट रायडर्सचा शेअर होल्डर आहे. याशिवाय स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. या माध्यमातून त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सलमान खान : सलमान खानचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहेच, त्याचबरोबर ‘बिईंग ुमन’ या ब्रँडच्या माध्यमातून तो मोठे उत्पन्न घेतो. तो चित्रपटातून घसघशीत कमाई करतोच.

सुनील शेट्टी : सुनील शेट्टी हा प्रत्येक भूमिकेत फिट बसतो. तो व्यवसायातही यशस्वी ठरला आहे. अनेक रेस्टॉरंट आणि नाईट क्लबचा मालक आहे. याशिवाय स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. पॉपकॉर्न एंटरटेन्मेंट असे त्याचे नाव आहे. तसेच हकिम आलिम सलूनमध्ये देखील त्याची भागिदारी आहे.

जॉन अब्राहम : एक यशस्वी कलाकार असण्याबरोबरच भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा जॉन अब्राहम हा निर्माता देखील आहे. जेए एंटरटेन्मेंट नावाने तो चित्रपट काढतो. या बॅनरखाली ‘विकी डोनर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो हिट राहिला. तो फिटनेसबाबत दक्ष आहे, हे सर्वांनाच ठावूक आहे. तो ब्रिटिश बॉक्सिंग लिजंड डेव्हिड हाएसमवेत फिटनेस फे्रंचाईजी सुरू करत आहे. ही कंपनी केवळ बॉक्सिंग आर्टवर लक्ष केंद्रित करणार आहे.

बॉबी देओेल : बॉबी देओल हा अभिनयापेक्षा उद्योगाबाबत अधिक चर्चेत असतो. त्याचे मुंबईत रेस्टॉरंट देखील आहे.

अर्जुन रामपाल : अर्जुन रामपाल हा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो. त्याचे नाव चेजिंग गणेशा असे आहे. दिल्लीतील ‘हॉटेल सम्राट’मध्ये असलेल्या एक लॅव्हिश लाऊंज एलएपीचा मालक आहे. यावरून त्याला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले होते.

डिनो मोरिया : डिनो मोरियाने अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्र सोडून बरीच वर्षे झाली असून तो आता व्यावसायिक बनला आहे. मुंबईत क्रेपी स्टेशन नावाचे त्याचे रेस्टॉरंट कम बार आहे. हे रेस्टॉरंट युरोपियन फूडसाठी प्रसिद्ध आहे.

मिथुन चक्रवर्ती : अभिनेता मिथुन चक्रवर्ती याची बॉलिवूडमधील दुसरी इंनिग देखील शानदार राहिली. तसेच तो व्यवसायातही यशस्वी ठरला आहे. त्याने उटी येथील अनेक हॉटेल्स आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली आहे.

अजय देवगण : १९९० च्या दशकापासून बॉलिवूडनगरीवर राज्य करणारा अभिनेता अजय देवगणचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. याशिवाय व्हिजुअल इफेक्टची एक कंपनी देखील आहे. त्याचे नाव एनवाय व्हीएफक्सवाला असे आहे.

शिल्पा शेट्टी : फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टीने त्यास व्यवसायाचे रूप दिले आहे. तिचा हेल्थ अ‍ॅप असून त्याचे नाव शिल्पा शेट्टी अ‍ॅप आहे. तिने फिटनेस डीव्हीडीतूनही भरपूर कमाई केली आहे. शिल्पा शेट्टीची आयओसिस नावाची ‘सलून आणि स्पा’ची साखळी आहे.

ट्विंकल खन्ना : २००१ मध्ये चित्रपटाला रामराम ठोकणारी अक्षयकुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने लेखन कौशल्य विकसित केले आणि वाचकांवर छाप पाडली. तिने वृत्तपत्रातून अनेक लेख लिहिले आहेत. ती इंटेरिअर डिझायनर आणि कँडल बिझनेस देखील करते.

सुष्मिता सेन : सुष्मिता सेनने अलीकडेच एका वेब मालिकेच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. तंत्र एंटरटेन्मेंटची ती मालकीन आहे. दुबईत रेनी ज्वेलर्स नावाने तिचा एक ज्वेलरी रिटेल स्टोअर देखील आहे.

पेरीजाद जोराबियन : ‘जॉगर्स पार्क’ फेम पेरीजाद जोराबियन जर आपल्या लक्षात असेल तर ती एक बिझनेस वूमन आहे. तिचे मुंबईच्या वांद्रे येथे मल्टी कझिन रेस्टॉरंट गोडोंला आहे. ती आपल्या सी-फूड, सिजलर्स आणि कॉकटेल्ससाठी प्रसिद्ध आहे.

करिश्मा कपूर : अभिनेत्री करिश्मा कपूर ब-याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. सध्याच्या काळात ती इ-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून उत्पन्न मिळवत आहे.

अभिषेक बच्चन : ज्युनिअर बच्चनला बॉलिवूडमध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. मात्र त्याने बिझनेसकडे लक्ष केंद्रित केले. अभिषेक बच्चन हा प्रो-कबड्डी लीगमध्ये जयपूर पिंक पँथर्सचा मालक आहे. त्याचबरोबर इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये चेन्नईन एफसीचा सह-मालक आहे.

सोनम परब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या