22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeविशेषचित्रपटांच्या स्वावलंबनाची गोष्ट

चित्रपटांच्या स्वावलंबनाची गोष्ट

एकमत ऑनलाईन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रवासाचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. रशियाचा विचार केल्यास लेनिनने क्रांतीनंतर तेथील चित्रपट उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करून हा उद्योग एका मंत्रालयाच्या आधिपत्याखाली आणला होता. परंतु भारतीय चित्रपट उद्योगाला सरकारी पातळीवरून खूप कमी पाठबळ मिळाले. चित्रपटनिर्मितीकडे त्यावेळच्या नेतृत्वाने नगण्य लक्ष दिले. परंतु या क्षेत्रातील अनेक धुरिणांच्या प्रयत्नांमुळे चित्रपटांचा प्रवास अखंड सुरू राहिला.

आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. भारतीय चित्रपट उद्योगाने स्वावलंबनाची कास पकडून कसा आणि किती प्रवास केला, त्यात कोणते अडथळे आले, हे या निमित्ताने तपासून पाहायला हवे. भारतीय चित्रपटांच्या प्रवासाचा विचार करण्यापूर्वी चित्रपटांविषयीच्या दोन वक्तव्यांचा विचार केला पाहिजे. पहिले वक्तव्य रशियाच्या क्रांतीचा नेता लेनिन याचे असून, दुसरे महात्मा गांधींचे आहे. रशियन क्रांतीनंतर लेनिन म्हणाला होता की, आमच्यासाठी चित्रपट हा अन्य सर्व कलामाध्यमांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. चित्रपट केवळ लोकांचे मनोरंजन करतो असे नव्हे तर सामाजिक शिक्षण, संवाद प्रस्थापित करणे आणि आपल्या विशाल लोकसंख्येला एका सूत्रात बांधण्याचे कामही तो करतो. रशियन क्रांतीनंतर दोनच वर्षांत लेनिनने तेथील चित्रपट उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करून तो उद्योग एका मंत्रालयाच्या आधिपत्याखाली आणला होता.

त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धाने जोर पकडला. गांधीजी हे या आंदोलनाचे सर्वमान्य नेते होते. परंतु चित्रपटांची ताकद गांधीजी त्यावेळी ओळखू शकले नाहीत. अर्थात त्यानंतरही त्यांनी ती ओळखली नाही. १९२९ मध्ये ते बर्मामध्ये (आताचे म्यानमार) होते. तेथे त्यांना एक नाटक पाहावे लागले होते. त्यांना एका मजुरांच्या सभेसाठी जायचे आहे हे माहीत होते. ते तेथे पोहोचले तेव्हा एका नाटकाचे मंचन सुरू होते. त्यावेळी गांधीजींनी एक भाषण केले होते आणि ते त्यांच्या वाङ्मय ग्रंथात समाविष्ट आहे. त्यांनी म्हटले होते की, सार्वजनिक नाट्यगृहांमध्ये जाण्याचे अन्य काहीही परिणाम असोत; परंतु नाटकांनी अनेक युवकांचे चारित्र्य भ्रष्ट केले आहे. परिपक्व लोकांना नाटकाचा आपल्यावर परिणाम होत नाही, असे वाटत असले तरी तुमच्या मुलांचाही विचार करायला हवा. त्यांना आक्षेपार्ह नाटके दाखवून त्यांच्या निष्पाप मनावर तुम्ही दुष्परिणाम घडवून आणता. आपण चहूबाजूंना नजर टाकल्यास असे दिसेल की, सध्याच्या व्यवस्थेच्या कुप्रभावाखाली आकार घेत असलेले चित्रपट, नाटके, मद्यालये आदींच्या रूपात समाजाचे हे शत्रू चहूबाजूंना आपला घात करण्यासाठी टपले आहेत. याचाच अर्थ गांधीजी सिनेमाला समाजाचा शत्रू मानत होते. परंतु लेनिन ते एक सामाजिक शिक्षणाचे माध्यम मानत होता. सिनेमाबद्दलचे दोन नेत्यांचे हे दोन टोकाचे विचार.

स्वातंत्र्यानंंतरच्या भारतीय चित्रपटांपुढील आव्हानांचा विचार करण्यापूर्वी गांधीजींचे हे विचार लक्षात घेतले पाहिजेत. १९४७ मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा चित्रपट उद्योगातील लोकांनी एका समारंभासाठी गांधीजींना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गांधीजींच्या सचिवाने या मंडळींना असे उत्तर दिले की, चित्रपटाशी संबंधित एखाद्या कार्यक्रमाला गांधीजींना बोलावण्याचा विचारसुद्धा करू नका. कारण चित्रपटांबद्दल त्यांचे मत चांगले नाही. चक्रवर्ती राजगोपालाचारी हेदेखील चित्रपटांना पापाचा प्रसार करणारे माध्यम मानत होते, याचे अनेक पुरावे आहेत. अत्यंत हीन दर्जाच्या पाश्चिमात्त्य मूल्यांचा मारा चित्रपट भारतीय समाजावर करतात, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी परदेशी चित्रपट मोठ्या संख्येने भारतात येत होते ही गोष्ट खरीच आहे. त्या चित्रपटांचे प्रदर्शनही यशस्वीरीत्या होत असे. त्यातील अनेक चित्रपटांमधून नग्नता प्रदर्शित केली जात असे. परंतु अनेक भारतीय निर्माते त्यावेळी आपल्या पौराणिक कथा आणि संत-महात्म्यांवर आधारित चित्रपटनिर्मिती करीत होते, हेही खरे आहे. या चित्रपटांना बरेच यशही मिळाले. १९१७ मध्ये दादासाहेब फाळके यांनी ‘लंकादहन’ नावाचा चित्रपट तयार केला होता. १९१८ मध्ये श्रीनाथ पाटणकर यांनी ‘राम वनवास’ या नावाचा चित्रपट तयार केला होता. पाटणकर यांनी त्यानंतर सीता स्वयंवर, सती अंजनी आणि वैदेही जनक नावाचे चित्रपटही तयार केले होते. मूकपटांच्या काळात प्रत्येक वर्षी रामकथेवर आधारित चित्रपट तयार होत होते. यात अहिल्या उद्धार, श्रीराम जन्म, लव-कुश, राम-रावण युद्ध, सीता विवाह, सीता स्वयंवर आणि सीता हरण आदी प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे.

बोलपटांच्या काळातही रामकथेवर आधारित अनेक चित्रपट तयार झाले. भरत मिलाप, रामराज्य आणि सीता स्वयंवर असे चित्रपट तयार होऊनसुद्धा गांधीजींचे चित्रपटांविषयीचे मत बदलले नाही. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम भारताच्या चित्रपट उद्योगावर झाला. चित्रपटांविषयी सरदार पटेल आणि नेहरू यांचे विचार गांधीजींपेक्षा भिन्न होते. गांधीजी हयात असतानाच पटेल यांनी मुंबईच्या चित्रपट उद्योगाला भरपूर मदत करण्याचे आश्वासन दिले होते. अशी पार्श्वभूमी असतानासुद्धा भारतीय चित्रपट उद्योग निरंतर वाढत गेला आणि या क्षेत्रातील लोकांचा या माध्यमावरील विश्वास हेच त्यामागील कारण होते. १९४८ मध्ये ‘चंद्रलेखा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मद्रासच्या जैमिनी स्टुडिओत तो तयार झाला होता.

या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी ३० लाख रुपये खर्च आला होता. वर्षभरात सुमारे दोन कोटींचा व्यवसाय या चित्रपटाने केला. हिंदी चित्रपटांना यशाचा फॉर्म्युला याच चित्रपटाने दिला. एक नायिका आणि तिच्या प्रेमात पडलेले दोन नायक असे हे सूत्र नंतर अनेक निर्मात्यांनी स्वीकारले. अनेक वर्षे हा फॉर्म्युला चालला. १९५० च्या आसपास काही अशा घटना घडल्या, ज्यामुळे भारतीय चित्रपटांच्या स्वरूपावर बराच परिणाम झाला. १९४९ मध्ये भारत सरकारने एस. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली. चित्रपट उद्योगाच्या परिस्थितीचे आकलन करणे आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, हे या समितीचे काम होते. १९५१ मध्ये राज कपूर यांचा ‘आवारा’ चित्रपट प्रदर्शित झाला. देशविदेशात तो लोकप्रिय ठरला. त्यानंतर वर्षभरात १९५२ मध्ये चार महानगरांमध्ये चित्रपट महोत्सवाचे आयोजन झाले. यात भारतीय चित्रपटांबरोबरच परदेशी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीला जगभरातील कलात्मक चित्रपटांचा परिचय या महोत्सवामुळे झाला. जपान, रशिया, इंग्लंंडमधून चित्रपट आले होते. या महोत्सवाने भारतीय चित्रपटांच्या प्रगतीची पायाभरणी केली.

स्वातंत्र्यापूर्वी ज्या स्टुडिओ व्यवस्थेची पायाभरणी झाली होती, ती आजही खूप यशस्वी ठरली आहे. चित्रपटनिर्मिती करणा-या डझनाहून अधिक कंपन्या आज कोट्यवधींमध्ये, काही कंपन्या अब्जावधींमध्ये व्यवसाय करीत आहेत. स्टुडिओंच्या व्यावसायिकीकरणाचा विचार करता, त्याचा प्रारंभ स्वातंत्र्यापूर्वीच झाला होता. फेब्रुवारी १९३४ मध्ये हिमांशु रॉय यांनी बॉम्बे टॉकिजसाठी २५ लाख रुपये उभे करण्याच्या दृष्टीने शंभर रुपयांचे २५ हजार शेअर्स जारी केले होते. देविका राणी यांनी लिहिले आहे की, १९३५ मध्ये आम्ही मुंबईच्या मालाडमध्ये जेव्हा बॉम्बे टॉकिजची स्थापना केली होती, तेव्हा तो एका व्यापाराप्रमाणे चालविला. आमच्या कंपनीकडे अद्ययावत उपकरणे होती. बेल अँड हॉवेल कंपनीचे कॅमेरे होते आणि आरसीए ध्वनियंत्रणा होती. यापूर्वीही चित्रपट कंपन्या चित्रपटांची निर्मिती करीत होत्या; परंतु हिमांशु राय यांनी त्याला एक नवीन आयाम दिला. आज भारतीय चित्रपट उद्योग जगातील सर्वांत मोठ्या चित्रपट उद्योगांमध्ये समाविष्ट झाला आहे आणि तो निरंतर मजबूत होत चालला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या