25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeविशेषमुंगीच्या परिश्रमाची गोष्ट "वारूळ"

मुंगीच्या परिश्रमाची गोष्ट “वारूळ”

एकमत ऑनलाईन

जिद्द, एकी, चिकाटीची गोष्ट ‘वारूळ’. कठोर परिश्रमाचा विषय आला की, आधी आठवते ते मुंगी. शिस्त, परिश्रम आणि एकी ही मुंग्यांची खास वैशिष्ट्ये. अतिशय लहान असल्याने नगण्य वाटणा-या या कीटकाच्या परिश्रमाची कथा सांगणारी संजय ऐलवाड यांची ‘वारूळ’ ही बालकादंबरी मन वेधून घेते. कादंबरी वाचायला सुरुवात केली की, हे एक रूपक आहे हे प्रकर्षाने जाणवते. पर्यावरणात सातत्याने होणारे बदल, त्याचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम तर आपण दैनंदिन जीवनात अनुभवतोच आहोत. या सगळ्याचा मुंग्या, मुंगळे, कोळी, चिरका, खपल्या, अळ्या, वाळव्या, गांडूळ, गोगलगाय यासारखे अनेक कीटक आणि चिमणी, कावळा, मोर, ससा, बदक, सुतारपक्षी, टिटवी, साळुंकी अशा अनेकानेक पक्ष्यांवरसुद्धा होणारे परिणाम आपल्या लक्षातही येत नाहीत. या बालकादंबरीने तिकडे आपले लक्ष वेधले आहे.

माणसाने केलेल्या भौतिक प्रगतीने मानवी जीवन सुस होते आहे. परंतु परिणामस्वरूप पर्यायाने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होताना आपण पाहतो. त्याचे परिणामही आपण भोगतो. माणसासारखा हाती-पायी धडधाकट असलेला प्राणीसुद्धा पर्यावरणाच्या -हासाचे परिणाम भोगत असताना त्रासून जातो, तर मुंग्या आणि तत्सम कीटकांची काय अवस्था होत असणार हे या कादंबरीतून स्पष्टपणे समोर येते.

संजय ऐलवाड यांनी या कादंबरीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. त्यासाठी मुंग्या-मुंगळे हे माणसांच्या तुलनेत क्षुद्र असलेले कीटक माध्यम म्हणून निवडले आहेत. याचे फार विशेष वाटले. जणू इतक्या लहानशा कीटकांनाही ते समजणे आणि तोडगा काढणे जमते, तर माणसालाही ते जमू शकते किंवा जमलेच पाहिजे. हे त्यांनी सूचित केले आहे. उन्हाने वारूळ तापते. तलखी होणे, अन्न-पाणी साठा संपणे या सगळ्या समस्या मानवी जीवनात येतात. तशा मुंग्यांच्या वारूळातही निर्माण झाल्या आहेत. समर्थ नेतृत्व सांभाळणारी राणी मुंगी त्यासाठी पर्यावरणात हे बदल का झाले याचा शोध घेणे आवश्यक आहे. हे समजून आधी या बदलाचे कारण शोधायला सांगते. आधी समस्यांच्या निर्मितीचे कारण व नंतर उपायाचा विचार हे अतिशय सुसंगत सूत्र राणी मुंगीने या कादंबरीत वापरले आहे.

या शोधासाठी निघालेल्या मुंग्यांना येणारे अनुभव, अडचणी, त्यांना होणारे श्रम, येणारी संभाव्य संकटे (विशेषत: रस्त्यावरची वाहतूक) हे वारूळात राहिलेल्यांना त्यांची वाटणारी काळजी या सगळ्या गोष्टी वाचताना त्या मानवी आहेत असे वाटते. म्हणून ही कादंबरी मला रूपक वाटते. जिद्द-चिकाटी आणि एकी ही मुंग्यांची ओळख आहे. त्याला अनुसरून तापमान का वाढले याचा शोध घेण्याचे काम पाच मुंगळे करायला निघतात. त्याचे उत्तर शोधतात. या तपासाचे अतिशय समर्पक आणि विस्तृत वर्णन तपशीलवारपणे कादंबरीत येते. ते रंजक आहे. वाढते तापमान रोखणे हे फार मोठे काम आहे. मात्र आपल्या एकीच्या ताकदीपुढे कोणतेच काम मोठे नाही हे राणी मुंगी समजावून सांगते. या इतक्या प्रयत्नांनंतर राणी मुंगी आणि तिच्या वारूळातल्या मुंग्या-मुंगळे कसे यशस्वी होतात हे वाचणे आनंददायी आहे.

वारूळ (बालकादंबरी)
संस्कृती प्रकाशन, पुणे.

-सुनंदा गोरे
मोबा. ९८२३० ६८२९२

हिंगोलीत रस्त्यावरून फिरणा-या रिकामटेकड्यांची कोविड चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या