31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeविशेषमाणुसकीची परीक्षा!

माणुसकीची परीक्षा!

केंद्र सरकारने विविध राज्यांना पुरविलेल्या लसींच्या दि. ८ एप्रिल रोजीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास केंद्राचा दुजाभाव स्पष्ट दिसतो. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या १२ कोटी तर रुग्णसंख्या पाच लाखांपेक्षा जास्त आणि लसी केवळ साडेसात लाख देण्यात आल्या. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २३ कोटी, रुग्ण ३१ हजारांच्या आसपास पण लसी ४० लाख देण्यात आल्या. गुजरातची लोकसंख्या ६ कोटी, रुग्ण १९ हजारांच्या घरात आणि लसी ३० लाख, मध्य प्रदेशची लोकसंख्या ८ कोटी , २६ हजार रुग्ण आणि ४० लाख लसी. लोकसंख्येची घनता आणि लसीकरणाचा वेग यांची सांगड घातली तर महाराष्ट्राला जास्त प्रमाणात लसी मिळणे आवश्यक आहे.

एकमत ऑनलाईन

इतिहासाच्या पानांवर हर्षवर्धन या नावाला अतिशय मानाचे स्थान आहे. कनौजचा सम्राट हर्षवर्धन प्रजाहितदक्ष आणि दानशूर वृत्तीचा होता. थानेसर या दिल्ली आणि हरियाणाच्या सीमांवर वसलेल्या गावात त्याचा जन्म झाला. काही काळ त्याने तिथे राज्य केले असे म्हणतात. अगदी अंगावरची वस्त्रेदेखील त्याने दान केली असा बाणभट्टाने लिहिलेल्या त्याच्या चरित्रात उल्लेख आहे. योगायोगाने विद्यमान आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील दिल्लीचे आहेत. त्यांची मुळं हरियाणाची आहेत. त्यामुळे ते सम्राट हर्षवर्धनच्या पावलावर पाऊल ठेवत प्रजेच्या हितासाठी, त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत असताना डॉक्टर साहेब बंगालमधील निवडणुकांचे व्हीडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात व्यस्त होते. ७ एप्रिल २०२१ रोजी मंत्रिमहोदय अचानक अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आले आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणा सुस्त असून केवळ भ्रम व भीती पसरवित असल्याचा जावईशोध लावला आणि महान सम्राट हर्षवर्धनाचे नाव आणि वारसा मातीमोल केला.

महाराष्ट्रातच कोरोना का पसरला हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. याचे उत्तर त्यांना माहीतही असावे. कारण डॉक्टर हर्षवर्धन हे अतिशय प्रतिथयश संस्थेतून शिकले आहेत. त्यांची वैद्यकीय अभ्यासातील गतीही विलक्षण आहे. जरी त्यांची वैद्यकीय पदवी त्यांना या प्रश्नाचे खरे उत्तर सांगत असली तरी ज्या पक्षामुळे ते आरोग्यमंत्री आहेत तो पक्ष त्यांना हे उत्तर ऐकण्याची व मान्य करण्याची परवानगी देत नाही का हा खरा प्रश्न आहे. ज्या विकासाचा पॅटर्न लोकांसमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्तेचा राजमार्ग प्रशस्त केला. त्या गुजरातपेक्षाही महाराष्ट्रात रोजगारासाठी येणा-यांची संख्या प्रचंड आहे आणि महाराष्ट्रात त्यांना तो मिळतो देखील हे तेवढंच खरं आहे. कोरोनाचा विषाणू पसरण्यासाठी लोकसंख्येची घनता हा सर्वांत मोठा निकष असून राज्यातील बहुतांश शहरं कोरोनाचा फैलाव वेगाने होण्यासाठी पोषक आहेत हे साधे सरळ उत्तर डॉक्टरांना ऐकायचे नाही का हा खरा मुद्दा आहे.

महाराष्ट्राचे लसीकरण समाधानकारक नाही असेही मंत्रिमहोदयांचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी मात्र वेगळीच माहिती सांगते. महाराष्ट्र सरकारने लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ८२ लाख २७ हजार २४८ एकूण लसी दिल्या आहेत. तर दोन्ही लसी मिळालेल्या व्यक्तींची संख्या राज्यात आज ८ लाख २९ हजार ४२ पेक्षा जास्त आहे. तर ७२ लाख ९८ हजार २०६ जणांना पहिला डोस मिळाला आहे. लसीकरणाचा हा वेग देशात सर्वाधिक असल्याचे स्वत: केंद्र सरकारचे आरोग्य खाते सांगते. डॉक्टर हर्षवर्धन यांना या आकडेवारीचा कदाचित विसर पडलेला असावा.

एनबीई ची कोरोनासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

लसींच्या गैरव्यवस्थापनाचा मुद्दा त्यांनी अधिक जोरकसपणे मांडला.कोणतीही लस ठराविक काळापर्यंत प्रभावी राहते. कोणत्याही लसीकरण मोहिमेत काही लसी खराब होतात हे गृहितच धरले जाते. ज्या राज्यांमध्ये अतिशय उत्तम नियोजन केल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला त्यातील उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या एकूण लसींपैकी सुमारे सात टक्के लसी खराब झाल्या. तर महाराष्ट्राचे हे प्रमाण देशात सर्वांत कमी म्हणजे केवळ साडेतीन टक्के एवढंच आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील शासकीय, प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेसह पोलिस व सर्वसामान्य नागरिक देखील या विषाणूच्या विरोधातील लढ्यात उतरले.

लोकसंख्येची घनता अधिक असताना व सुरुवातीच्या काळात या आजाराविषयी संभ्रमावस्था असताना देखील ग्राऊंड झिरोवर काम करणा-या डॉक्टर्स, परिचारिका व सपोर्टिंग स्टाफ यांनी प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन लोकांचे जीव वाचविले. त्यांच्या या समर्पणामुळेच महाराष्ट्रात अपेक्षित जीवितहानी होऊ शकली नाही. महाराष्ट्राच्या कोरोनाच्या प्रतिकाराबाबतच्या प्रयत्नांना मूर्खपणाचे प्रयत्न असे शेलके विशेषण लावून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केवळ या कोरोना योद्ध्यांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांनीही या संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक होते. राजकारणासाठी अनेक विषय आणि प्रसंग येतात पण जेव्हा जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो अशा वेळी मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येऊन त्याचा सामना करायला हवा.

ही स्व. यशवंतराव चव्हाण यांनी शिकविलेली नैतिकता राज्याच्या सामाजिक व राजकीय अवकाशातून हद्दपार होतेय का अशी शंका महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यामुळे येऊ लागली आहे. एकाही नरपुंगवाने केंद्राकडे राज्यासाठी मदतीची मागणी केलेली नाही, हे देखील तेवढंच खरं आहे. परंतु महाराष्ट्रात जरी कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झाला आणि त्यामुळे सर्वाधिक बळी महाराष्ट्रात गेले असले तरी एका मोठ्या संकटाचा प्रतिकार करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला हे तथ्य केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विविध आकडेवारींत सहज दिसतेय. या परिस्थितीत महाराष्ट्राची उणी-दुणी काढून लसींबाबत अडवणूक करण्याचे धोरण केंद्र सरकार का स्वीकारत आहे याचे उत्तर कुणीही सांगू शकेल. राज्यातील महाविकास आघाडीत आरोग्यखात्याची जबाबदारी राजेश टोपे सांभाळत आहेत. त्यांच्या एकंदर समर्पण वृत्तीबाबत अगदी विरोधक देखील आक्षेप घेत नाहीत.

आई मृत्युशय्येवर असतानाही राजेश टोपे कोरोनाच्या महासंकटाचा सामना करण्यासाठी २४ तास कार्यरत होते. अगदी दुस-या लाटेतही त्यांनी आतापर्यंत अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. मर्यादित निधी, केंद्राकडून येणारी अपुरी औषधे व सातत्याने होणारी अडवणूक अशा तिहेरी संकटांचा ते सामना करीत आहेत. केंद्र सरकार आजही महाराष्ट्राच्या वाट्याचा जीएसटीचा संपूर्ण परतावा देण्यास तयार नाही. त्या पैशांतून राज्य सरकार कोरोनाशी लढण्यात आणखी प्रभावी यंत्रणा उभारू शकते. ही अशी संकटं शतकांतून एखादी येतात. अशावेळी राज्यकर्त्यांच्या कौशल्याचा कस तर लागतोच पण त्यांच्या माणुसकीचीही परीक्षा होत असते. केंद्रातील सरकार दोन्ही परीक्षांमध्ये नापास होताना दिसतेय असे खेदाने म्हणावे लागेल.

गिरीश अवघडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या