22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeविशेषख्याल गायकीचे अजरामर स्वर

ख्याल गायकीचे अजरामर स्वर

शास्त्रीय संगीतातील महान गायक आणि बनारस घराण्याशी संबंधित असणारे राजन मिश्र यांचे नुकतेच निधन झाले. ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचा अवीट स्वर गंगेच्या काठावरच नाही तर आसमंतात घुमतराहील. आकाशवाणीच्या नोकरीतून राजन यांची गायकी श्रोत्यांपर्यंत पोचली. १९७८ मध्ये श्रीलंकेत त्यांनी पहिला कार्यक्रम केला होता. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड, संयुक्त रशिया, सिंगापूर, कतार, बांगलादेशसह जगभरातील अनेक देशांतील रसिक श्रोत्यांना आपल्या गायकीने त्यांनी मंत्रमुग्ध केले. ते कधीही प्रसिद्धी आणि पुरस्कारामागे धावले नाहीत. आपल्या गायकीचे खरे परीक्षक श्रोतेच आहेत, असे पंडितजी मानत.

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या दुस-या लाटेने आरोग्य यंत्रणा हतबल झाल्या असून या लाटेत सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच अनेक असामान्य व्यक्तिमत्त्वेदेखील आपल्यापासून हिरावली जात आहेत. काही दिवसांपूर्वी पद्मभूषण सन्मानाने गौरवलेले प्रख्यात गायक राजन मिश्र यांचे कोरोनामुळे निधन झाले. अनेक प्रयत्न करूनही त्यांना व्हेंटिलेटर मिळू शकले नाही आणि त्यांचा श्वास थांबला. दिल्लीच्या सेंट स्टिफन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ट्विटरवर काही जणांनी त्यांच्यासाठी एक बेड आणि ऑक्सिजनची मागणी देखील केली होती. आयएएस अधिकारी संजीव गुप्ता यांच्या प्रयत्नांनंतर पंडित राजन मिश्र यांना सेंट स्टिफन्स रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. चारशे वर्षांची परंपरा असलेल्या ख्याल गायकीचे वारसदार असणा-या पंडित राजन मिश्र यांचा बुलंद आवाज अमर आहे. आता राजन-साजन यांची जुगलबंदी भविष्यात कधीही दिसणार नाही.

शास्त्रीय संगीतातील महान गायक आणि बनारस घराण्याशी संबंधित असणारे राजन मिश्र आता आपल्यात नाहीत. मात्र त्यांचा स्वर गंगा नदीच्या काठावरच नाही तर आसमंतात घुमतराहील. पण आता राजन-साजन यांची जोडी तुटली आहे. त्यांची ओळखच प्रामुख्याने जुगलबंदीच्या रूपातून झाली होती. बनारस हे भारतीय संगीत परंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र राहिले आहे. एकीकडे राग ख्याल तर दुसरीकडे लोकसंगीत. याचाच अर्थ असा की बनारस घराणे हे विविध संगीत परंपरांचे मिश्रण राहिले आहे. राजन मिश्र हे या परंपरेचे मोठे वारसदार होते. राजन-साजन मिश्र यांनी भारतीय संगीत परंपरेला एका उंचीवर नेले. त्यांनी सतत पाच दशकं अवीट जुगलबंदींद्वारे रसिकांना मोहित केले. सुमारे १५६ रागांना आपला आपला आवाज दिला आहे.

राजन मिश्र यांनी आपल्या जीवनकाळात भारतीय शास्त्रीय संगीताला नवा अध्याय जोडला. ख्याल गायकीला त्यांनी एक नवीन ओळख करून दिली. अकबराच्या काळापासून ख्याय गायकीची सुरू असलेली परंपरा ही नव्या सुरांनी बांधली गेली. कारण ख्यालचा अर्थच नवीनवीन सूर जोडणे होय. चार ओळींना नव्या शैलीने सादर करण्याबरोबरच एका मर्यादेत प्रयोग करण्यास पूर्ण मुभा दिली जाते. त्याचाच प्रयोग मिश्र बंधूंनी केला आणि ख्यालला लोकप्रियता मिळवून दिली. शास्त्रीय संगीतातील या बेमिसाल जोडीने आपल्या कर्णमधुर आवाजाने वाराणसीच्या संगीत परंपरेला मोठे वैभव मिळवून दिले.

राजन मिश्र यांचा जन्म १९५१ मध्ये झाला. आजोबांचे भाऊ रामदास मिश्र आणि वडील हनुमान प्रसाद मिश्र यांच्याकडून अगदी लहान वयातच त्यांना गायकीचे धडे मिळाले. त्यांचे काका गोपालप्रसाद मिश्र हे प्रसिद्ध सारंगीवादक होते. त्यांच्याकडूनही त्यांना संगीताचे धडे मिळाले. सुमारे पाच दशकांपासून त्यांचे नाव भारतीय शास्त्रीय संगीतात दबदबा निर्माण करणारे राहिले आहे. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवातही त्यांची हजेरी असायची. त्यांच्या सुरेल गायनाने हजारो श्रोते तल्लीन होऊन जायचे. राजन मिश्र यांना १९७१ मध्ये पंतप्रधान संस्कृत पुरस्कार, १९९४-९५ मध्ये गंधर्व सन्मान आणि २००७ मध्ये दोन्ही भावांना पद्मभूषण सन्मान देऊन गौरविण्यात आले. या गायकद्वयीचे २० हून अधिक अल्बम आले. ४०० वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला हा संगीताचा वारसा राजन मिश्र यांचे चिरंजीव रितेश आणि रजनीश पुढे नेत आहेत. राजन मिश्र यांचा विवाह पंडित दामोदर मिश्र यांची कन्या बीना यांच्याशी झाला होता.

विनाकारण सलाईन लावून रुग्णांची लूट

मिश्र बंधूंची गायकी वारशाने आली आहे. त्यांनी बनारसच्या संकटमोचक मंदिरातून युगल गायकीला प्रारंभ केला. त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. वारशाचा प्रभाव आणि नवीन प्रयोग करून दाखवण्याच्या इच्छेने राजन मिश्र महान गायक बनले. ब्रज, हिंदी आणि अवध यावर त्यांची पकड होती. मिश्र बंधू गायन करत असताना वातावरणात एक वेगळेच चैतन्य पसरायचे. शब्द त्यांच्या अवीट सुरात बांधले जात आणि ते श्रोत्यांना भारावून टाकत असत. बनारसहून दिल्लीत पोचल्यानंतर त्यांच्या गायनाला नवी व्याप्ती मिळाली. आकाशवाणीच्या नोकरीतून त्यांची गायक श्रोत्यांपर्यंत पोचली. १९७८ मध्ये श्रीलंकेत त्यांनी पहिला कार्यक्रम केला होता. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड, संयुक्त रशिया, सिंगापूर, कतार, बांगलादेशसह जगभरातील अनेक देशांतील रसिक श्रोत्यांना आपल्या गायकीने त्यांनी मंत्रमुग्ध केले. ते कधीही प्रसिद्धी आणि पुरस्कारामागे धावले नाहीत. आपली गायकीच आपली ओळख आहे, असे ते मानत. आपल्या गायकीचे खरे परीक्षक श्रोतेच आहेत, असे पंडितजी मानत. जसे मानवाचे शरीर पाच तत्त्वांनी तयार झाले आहे तसेच संगीत देखील सात सूर ‘सारेगमपधनी’, पशू-पक्ष्यांच्या आवाजांनी तयार झालेले आहेत, असे ते मानत.

पंडित राजन आणि साजन हे गायकीला बसले की त्यांचा पांढरा शुभ्र पोशाख आणि सात्विक भावाचा प्रभाव समोरील श्रोत्यांवर पडत असे. प्रत्यक्षात त्यांचे गायन सुरू झाल्यावर बनारस घराण्याचे दीपवून टाकणारे दर्शन व्हायचे. त्यांच्या कंठातील ओजस्वी सुरांनी रंगणारा ख्याल म्हणजे स्वर्गीय अनुभूती देणारा क्षण ठरायचा. साधारणपणे शास्त्रीय गायनात एकल गायन ऐकण्याची सवय, मात्र मिश्र बंधूंनी कायमच सहगायन केले. वाद्यवादनात बहुतांश वेळा जुगलबंदी चालते, तसे त्यांचे गायन नव्हते. दोन देह असले तरी स्वर मात्र एकरूप झालेला असायचा. हे अनोखे दर्शन श्रोत्यांना घडायचे. बनारस घराण्याशी निगडीत असलेले राजन मिश्र यांचे निधन हे कला आणि संगीत जगतासाठी मोठी हानी आहे. त्यांचे स्वर आपल्या कानावर पडत राहतील, त्यांची धून सर्वत्र ऐकली जाईल आणि आठवणींना उजाळाही मिळत राहील. मात्र ते आता कधीही व्यासपीठावर गायकी करताना दिसणार नाहीत. पण बनारसच्या घाटांवर गंगा नदीतील जलाप्रमाणेच त्यांच्या स्वररंगाचे तरंग उमटत राहतील.

शैलेश धारकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या