22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeविशेषप्रतीकात्मतेचे ‘सत्य’

प्रतीकात्मतेचे ‘सत्य’

एकमत ऑनलाईन

मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणादरम्यान केवळ निदर्शक म्हणून मंगळसूत्राचा उल्लेख केलेला असताना अनेक माध्यमांनी पत्नीने मंगळसूत्र न घालणे ही क्रूरता असे न्यायालयाने म्हटले असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. वास्तविक हे चुकीचे वार्तांकन आहे. प्रत्यक्षात न्यायालयाने असे कुठेही म्हटलेले नाही. तसेच हिंदू विवाह कायद्यामध्येही कुंकू, टिकली, मंगळसूत्र यांसारख्या प्रतीकांना कुठेही स्थान नाहीये. परंतु आपल्याकडील पुरुषप्रधान व्यवस्थेने महिलांसाठी अशा नियमांचे, प्रतिकांचे प्रचंड अवडंबर माजवले आहे. वास्तविक, विवाहसंस्थेचा पाया हा अशी प्रतीके नसून परस्परातील विश्वास हा आहे हे मर्म समजून घेतले पाहिजे.

मद्रास उच्च न्यायालयाच्या न्या. व्ही. एम. वेलुमणी आणि न्या. एस. सौथर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दिलेल्या एका निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम करणा-या सी. शिवकुमार आणि त्यांची पत्नी श्रीविद्या यांच्या घटस्फोटासंदर्भातील हे प्रकरण होते. शिवकुमार यांनी श्रीविद्यापासून घटस्फोटासाठी स्थानिक कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता; परंतु तिथे तो फेटाळण्यात आला. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देणारी याचिका त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधिशांनी शिवकुमार यांना घटस्फोट मंजूर केला; परंतु न्यायालयातील विवेचनादरम्यान न्यायाधिशांनी मंगळसूत्राचा उल्लेख केल्यामुळे अनेक माध्यमांनी हा घटस्फोट पत्नीने मंगळसूत्र न घातल्याच्या कारणामुळे मंजूर केला असा चुकीचा अर्थ काढला. पत्नीने गळ्यात मंगळसूत्र न घालणे ही क्रूरता आहे किंवा पत्नीने पतीसोबत केलेल्या मानसिक क्रूरतेचा कळस आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिल्याचे वृत्तांकन प्रसिद्ध केले. वास्तविक, घटस्फोटाचे मुख्य कारण मंगळसूत्र असल्याचे न्यायालयाने कुठेही म्हटलेले नाही. मुळात हे प्रकरण हिंदू विवाह कायद्याशी संबंधित आहे. हिंदू मॅरेज अ‍ॅक्टनुसार कोणत्याही विवाहाला कायदेशीर अधिमान्यता मिळण्यासाठी सर्वांत पहिला निकष वयाचा आहे. त्यानुसार मुलाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्या दोघांचीही परस्परांशी विवाहाला संमती असणे गरजेचे आहे.

सप्तपदी हा विवाह संस्कारातील एक भाग असलेला विधीही यामध्ये महत्त्वाचा मानला गेला आहे. यापलीकडे जाऊन पत्नीने कुंकू लावणे, टिकली लावणे, साडी नेसणे, मंगळसूत्र घालणे यांसारख्या गोष्टी केवळ प्रतीकात्मक आहेत. कायदेशीर दृष्ट्या त्या आवश्यक मानल्या गेलेल्या नाहीत. त्या सर्वथा लोकपरंपरेतून, धार्मिकतेतून पुढे आलेल्या आहेत. किंबहुना, त्या आवडी-निवडीशी संबंधित आहेत. परंतु समाजव्यवस्थेने त्याचे इतके अवडंबर केले की आज ही प्रतीके अत्यावश्यकच आहेत, असा समज दृढ झाला आहे. वास्तविक, पत्नीने मंगळसूत्र घालणे अथवा न घालणे यावर त्यांच्या नात्याचे टिकणे अथवा न टिकणे अवलंबून नसते. विवाहसंस्थेचा पाया पती-पत्नींमधील विश्वास, प्रेम आणि एकमेकांना समजून घेणे हा असतो. तो डळमळीत होऊ लागतो तेव्हा या नात्यामध्ये समस्या उद्भवतात. शिवकुमार आणि श्रीविद्या यांच्याबाबतीत नेमके हेच घडले.

श्रीविद्याला शिवकुमारचे विवाहबा संबंध आहेत, असा संशय होता. हा संशय इतका बळावत गेला की तिने शिवकुमार काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन बरेचदा वादविवाद केले. शिवकुमार जिथे काम करतो तिथल्याच महिलेशी त्याचे विवाहबा संबंध आहेत, असा आरोप ती सातत्याने करत होती. तिच्या या संशयाला कंटाळूनच शिवकुमारने घटस्फोटाचा निर्णय घेतला. मद्रास उच्च न्यायालयात हे प्रकरण आल्यानंतर न्यायाधिशांनी सर्व प्रकरण समजून घेतले. वास्तविक, पतीचे विवाहबा संबंध आहेत असा दावा करत असताना तिच्याकडे कसलेही पुरावे नव्हते. या संबंधांबाबत कशी माहिती झाली याविषयीही ती काहीच सांगत नव्हती. तसेच तिने कुणाचे नावही घेतले नाही.

साहजिकच, अशा बिनबुडाच्या संशयातून उद्विग्न होऊन नव-याच्या ऑफिसमध्ये जाऊन वाद घालणे अयोग्य आहे. तसेच तिच्या या सर्व प्रकारामुळे शिवकुमारला मान खाली घालावी लागली होती. ही बदनामी त्याच्यासाठी लाजिरवाणी होती. त्यामुळेच श्रीविद्याची ही वर्तणूक मानसिक क्रूरता आहे, अशा आशयाची टिप्पणी न्यायालयाने केली. श्रीविद्याने विवाहाच्या वेळी घातलेले मंगळसूत्रही काढल्यामुळे तिलाही हे नाते मान्य नाहीये, असे मानले गेले. त्यानुसार न्यायालयाने या घटस्फोटाला मान्यता दिली. म्हणजेच केवळ पत्नीने मंगळसूत्र काढून टाकले म्हणून न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केलेला नाही. तसेच पत्नीने मंगळसूत्र काढून टाकणे ही मानसिक क्रूरता आहे, असे कुठेही न्यायालयाने म्हटलेले नाही. ती बाब केवळ एक निदर्शक म्हणून नमूद केली आहे. हा मतितार्थ लक्षात न घेता न्यायालयीन निवाड्याचा माध्यमांकडून चुकचा अन्वयार्थ लावला गेला. ही बाब खूप गंभीर आहे. वास्तवाचे सत्यकथन करणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. अन्यथा समाजाचे नुकसान होऊ शकते. अनेकदा न्यायालयामध्ये माध्यमातील वृत्तांचा दाखला देऊन केसेस उभ्या केल्या जातात. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवल्या जाणा-या माध्यमांनी वार्तांकन करताना आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सनसनाटी निर्माण करण्यासाठी उथळपणाने वार्तांकन केले जाता कामा नये. त्यामुळे ‘काळ सोकावू शकतो’.

या प्रकरणाच्या निमित्ताने स्रियांसाठी समाजात असणा-या अलिखित नियमांच्या दडपणाविषयीही बोलले गेले पाहिजे. विवाहित महिलेने कुंकू लावलेच पाहिजे, कपाळावर टिकली असलीच पाहिजे, तिने मंगळसूत्र घातलेच पाहिजे, साडीच नेसली पाहिजे अशा अनेक नियमांचा बोजा समाजाने महिलांवर टाकला आहे आणि वर्षानुवर्षापासून महिला त्यानुसार आचरण करत आहेत. कारण व्यवस्थेने तिला गृहित धरले आहे. यामध्ये तिला काय हवंय याचा विचारच केला नाहीये. वटसावित्रीची पूजा, उपवास या सर्व गोष्टींमध्येही महिलेने काय करायचे यासाठीच नियमांची जंत्री दिसते. हे नियम पुरुषप्रधान व्यवस्थेतून आलेले आहेत. कायद्यात तसे कुठेही म्हटलेले नाही. विशेष म्हणजे स्रियांसाठी ही नियमांची चौकट ठरवताना पुरुषांसाठी कसलेच नियम नाहीयेत. विवाहित पुरुषाचा पोषाख कसा असला पाहिजे, त्याचे केस कसे असले पाहिजेत, त्याने विशिष्ट दागिना घातलाच पाहिजे असा एकही नियम समाजात दिसून येत नाही. समानतेचे तत्त्व स्वीकारलेल्या समाजात हा दुजाभाव किंवा विसंगती का? सर्व नियम बायकांसाठीच का? क्षणभरासाठी त्यातील परंपरेचा भाग मान्य केला तरी ही प्रतीके न मानणा-या किंवा न वापरणा-या महिलांना विवाहाचे नाते मान्य नाही असा अर्थ का काढला जातो.

सरसकटपणाने हा न्याय लावणे आणि अशी प्रतीके नाकारणा-या स्रियांविषयी बरेवाईट बोलणे हे समाज म्हणून आपल्या बुरसटलेपणाचे लक्षण आहे. प्रत्यक्षात वैवाहिक आयुष्याचे यशापयश हे सर्वथा पती-पत्नी यांच्यात परस्परांवर असणा-या विश्वासावर आणि प्रेमावर अवलंबून असते. तिथे प्रतीके दुय्यम असतात. पण आपण प्रतिकात्मतेलाच अधिक महत्त्व देतो. प्रतीकांचे पालन करताना जर विश्वासाचा अभाव असेल तर ते नाते टिकणार नाही. याउलट प्रतीकांचे अवडंबर झुगारूनही जर विश्वासाचा पाया पक्का असेल तर विवाहाचे नाते चिरकाळ शाबूत राहील. हे मर्म समजून घ्यायला हवे. माझ्या मते, न्यायव्यवस्थेनेही याबाबत सजग राहणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही खटल्यामध्ये निकाल देत असताना न्यायाधिश जी टिप्पणी करतात त्याचा अन्वयार्थ काढून, तो संदर्भ घेऊन पुढील प्रकरणांमध्ये युक्तिवाद केले जातात. त्यामुळे न्यायाधिशांनीही टिप्पणी करताना अधिक सावधगिरीने आणि जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे. अन्यथा त्यातून समाजात चुकचा ंसंदेश जाण्याचा धोका असतो. आताच्या प्रकरणामध्ये न्यायाधिशांनी मंगळसूत्राचा उल्लेखच केला नसता तर चुकच्या वार्तांकनाला संधीच मिळाली नसती. त्यामुळे बुरसटलेल्या गोष्टी पुन्हा अधोरेखित करण्याऐवजी त्या काढून टाकण्याचा विचार झाला पाहिजे.

-अ‍ॅड. रमा सरोदे
कायदेतज्ज्ञ आणि स्रीप्रश्नांच्या अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या