22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeविशेष‘प्रदर्शनासाठी’चा उतावळेपणा

‘प्रदर्शनासाठी’चा उतावळेपणा

कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून त्यापासून अब्जावधींची उलाढाल असलेला बॉलिवूड उद्योगही अपवाद राहिलेला नाही. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून मल्टिप्लेक्सचे बंद झालेले दरवाजे अजूनही उघडलेले नाहीत. परिणामी दिग्गज कलाकारांचे मोठे चित्रपट प्रदर्शनासाठी सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. अर्थात कोविडचा संसर्ग कमी झाल्यास बॉलिवूडची मंडळी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी उतावीळ राहू शकतात. हीच घाई आर्थिक नुकसान करणारी ठरू शकते.

एकमत ऑनलाईन

कोविडमुळे मायानगरीचे काम थंडावले आहे. टॉकीजही बंद राहिल्याने हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी दक्षिणेत चित्रपटगृहे सुरू झाली आणि काही चित्रपट प्रदर्शितही झाले. परंतु दुस-या लाटेमुळे टॉकीजला पुन्हा टाळे लागले. आता ही मंडळी कोरोना कमी होण्याची वाट पाहत असून सध्याची चित्रपट प्रदर्शनाची रांग पाहता आगामी काळात बॉक्स ऑफिसवर मोठा मुकाबला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॉक्स ऑफिसच्या इतिहासात दोन चित्रपटांतील टक्कर क्वचितच पाहावयास मिळते. गेल्या काही दिवसांपासून दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरी त्याची धास्ती कायम आहे. कोरोना रुग्णांत घसरण होत असून अनेक राज्यांत लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक राज्यांनी व्यवहार पूर्ववत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. कोरोनामुळे बॉलिवूडला जबर दणका बसलेला असताना अनलॉकची प्रक्रिया ही दिलासादायक बाब ठरू शकते. एप्रिलमध्ये सर्व काम थांबले होते, परंतु आता काही ठिकाणी कोविडच्या प्रोटोकॉलचे पालन करत शूटिंग करण्यास मुभा दिली जात आहे. या आधारावर जुलै किंवा ऑगस्टपर्यंत टॉकीज सुरू होईल, असे चिन्हे आहेत.

अर्थात टॉकीज सुरू करण्याचा निर्णय हा अनलॉकच्या प्रक्रियेतील इनडोअर अ‍ॅक्टिव्हिटी गाईडलाईनवर अवलंबून आहे. टॉकीज कधी, केव्हा आणि कशा स्वरूपात सुरू होणार हे आताच सांगता येणार नाही. मात्र व्यवहार सुरळीत करण्याच्या प्रक्रियेत टॉकीज सुरू होण्याच्या बाबीला बळ मिळत आहे. म्हणून काही निर्बंधांसह जुलैअखेरपर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी आशा बॉलिवूड बाळगून आहे. सुपरकॉप मूव्ही सूर्यवंशी (अक्षयकुमार), १९८३ च्या विजयावर साकारलेला ८३ (रणवीर सिंह), पीरियड ड्रामा शमशेरा (रणबीर कपूर), मारधाडपट केजीएम चॅप्टर २ (यश) आणि स्पोर्टस् बायोपिक झुंड (अमिताभ बच्चन) यासारखे मोठे चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. मार्व्हल आणि हॉलिवूडचे दुस-या बॅनरचे चित्रपट देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत आणि ते भारतीय बॉक्स ऑफिसवर देखील हिंदी चित्रपटापेक्षा सरस ठरू शकतात.

दुसरीकडे ब्रह्मास्त्र (रणबीर कपूर), गंगूबाई काठियावाडी आणि लालसिंह चढ्ढा यासारख्या चित्रपटाचे एक-दोन प्रसंग शूट करणे बाकी राहिले आहे. ते चित्रपट देखील तयार आहेत. त्यांची प्रदर्शनाची तारीख अगोदरच समोर आली आहे. परंतु मे महिन्यापर्यंत जे चित्रपट रिलिज होणार होते, त्यांना दुस-या लाटेच्या तीव्रतेमुळे आणि लॉकडाऊनमुळे तारीख पुढे ढकलावी लागली. यादरम्यान अभिषेक बच्चनचा बिग बूल आणि सलमान खानचा ‘राधे’ हे चित्रपट ओटीटीवर रिलिज झाले. काही लहानसहान बजेटचे चित्रपट एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीत ओटीटीवर आणण्यात आले.

जून महिन्यात ठरतील प्रदर्शनाच्या तारखा
भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकाच्या ऐतिहासिक कामगिरीवर बेतलेला ‘८३’ या चित्रपटाचे वेळापत्रक निर्मात्याने अगोदरच बदलले आहे. ‘सूर्यवंशी’चे प्रदर्शन देखील दुस-या लाटेमुळे पुढे ढकलले. पूर्वनियोजनानुसार ‘८३’ हा ४ जूनला रिलिज होणार होता. परंतु सध्याच्या काळात हा चित्रपट इतक्यात प्रदर्शित होईल, असे वाटत नाही. निर्मात्यांनी देखील प्रदर्शनाबाबत ठोस मत मांडलेले नाही. सध्या ही मंडळी टॉकीज सुरू होण्याची वाट पाहत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरकारच्या गाईडलाईननुसार प्रदर्शनाची तारीख निश्चित होऊ शकते.

नव्या वेळापत्रकामुळे प्रदर्शनाचे गणित बिघडेल
टॉकिजमध्ये प्रदर्शनाची वाट पाहणा-या चित्रपटांची संख्या पाहता आगामी काळात बॉक्स ऑफिसवर मोठ्या बॅनरमध्ये जोरात टक्कर होऊ शकते. जनजीवन पूर्वपदावर येत असेल तर निर्मात्यांचा आग्रह देखील टॉकीजमध्येच चित्रपट रिलिज व्हावा असाच असेल. जुलैमध्ये टॉकीज सुरू झाल्या नाहीत तर शमशेरा, केजीएफ, झुंड, गंगुबाई काठियावाडी, शेरशाह यांना आपल्या तारखा पुढे ढकलाव्या लागतील. हे चित्रपट एकाच महिन्यात कमी-जास्त अंतराने प्रदर्शित होऊ शकतात. सप्टेंबर ते डिसेंबर या काळात दसरा आणि दिवाळी तसेच ख्रिसमस आहे. त्यामुळे डझनभर चित्रपट या काळात प्रदर्शनाच्या वाटेवर राहू शकतात.

सर्वच चित्रपट बिग बजेट
ऑक्टोबरमध्ये दस-याचा विकेंड आणि त्या काळातच तीन मोठे चित्रपट धाकड, आरआर आणि मैदान, नोव्हेंबरमध्ये गोलमाल-५, रक्षाबंधन, पृथ्वीराज, भूलभूलैय्या-२ आणि डिसेंबरमध्ये ब्रह्मास्र, लालसिंह चढ्ढा रिलिज होण्याची शक्यता आहे. सर्वच चित्रपट मोठ्या बजेटचे आणि बड्या कलाकारांचा भरणा असणारे आहेत. काही राज्यांतील लॉकडाऊनमुळे जुलैपर्यत प्रदर्शित होणा-या चित्रपटांचे शेड्यूल पुढे जाऊ शकते. म्हणून बॉक्स ऑफिसवर दे दणादण होऊ शकते. स्वाभाविकच ही स्थिती व्यापाराच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणता येणार नाही. ज्या प्रोजेक्टचा इथे उल्लेख केला जात आहे, तेथे प्रचंड पैसा गुंतवण्यात आला आहे. एवढेच नाही तर चांगली स्थिती असतानाही चित्रपटगृहात प्रेक्षक येतील की नाही, ही शंका आहे. बॉक्स ऑफिसवरचा संघर्ष हा आर्थिक आघाडीवर नुकसानकारक ठरू शकतो.

दोन चित्रपटांतील अंतर गरजेचे
बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्यासाठी चांगल्या चित्रपटांना किमान दोन आठवड्यांचा कालावधी हवा असतो. रिलिज ट्रेंड पाहिल्यास कोणत्याही महिन्यात सामान्यरूपाने दोन बड्या चित्रपटांतील अंतर तीन ते चार आठवडे ठेवले जाते. कारण अधिकाधिक स्क्रीन मिळावेत आणि एकमेकांचे नुकसान होऊ नये, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. बॉक्स ऑफिसच्या इतिहासात दोन मोठे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होण्याचा योग कमीच आला आहे.

ओटीटीचा मार्ग कितपत स्वीकारणार
कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखा मागेपुढे होत आहेत. एवढेच नाही तर काही जण आपले नुकसान वाचवण्यासाठी टॉकीज आणि ओटीटी असे दोन्ही पर्याय पाहत आहेत. सलमान खानने नुकताच आपला चित्रपट प्रदर्शित केला. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘राधे’चा व्यवसाय हा फायदेशीर राहिला आहे. स्पॉटबॉयच्या एका अहवालानुसार अक्षयकुमारचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय जून महिन्यात होऊ शकतो. परंतु सरकारने जुलैपर्यंत टॉकीजला टाळे कायम ठेवले तर कदाचित तो चित्रपट ओटीटीवर झळकू शकतो. परंतु एक गोष्ट निश्चितच की काही चित्रपट ओटीटीवर गेले नाहीत तर बॉक्सऑफिसवर एकाचवेळी चित्रपट प्रदर्शनाचा हट्ट हा ‘घाटे का सौदा’ राहू शकतो.

सोनम परब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या