22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषगावाकडचा बैल पोळा

गावाकडचा बैल पोळा

एकमत ऑनलाईन

आम्ही लहान असताना पोळ्याची लय मज्जा! ‘पंचमीची लाही अन् पोळ्यानं केली घाई!’ या झोक्यावरच्या गाण्यानं सुरू व्हायचा पोळा! पोळा आला हे लगेच कळायचं, कारण बुजुर्ग लोकांच्या एका हातात पांढ-या-रंगीबेरंगी सुताची बंडलं अन् दुस-या हातात सूत कातायचं भिरभिरं म्हणजे भेरा असायचा. पाऊस पडल्यामुळं वावरात वळाण्या नसायच्या. सगळे शेतकरी दुपारी बैल चारून आले, की वाटेवर लांबच्या लांब सुताचे बंडलं घेऊन चाळवीत आणि सुताचा गुंता काढून भे-यावर कातून, घट्ट पीळ देऊन गुंडाळून ठेवत. भे-यावर कातलेल्या त्या रंगीबेरंगी सुताचा बैलांचा साज जसं यसनी, गोंडे, मथाट्या, सर, कासरे आणि मोहरक्या करायचा कार्यक्रम सुरू व्हायचा. हे सर्वच शेतक-यांना जमायचं नाही. दादा रात्ररात्र जागून लोकांच्या बैलांचे साज करून द्यायचे. तो काळच वेगळा होता.

माणसं परिस्थितीनं गरीब होती पण मनानं श्रीमंत होती. एकमेकांना एकमेकांसाठी वेळ होता. माणसांना प्राण्यांसाठी वेळ होता आणि प्राणीही माणसांना जीव लावायचे अगदी माणसासारखा! गावाकडचा पोळा तसा तीन दिवसांचा सण! आदल्या दिवशी खांदेमळन! एकाने बैल चारून-धुऊन आणायचे. माळावून येताना पळसाचे चार-दोन मुळं काढून, ते भाजून-ठोकून त्याचे बैलांना चौरं बनवायचे. एखादं लांब मूळ सापडलं, की दादा मला त्याचा चाबूक करून द्यायचा. तो काड्कन वाजायचा. तिकडं दुस-या दादानं नदीला जाऊन मोळ अन् पळसाचा पाचपाण्या डहाळा आणायचा. संध्याकाळी मोठ्या वाटीत गायीचं दूध-लोणी-हळद टाकून मोळ-डहाळ्यानं घट्ट कालवून घ्यायचं. मी, नामादादा, सुदादा, मुरलीदादा गोठ्यात जाऊन घट्ट दुधाने पिल्या-पाख-या, पदम्या-कंबळ्या या चार बैलांचे खांदे मळायचो. खांदे मळणाराला एकानं विचारायचं, ‘काय करायला?’ त्यानं खांदा मळत मळत ‘पिल्याचा खांदा मळायलो!’ असं उत्तर द्यायचं. असं तीन तीन वेळा झालं की, त्या बैलाचं नाव घेऊन त्याच्या कानात ‘आज आवतन, उद्या जेवायला आहे हो!’ असं जोरात सांगून सोबत नेलेली पितळेची परात त्या बैलाच्या कानात वाजवायची. खांदे मळणीचा जेवायचा बेतही विशेषच ! वरण-फळं, त्यावर घरचं तूप अन् सोबत गावरान मिरचीचा झणझणीत ठेचा! लय मज्जा यायची!

पहाटेपासूनच पोळ्याची लगबग सुरू व्हायची. माय-बाबा-भाबी घरची तयारी करायचे. वावरात जाऊन बाबा जू आणायचे. आम्हाला खंडोबा, मसोबा, मुंज्या, असराया, वावरातला खंडोबा या सगळ्या देवांना शेंदूर लावणे आणि नारळ फोडण्याचे काम! पोळ्याची खरी तयारी सुरू व्हायची दोन-अडीच वाजल्यापासून. आपापल्या गोठ्यासमोर लोकं बैल सजवायचे. स्वच्छ धुऊन आणलेले बैल मस्त दिसायचे ! शिंगं व्यवस्थित करून शेपूट-गोंडे करायचे. शिंगांना वारणीस अन् त्यावर रंगीबेरंगी बेगडं लावायचे. शिंगाला चौरं, शेंगुळे, नाडा-पुडी बांधायची, गळ्यात घागरमाळा, अन पाठीवर झुली. कुणीकुणी बैलांच्या शिंगात फिरते फुलं-फुगे लावायचे! पोळा म्हणजे बैलांचं लग्न ! बैलांच्या कपाळावर आरशाचे बाशिंग उठून दिसायचे. प्रत्येक बैल नवरदेवासारखा छान सजलेला! बैलाच्या पाठीवर हळदी-कुंकवाचे छापे मारायचे काम माय-भाबी करायच्या. तिकडं दारात एक बाज, त्यावर एक चादर टाकलेली, त्यावर काव-चुन्यानं रंगवलेलं जू अन् हारा-डेरा! सारवलेल्या घराच्या दोन्हींकडून काव-चुन्याचे ठिपके दिलेले! आत-बाहेर शेणामातीनं सारवलेलं घर अक्षरश: सजून जायचं. तिकडं सगळे बैलाच्या साजात गुंग. कामावरच्या सालगड्याला मालक नवे कपडे घ्यायचा.

सायंकाळी पाचपर्यंत सगळे लोक सजूनधजून, बाया-पोरं नटूनथटून तयार! बुजुर्ग लाल-पिवळे-पांढरे पटके (फेटे) बांधून पाटीलकीच्या थाटात पाराकडं यायचे. आम्ही बैल धरू द्या म्हणून रडायचो. गावातील मानकरी-पाटील आणि सर्वांचे बैल पाराच्या भोवताली आले की अक्षता वाटल्या जायच्या. बैलांचं लग्न सुरू व्हायचं. लोक जोरजोरात मंगलाष्टक म्हणायचे. पोस्टमास्तर बबनदा, उत्तमदा, नाजुकदा, आमचे मोठे राधोजीदादा, नामादादा मंगलाष्टकं म्हणायचे. शेवटी ‘आता सावध सावधान’ होऊन पोळा फुटायचा! बैल फिरवायला सुरुवात व्हायची. प्रदक्षिणा घालून दादा बैल दारात घेऊन यायचा, आम्ही शेपटीसारखे मागंच. माय-भाबी बैलांना आणि दादांना ओवाळायच्या. त्यात आमचाही नंबर लागायचा. बैलांच्या पायाची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा निवद खाऊ घालायचा. कधी-कधी एखादा बैल रुसायचा. पुरणपोळी खायचाच नाही. मग दादा हळूच त्याच्या पाठीवून हात फिरवून त्याची समजूत-रुसवा काढायचा! अन् आश्चर्य म्हणजे लगेच बैल निवद खायचा ! कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? बैलांना निवद खाऊ घालताना माय-बाबांचे डोळे भरून यायचे. त्यांना वाईट दिवसांची आठवण व्हायची.

सगळं भावनिक वातावरण व्हायचं. त्यानंतर मात्र आणखीच मज्जा यायची. आमच्या गावात पोळ्याच्या दिवशी सगळ्या गावात घरोघर जाऊन पाया पडायची प्रथा आहे. त्यात आम्ही लहान पोरंसोरं आघाडीवर. गावातल्या सगळ्या घरी पाया पडायला जायचं. घरातील बुजुर्ग स्त्री-पुरुष पाया पडलं की, लहान पोराला नारळाचा कुटका, मोठ्या माणसांना करदोडा द्यायचे. त्यात आम्ही बळंच करदोडा मागून घ्यायचो. कुणी द्यायचं तर कुणी, ‘चला पळा’ म्हणून काढून द्यायचे. हे पाया पडणं विशेष! कुणाचा रुसवा-फुगवा, भांडण झालं असलं किंवा बोलणं-भाषण बंद असलं तर आजच्या दिवशी सर्वांना माफ करून पुन्हा नव्यानं संबंध जोडले जायचे! पाया पडणं झालं की, आम्ही चार-पाच भाऊ अन् बाबा जेवायला बसायचो. चांगली भूक लागलेली असायची. पुरणपोळी आणि त्यावर गावरान तूप.. गप्पा मारत, हसत-खेळत मस्त जेवण व्हायचे. माय अन् भाबी आग्रह करू करू वाढायच्या. पुरणपोळीसारखं गोड वातावरण तयार व्हायचं. पोळ्याच्या दुस-या दिवशी नामादादा आणि गावातील पाच-पन्नास जण आपल्या बैलजोड्या वाईला गोरक्षनाथाच्या दर्शनाला घेऊन जायचे!

आज मागे वळून पाहताना सगळंच बदललंय ! ते जग अन् जगणं बरंच रिकामं-रिकामं झालंय ! सगळ्यांची घरं मजबूत-सिमेंटची झालीत, पण त्यातील माय-बाबा अन् मातीचा ओलावा संपलाय. गावाकडं आता माय-बाबा नाहीत. पट्कन गावाकडं पाय वळत नाहीत. पाणी भरपूर आहे पण सगळं कसं आटल्यासारखं झालंय. दोन मोठ्या दादांचा प्रवास केव्हाच थांबलाय. आता आम्ही केवळ पाचच आहोत. सगळ्यांना घरं आहेत, मात्र आपापल्या घरात दोघंच आपल्या लेकरांसोबत पुरणपोळी खात आहोत, पोळा मात्र नाही!
मनात आठवणींचे पक्षी, हळूच घिरट्या घालतात
येतील का पुन्हा ते दिवस?, स्वत:च स्वत:शी बोलतात
सगळं आहे पण ती पोळ्याची लगबग, धावपळ, तो काव-चुन्याचा, सारवणाचा सुगंध अन् ती नारळाची चव कुठंच शिल्लक नाही आठवणींशिवाय!

-प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये
सोनपेठ, जि. परभणी,
मो.: ९१५८० ६४०६८

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या